मुक्ता
मुक्ता


मुक्ता, मुक्ता आईने आवाज दिला.मुक्ता ही विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दापंत्याची जेष्ठ कन्या,दोघेही विठ्ठल भक्त म्हणून मुलीचे नाव मुक्ता. अजून तीन मुली आणि दोन मुले होती. काळ तसा फारच पूर्वीचा होता. मुक्ताला आताच अकरा वर्षे पूर्ण झाले होते.तिचे खेळण्याचे, बागडण्याचे वय होते,पण त्या काळी लग्न लवकर करायचे. आज मुक्ताला पाहायला मुलगा येणार होता. मुलगा कसला त्या व्यक्तीची पहिली पत्नी मृत झाली होती.मुलाचे नाव राजाराम मुलगा उंचापुरा, राजबिंडा होता.शिक्षण सातवी, त्या काळी सातवी शिक्षण पूर्ण म्हणजे शिक्षकाची पदवीच. राजाराम श्रीमंत घरातील होता,पण त्याने स्वतःच्या हिमतीवर जमीन, घर ,व्यवसाय असे सगळे मिळवले होते. एवढं सगळं जुळून आलेलं असताना कोण माघार घेईल.
मुक्ताच्या मागे अजून बाकीचे भाऊ- बहीण होते.म्हणून आईवडिलांनी होकार दिला.लग्न धुमधडाक्यात झाले.आता मुक्ता लग्न करून सासरी आली.राजाराम त्याकाळी सावकार,गावात मोठे दुकान आणि राजकारणी होता.त्यामुळे घरात दिवसभर लोकांची रेलचेल असायची. घरी कामाला नोकरचाकर होते,पण नाजूक, लहानग्या मुक्तावर शेती,घर दुकान अशी खूप सारी जबाबदारी होती.
आता मुक्ताच्या आयुष्यातील कष्टाला खरी सुरवात झाली,मुक्ता हळूहळू घरात रमली. दोघांचा संसार आता सुखाचा चालला होता. राजाराम चे कामानिमित्त बाहेर जाणे खूप होत असे. मागील सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी मुक्ताला कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सर्व हिशोब,व्यवसाय याविषयी सर्व माहिती सांगून ठेवली होती.हे सर्व करताना तिची रोजच तारेवरची कसरत व्हायची, तरीही चेहरा नेहमी हसत असायचा. मुक्ताला थोडीफार अक्षरांची ओळख होती. पण लग्नानंतर राजारामने मुक्ताला पाढे, मोडी लिपी, इंग्रजी अंक,शब्द सगळे काही हळूहळू शिकवले.अधूनमधून मुक्ताचे भाऊ यायचे, पण कामाच्या व्यापामुळे तिला माहेरी जायला जमायचे नाहीं. थोड्याच दिवसांत मुक्ता ,राजारामच्या संसारवेलीवर एक गोंडस फूल उमलले. सर्वाना आनंद झाला,त्याचे नाव कृष्णा त्याला खूपच लाडात वाढवले. राजारामच्या विरोधकांना त्याची श्रीमंती, नाव, भरभराटी पाहवत नव्हती.त्यामुळे त्यांनी कृष्णाला खाऊ मधून विष दिले.त्यामुळे कृष्णाचा सातव्या वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू झाला. हे पाहून मुक्ता आणि राजारामच्या डोक्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. दिवसामागून दिवस जात होते,,दोघेही दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होते.
पुढे जाऊन त्यांनी शेती, व्यवसाय यात प्रगती केली,काही दिवसांनी त्यांना एक मुलगा आणि खूप नवसाने एक मुलगी झाली.सर्व काही सुरू होते पण मुक्ताचे कष्ट कधीही कमी झाले नव्हते.तिने आतापर्यंत कधीही माहेर पाहिले नाही.त्यातच एकेदिवशी आई गेल्याचे समजले पण काही कारणाने ती जाऊ शकली नाही. मनातच दुःखाचा आवंढा गिळून गप्प राहिली. मुक्ताचे वय दिवसेंदिवस वाढत होते त्याचबरोबर तिची विठ्ठल भक्ती अन दानशूरपणाही वाढत होते.
सगळा संसार मुलावर सोपवून ती आता विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाली होती.तइ आपला दिवस काम, भजन, कीर्तन, मंदिरात होणे यात घालवत होती. राजरामनेही आता सत्तरी गाठली होती,अचानक त्याच्या पायाला दुखापत झाली,त्याने अंथरून धरले. मुक्ता राजारामची रात्रंदिवस सेवा करत होती.आता पती शिवाय आपले कसे होणार या विचाराने तिने धास्ती घेतली आणि तिलाही लकवा मारला.आता तिही अंथरुणात होती. हळूहळू राजारामची प्रकृती ठीक झाली,पण मुक्ताची अवस्था पाहून त्याने ही औषधे घेणे टाळले. थोड्याच दिवसात मुक्ता चालू फिरू लागली. पण औषधे नीट न घेतल्याने हळूहळू राजारामची तब्येत खालावली काही दिवसातच राजाराम मरण पावला.आता मुक्ताचे कसे होणार मोठा आधारस्तंभ गेला.
मुक्ताने आजपर्यंत अनेक दुःखे अनुभवली होती,प्रत्येकवेळी त्यातून ती सावरत होती. आयुष्याच्या उत्तरार्धात ती आता पूर्णपणे विठ्ठल भक्तीत लीन झाली होती. एकेकाळी सर्व गावाला अन्नधान्य, पाणी,कपडे सढळ हाताने दान करणाऱ्या मुक्ताला आज घोटभर चहा पिण्यासाठी पण सुनेच्या हाकेची वाट पाहायला लागायची. आजकाल मुक्ताचे खूपच हाल होत होते,परंतु तिने भक्तिमार्ग सोडला नाही. तिचे हाल भगवंतालाही पहावले नाहीत म्हणून की काय विठ्ठलाने ही तिला आपल्या जवळ बोलवले, एकेदिवशी झोपेतच मुक्ताने जगाचा कायमचा निरोप घेतला.अश्या सहनशील, कष्टाळू, दानशूर आणि प्रेमळ मुक्ताचा जीवनप्रवास अखेर थांबला.