फोटोग्राफर संपा
फोटोग्राफर संपा
आजकाल कलेत एक पासष्टावी कला अॅड झालीये. ती म्हणजे फोटोग्राफी. खरं तर आपल्यात एक जण असा असतोच जो स्वतःला फोटोग्राफर म्हणवून घेत असतो. आणि त्याला ही फोटोग्राफीची कला अवगत असावी असं काही नाही. फक्त एखादा बऱ्यापैकी कॅमेरा किंवा मोबाईल असला की कोणीही कलावंत होऊ शकतो.
अशा स्वयंघोषित कलाकाराची ग्रहदशा आम्हालाही चुकलेली नाही. आणि या ग्रहदोषाचा मानकरी आमचा संपा. संपा ना आमच्या गल्लीतला, ना शाळेतला, ना कॉलेजातला. तो आमच्यात येऊन कसा चिकटला हा किस्सा त्याच्या इतकाच अतर्क्य आहे.
आला की त्यादिवशी कट्ट्यावर, आम्हाला म्हणाला,
"मी कशाचा फोटो काढलाय ते ओळखून दाखवलं तर माझ्याकडून सगळ्याला चायनीज सूप फुकट." आता ' फुकट ' या शब्दांनी आमच्यातल्या शाम्याची विकेट पडली नसती तर तो शाम्या कसला.
"ओळखून दाखवतो पण सूप नाय दिलं तर सुपच्या बाऊलात बुचाकळून मारील."
"कबूल पण नाय ओळखलं तर, तुम्ही मला आठवडाभर सूप पाजायचं."आता ही अट शाम्याला कच खायला लावू शकत होती. पण शाम्याच्या टाळक्यात ' फुकट ' हा शब्द रबरी बॉल टणाटणा उडत होता.
"चल दाखव फोटो." त्यानं मोबाईलची स्क्रीन सगळ्यांसमोर फिरवली. त्यात जे काही होतं ते साधारण झाडाचं खोड, एखादं लाकडी फळकुट किंवा घोड्याचा पाय असं काहीतरी दिसत होतं.
आम्ही उत्तर दिलं की हा सत्पुरुष आम्हा अज्ञान बालकांकडे बघून असे काही स्मित करत होता की,
' वत्सांनो, अजून अनेक रहस्य या जगात दडली आहेत, ज्यापासून तुम्ही अलिप्त आहात. ' असा अर्थ त्यातून निसटून जायचा.
बराच वेळ विचार करून आणि मोबाईल उलटापालटा करूनही जेव्हा आमच्या बालबुद्धीला कसलाच माग लागेनासा झाला तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाने सर्वांवर एक अभिमानयुक्त नजर फिरवली. वास्तविक पाहता, आपण काढलेला फोटो नक्की कशाचा, हे लोक ओळखूच शकत नाहीत ही गोष्ट 'अपमान ' या प्रकारात मोडत असावी. पण संपा हे अजबच रसायन आहे हे त्यादिवशी समजलं.
"उडणाऱ्या गरुडचा फोटो आहे हा." कसं विचारलं तर म्हणाला,
"हा इथं एक डोळा, हे पाय मुडपलेले आणि
हे sss दोन पंख पसरलेले आणि उडतोय बघा लबाड कसा ऐटीत " त्या गरुडाला लबाड म्हणायचं काहीच कारण नव्हतं. उडणं हेच त्याचं काम. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्याला फळकुटावरचे डाग समजत होतो ते डोळे, पंख आणि पाय निघावेत आणि त्याबद्दल आम्हाला उलटा जबाब देता येऊ नये , हे भयंकर होतं. कारण फोटोत तसं काहीतरी असावं, म्हणजे ते डोळे, पाय न् कायकाय हे संपानं सांगितल्यावर आम्हाला थोडं थोडं दिसू लागलं.
तोंडात मारल्यासारखे शाम्या आणि कट्टेकरी संपाकडं पाहायला लागले. निमूटपणे आम्ही त्याच्या सुपसाठी पैसे काढून दिले. सगळ्यात जास्त हवालदिल तर शाम्या होता. आर्थिक नुकसान, दुसरं काय. केवळ शाम्याचं असं तोंड बघण्यासाठी अशा सूपच्या शंभर वाट्या आम्ही कुर्बान केली असत्या.
ही आमची संपाशी पहिली ओळख. त्यानंतर तो रोज येऊन कट्ट्यावर बसायला लागला. आम्ही कधीही तिथं पोचलो की हा आमच्या आधी तिथं हजर असायचा. बरं आमची कट्टाभेटीची वेळ ठरलेली होती असं पण नव्हतं. मग हा नेमक्या वेळी तिथं कसा उगवायचा काही समजायचं नाही. आला तरी एकदम शांत बसायचा. बाकड्याचा आधार मिळाला की त्यानंतर ज्या वस्तूवर नजर स्थिरावेल तिथेच तासन् तास बघत राहायचा. त्याच्या या सवयीमुळे आम्हाला अवघडल्यासारखं होत असे. पण नंतर एकदा त्याच्या याच सवयीमुळे त्यानं एका सुंदर मुलीच्या बंधुराजांच्या हातचा प्रसाद खाल्ला. आपण मार का खाल्ला हे त्याला शेवटपर्यंत समजलं नाही. त्यामुळं त्याची ही सवय कधीच जाणार नाही अशी आम्ही मनाशी पक्की खूणगाठ बांधून घेतली.
