Sandip Khurud

Comedy

4.0  

Sandip Khurud

Comedy

नवरदेवाची फजिती

नवरदेवाची फजिती

7 mins
483


बबन्याला हळदीला घेवून जायला मुलीकडील दोन पाहुणे आले होते. पाहुणे येवून दोन तास झाले होते,तरी बबन्याचं आवरतच नव्हतं. बबन्याच्या सख्या, चुलत, मावस सगळया बहीणी बबन्याला सजवत होत्या. आज बबन्याला हिरोझाल्यागत वाटत होतं.पाहुणे कंटाळून गेले होते, लवकर चला म्हणून विनवत होते. नवरदेवाकडचे वरचढ बाजू असल्याने त्यांचे ऐकून न ऐकल्यासारखे करत होते. तेवढयात बबन्याचे वडील तिरशिंगराव तेथे आले. त्यांना पाहुण्यांनी नमस्कार घातला. पाहुण्यांना नमस्कार घालून ते बबन्याच्या आईला म्हणाले, 

“अगं, पाहुण्यांचं जेवणा-खावणाचं काही बघीतलं का नाही?”   बबन्याची आई म्हणली,

“जेवण-खाणं समदं झालं पाहुण्यांचं”,

 

तेवढयात पाहुणे काकुळतीला येवून तिरशिंगरावांना म्हणाले,   “पाहुणं लवकर आवरा, आधीच हिवाळयाचे दिस हाईत,हाळदीला उशीर होईन.”

 पाहुण्यांचं ऐकून तिरशिंगराव बबन्याचा मेकअप करणाऱ्या समद्या पोरींना म्हणाले,

 “पोरींनो,लौकर आवरा बरं”.

 

तशी पोरींनी आवरायची घाई सुरु केली. तिरशिंगराव सर्वांना पटापट हुकूम सोडून दुसऱ्या कामाला निघून गेले. एकदाचं नवरदेवाचं आवरलं. गल्लीतल्या आया-बाया, पै-पाऊणे, मित्र मंडळ नवरदेवाला वाटं लावण्यासाठी घराच्या बाहेर जमले. नवरदेव देवघरातील देवांनां नमस्कार करुन व वडीलधाऱ्या माणसांचे दर्शन घेवून हळदीला निघाला. नवरदेवाची गाडी नवरीच्या गावाकडे निघाली. 


नवरीकडील पाहुणे नवरदेवाची वाटच पाहत होते. नवरदेवाची गाडी येताच,लहान मुलं नवरदेव आला, म्हणून ओरडत मोठया माणसांना सांगायला पळाले. नवरदेवाला बघायला मुलीच्या गल्लीतल्या बाया मुलीच्या घराजवळ जमल्या होत्या. घराबाहेर सुवासिनी ताट तांब्या घेवून उभ्याच होत्या. नवरदेव गाडीतून उतरताच आयाबायांनी त्याला ओवाळलं. घराबाहेर लिंबाच्या झाडाखाली छोटासा मंडप दिलेला होता. सतरंजी अंथरलेली होती. पाहुण्यांना तेथेच बसायला सांगीतले. चहापाणी झालं. सगळे पाहुण्यांची काळजी घेत होते. काही पाहुण्या, गल्लीतील बाया बबन्याला निरखून पाहत होत्या. नवरदेव दिसायला चांगला आहे असं म्हणत होत्या. स्तुती ऐकून बबन्या मनातल्या मनात खुष होत होता. आज सगळेजण बबन्याच्या पुढं-पुढं करत होते. त्यामुळे त्याला एखाद्या राजासारखं वाटत होतं.कधी पाणी मागीतलं तर न देणारी मग बबन्याचा धपाटा खाणारी त्याची लहान बहीण मंजू त्याची आज चांगलीच काळजी घेत होती.


मुलीकडील काही पाहुणे बबन्याला ओळख सांगत होते. बबन्याही सर्वांना हसून बोलत होता. बबन्याचा मित्र बाळया आणी बबन्याचा दाजी कलवरा होवून बबन्याच्या सोबत आले होते. दाजीचा स्वभाव बोलका होता. ते पाहुण्यांना बोलत होते. घराच्या बाजूलाच एक शाळा होती. शाळेला दिवाळीची सुट्टी होती. शाळेच्या मैदानातच मोठा मंडप दिलेला होता.तेथेच आज सायंकाळी हळदीचा कार्यक्रम होणार होता. शाळेतील वर्ग खोल्यांमध्येच पाहुण्यांची मुक्कमाची सोय केलेली होती. पाहुण्यांच्या बॅग, पिशव्या सर्व पोरीकडल्यांनी तेथे आणून ठेवल्या होत्या.

