फुकटखाऊ चिमण आण्णा
फुकटखाऊ चिमण आण्णा
या पंधरा घरांची एकता चाळीत एकटे चिमणराव जर सोडलेत ना तर अख्ख्या चाळीत नावाप्रमाणेच एकमेकांनमधे एकोपा होता.मात्र या चिमण आण्णांच्या जाचाला सारे चाळकरी कंटाळलेत,वैतागून सोडतो हा माणूस पण करणार काय किती सहण करायचं हो,त्यालाही काही मर्यादा असतात ना, सांगुनही हा चिमण्याआण्णा काही त्याच्या सवयी सोडत नाही. दरवर्षी साऱ्या चाळकऱ्यांनी, सणानिमित्त चाळीला रंगरंगोटी करून चाळ सजवायची आणि काय तासाभरात या चिमण्याने पाणाच्या पिचकाऱ्या मारून भिंती घाण करायच्या,विचारणा केली तर वरून म्हणतो कसा नुसत्या रंगवलेल्या भिंतीवर काहीतरी चित्र असायला हवे ना! म्हणून मी माझ्या मुखमंडलाद्वारे छानपैकी चित्र काढले काय!,आता बोला काय म्हणायचं या माणसाला. मुळरंग दिसेनासा होतो या चिमणरावच्या पिचकारीने,वर्षभर भिंती रंगत असतात.
त्यांच्या अशा वागण्याला जर कोणी अरेरावी केली की मग काय.चिमणराव लगेच आपल्या गळ्यातले मफलर झटक्यात माघे घेऊन कपाळावर आढी आणत भुवया ताणून
नाकापर्यंत चष्मा सरकवत,वाघासारखे मोठे डोळे करून समोरच्याला दम भरायचा,आणि हुज्जत घालायची.या चिमण आण्णाचा रूद्र अवतार पाहून समोरचाही बिचारा असल्या नालायक माणसाशी कशाला डोकेमारी करायची अशी स्वतःची समजूत काढून निघून जायचा.
खरतर चिमणराव हे निवृत्त शिक्षक,पण शिक्षकीपेशाला शोभेल असा एकही गुण त्यांच्यात नव्हता.त्यांच्या फडतूस वागण्यामुळे चाळीत त्यांच्या विषयी कोणीच चांगल बोलतं नसे.ते दिसले म्हणजे चाळकरी रस्ता बदलून घेत पण काय सवयीप्रमाणे रस्त्यात आडवा झाल्याशिवाय त्यांच समाधान होत नसे.आहो डोक्यात काळी टोपी,काळा कोट पाढंरे स्वच्छ धोतरं,एका हाता काठी दुसऱ्या हातात तपकीरची डबी,गळ्यात मफलर तोंडात पानाचा डुच्चा बगलेत पेपर,नाकापर्यंत आलेला चष्मा,ओठावर बारीक मिश म्हणजे चांगल्यालाही लाजवेल असा पेहरावा करून बिनकामची फुशारकी मारत फिरायचं पण कोणाशी चंगल बेलेल तर खरं छे मूळीच नाही. त्यांच्या फुकटखाऊ वागण्यामुळे सारे चाळकरी वैतागले होते.मारता येईना आणि बोलता येईना अशी गत चाळकऱ्यांची झाली होती.स्वतःच्या खिशातली एक दमडी खर्च न करता फुकटच कसं मिळेल या बाबतीत चिमणराव एकदम माहीर होते.चाळीतल्या प्रत्येकाच्या घरी वर्तमानपत्र यायचे त्यांच्यापर्यंत पोहण्याधीच आण्णा त्या पेपरवाल्या कडून सर्वांचे पेपर गोळा करून आधी स्वतः वाचायचे मग संध्याकाळी त्यांच्या पर्यंत पोहचायचे. त्यांच्या हातात जाईपर्यंत त्या वर्तमानपत्राची रद्दी झालेली असाची.आधीच कामावरून थकूनभागून आल्यावर अंगात संचारलेला संताप गरमागरम चहा पिऊन शांत करावा लागत असे.
उगाच रोजची कटकट नको म्हणून सर्व चाळकऱ्यांनी पेपर घेण्याचे बंद केले आणि चाळीत सामुहिक लायब्ररी सुरू केली तरी आण्णांची नित्य सवय जात नव्हती.ते महीनाभारातील सर्व पेपर गोळा करून रद्दीवाल्यांना विकायचे आणि त्या पैशातून त्या चिमण्याची मजा व्हायची म्हणजे पेपरवाल्याचे बिल चाळकऱ्यांनी भरायचे आणि रद्दी करून आण्णांने विकायची व स्वतःचा खर्च भागवायचा म्हणून चाळकऱ्यांनी लायब्ररीही बंद करुन टाकली.