संपा जेव्हा कट्ट्यावर यायचा तेव्हा त्यानं दिवसभरात काढलेले सगळे फोटो आम्हाला दाखवत असे. तसं तो नेहमीच कट्ट्यावर हजर असायचा. त्यामुळं लहानपणी जेवण्याआधी ' वदनी कवळ ' म्हणणं ही जशी रीत होती, तसंच कट्ट्यावर आल्यावर चहाच्या आधी संपाचे फोटो बघणं हा अनिवार्य भाग होता. तो संपण्याआधी बारका जगू पण आम्हाला चहा आणून देत नसे. संपा आणि जगुमधला हा गुप्त करार असावा असं मला कित्येक दिवस वाटायचं.
संपाच्या फोटोग्राफीचा विषय अगदी कोणताही असायचा. चहाचा कप, अत्तराची बाटली, पेनाचं टोपण, पुस्तकाची पानं, कुत्र्याचं शेपूट, शेपटीचा केस.... असं अगदी अथपासून इतिपर्यंत सगळे प्रकार त्यानं हाताळले होते. आणि त्याची झळ मात्र आम्हाला बसायची. पण त्याच्या अश्या वागण्यानं सुद्धा आम्ही त्याच्याशी तुटक वागू शकत नव्हतो. असं का होतं हे मात्र एक कोडंच आहे.
इतके वर्ष एकत्र राहून सुद्धा संपाचं पूर्ण नाव काही आम्हाला कळलं नाही की आमच्यापैकी ते विचारण्याचीही कुणी तसदी घेतली नाही. ' संपा ' ही दोन अक्षरंच त्याच्या ओळखीसाठी पुरेशी होती.
कट्ट्यावर आमच्या गप्पांना उधाण यायचं. पाहिजे नको ते सगळे विषय चघळून व्हायचे. संपा ही चर्चा तासन् तास ऐकत बसायचा.तो इथंच बसलाय हे सुद्धा आम्ही विसरायचो. इतपत मौनव्रत तो पाळायचा. पण जेव्हा एखाद्या हिरोईनचा विषय निघायचा तेव्हा घासात खडा निघाल्यासारखं मध्येच याचं बोलणं सुरु व्हायचं. त्याच्या फोटोग्राफी सारखंच हे बोलणं पण सैरावैरा पळत सगळ्या दिशा धुंडाळून यायचं. सुरुवात कुठून झाली हे सुद्धा आठवणार नाही इतके वेगवेगळे विषय तो भरभर बोलून टाकायचा. त्याचं बोलणं ऐकताना ' बे एके बे ' च्या चालीची आठवण व्हायची.आणि शाळेत गणिताच्या तासाला येणारी झोप परत डोळ्यात डोकावूं लागे. त्यापेक्षा संपा झोपला तर किती बरं असं दिवास्वप्न बघत आम्ही त्याचे ते असंबद्ध शब्द ऐकत बसायचो.
एकेदिवशी आम्ही येऊन पूर्ण सात मिनिटे झाली तरी संपाचं दर्शन झालं नाही म्हणून आम्ही आश्चर्य करत बसलो होतो. तेव्हा जगुकडून संपाची हकिकत समजली. आणि दोघांच्या गुप्त कराराचं कारण ही समजलं.
संपाचं पूर्ण नाव संपत पांडुरंग पाटील असल्याचं ऐकुन आम्ही चाट पडलो. पांडुरंग पाटील हे गावातले प्रतिष्ठित व्यक्ती म्हणवले जात होते. शिवाय श्रीमंत नगरसेवक होते. श्रीमंती आणि पावर या दोन गोष्टींची एकत्र कल्पना केल्यावर आमच्या डोळ्यांसमोर संपतचे डझनभर गुंड तरळून गेले. आता त्याला विचारात पण संपा म्हणू वाटत नव्हतं. आजपर्यंत त्याला आम्ही जे काही वेडंवाकडं बोललो ( अर्थात ते आता ' वेडंवाकडं ' वाटू लागलं होतं.) , ते सगळं कानात घूमू लागलं. त्याबद्दल त्याला ' सॉरी' म्हणायचं यावर सगळ्यांचं एकमत झालं. तसंच त्याच्याशी जास्त तुटक न वागण्याची सद्बुद्धी दिल्याबद्दल देवाचे आभार मानले.
संपा हे त्याचं हे नाव म्हणजे संपतचा की संपत पांडुरंग चा की संपत पाटीलचा शॉर्टफॉर्म यावर आमची उठाठेव चालू असतानाच एक आलिशान गाडी येऊन थांबली. तशी ती आम्हाला रोजच दिसायची. किंवा ती गाडी महागडी आणि सुंदर असल्याने आमची नजर तिकडे वळायची असं म्हणा. पण आज त्या गाडीतून संपा उतरत होता. तो रोज त्याच गाडीतून तिथं यायचा असं आम्हाला जगुनी सांगितलं. संपा बाकड्यावर टेकला आणि त्याची नेहमीची ध्यानधारणा सुरु झाली. यावेळी तो चहाच्या स्टोव्हकडे एकटक बघत बसला होता.
आम्ही त्याच्याकडं आश्चर्यानं बघतोय हे त्याच्या गावीही नव्हतं. काही मिनिटांनी त्यानं आमच्याकडं बघितलं.
"आज काय सगळ्यांचं मौनव्रत आहे का? कुणीच काही बोलत नाही. तुमचं बोलणं ऐकल्याशिवाय माझं चित्त स्थिर होत नाही." हे ऐकुन हसावं की रडावं तेच कळेना. शेवटी हिम्मत करून सानूनं त्याला विचारलं,
"तू आम्हाला कधीच का सांगितलं नाही की तू नगरसेवकांचा मुलगा आहेस?"
"त्यात काय सांगायचं." त्याच्या थंडपणाचे तीनच शब्द पण ते बोलताना त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच दुःखाची छटा तरळून गेली.
"आम्हाला माफ कर, आम्ही तुला काहीही बोलत होतो. पण त्यात आमचा काहीच वाईट हेतू नव्हता. एक मित्र म्हणूनच आम्ही तुझ्याशी बोलायचो." अशी बाजू सावरण्याचा फोलपणा माझ्या लगेच लक्षात आला. पण ते त्याला कळलं नसावं.
"मित्र आहात म्हणूनच मीपण ऐकायचो. किंवा असं म्हणा हे सगळं ऐकण्यासाठीच मी तुमचा मित्र झालो." हा टोमणा होता की काय ते कळेना खरं तर आम्ही त्याला खरंच एक मित्र म्हणून पाहत होतो. पण आज त्याची माहिती कळल्यावर आपण त्यापुढं खूप लहान आहोत असं उगाचच वाटू लागलं आणि ते अर्थ नसलेलं ओशाळलेपण आलं होतं.
मनात कुठंतरी हे विचार नाचत असताना त्याचे पुढचे शब्द कानावर आले.
"आणि मला हे पण माहितीये की माझ्या फोटोंमध्ये तसा काहीच अर्थ नसतो. तुमची हक्काची बोलणी ऐकण्यासाठी मी रोज ते फोटो तुम्हाला दाखवायचो."
संपाची भाषा इतकी चांगली आहे हे आज कळत होतं. नाहीतर इतरवेळी त्याच्या वाक्यावाक्यात खेडवळपणा डोकावायचा. अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे संपा व्यवस्थेशीर बोलूही शकतो. त्यात मनातला एक प्रश्न नकळत ओठांतून बाहेर निसटला,
"पण ही सगळी उठाठेव कशासाठी?" संपाच्या डोळ्यातून एक थेंब ओघळला,
"तुम्ही कधी असं श्रीमंत घर बघितलंय जिथं नोकर चाकर, हवा तेवढा पैसा, आलिशान गाड्या आणि सगळ्या सुखसोयी ठासून भरल्यात. बघणाऱ्याला वाटतं ही लोकं आनंदानं न्हाऊन निघतायत. पण त्यांना हे माहीत नसतं की आतून आम्ही कोरडेच आहोत."
आज एक वेगळाच संपा आम्हाला भेटत होता. की हा कुणी वेगळाच होता संपाचा मुखवटा लावून आलेला.
"आणि माझ्याकडे सगळं आहे. पण तरी सगळं असून नसल्यासारखं आहे. माझा बंगला कधी घर नाही होऊ शकत. कारण आत राहणारे हॉटेलच्या रुममध्ये राहत असल्यासारखे परक्यासारखे राहतात. एकटेच खातात, जेवतात, झोपतात. शेजारच्या खोलीत कोण राहतं हे पाहायचे कष्ट घ्यायचं काहीच कारण नसतं. माझं सगळं लहानपण असं गेलं. मग वेड्यासारखं आजूबाजूच्या लोकांमध्येच नाही तर वस्तूंमध्ये ही कुठं प्रेम दिसतं का हे शोधत बसतो तासन् तास फोटो काढत बसतो त्यांचे."
या कसल्या व्यथा घेऊन जगत होता संपा. लहानपणापासून एकटाच होता. एकटाच राहायचा, जेवायचा. कुणी विचारपूस करायला येईल याची वाट बघत तसाच झोपी जायचा. भयानक होत हे.
मग त्यानं आमच्यात कुटुंब शोधण्याचा प्रयत्न केला होता. काही लोकांचं आयुष्यच असं असतं. एकटं. त्यातलाच हा संपा. पण आज, आत्ता, याक्षणी तो आमचा झाला होता. खरोखरच कट्टेकरी कुटुंबाचा भाग झाला होता आमचा संपा...