   

एव्हाना दिवस मावळलाच होता. हळदीची सगळी तयारी झालेली होती. बबन्याचा साखरपुडा होवून दोन महिने झाले होते. तेव्हा पासून बबन्यानं आपल्या होणाऱ्या बायकोला म्हणजेच राधाला पाहिलं नव्हतं. फक्त फोनवर बोलणं आणी कधीमधी व्हॉटस्अप व्हिडीओ कॉल आणी एकदा तिच्यासोबत चित्रपट पाहिला होता. एकदा शहरातल्या बागेत भेटला होता. तेवढचं काय ते त्याने तिला पाहिलं होतं. आज तिला पाहण्याची आतुरता त्याच्या मनात दाटून आली होती. तेवढयात ती तिच्या मैत्रीणींसोबत येताना त्याला दिसली. जी आजपर्यंत मनात होती, ती आजपासून आयुष्यात येणार होती. राधा सारखी सुंदर मुलगी पत्नी मिळाल्यामुळे बबन्या मनातच देवाचे आभार मानत होता. हळदीला सुरुवात झाली. बायांनी बारीबारीनं हळद लावली. पुन्हा एकमेकींना हळद घोळसली.


थंडीचे दिवस होते म्हणून पाणी तापवलेलं होतं. आता थंडी चांगली जाणवू लागली होती. तेवढयात नवरीच्या कलवऱ्यांनी चेष्टेने बबन्याच्या अंगावर गार पाण्याचा हंडा ओतला. बबन्या पहिलवान गडी बळकट शरीर होतं त्याचं. त्यानं मुद्दामच थंडी वाजत आहे असे जाणवु दिलं नाही. कलवऱ्या त्याला पाहून हसत होत्या. पण बबन्याच्या बहीणी चिडल्या होत्या. एवढया थंडीचं गार पाणी कशाला ओतलं, म्हणून त्या भांडु लागल्या. पण मोठे माणसं मधी पडल्यामुळे भांडण मिटलं. अंघोळ घातल्यानंतर बबन्या आणी सोबतच्या कलवऱ्या आपल्या खोलीत गेल्या. बाळया आणी दाजी झोपले होते. पण बबन्याला काही केल्या झोप येत नव्हती. लहाणपणापासून ते आतापर्यंत घडलेल्या घटनांचा, प्रसंगांचा पट त्याच्या डोळयासमोर उलगडत होता.उद्या आपलं लग्न होणार, या विचारानं आता मोठं झाल्याची जाणीव त्याला झाली. उद्यापासून एका व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येणार होती. आजपर्यंतचं बेजबाबदारपणाचं वागणं सोडून जबाबदारपणानं वागावं लागणार होतं. या विचारातच त्याला कधी झोप लागली ते कळलं नाही.

   

पहाटे ४:३० वाजता मोबाईलमधील आलार्म वाजल्यानं बबन्याला जाग आली. पोट साफ होतं का नाही? याचीच बबन्याला काळजी होती. पण सुदैवानं त्याचं पोट चांगलं साफ झालं. सौचाहून आल्यानंतर त्याने बाळयाला व दाजीला उठवलं. सर्वांनी अंघोळी,चहा, नाष्टा उरकून घेतला. वऱ्हाडाची एक-एक गाडी येऊ लागली होती. मोकळा मंडप आता गर्दीनं भरु लागला होता. आता साडे अकरा वाजत आले होते. लग्नाचा मुहुर्त १२:३५ चा होता. मित्र मंडळींच्या खर्च पाण्याची जबाबदारी बबन्यानं गोप्याकडं दिली होती. परण्या निघायची वेळ होत आली, तरी पोरं आले नव्हते. बबन्यानं पोरं कुठपर्यंत आली म्हणून विचारण्यासाठी बाळयाला फोन लावायला सांगीतला. बाळया म्हणाला, 

   “ते घ्यायला बसलेत धाब्यावर.” 

   बबन्या म्हणाला, “गोप्याला सांग जास्त पिऊ देवु नको म्हणून, नाहीतर धिंगाणा करतील वरातील”. 

