तूच मांगल्याची मूर्ती
तूच मांगल्याची मूर्ती
आई म्हणजे आत्मा आणि ईश्वराचा सुरेख संगम. ती संसार मंदिरातील मांगल्याची जणू मूर्तीच. आई म्हणजे माया, ममतेचा आणि वात्सल्याचा पान्हा. पंचप्राणांनी ओवाळून भक्तिभावाने आयुष्यभर पूजा करावी असे देवाचे दुसरे रूप म्हणजे आई.
मातृत्वाचे नऊ महिने ती नाना यातना सोसते. जन्म देऊन ती हे जग दाखवते. हाताचा पाळणा, नयनांच्या ज्योती करून, मुखानं अंगाई गीत गाऊन रात्रंदिवस ती आपला सांभाळ करते. एवढेच नव्हे तर सांजवेळी संस्काराची शिकवण देण्यासाठी शुभंकरोती वदवून घेते.
आई ही घराची गृहलक्ष्मीच आहे. तिच्यामुळेच घराला घरपण येते. अन्नपूर्णा हे तीचं आणखी रूप . घरातील सर्वांना सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी नेहमी चंदनासारखी झिजत असते. घरातील साऱ्यांच्या चुका, अपराध पदरात टाकून सर्वांना सदा आनंदित ठेवत असते.
आई म्हणजे वात्सल्याची सरीताच आहे. आई करुणेचा अखंड झरा आहे. तिच्या कुशीत शिरताना नेहमी सौख्याचा ऊबारा मिळतो. आई म्हणजे जीवन जगायला शिकवणारी "तेजोमय जीवन शक्ती" आहे. तिचे जन्मोजन्मांतरीचे आपल्यावर ऋण आहे.
जन्मदात्या आई-वडिलांची सेवा करणं हे पवित्र कर्म आहे. श्रावण बाळानं आपल्या मात्यापित्यांना तीर्थयात्रा घडवण्यासाठी कावड खांद्यावर घेतली. भक्त पुंडलिकाची माय - पित्याची सेवा पाहण्यासाठी दारी साक्षात परब्रह्म आले. एव्हढेच नव्हे तर श्री गणेशाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आपल्या माता-पिता... शिव-पार्वती भोवती फेरी पूर्ण केली. म्हणून माय-बाप सेवा हे महापुण्य आहे . त्यांचे मन गंगेच्या पाण्यासारखे पवित्र आहे. त्यांचा स्पर्श चंदनासारखा शीतल आहे. त्यांची माया आभाळाहून विशाल आहे ;आणि पावन चरण म्हणजे तिर्थधाम आहे.
।। मातृ पितृ देवो भव ।।
