पाऊल विश्वासाचं
पाऊल विश्वासाचं
"दारी मंगल वाद्य वाजत होती ; पण आतल्या खोलीत मंगला मात्र हुमसून हुमसून रडत होती. अंगणात सनईचे सूर घुमत होते ; तर मंगलाच्या डोळ्यात आसवांचे पूर वाहत होते. हातावर रंगलेली मेंदी तिला आता अस्पष्ट दिसत होती. तिच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. तिच्या वडिलांनी- बबनरावांनी शोधलेलं स्थळ हे श्रीमंत होतं. पण श्रीमंतीचा सोस पहिल्यापासून नसलेल्या मंगलेला उर्मट आणि विलासात लोळणाऱ्या विलासबद्दल जराही प्रेम वाटत नव्हतं. त्याउलट तिच्या सुख दुःखात लहानपणी पासून सहभागी झालेला गरीब घरचा मंगेश तिला जास्त प्रिय वाटत होता. जीवनभर अशाच व्यक्तीच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकावी आणि मिठीत बध्द व्हावं असंच तिला त्याच्यासोबत वाटायचं. शाळेत बरोबर घेऊन जाणारा...स्वतः च्या डब्यातील भाकरिचा घास भरवणारा....खोडकर मुलांपासून सांभाळणारा...पायात रुतलेला काटा हळूच बाहेर काढून प्रेमानं फुंकर मारणारा... पण आता सारं संपलं होतं. उद्या ती दुसऱ्याची होणार होती. लहानपणापासून विश्वासानं पावलावर पाऊल टाकणाऱ्या मंगेशच्या आयुष्यातून कायमची दूर निघून जाणार होती.
कसल्यातरी जाणिवेनं ती ताडकन उठली. समोरच्या दर्पणात नववधूच्या शृंगारात ऊभी असलेली तिची प्रतिमा विकट हास्य करून विश्वास घाताची कहाणी ऐकवत होती. विश्वास घात केल्याचं शल्य तिच्या मनाला सारखं टोचू लागलं. आता मात्र ती बेभान झाली आणि कशाचीही तमा न बाळगता साऱ्यांचा डोळा चुकवून ती आतल्या खोलीतून बाहेर पडली. पिसाट सुटलेल्या वाऱ्यासारखी ती धावत सुटली. पायात रुतलेल्या काट्यांचं आता तिला भान उरलं नव्हतं. गमावलेला विश्वास आता ती कमवायला मंगेशकडे चालली होती."