   बाळयाने लगेच गोप्याला फोन लावला आणी म्हणाला,

   “लवकर निघा परण्या निघायची वेळ झाली टाईमपास करु नका, इथं परण्या निघाल्यावर नाचायला एक पण पोरगं नाही”.

   तिकडं गोप्या अमृत प्राशन करणाऱ्या मित्रांना म्हणाला, “चला आवरा लवकर, परण्या निघालाय”. 

   

तशी पोरांनी गडबड केली आणी ते आपल्या जीवलग मित्राच्या वरातीत नाचायला निघाले. परण्या निघाल्यावर नाचायला कोणीच नाही म्हणून बबन्या बेचैन झाला होता. पाहुणे परण्या लवकर काढा म्हणून गडबड करत होते. तेवढयात बबन्याला परण्यासाठी उशीर करायला एक कल्पना सुचली. 

   तो म्हणाला, “परण्याला घोडा नसेल तर मी येणारच नाही”. 

   

आता पाहुण्यांची चांगलीच पंचाईत झाली. पाहुण्यातले दोन पोरं घोडा बघायला गेले. तोवर बबन्याचे सगळे मित्र आले होते. पाहुण्यांनी कोठून तरी घोडा आणला, घोडा चांगला रगेल आणी उंच होता. बबन्या बुटका होता. त्यामुळे बबन्या जीव मुठीत धरुन घोडयावर बसला होता. डी.जे च्या तालावर बबन्याचं मित्र मंडळ नृत्याचे वेगवेगळे अविष्कार दाखवत होते. आता कुठं त्यांच्या अंगातल्या बयेनं जादू दाखवायला सुरुवात केली होती. पाहुणे लग्नाचा मुहुर्त टळून जाईन म्हणून गडबड करत होते. पण अमृत पिलेले बबन्याचे मित्र त्यांच्यासोबत हुज्जत घालत होते. ते कोणाचचं ऐकत नव्हते. डी.जे.च्या आवाजाने आणी पोरांच्या कालव्याने घोडा बिथरल्यासारखा करत होता.

  

 बबन्या घोडयावाल्याला म्हणाला, “जरा निट पकडा हं घोडा”.   त्यावर घोडेवाला म्हणाला, “घाबरु नका, मी नीटच पकडतो, “ते काय झालं,आमच्या घोडयाला दुसऱ्या लग्नाची सुपारी हाय, माझं पोरंगं घोडा घेवून तिकडं गेलंय आणी तुमच्या पाहुण्यांनी जरा गडबडीतच घोडा सांगीतला, तवा हेव माझ्या मित्राचा घोडा घेवून आलो, परण्यासाठी पहिल्यांदाच आणलाय ना. म्हणून जरा बिथरल्यासारखा करतो.”

    

हे ऐकून तर बबन्या आणखीनच भिला.वरात अर्ध्या रस्त्यात आली होती. तेवढयात बबन्याचे मित्र पक्या आणी पम्या बबन्याकडे आले. त्या दोघांनाच त्यांचा तोल सावरत नव्हता. आणी ते बबन्याला खांद्यावर घेवून नाचायचंय म्हणू लागले. बबन्या त्यांना नको-नको म्हणत होता. तेवढयात पक्यानं बबन्याचा उजवा पाय आणी पम्यानं डावा पाय धरला. त्या दोघांचाच एकमेकांना मेळ नव्हता. मध्येच बबन्याची टचींग झाली. बबन्याची पँट बोटभर फाटली. बबन्या त्या दोघांना लाथांनी झाडायला लागला. त्यामुळे घोडं बिथरलं. घोडयानं हिसका दिला. घोडा पकडणाराच्या हातून लगाम सुटला. काही कळायच्या आतच घोडयानं दोन-चार लाथा झाडल्या. एक लाथ पक्याच्या नाकाडावर बसली आणी एक लाथ पम्याच्या व्हटकाळावर बसली.


घोडयाच्या नाकात वारं शिरल्यासारखा घोडा वेगानं पळत सुटला. बबन्या मोठमोठयांन बोंबलत घोडयाच्या केसांना घट्ट पकडून बसला होता. परण्यातले सगळे लोक घोडयाच्या मागे पळु लागले. काहीजण फटफटया घेवून घोडयाच्या मागे लागले. त्यामुळे तर घोडा अजूनच बिथरला. ते उमदं जनावर आणखी जोरानं पळु लागलं. घोडा बबन्याला घेऊन गावातल्या गल्ली बोळांमधून पळत होता. पुढं काही आडवं आलं की, रस्ता बदलत होता. घोडयाला कळत नव्हतं कोणीकडे जावं, आणी बबन्याला कळत नव्हतं काय करावं? गावच्या होणाऱ्या जावयाला घोडयानं सगळया सासरवाडीचं दर्शन घडवलं.   


लग्नासाठी आलेले, नुकतेच बसस्थानकात उतरलेले पाहुणे लग्न कोठे आहे म्हणून पत्ता शोधत होते. तेवढयात त्यांना घोडयावर बसलेला बबन्या दिसला. बबन्या असा का म्हणून घोडा पळवत आहे, त्यांना काही कळेना. ते ही घोडयाच्या मागे पळु लागले. जवळ-जवळ अर्धा गाव होणाऱ्या जावयाला वाचवण्यासाठी घोडयाच्या मागे पळु लागला. नवरीच्या भावाचं तरुण मित्र मंडळ पाहुण्याला वाचवण्यासाठी गाडीवरुन घोडयाचा पाठलाग करु लागलं. गाडया जवळ येताच घोडा अजूनच वेगानं पळु लागला. एक फटफटीवालं घोडयाजवळ आलं, तशी घोडयानं गाडीच्या टायरला लाथ मारली. तसं ते पोरगं गाडीसकट बाजूच्या मोठया गटारीत पडलं. सुदैवानं त्याला काही लागलं नाही. घोडयाला आता गावाच्या बाहेर जाण्याची वाट सापडली होती. आता मोकळा रस्ता होता.


घोडयानं टॉप गिअर टाकला आणी ते आता बंदुकीच्या गोळीच्या वेगानं पळु लागलं. बबन्याला डोळयासमोर आता यमदुत दिसु लागला. तो मनातच म्हणत होता, मी उगाचचं घोडा मागवला, आता बसा बोंबलत.घोडा आता गावाच्या बाहेर आला होता. नदी जवळ आली होती. नदी अर्धी कोरडीच होती. नदीमध्ये वाळु होती. बबन्यानं देवाचं नाव घेवून घोडयावरुन वाळुमध्ये उडी मारली. बबन्याच्या गुडघ्याला आणी हाताला थोडं लागलं. बबन्या थोडावेळ तसाच पडून राहीला. थोडावेळापुर्वी बोटभर फाटलेली पँट आता चांगली हातभर फाटली होती. तेवढयात गाडीवर पाठलाग करणारे पोरं जवळ आले.त्यांनी बबन्याला गाडीवर बसवून मारुतीच्या पाराकडं नेलं. तिथं फाटके कपडे काढून नवे कपडे घातले.


   इकडं मांडवामध्ये घोडा नवरदेवासकट पळाला म्हणून गोंधळ माजला होता. ज्याला त्याला चिंता पडली होती, आता नवरदेव सुखरुप परत येतो का नाही? इकडं नवरीच्या कानावर पण ही हकीकत गेली होती. तीही होणाऱ्या नवऱ्याला सुखरुप परत आण म्हणून देवाला प्रार्थना करत होती. तेवढयात नवरदेव मांडवात आला. सगळयांच्या जीवात जीव आला. सगळेजण नवरदेवाकडं पाहत होते. तेवढयात देवबप्पा ओरडु लागले,   “लग्नाची वेळ झालेली आहे चला आपापल्या जागेवर बसून घ्या.नवरीचे मामा नवरीला घेवून या”. 

   

नवरी मांडवात आली. तिनं पहिल्यांदा नवरदेवाकडं पाहिलं. नवरदेव सुखरुप असलेला पाहून तिच्या जीवात जीव आला. अर्ध्या मंगलअष्टका झाल्यावर पम्या आणि पक्या आले. पोरांनी त्यांना दवाखान्यात नेले होते. त्या दोघांचेही चेहरे सुजले होते. ते दोघेही ओळखु येत नव्हते. लग्न झाल्यावर फोटोसाठी दोघेही नवरदेव नवरीच्या बाजूला उभे राहिले होते. आज दोन वर्षानंतर बबन्या त्याच फोटोकडे पाहून झालेला प्रकार आठवत हसत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy