ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण


"अरे चल उठ लवकर तुझी ऑनलाईन क्लास सुरु होणार."
"राहू दे गं आई झोपू दे."
"अरे पण क्लासचं काय..."
"आई तू नोट करून घे ना."
"काय... मी... तू शाळेत जातो की मी?"
"आई प्लीज..."
"ते काही नाही उठ लवकर..."
(एवढ्यात दरवाजाची बेल वाजली)
"अरे सुमा."
"हो ताई."
"ये तुझीच वाट पाहत होते खूप पसारा झाला आज..."
"मी करते तुम्ही काही चिंता करू नका..."
"हा ते पहिले कपडे वाळत टाक मग किचनमध्ये ये."
"बरं."
"अरे उठ रे..."
"काय झालं ताई रोहित बाबा नाही उठला?"
"बघ ना गं अगं मघासपासून उठवते पण उठतच नाही आणि आता क्लास पण सुरु होणार. सुमा तुझ्या मुलालासुद्धा असतील ना क्लास?"
"नाही हो त्याला नाही आहे तो घरीच असतो."
"अगं क्लास म्हणजे मोबाईलवर शिकवतात आता पलीकडून शिक्षक शिकवतात ते विद्यार्थ्यांनी आपल्या घरात बसून पाहून शिकावे."
"नाही ताई असलं नाही शिकवत त्याला पण तो पुस्तक घेऊन अभ्यास करतो."
"काय पण आता ऑनलाईनच शिकवतात."
"हो का विचारेन त्याला..."
(सुमा घरातील सगळी कामे आटोपून घरी जाते तर मुलगा पुस्तकात डोकं घालून वाचत होता )
"अरे रवी..."
"आई तू कधी आलीस "
"अरे आता... चल जेवण वाढते हात-पाय धुऊन घे."
(दोघे जण जेवायला बसतात )
"काय रे रवी रोहितची आई म्हणत होती की सगळयांना ऑनलाईन क्लास आहे मग तुला नाही ते म्हणे मोबाईलवर शिकवतात?"
"हा..."
"काय झालं काही बोलत का नाहीस."
"आई आपल्याकडे कुठे तसा स्मार्ट मोबाईल आहे..."
"म्हणजे..."
"मला पण ऑनलाईन क्लास आहे पण आपल्याकडे तसा स्मार्ट फोन मोबाईल नाही ना लॅपटॉप मग काय
करू शकतो आणि आपल्याकडे एवढे पैसे नाही की आपण नवीन घेऊ शकतो..."
"अरे देवा तू आम्हला का नाही सांगितलंस..."
"कसं सांगू बाबांचं काम गेलं तूही दोन महिने कुठे कामाला गेलीस त्यात या भाड्याच्या खोलीचे पैसे द्याचे आहेत आणि त्यात मी तुम्हाला कसे सांगू..."
"पोरा किती विचार करतोस रे तू... पण तुझ्या अभ्यासाचं काय... अरे आम्ही कष्ट यासाठी करतो जेणे करून तुला आमच्या सारखे दिवस पाहायला नकोत म्हणून..."
"माहित आहे आई म्हणून तर मी खूप अभ्यास करत आहे मोठा होण्यासाठी मग आपल्यलाकडे खूप पैसे असतील..."
"हो रे चागला शीक मोठा हो..."
"अरे पण आता अभ्यास कसा करणार?"
"टेन्शन घेऊ नको आई मी सगळ्या विषयांचे पुस्तक वाचणार आहे आणि बरं झालं आई मी ती पुस्तक रमा ताईला पहिलीच दे म्हणालो जुनी असली तरी अभ्यास होतोच की... सगळे धडे त्याची प्रश्न-उत्तरे कविता आता तर मी अर्धे पुस्तक वाचून काढलंय आणि आई हेच तर त्या ऑनलाईनमध्ये शिकवणार..."
"अरे पण तुझ्या शिक्षकांनी विचारले तर..."
"तर सांगेन मी ऑनलाईन क्लासला नाही हजर राहू शकत पण माझा अभ्यास झाला आहे परीक्षेसाठी मी तयार आहे..."
"नाही नको आपण काही तरी करू, तुझ्यासाठी मोबाईल घेऊ..."
"आई पाच सहा हजार लागतील कुठून आणणार..."
"अरे मी रोहितच्या आईशी बोलीन..."
"नको आई..."
"नाही काही झालं तरी चालेल मी कष्ट करून परतफेड करीन पण तुझ्या अभ्यासाची अशी वाट लावू देणार नाही..."
"पण आई..."
"नाही तू फक्त अभ्यासावर लक्ष दे येत्या दोन दिवसात मोबाईल असेल तुझ्याकडे बाकीचे मी आणि तुझे बाबा पाहून घेऊ... देवा तझी अजब आहे दुनिया जो अभ्यासासाठी तळमळतो त्याच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाही आणि ज्याकडे आहे त्याला शिक्षणाची किंमत नाही..."