सकाळी सकाळी पाण्यासाठी नळावर भली मोठी लाईन लागायची पण आण्णा मात्र लाईनीत उभे राहण्याची कसलीच तसदी न घेता जबरदस्तीने पुढे जाऊन नळाला बादली लाऊन पाणीभरून घेत निघून जायचे आणि लाईनीत उभे असणाऱ्यांना मुग गिळून गप्प राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.कोणी बोलायला गेले तर आण्णा त्यांच्यावर धाऊन वाट्टेल तसे बलून घ्यायचे. समोरचा सभ्यव्यक्ती असल्याने तोच शर्मींदा होऊन त्याला माघार घ्यावी लागत असे. सकाळी दुधवाला आला म्हणजे तिथेही आण्णांची अशीच तऱ्हा.तो दुधवाला ईतरांच्या भांड्यात दुध ओतेपर्यंत आण्णा दुसरे माप दुधाच्या कॅन मधे बुडवून स्वतःच्या हाताने भांड्यात दुध ओतून निघून जायचे दुधवाला अचंबित होऊन बघतच रहायचा पैसे मागीतले तर.'चलबे चलं,कुठे पळून चाल्लो मला वाटेल तेव्हा देईन मी चल'.असा वरून दम असायचा तेंव्हा या चिमणआण्णाच्या जाचाला कंटाळून दुधवाल्याने चाळीत येण्याचे बंद केले.
आण्णांना तपकीर हुंगायची सवय असल्यामुळे दुकानात गेल्यावर ती चार वेळा हुंगून बघायची आणि टेस्ट म्हणून आपल्या डबीत भरून चालायला लागायचे तो दुकानदार सुक्ष्म नजरेने बघतं आण्णा नजरेआड होईपर्यंत काहीच करू शकतं नव्हता.आण्णांनी कधीच तपकीर विकत घेतली नाही शिवाय अशा बऱ्या दुकाना आण्णांनी पालथ्या घातल्यामुळे तपकीर असुनही एकही दुकानदार त्यांना तपकीर देत नसे.काहीही झाल तरी आण्णा दुसरे दुकान हुडकून फुकटची तपकीर घेऊन आपली हौस भागवत असे.चाळीच्या बाहेर पान टपरी होती तेथेही आण्णांची उधारी होती,चोवीस तासात चोवीस पानांचा डुच्चा तोंडात कोंबून ऐकही पानाचे पैसे न देण्यात आण्णा पटाईत होते.पैसे मागतले तर आण्णा आख्ख गाव गोळा करून घेत,तेव्हा त्या पान विक्रेत्यालाच आण्णांन समोर साष्टांग दंडवत घालून माघार घ्यावी लागे आणि नको हा उगाच फुकटचा त्रास म्हणून पान टपरीवाल्यानेही आपला गाशा गुंडाळून दुकान बंद करून निघून गेला.
बाजारात भाजी आणायला गेल्यावर प्रत्येक भाजीचा भाव विचारायचा आणि नमुनादाखल थोडी भाजी पिशवीत भरून चालायला लागायचं तेव्हा भाजी विकणारा भरगच्च शिव्यांची लाखोली वाहूनही आण्णांना काहीच फरक पडत नसे.आण्णा मात्र आपल्या सवयी प्रमाणे तपकीर हुंगत,पान चघळीत,मफलर गळ्याभोवती फिरकवत नाकाखाली आलेल्या चष्म्यातून बघतं आपली वाट मोकळी करायचे. एकदा आण्णांशिवाय सर्व चाळकरी काही दिवस फिरायला गेलेत. आणि मग काय ते परत येईपर्यंत,प्रत्येकाने घराबाहेर ठेवलेल्या प्लास्टिकच्या डसबीन,प्लास्टिकच्या कुंड्या शिवाय ईतरकाही साठवलेली भंगार असेल ती सर्व गोळाकरून आण्णांनी भंगारवाल्याला विकली.दहा दिवसांनी चाळकरी फिरून आल्यावर प्रत्येकाचा रूद्रावतार बघण्यासारखा होता.पण याचा जराही त्रास आण्णांनी करून घेतला नाही.
चाळीतली सर्वाच जोडपी नौकरीला होते तेव्हा घरी म्हातारे आजीआजोबा नाहीतर काहींकडे त्यांची मुले असायचे तेव्हा दुपारचा चहा कोणत्यातरी घरी जाऊन बळजबरीने पिऊन घ्यायचे.चहा घेतल्याशिवाय आण्णा घरातून निघतचं नसे उकळलेल्या चहाच्या कुंचीतला निपळून काढलेला चहा जरी दिला तरी आण्णा घटा घटा पोटात ओतून समाधानाचा ढेकर देत त्या दिवसापूरते भागल्याचा आनंद व्यक्त करत असे. गणपतीत तर आण्णांची चंगळ असायची.गणपती बसवे पासून तर बुडवे पर्यंत आण्णांचा सक्रीय सहभाग असायचा कारण प्रसाद म्हटला म्हणजे त्या प्रसादाच्या वासाशिवाय चाळकऱ्याच्या वाटेला काहीच येत नव्हते. सत्यनारायणाचा प्रसाद म्हटला म्हणजे मग विचारूच नका.
दिवाळीला कोणी बोलवले नसले तरी आणा प्रत्येकाच्याघरी जाऊन फराळाचा अस्वाद घेतल्याशिवाय रहायचे नाही.एव्हढेच काय चाळीतल्या प्रत्येकाकडे येणारे मित्र,पाहूणे,नातेवाईक त्यांच्याशी स्वतःहून ओळख करून घेत ज्या घरी जायचे त्या घरच्यांची वारेमाफ तारीफ करत त्यांना त्यांच्या घरी आण्णा स्वतः घेऊन जात असे आणि फराळा बरोबर त्यांच्या सोबत जेवण केल्याशिवाय घर सोडत नसे एव्हढे कठीण होते आण्णा.काहीना काही बहाणे करून आण्णांना घरा बाहेर काढण्याचा प्रयत्न असायचा पण बाहेर जातील ते आण्णा कसले हो.
लग्नाचा सिजन असला म्हणजे लग्नसिजन संपेपर्यंत आण्णांची मजाच असायची कारण संबंधित लग्नाशी आण्णांचा काहिही एक संबध नसतांनाही आण्णा
थाटामाटात पगंतीत बसुन जेवणाचा मनमुराद आनंद घ्यायचे. लग्नसराईच्या काळात आण्णांच दोघीवेळेची पोटपूजा होऊन जायची.
निशा आणि शेखरचं एकमेकांवर खूप प्रेम होतं या प्रेमाची खबर घरातच काय पण चाळीतही कोणाला माहीत नव्हती आता प्रेम कितीही लपवले तर ते केव्हान केव्हा कळतेचं पण ते जर का चुकीच्या माणसाला कळले तर प्रेमाचा फालुदा झाल्याशिवाय रहात नाही.असच एकदा चौपाटीवर निशा आणि शेखर मांडीला मांडी लाऊन भेळ खाताना आण्णांना दिसले आणि आण्णांच्या जिभेला पाणीच सुटले.मग काय आण्णांना पाहून निशा आणि शेखरच्या तोंडाला फेसच आला ना. कुणालाही माहित नसलेलं प्रेम आण्णांसारख्या नालायक माणसाला माहित झाले म्हणजे मरायचीचं वेळ समजायची ना!तेव्हा निशा आणि शेखरने आण्णांच्या हातापाया पडून कुणालाही काहीच न सांगण्याची मुकं संमती देत आण्णांनी भेळवर यथेच्छ ताव मारला.पण भेळ काही आण्णांना पचली नाही.आख्ख्या चाळीत आण्णांनी भेळ ओकली आणि निशा व.शेखर घरी येईपर्यंत दोघांच्याही आईवडीलांमधे महायुद्ध सुरूच राहीले.
आण्णा म्हणजे एक नंबरचा भांडखोर माणूस त्याच्या मनासारखे झाले नाही किंवा केले नाही तर ते दहा पिढ्यांचा उध्दार एकादमात काढायचे म्हणून त्यांच्या नादी कोणी लागायचे नाही.त्याच्या अशा वागण्याने
त्यांना त्यांची बायको, मुलगा दोघही सोडून गेलेत तरी या फुकटखाऊ चिमणआण्णाला काहीच फरक पडत नव्हता. दिवस उगवला की चिमणआण्णांचा फुकटखाण्याचा दिनक्रम सुरू व्हायचा.
