श्रद्धेची फुले
श्रद्धेची फुले
नुकताच अरुणोदय झालेला होता. देवडोबाच्या डोंगर माथ्यावर नभांगणात उषेच्या नवरंगांची उधळण झाली होती. सूर्यनारायणाच्या किरणांची सोनपावले वसुंधरेवर उतरत होती. कुणाच्या तरी आवाजाने मी जागा झालो. "अरे निघाले की नाही... आज परीक्षा आहे ना?...आणि झोपा कसल्या काढताय?. आज सकाळची शाळा आहे आणि अजून निघाला नाहीत ? कमाल झाली तुमची. परीक्षेची काळजी कुणालाच नाही.." असे म्हणून आमचा म्होरक्या वैतागून पुढे निघून गेला. कितीही उशीर झाला तरी शाळेला सर्वांनी संगाती जायचं आणि ते सुद्धा लावलेल्या क्रमानुसार.. अगदी शिस्तबद्ध.. चुकून कुणाच्या कोणी पुढे गेला आणि ह्याला कळलं की त्याला चांगलाच प्रसाद मिळायचा . वेळ आली तर काठीचा ही . कारण सर्व मुलांना शाळेतून सांभाळून आणणं त्याचं मोठं काम होतं.
खूपच उशीर झाल्यानं लगबगीनं आईने दिलेला चहा घेऊन जवळ जवळ धावच मारली. एव्हाना सर्व शाळकरी मुलं तात्यांच्या घरापुढील अंगणात जमली होती. क्षणभर का होईना त्या नभांगणातील अरुणोदयाचा रंग त्या अंगणात उतरल्याचा भास झाला . अंगणातील जास्वंद बहरून लाल भडक झाली होती. मुलांची गर्दी का झाली होती ते लवकरच कळलं मला. मी सुद्धा भारावून स्तब्ध झालो. त्यांना त्या जास्वंदीच्या फुलांचा मोह आवरेना . कारण आज परीक्षा होती. आणि त्यांना त्या फुलांना देवाच्या चरणावर वाहून परीक्षेचा पेपर कठीण न जाता सोपा जावा असं गाऱ्हाणं घालायचं होतं. केवढी ही देवाप्रति अपार श्रद्धा!....
हाती लागेल ते फुल वेचून सारी मुलं शाळेकडे निघाली देखील . शाळेत जाण्याची वाट रानावनाची असली तरी त्या वाटेने जाण्याची मजाच निराळी. रिमझिम पावसात वाटेतील दगड कोणता? आणि म्हशीच शेण कोणतं? दोन्हीही सारखंच दिसायचं...चुकून एखाद्याचा पाय त्याच्यावर पडला की टाळ्यांचा कडकडाट...पोट धरून हसत हसत पोरं केक कापल्याचा आनंद साजरा करायची. वाटेत मोठाले दगड, घनदाट झाडी, मधूनच सरसरण्याचा आवाज .. तरीही भीती न वाटणारी रोजचीच मजेशीर पायवाट ....गाई गुरांच्या सहवासाने गजबजलेली, पक्ष्यांच्या कलरवाने आणि शाळकरी मुलांच्या वर्दळीने जागी होऊन हसणारी...आल्हाददायक.
आधीच खूप उशीर झाला होता त्यात समोरून येणारी गुरे पाहिल्यानं मुलं थोडी पांगली. एका उंच दगडाच्या सुळक्यावर पोरं भीतीनं उभी राहिली. कारण गुरांबरोबर गुराखी जरी असला तरी मारक्या बैलाला ऐनवेळी कोण अडवणार?. एवढ्यात कुणाची तरी किंकाळी ऐकायला आली. साऱ्यांच्या नजरा आता तिकडे वळल्या. पारूच्या पायात काटा खोलवर रुतला होता. काटा पायातून काढताच लाल रक्ताची धार लागली. पुढल्या क्षणीच कळून चुकलं की जिथं पोरं भीतीनं उभी होती तिथं सारी करवंदीची झुडूपं होती. कुणीतरी कधीतरी दप्तराच्या कप्प्यात ठेवलेली हळदीची पुडी पुढे केली आणि पारूच्या जखमेवर लावली. पुढे काही अंतरावर अगदी धारेवर गेल्यावर मुलं रेंगाळताना दिसली. ज्याच्या चरणी ही फुलं अर्पायची आहेत त्या देवाच्या मुर्तीपूढे गाऱ्हाणं घालायला आणि परीक्षेत चांगलं यश लाभो असा आशीर्वाद घ्यायला सारी मुलं थांबली...
"ग्रामदेवता -श्री पावणाई देवीच्या मंदिराच्या पश्चिमेला धारेच्या कुशीत वसलेली ही धारदेवाची मूर्ती. ही मूर्ती पाषाणाची असून रेखीव आहे. अश्माच्या मंदिरातील गाभाऱ्यात ही पश्चिमाभिमुख मूर्ती पल्लवांच्या नक्षीने खूपच सुंदर दिसते. सारणीच्या प्रवाहाच्या प्रसरण पावलेल्या पाण्यानं आणि पावसाळ्यात धारेच्या कुशीतून झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यानं हे लेण्यामय लहानसं मंदिर अधिकच मोहक दिसते."
या वाटेने जाणारा पथिक आपलं गाऱ्हाणं देवासमोर मांडून पुढे जात असे. या वाटेनं येणारी जाणारी गायीगुरं ही याच देवाच्या परिसरात विसावा घेत होती. पण आता पर्यायी रस्ता झाल्याने या वाटेवरील वर्दळ कमी झाली असून धारदेवाच्या परिसरातील वाट आता झाडं-झुडपांनी, वेलींनी, पल्लवांनी आच्छादलेली आहे.
