पाटी
पाटी
त्याने आपल्या हातातल्या पाटीकडे पाहिलं आणि द्वेषाने ती फेकून दिली. "आए, मला ही पाटी नाय आवडत."
" आरं असं म्हणुन कसं चाललं. पोट, पाणी पिकायसाठी पाटी हातात घ्याया लागतीया बाबा."
" अगं पण,,,आए ", तो कासावीस झाला.
" पोटात मंद आन कपाळाला गंध लावून कसं चाललं ". आई असं बोलताच तो पाय पोटात घेऊन मुटकुळ होऊन झोपी गेला.
शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामावर तो आईसोबत नेहमीच जायचा. मस्त करड्या रंगाचा गणवेश, लाल मोजे, काळा बूट घालून येणारी चिमुकली पावले आणि त्यांच्या हातात असलेली काळ्या कुळकुळीत रंगाची पाटी त्याला नेहमीच भुरळ घालायची पण त्याच्या हातात होती ती दगड, विटा वाहणारी पाटी.
दोन्हीही पाट्याच पण वेगवेगळं प्रारब्ध घडवणारी.
एक जगणं शिकवणारी आणि दुसरी जीवन समृद्ध करणारी...
