निल्या
निल्या
निल्या हे नाव आहे एका कुत्र्याचं. खरंतर माणसांना जे समजत नाही ते प्राण्यांना समजत अशी म्हणं आहे. ती सत्यात उतरवली तो कुत्रा म्हणजे निल्या. निल्याला 'निल्या' म्हणून हाक मारली तर तो शत्रूलादेखील चावत नसे. परंतु ज्याला हे माहित नव्हतं त्याला निल्या सोडत नसे. निल्याच्या या स्वभावाची तऱ्हा गावातील सगळ्यांनाच परिचित होती.
आमच्या वस्तीवरील एक प्रतिष्ठित नाव म्हणजे अलकामामी. आम्ही सगळे त्यांना मामी म्हणत असायचो. आम्हाला भजनाची नितांत आवड लागण्यामागे एकच व्यक्ती होती ती म्हणजे अलकामामी. खडतर परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणारी अलकामामी ही गावच्या उपसरपंच पदापर्यंत पोहचलेली होती. गावातील लोकांच्या अडी -अडचणींना मदत करत असे, दुःखात धीर देत असे. निल्या हा अलकामामीचा आवडता कुत्रा. त्यांनी त्याला लहाणपणापासून पाळलेला नव्हता. पण कुठून तरी तो त्यांच्या घरी आला आणि अलकामामीने त्याला लळा लावल्यामुळे तो त्यांच्याच घरी राहिला. पांढऱ्या शुभ्र रंगांचा, मोठ्या देहयष्ठीचा आणि चौफेर व चाणाक्ष नजरेचा निल्या, अलकामामीच्या घरचा एक सदस्यच होता. सतत स्वयंपाकघरात जवळच बसायचा अगदी मूल असल्यासारखा. अलकामामी त्याचे खूप लाड करायची. त्याच्याशी गप्पा मारायची. कुणी घरी आले आणि धावून अंगावर गेला तर अलकामामीने हाक दिली की गप्प बसायचा. परंतु वस्तीवरील कोणालाही त्यांच्या घरी जायचे असेल तर भिती वाटायची ती निल्याची.
एकदा अचानक पंढरपूरच्या वारीवरुन अलकामामी घरी आल्यानंतर आजारी पडली. जवळच्या दवाखान्यात उपचार घेऊनदेखील तिला बर वाटलं नाही. तब्येत जास्त बिघडत गेली म्हणून अलकामामीला पुण्यातल्या चांगल्या दवाखान्यात ॲडमिट केले. तब्बल २५ दिवसांच्यावर ती ॲडमिट होती. अलकामामी घरी नाही त्यामुळे व्याकूळ झालेला निल्या घर सोडून निघून गेला. मध्ये मध्ये येत असे पण अलकामामी घरी नाही हे पाहून त्याने अन्न, पाणी सोडून दिले. दवाखान्यात खूप उपचार घेऊनही अलकामामी ठीक झाली नाही आणि अचानक हे जग सोडून गेली.
अलकामामी गेली हे समजताच त्यांच्या घरी गर्दीचा ओघ सुरू झाला. सकाळी दहाच्या दरम्यान मोठा आवाज करत एक ॲम्ब्युलन्स आली. अलकामामीचा मृतदेह बाहेर काढून ओट्यावर ठेवला गेला. निल्याला अलकामामी घरी आलीय याची कुठून चाहूल लागली समजल नाही पण गर्दीतून वाट काढत निल्या अलकामामी जवळ आला. पायांच्या जवळ बसून वास घेतल्यासारखे केले. त्याला काय समजलं माहित नाही परंतु तो गर्दीतून बाहेर निघून गेला. खरंतरं त्याच्याकडे कोणाचचं लक्ष नव्हतं. त्यानंतर अलकामामीचा मृतदेह अंगणात ठेवला गेला. पायावर पाणी वगैरे विधी उरकले गेले आणि शेवटी सगळेच अलकामामीच्या अंत्यविधी पार पाडण्यासाठी नदीवर गेले. तब्बल दोन-अडीच तासाने सगळेच घरी परतले. एकामागून एक सर्वचजण येऊन अलकामामीचा मृतदेह जिथे ठेवला गेला होता तिथे गर्दी करून उभे राहिलेले दिसले. मागून येणाऱ्या प्रत्येकाला वाटायचे तिथे लोकांनी का गर्दी केली असेल ? हळूहळू सगळ्यांच्या तोंडावर निराशेचे हावभाव उमटताना दिसले. कारण निल्यानेही आपला जीव त्या जागेवर सोडला होता आणि तोही अलकामामीच्या देहाबरोबर अनंतात विलीन झाला होता.