Suchita Bhushan

Drama Romance

3.4  

Suchita Bhushan

Drama Romance

निःशब्द प्रेम

निःशब्द प्रेम

6 mins
288


"हे बघ स्नेहा, माझ्या आई-वडिलांनी या... याच... छोट्याशा दहा बाय बाराच्या घरात संसार केला आणि आम्हा भावंडांना पण मोठे केले. लीनाताईचे लग्न या छोट्याशा घरातच केले. तुला म्हणालो होतो की, थोडे थांब लग्नाची घाई करू नकोस. पण तुला तर ऐकायचं नव्हतं. मला वेळ दे मी करेन तुझी सगळी स्वप्न पूर्ण!" अभी शांतपणे बोलत होता.


"ते तुला काय करायचे ते कर. मला काही माहित नाही. मी आता इथे नाही राहू शकत that's all..." असे बोलून स्नेहा ताडकन उठून तिची बॅग भरली अन् माहेरी निघून गेली. 


अभीचे आई-बाबा हे सगळं पाहत होते. त्याच्या आईला खूप वाईट वाटत होते. आत्ताच आठवड्यापूर्वी पोराचं लग्न झालं अन्..."


खरं तर कमलेश रावांसारख्या प्रामाणिक इमानदार माणसाला नशिबाने साथ दिली नाही. ते नाटक संगीतात अव्वल दर्जाचे कलाकार होते. पण त्यांना त्या क्षेत्रात यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी ते काम सोडून देऊन, बांधकाम क्षेत्रात कमावण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनीसुद्धा त्याकाळी सिव्हिल इंजिनिअरिंग केले होते. पण तिथेही त्यांना यश मिळाले नाही. कारण त्यांचा साधा सरळ स्वभाव! तोच त्यांना कायम नडला कुणावरही भरवसा करावा, फ्लॅटचे पूर्ण पैसे भरले नसतील तरीही घराचे पझेशन देऊन मोकळे व्हायचे. मग लोकांना काय फुकटचे राहायला! त्यातच बँकेचे कर्ज वाढले अन ते चुकवण्यासाठी स्वतःसाठी बांधलेला चांगला मोठा फ्लॅट विकून टाकावा लागला आणि या छोट्याशा जागेत राहायला यावे लागले.


अभीने आईचे डोळे वाचले आणि तो म्हणाला, "आपल्या घराची अवस्था पाहता आधुनिक जगातली कोणतीही मॉडर्न मुलगी क्षणभरसुद्धा इथे थांबणार नाही. आम्ही दोघेही खूप मेहनत करू आणि पुन्हा एकदा स्वर्ग उभा करू. तू काळजी करू नकोस." अन् कुसुमताई शांत झाल्या. कारण त्यांना अभीवर पूर्ण विश्वास होता.


अभिजीत सिव्हिल इंजिनिअर होता. कॉलेजात असताना त्याला स्नेहा मिळाली. अभिजीत तसा सरळ साधा आणि हुशार मुलगा होता. त्याला इतर मुलांसारखे उनाडक्या करणे, व्यसन करणे या गोष्टी आवडत नसे तो भला की त्याचा अभ्यास भला! स्नेहा त्याच्या याच गुणांवर भाळली अन् त्याच्या प्रेमात पडली होती.


स्नेहा एका मोठ्या कंपनीच्या मालकाची लाडाकोडात वाढलेली, थोडी फटकळ, अल्लड पण संस्कारी मुलगी होती. पाहता पाहता कॉलेज संपले. आता अभिजीत तिला पुन्हा कुठे अन् कसा भेटणार याची तिला चिंता वाटत होती. तिने आज ठरवले होते की, ती तिच्या भावना सरळ अभीला सांगून टाकणार. तशी ती बिनधास्त होती बोलायला पण का कुणास ठाऊक अभीशी बोलताना तिच्या पोटात गोळा आला. पण तरीही तिने मन घट्ट करून बोलायचे ठरवले. आणि त्याला कॉलेजच्या गेट जवळच गाठले. अन् सरळ म्हणाली, "अभिजीत तू एक खानदानी, सुशील मुलगा आहेस. माझ्यासारख्या मारक्या गाईशी लग्न करून तिला गरीब गाय बनवण्याची ताकद तुझ्यात आहे तू माझ्याशी लग्न कर. मी तुझ्यावर खूप प्रेम करते..." असे एका दमात तिने त्याला बोलून टाकले. तसा अभी हसला. तिला आश्चर्य वाटले की, हा का हसतोय. तिने त्याला विचारले, "का हसतोय? मी काही मस्ती करत नाहीये. I m serious! तू तर मला कधी नोटीसच नाही केले की, माझ्या मनातल्या भावना काय आहेत. दगड आहेस तू!"


"स्नेहा, तसे अजिबात नाही. मी सुद्धा प्रेम करतो तुझ्यावर... पण..."


"...पण... पण काय अभी?"


"मला माझे शिक्षण पूर्ण करायचे होते आणि तेही व्यवस्थित अव्वल नंबर मिळवून. मला प्रेम वैगरे या गोष्टींनी distract व्हायचे नव्हते."


हे अभीचे बोलणे ऐकून स्नेहा हबकून गेली. की इतके वर्ष याने भावना मोकळ्या केल्याच नाहीत. हा प्रेम करत होता माझ्यावर, याची मला जराही जाणीव करून दिली नाही. पण ती खुशही तेवढीच होती की तो तिचाच होता. तो सुद्धा तिच्यावर प्रेम करत होता!


"...पण मी अजून आर्थिकरित्या स्वावलंबी नाही. आत्ताच तर कुठे कॉलेज संपले आहे. आम्ही दहा बाय बाराच्या एका छोट्या खोलीत राहतो. आणि तुझ्यासारख्या श्रीमंत कुटुंबातील मुलीला तिथे राहायला जमणार नाही. प्रेमाच्या भावनेचा पूर ओसरायला वेळ नाही लागणार. म्हणूनच जीवनरुपी नौकेला भावनेच्या सागरात सोडण्याआधी एक वेळा नाही दहा वेळा विचार कर. बाकी तुझी मर्जी." अभिजीतने तिला समजावले होते.


"अभी माझा निर्णय पक्का आहे. मी लग्न करेन तर तुझ्याशीच!" स्नेहा ठामपणे बोलली होती.


तो म्हणाला, "ठीक आहे, पण मला थोडा वेळ दे. एखादी छोटी मोठी नोकरी मला मिळू दे. मग आपण विचार करू." तिने ते मान्य केले.


अभी सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे त्यानं ठरवलं होतं की, बांधकाम क्षेत्रातच नोकरी करायची. कमवण्याची सुरुवात करावी म्हणून त्याने एका बिल्डरकडे काम मिळवले. बऱ्यापैकी पैसे मिळत होते.


स्नेहाने अभीबद्दल तिच्या वडिलांना सांगितले. तसे ते चिडले. आपल्या राजकुमारीसारख्या मुलीला कुणी राजकुमार ते शोधतील अशी त्यांची इच्छा होती. पण स्नेहाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले होते. तिने अभिषेकबरोबर कोर्टात जाऊन लग्न केले. पण पाणी मागता दूध मिळणारी, महालात राहणारी स्नेहा अभीच्या घरच्या वातावरणाला एकाच आठवड्यात कंटाळली होती. अन् पुन्हा परत आपल्या माहेरी आली होती...


..अभीच्या कामातल्या इंटरेस्टमुळे अन् मेहनती स्वभावामुळे त्याच्या व्यवसायात तो प्रगती करत होता.  थोड्याच दिवसात तो नामवंत बिल्डर झाला.

  

इकडे स्नेहा तिच्या माहेरी गेली पण तिच्या कल्पनेच्या बाहेर तिला तिथे वागणूक मिळाली. तिचे वडील दिलीप राव... त्यांनी तिला स्पष्टपणे म्हटले, इथे राहून तू त्याला आर्थिक मदत करू शकत नाहीस. तुझी राहण्याची व्यवस्था दुसरीकडे बघ... 


वडिलांचे असे तोडून बोललेले स्नेहाला आवडले नाही. ती त्यांच्याकडे नजर रोखून पाहू लागली. तसे ते तिला म्हणाले, "हो, तू जिद्दीने हे लग्न केले मी नाही म्हणत असताना!  आमच्या मर्जी विरूद्ध!  हे बघ स्नेहा, बागेतला माळी सुद्धा वेड्यावाकड्या वाढलेल्या झुडपांना काढून टाकतो, मीसुद्धा या गोष्टींना मानतो..."

   

आता स्नेहाला तिथे राहणे मुश्किल वाटत होते. तिच्या मनाची घुसमट दूर करण्यासाठी आणि अभीच्या अन् तिच्या संसाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने एका ऑफिसमध्ये कॉम्प्युटर इंजिनीअरची नोकरी करण्यास सुरुवात केली. त्या कंपनीत तिच्यासारख्याच तीन मुली होत्या. ज्यांनी आपल्या नवऱ्याना सोडले होते. त्या तिघी स्वच्छंदी वागत असत. त्यांचे असे वागणे पाहून तिलाही त्यांच्यासारखे जगावेसे वाटू लागले.

  

त्या तिघींनी स्नेहाला उपदेशाचे डोस पाजून पाजून तिचे ब्रेन वॉश करून टाकले होते. आता ती खरंच स्वच्छंदी जीवनाचे स्वप्न पाहू लागली होती. संसार, मुलं हे सगळं करण्यापेक्षा आपणही स्वच्छंदी जगावे. तिने अभीबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याबद्दल दिलीपरावांना तिने सांगितले.


या सगळ्या गोष्टींचा स्नेहाच्या आईला मात्र राग येत होता. दुसऱ्याच दिवशी अभिजीतला नोटीस पाठवून, घटस्फोटासाठी कोर्टात केस दाखल करण्याचे ठरले.


कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. अभीला स्नेहाच्या अशा वागण्याची पूर्णपणे कल्पना होती. त्याने मनाची तयारी केली. स्नेहावर त्याने जीवापाड प्रेम केले होते. त्याला मनातून वाईट तर वाटत होते पण तो तिला संपूर्णपणे सपोर्ट करायला तयार झाला होता. 


कोर्टात त्याने पाहिले की, स्नेहा तिच्या निर्णयावर ठाम आहे. तिच्या चेहऱ्यावर जराही दुःख नव्हतं. किंवा पश्चात्तापाची एक रेषही दिसत नव्हती. उलट मॉडर्न कपड्यांमध्ये ती कोर्टात आली होती. आणि असं दाखवत होती की, जणू ती अभीला ओळखतही नाही.


स्नेहाचा वकील जज समोर एक एक गोष्ट मांडत होता, "माझी क्लायंट गर्भश्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे. तिला अभिजीतने लग्नाच्या जाळ्यात जबरदस्ती फसवले आहे."


अभीला त्याबद्दल विचारण्यात आले.


"तुमचा वकील कुठे आहे.?" कोर्टाने विचारले. तो शांततेत म्हणाला, "जज साहेब ,खऱ्या प्रेमाला साबित करण्यासाठी कुठलाही कायदा मदत करू शकत नाही त्यामुळे मी वकील केलेला नाही. स्नेहाने माझ्यावर प्रेम केले की नाही ते मला माहिती नाही. परंतु मी मात्र तिच्यावर जीवापाड प्रेम केले होते... मी तिच्या बाह्य सुंदरतेवर आंधळं प्रेम कधीही केले नाही. प्रेम नेहमी अंतर्मनातून आलेली हाक असावी आणि ती हाक मी ऐकली अन् स्नेहाशी भावनिक बंधनात अडकलो. ते अडकणे मला कधीही बेडी वाटली नाही. मला माझ्या प्रेमाचा अभिमान आहे आणि खरे प्रेम आपल्या प्रिय व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत दुःखी पाहू शकत नाही. माझे हृदय तिच्या जाण्याने दुःखी राहील पण माझ्या हृदयात राहणारी स्नेहा मात्र कायम खुश राहावी. स्नेहाला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी स्नेहाला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि राहिली गोष्ट भरण पोषणाची तर मी स्नेहाला तिच्या वडिलांवर किंवा भावावर बोजा बनू देणार नाही. आणि म्हणूनच स्नेहाला आवडेल असा डिझाईन केलेला एक बंगला आणि हा पन्नास लाखांचा चेक तिच्यावरच्या माझ्या प्रेमाचं बक्षीस म्हणून तिला देणार. हे घ्या वकीलसाहेब हा चेक आणि ही बंगल्याची चावी!"


जज साहेबांनी आत्तापर्यंत भरण पोषणासाठी भांडणारे नवरा-बायको पाहिले होते. पण आज त्यांच्यासमोर एक असा माणूस नवरा म्हणून उभा होता, ज्याने "प्रेम" शब्दाला खरोखर साबित करून दाखवले होते.


जज साहेब निःशब्द होऊन थोडावेळ स्तब्ध बसून राहिले. निर्णय लिहिण्यास त्यांची लेखणीही जणू निःशब्द झाली होती. त्यांनी एक कटाक्ष स्नेहावर टाकला. तो कटाक्ष हेच तिला विचारत होता की, तिचा निर्णय तिला बदलायचा आहे का? पण डोळ्यांवर भौतिक सुखाची झापड पडलेल्या स्नेहाला ते वाचायला जमले नाही. शेवटी भावनांना आवर घालून जड लेखणीने त्यांनी निर्णय दिला. आणि मनात बोलले,

"प्रेमाची व्याख्या ज्याला कळली तो विरळाच!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama