Suchita Bhushan

Drama Romance

3.5  

Suchita Bhushan

Drama Romance

अनामिका

अनामिका

17 mins
24K


"काय करतोस आक्या?" अक्षयच्या पाठीवर थाप मारून शेजारची मिनल बोलली.


तसा अक्षय भानावर आला. "आ... हो... काही नाही बोल ना काय म्हणतेस?"


"काही नाही बस मज्जेत! पण माझ्यापेक्षा तुझी जास्त मजा आहे हं आक्या... मुली तुझ्यावर लाईन मारतात आणि तुला माहितीसुद्धा नाही." आणि मिनल जोरजोरात हसत बोलली.


"कुछ भी यार तू..." असे म्हणून त्याने तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण मिनलने त्या गोष्टीचा पिच्छा सोडला नाही.


"सांग ना रे! कोण आहे ती? तुला माहीतच असणार पण तू बोलत नाहीस."


"अगं नाही गं बाई! कोण आहे ती मला माहित नाही. माहित असते तर तुला आधी सांगितले असते. तुझ्यापासून काही लपवले आहे का मी आजवर?"


अक्षय आणि मिनल दोघेही लहानपणापासूनच जिवलग मित्र होते. एकमेकांचे सुख-दुःख एकमेकांना सांगत असत. मिनलच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. ती सुद्धा अभ्यासात अक्षयप्रमाणेच हुशार होती. तिचे वडील आणि अक्षयचे वडील दोघे मित्र होते. मिनलची आई एका असाध्य रोगामुळे चार वर्षापूर्वीच देवाघरी गेली होती. तेव्हापासून मिनलच घरातली जबाबदारी सांभाळण्यास तिच्या वडिलांना मदत करत होती. दोन्ही कुटुंबात छान नाते होते. सुख-दुःख वाटून घेत होते. मिनल अल्लड, अवखळ होती. अक्षयशी तिचे वेगळेच नाते होते. एका धाग्यात दोन मणी बांधावे तसे हे दोघे राहत असत. कुठल्याही प्रकारची अडचण आली की, एकमेकांना विचारून सांगून ते solve करत असत. अक्षय मिनलचा उजवा हात होता. अन् मिनल अक्षयची... मिनलला दुसरे भावंड नव्हते त्यामुळे तिचे एकटेपण घालवण्यासाठी अक्षयच्या घरी येत असे. अक्षयचे घर म्हणजे तिला तिचे अर्धे घर वाटायचे. अक्षयची आई मिनलला खूप जीव लावत असे. ती त्यांच्या घरी निःसंकोचपणे येत जात असे.


अक्षय अभ्यासात मिनलपेक्षा २ वर्ष पुढे होता. गावात शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे त्याने १२ वी नंतर मेडिकलच्या शिक्षणासाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतले. मिनलची आई वेळेवर इलाज न मिळाल्यामुळे वारली.. आणि म्हणूनच तिला डॉक्टर बनायचे होते. तिचीही १२ वी झाली आणि तिनेपण अक्षयच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. अक्षय तिला अभ्यासात मदत करत असे. दोघेही अभ्यासात हुशार होते. त्यांचे लक्ष्य ठरलेले होते की, डॉक्टरच बनायचे. गावात डॉक्टर नाही म्हणून गावातल्या लोकांना खूप हलाकी सोसावी लागते. त्यामुळे दोघांची इच्छा डॉक्टर बनून गावातल्या लोकांची सेवा करण्याची होती. अक्षयचा दरवर्षी प्रथम क्रमांक ठरलेलाच असायचा.


....अक्षय आज कॉलेजला निघाला. पण आज त्याचा तयार होण्याचा अंदाज काही निराळाच होता. स्वतःकडे कधीही लक्ष न देणारा अक्षय आज अगदी आरशासमोर स्वतःला सारखे पाहत होता. केसांवरून सारखा कंगवा फिरवत होता. शर्टचे इन. व्यवस्थित आहे की नाही हे तपासात होता. आज त्याने मावशीच्या मुलाच्या लग्नात घालण्यासाठी जे बूट आणले होते, ते घातले, जे तो, खूप जपून वापरत असे. गरीब परिस्थिती असल्याने सगळ्याच बाबतीत तो खूप काटकसरी होता. तो तयार होण्यामागे एवढे लक्ष देत होता त्याचे कारणही तसेच होते. काल झालेल्या annual functionच्या फिशपोंडमध्ये कुणीतरी मुलीने त्याला indirect प्रपोज केले होते.


"अक्षय, तू मला खूप आवडतोस तुझ्या कविता माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत. मी तुझ्या काव्यावरच नाही तर तुझ्यावरसुद्धा प्रेम करते. सतत तुझ्याभोवती फुलपाखरासारखी फिरत असते. पण तुला मात्र मी का दिसत नाही कळत नाही. थोडे डोळे उघडून बघ ना.....! तुझीच अनामिका."


असे लाघवी वाटणारे लिखाण त्याच्यासाठी लिहिले गेले होते. तेव्हापासून त्याची ऐट बदलली होती. माझ्यावरही प्रेम करणारे कुणी आहे ही कल्पना त्याला सुखावत होती. दुसऱ्यांसाठी प्रेम कविता लिहिणारा हा वेडा कवी, असा कधी कुणाच्या प्रेमात पडला नव्हता. आणि त्याची राहणी एवढी साधी आणि गबाळी होती की, त्याच्यासाठी कोणी असेही लिहिल असे कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. सगळेच आश्चर्यचकीत होते...


"ओय आक्या चल ना, किती उशीर बस सुटेल. रोज तू मला हाक मारतोस कॉलेजात जायला आणि आज तुला मला बोलवायला यावे लागते? चल लवकर..." मिनलने बाहेरून आवाज दिला.


"कित्ती वेळ?" चिडून मिनल बोलली आणि अक्षयच्या घरात गेली. त्याला पाहताच ती थक्क झाली. "ओहो, क्या बात है! काय हीरो दिसतोय. पण काय रे असा नवरदेव बनून कुठे निघाला? कॉलेजमध्ये येतोय ना की लग्नात चाललास कुणाच्या?"


"ओय चिमणी..." अक्षय लाडात मिनलला चिमणी म्हणत असे कारण तिची सारखी चिवचिव सुरूच असायची... "लग्न बिग्न काही नाही. कॉलेजलाच निघालोय चल." असे म्हणत त्याने तिचा हात ओढला आणि बाहेर निघाला. तसा मिनलने त्याचा हात झटकला आणि कमरेवर हात ठेवून म्हणाली," अच्छा अब आयी बात समझ में... त्या अनामिकेसाठी ही एवढी तयारी, हो ना?" अक्षय गालातल्या गालात हसला. आणि चालत पुढे निघाला.


"मी जातोय उशीर झाला... तुला यायचे तर ये नाहीतर जा तिकडे, मी निघालो ..." असे म्हणत तो ताडताड निघाला. ...मिनल मागून चालत गेली अन् त्याला गाठून पाठीवर जोरात मारून म्हणाली, "त्या अनामिकेसाठी इतने दिनोकी दोस्ती तोड दोगे अब हा......?"


"नाही गं चिमणे! तुला कसा सोडीन." असे म्हणून त्याने तिच्या गळ्यात हात टाकला. मिनलने तो झटकून टाकला. आणि मस्ती करत ते बस स्टँडवर पोहोचले. त्यांच्या गावावून त्यांचे कॉलेज ३० मिनिटाच्या अंतरावर होते. ते दोघे बसमधून उतरून कॉलेजात पोहोचले. आज अक्षय कॉलेजात प्रवेश करत असतानाच काहीसा वेगळा अनुभव करत होता. तो खूप सावधपणे चालत होता. त्याची नजर कावरीबावरी होऊन त्या अनामिकेला शोधत होती... त्याला वाटले न जाणो "ती" अनामिका... अचानक समोर आली तर?? तो त्याच विचारात दिवसभर वावरत राहिला.... पण... सबंध दिवसभरात कुणीही मुलगी त्याला त्या नजरेने पाहताना बोलताना दिसली नाही. संध्याकाळी कॉलेजामधून परत निघताना रागाने त्याने शर्टचे इन काढून टाकले. तो हिरमुसला चेहऱ्याने बसमध्ये बसला. मिनल त्याच्या जवळ जाऊन बसली आणि तिने त्याची टिंगल सुरू केली.


"काय मिळाली का तुझी हिरोईन? एवढं तयार होणं काही कामास नाही आले..." अक्षयचा चेहरा खूप उदास होता. तो आता त्या अनामिकेच्या प्रेमात पडला होता. त्याला अनामिकेला भेटण्याची हुरहूर लागून राहिली होती. पण त्याचा भ्रमनिरास झाला होता. दिवसामागून दिवस जात होते पण "ती अनामिका" काही त्याच्यासमोर आली नाही.


अक्षयचा आज कॉलेजातील शेवटचा दिवस होता. बघता बघता कॉलेज संपत आले होते त्यामुळे अक्षय आज खूप उदास झाला होता. त्याची अनामिका त्याला आज शेवटच्या दिवशी तरी भेटायला येईल, असे वाटले होते. पण तसे आजच्या शेवटच्या दिवशीही घडले नव्हते. तो अत्यंत खिन्न मनाने कॉलेजातून बाहेर पडला होता.


तो त्या अनमिकेच्या विरहात आता काव्य लिहू लागला होता.  मेडिकल फायनल इअरचा रिझल्ट आला.... तो कॉलेजातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता. त्याचे गावात खूप कौतुक केले गेले. पेपरमध्ये त्याचे नाव छापून आले. असे त्याचे यश पाहून घरच्यांबरोबरच मिनललाही खूप आनंद झाला. मिनलसुद्धा दरवर्षी अव्वल नंबरने पास होत होती. अक्षयने आता गावातच दवाखाना उघडला होता. गरिबीची जाण त्याला होती त्यामुळे तो गरिबांचा इलाज मोफत किंवा खूप कमी दरात औषध देऊन करत असे. कुटुंबात तोच एवढे शिकून, गावातला पहिला डॉक्टर झाला होता.  त्याला आता लग्नासाठी मुली सांगून येऊ लागल्या होत्या. पण अक्षय मात्र नकार देत होता. तो अजूनही त्या अनामिकेची वाट पाहत होता. ती कधीतरी येईल आणि मग मी तिच्याशी बोलून तिच्याशीच संसार थाटेल असे त्याचे स्वप्न पाहत होता.

 

अक्षयचे कॉलेज संपल्यावर मिनल कॉलेजात एकटी पडली होती. हल्ली तिची आणि त्याची भेट फार कमी होत होती. कारण अक्षय त्याच्या क्लिनिकमध्ये बिझी असायचा. आणि मिनल तिच्या अभ्यासात. नाही म्हणायला अभ्यासात काही अडचण आली तर अक्षय बरोबर ती discuss करत असे. एका रविवारी मिनल अक्षयकडे आली. अक्षयशी तिचे बोलणे झाल्यानंतर, ती जायला उठली तेवढ्यात अक्षय तिला म्हणाला, "कॉलेजात माझ्याबद्दल कुणी काही चौकशी केली का गं कधी?"


मिनल खळखळून हसली. म्हणाली, "ओय मजनू, तुला अजून कळलेच नाही का तुझी अनामिका प्रेमिका कोण ते...? अन् तू तिचा शोधही घेतला नाहीस?"


"नाही गं, मी आता क्लिनिकमध्ये एवढं गुंतलोय की, या गोष्टींना वेळच नाही मिळत. पण आता घरातले लग्न कर म्हणत आहेत... आणि माझे मन त्या अनामिकेला शोधतेय. मी असे ठरवले आहे की तीच अनामिका जीवनसाथी म्हणून मिळाली तर..... पण अशी कशी गं ती मुलगी, असे प्रेम प्रदर्शित करूनही एवढे वर्ष समोरच आली नाही? मिनुडी माझ्या बरोबर कुणी चेष्टा केली असेल का गं? माझी टर उडवली असेल बहुतेक.. मी कुठे एवढा हँडसम आहे? नाही का?" असे बोलून अक्षयचा आवाज जड झाला. त्याच्या आवाजातील कातरपणा स्पष्ट सांगत होता की त्याला अनामिकेसाठी किती प्रेम.. ओढ... होती.


"असे कसे बोलतोस? तुला काय माहित तुझ्यात काय आहे?" मिनल काहीसे रागातच बोलली आणि तिथून निघून गेली. आणि अक्षय आपल्या कामाला लागला.

     

त्याच्या आईवडिलांनी, त्याला लग्न कर... लग्न कर असे सारखे पालुपद लावले होते. तो आता काही बहाणेही सांगू शकत नव्हता. त्यांनी एका मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरवला. त्याच्या गावापासून जवळच त्यांच्याच नात्यातली एक graduate मुलीचे स्थळ होते, सुमेधा नाव होतं तिचं आणि ते स्थळ यांच्यापेक्षा जरा वरचढच होते व सुमेधा दिसायला अतिशय सुंदर होती. घरातल्या मोठ्या लोकांनी सगळे काही ठरवून चांगल्या मुहूर्तावर लग्न ठरवले. अक्षय लग्नाला घेऊन फारसा उत्साहीत नव्हता. पण त्याने परिस्थितीशी तडजोड करायचे ठरवले. त्याला दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.

     

लग्न थाटात पार पडले. अक्षय पती म्हणून सगळीच कर्तव्य चोख बजावत असे. सुमेधाला काहीही कमी पडू देत नसे. पण सुमेधाने बड्या घरची मिजास दाखवण्यास सुरुवात केली. तिला इकडे आल्यावर माहेरच्या सुखवस्तुंचा अभाव भासू लागला होता आणि त्यामुळे ती येता जाता, उठता बसता अक्षयचा आणि त्याच्या घरच्यांचा पाणउतारा करू लागली. भौतिक सुखांची झापडे तिच्या डोळ्यांवर असल्यामुळे त्यांच्या मनाची श्रीमंती तिला कधी दिसलीच नाही. 

   

सुमेधाच्या अशा वागण्याने अक्षय दिङमुढ झाला. आणि त्यामुळे अनामिकेचे रितेपण त्याला जास्त जाणवू लागले. त्याच्या मनाची घालमेल वाढू लागली होती. अनामिकेची ओढ त्याला सतावत होती. तो रोजचे काम तर करायचा, पण त्याचे मन सतत बेचैन राहू लागले. अक्षयला हे दुःख कुणाशी तरी शेअर करावेसे वाटले. मिनलशिवाय दुसरे कोण असणार? लहापणापासूनचीच त्याची ही सवय! त्याला सगळ्यात जवळची तर फक्त मिनल होती. त्याने तिला फोन केला. ती म्हणाली, "sorry आत्ता वेळ नाही."

"मिनल अगं it's urgent please do come यार..." ती जास्त टाळू शकली नाही. ती येते म्हणाली. ती आणि अक्षय त्यांच्या नेहमी गप्पा मारत असत. तिथे घराच्या टेरेस वर अक्षय तिची वाट पाहात होता. मिनल आली. तो तिला म्हणाला, "मिनल अगं माझे मन खूप बेचैन आहे." 


मिनल काळजीने म्हणाली, "काय रे काय झाले?"


अक्षय बोलला, "सुमेधा घरात मला व इतर सर्वांना खूप त्रास देते, सर्वांचा अपमान करते. मिनू माझे मन त्या अनामिकेसाठी बेचैन आहे. ती असती तर खरंच मला खूप सुख लागले असते ती माझ्यावर जीवापाड प्रेम करत होती. तिने बोलायला हवे होते, ओळख द्यायला हवी होती तिने मला सुखात ठेवले असते. काश! ती मला कधी भेटली असती...."


"तू वेडा आहेस का? तुझे लग्न झालेय आता... तुला तिचा विचार नको करायला." आणि मिनलच्या डोळ्यातही पाणी आले. तिने त्याला खूप समजावले. त्याचे मन मानत नव्हते.

  

आई-वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी त्याला सुमेधाशी संसार करावाच लागणार होता. आणि त्याने कसेबसे मनाला सावरत संसाराची वेल बहरावयची असे ठरवले. पण म्हणतात ना एकदा का एखाद्या गोष्टीला नाट लागली की मग ती गोष्ट बिघडतच जाते.. त्याप्रमाणेच अक्षयच्या संसाराचे झाले. सुमेधा आणि अक्षयच्या संसारात तिच्या आईची मध्यस्ती दिवसेंदिवस जास्तच वाढू लागली आणि त्यामुळे अक्षय अन् सुमेधामध्ये सारखे खटके उडू लागले होते. घरात नुसती कटकट असायची. तिची आई येऊन तिला नाही नाही ते शिकवत असे. आणि सुमेधाही हलक्या कानाची असल्याने ती आईच्या सांगण्यावरून अक्षयशी आणि त्याच्या घरच्यांशी वाईट वागत असे. तिच्या आईच्या सांगण्यावरून तिने अक्षयला त्याच्या आई-बाबांपासून दूर केले. त्याला वेगळे राहण्यास भाग पाडले. अक्षयला वाटले असे करण्याने तरी घरात शांती राहील पण तसे घडले नाही उलट तिची कटकट वाढली होती. तिला नेमके काय हवे होते तेच कळेनासे झाले होते.  

    

इकडे मिनलचे मेडिकलचे शिक्षण पूर्ण झाले होते. तिनेदेखील प्रॅक्टिस सुरू केली होती. काहीही अडचण आली की ती अक्षयशी discuss करत असे. आता पहिल्यासारखी मस्ती मजाक त्यांच्या दोघात होत नसे, कामापूरते बोलून दोघे जण आपल्या कामाला निघून जात असत. आता तिच्या लग्नाची काळजी तिचे वडील करायला लागले होते. पण मिनल मात्र लग्नास तयार नव्हती. तिने लग्न करायचे नाही असे ठरवले होते. तिच्या वडिलांनी तिला खूप समजावले पण तिने ऐकले नाही. खूप छान छान डॉक्टर, इंजिनिअर, वकीलदेखील तिला सांगून आले, पण तिने नकार दिला. तिला समजावून सांगणारा फक्त अक्षय आहे, असे म्हणून तिची ही तक्रार तिच्या वडिलांनी अक्षयजवळ केली. अक्षय तिच्याशी बोलेन मी, असे म्हणाला. मोका पाहून अक्षय मिनलशी बोलला, "काय गं चिमणे हे घरटे का नाही सोडायचे तुला? एवढे छान छान स्थळ येताहेत तर करून टाक ना लग्न! बाबांना का त्रास देतेस."

"हे बघ अक्षय तू माझ्या भानगडीत पडू नकोस हा माझ्या जीवनाचा प्रश्न आहे... आणि तू मला उगाच फुकटचे सल्ले देऊ नकोस..."


"मिनल, मला खरे सांग का लग्न करायचे नाही तुला? कुणी मनात भरलाय का? तसे असेल तर ते सांग. मी बोलेन काकांशी..." अक्षयने तिला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. पण मिनल काहीही बोलायला तयार नव्हती. तिच्या मनात काहीतरी खळबळ चालली आहे. पण ती त्याच्यापासून लपवत आहे हे अक्षयने ओळखले होते.

    

अक्षय मिनलला खोदून खोदून लग्न न करण्याचे कारण विचारू लागला. पण मिनलच्या कानापर्यंत त्याचे शब्द पोहोचत नव्हते. ती सुन्न होऊन शून्यात बघत उभी होती. भूतकाळाच्या त्या भयानक घटनेने तिच्या मनात थैमान घातले होते. आणि... मिनलच्या भावनांचा बांध सुटला. ती अक्षयच्या खांद्यावर डोकं ठेऊन ओक्साबोक्शी रडू लागली. अक्षयला कळेना की हिला अचानक काय झाले. तिला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. पण तिचे रडणे थांबत नव्हते. अक्षयने तिच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला, "का रडतेय? मिनू शांत हो. काय कारण ते तर सांगशील की नाही?" तिने स्वतःला कसेबसे सावरले आणि अश्रू पुसत ती खाली बसली. अक्षयने तिला पाणी दिले, "take your time..." म्हणत तिला दिलासा दिला. थोडावेळ दोघांत स्तब्धता होती. मिनलने सावरत एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली..... आणि अक्षयच्या पायाखालची जमीन सरकली.

     

.......मिनलच्या वडिलांची गरीब परिस्थिती होती. छोट्याश्या जमिनीच्या तुकड्यात शेती करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यात मिनलचे शिक्षण. मिनल अभ्यासात हुशार असल्यामुळे तिला १२ वी तरी शिकवायचे असे तिच्या वडिलांनी ठरवले होते. मिनल १२ वीत अव्वल नंबरने पास झाली होती. पुढच्या शिक्षणासाठी तिचे वडील तयार नव्हते. पण आईच्या मृत्यूनंतर गावात डॉक्टर नसल्याकारणाने अन् वेळेवर ट्रिटमेंट न मिळाल्यामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला होता त्यामुळे तिने डॉक्टरच बनायचे असे ठरवले होते. आणि मेडिकलला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी म्हणून एक एक पै जोडून ठेवला होता. मेडीकल कॉलेजची फी त्यांना परवडण्यासारखी नव्हती. आणि म्हणूनच मिनलने मेडिकलला जाऊ नये, अशीच त्यांची इच्छा होती. पुन्हा मुलीच्या जातीने एवढे शिकून काय करायचे? या बुरसटलेल्या विचारांमुळे तिच्या डॉक्टर होण्याच्या इच्छेवर पाणी फिरणार होते. पण मिनलच्या हट्टापुढे आणि गावातल्या काही प्रतिष्ठित आणि शिक्षित लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी मिनलला मेडिकलला जाण्याची परवानगी दिली. पहिल्या वर्षाची फी तिच्या लग्नासाठी काढून ठेवलेल्या पैशांनी भागवली होती. दुसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी मात्र तिच्या वडिलांकडे एक रुपयाही नव्हता. वर्षभर कितीही प्रयत्न केले असते, तरी ते शक्य नव्हते. पैशांची जमवाजमव कशी करावी या विवंचनेत तिचे वडील होते. तशातच ते दोघे रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवळच्याच गावात त्यांच्या बहिणीकडे म्हणजेच मिनलच्या आत्याकडे गेले. मिनलच्या आत्याचे लग्न चांगल्या श्रीमंत घराण्यात झाले होते. ते लग्नही मिनलच्या वडिलांनीच पार पाडले होते. पण गरीब परिस्थितीमुळे त्या लोकांनीच लग्नाचा सगळा खर्च केला होता.

     

पैशांच्या अडचणीमुळे मिनलच्या पुढच्या शिक्षणाची त्यांना काळजी आहे. हे तिच्या आत्याच्या घरात सगळ्यांना कळले होते. आत्या संयुक्त कुटुंबात राहत होती. तिचे आत्तोबा सम्राटराव बोलले, "तुम्ही काळजी करू नका. आपण मिनलची फी भरून देऊ. तिचे शिक्षण तुम्ही थांबवू नका. किती पैसे हवेत ते सांगा, एवढेच नाही पुढचे संपूर्ण मेडिकल कॉलेजचा खर्च आम्ही देऊ. मग मिनल डॉक्टर झाली की, ती फेडेल आमचे पैसे! काय मिनल?" असे हसत आणि विश्वास देऊन ते बोलले. मिनलच्या वडिलांनी त्यांचे मनापासून आभार मानले. आवश्यक तेवढ्या रकमेचा चेक त्यांनी मिनलच्या वडिलांच्या हातात दिला, लागेल तेव्हा अजून पैसे देऊ असेही बोलले. मिनलचे सेकंड इअर सुरू झाले. ती खूप मन लावून अभ्यास करू लागली होती.

     

त्या दिवशी.... मिनलचे वडील शेतावर गेले होते. आणि मिनल घरात अभ्यास करत बसली होती. तेवढ्यात दारावरची कडी वाजली. तिने दार उघडले. दारात तिच्या सम्राट राव उभे होते. मिनलने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांना पाणी प्यायला दिले. "बाबा कुठे गेले?" त्यांनी घरात पाहत विचारले. 


"आत्ताच शेताकडे गेलेत." असे म्हणून ती चहा ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. दुपारची वेळ होती. आजूबाजूला सामसूम होती. मिनलने दोघांचा चहा गाळून दोन कप एका ट्रे मध्ये घेऊन आली. मिनलकडे अजून पाणी हवे आहे असे ते म्हणाले. ती पाणी आणायला आत गेली. परत येऊन तिने त्यांना पाणी दिले आणि सम्राट रावांनी त्यांचा कप उचलून घेऊन ते चहा प्याले. मिनलही चहा प्याली. सम्राट राव जायला निघाले.


"काही निरोप द्यायचा का बाबांना?" मिनलने त्यांना विचारले.


"नाही मी निघतो, मी एका कामानिमित्ताने इकडे आलो होतो. तुम्हा दोघांची भेट घ्यावी म्हणून आलो होतो." आणि ते तिथून निघून गेले. इकडे मिनलच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला होता. तिला हळूहळू घेरी येऊ लागली होती. तिला काहीच कळत नव्हते. डोकं गरगरायला लागलं होते. समोरचे काहीही दिसत नव्हते. आणि हळूहळू ती बेशुद्ध होऊ लागली होती. बरोबर ५ मिनिटांनी दार उघडून सम्राट आत आला. दरवाज्याला आतून कडी लावली. आणि.... त्या नराधमाने मिनलवर पाशवी बलात्कार केला. तिला तशाच अर्धनग्न अवस्थेत टाकून तो आपली वासना शमवून तिथून निघून गेला.... मिनल भानावर आली तेव्हा आपण आयष्यातून उठलो आहे, आपल्याला डॉक्टर होण्याची किंमत आपले शील भ्रष्ट करून मोजावी लागली हे तिला कळले. मोठ्या प्रयासाने तिने स्वतःला सावरले अंगावरील कपडे नीट करून, ती कितीतरी वेळ एकटीच रडत बसली होती. कुणाला बोलूही शकत नव्हती, ती आतून फार खचली होती.

      

....हे सगळं ऐकता ऐकता अक्षयच्या डोळ्यासमोर अंधार झाला. त्याचंं डोकंं सुन्न झालें. तो मटकन खाली बसला. "बस मिनल! थांब!" तो त्याचे अश्रू थांबवू शकला नाही. तो डोक्याला हात लावून बसला. मिनलचेही अश्रू थांबत नव्हते. तिने चेहरा दोन्ही हातांनी लपवून घेतला आणि ती जोरजोरात रडू लागली. अक्षयला कळत नव्हते. मिनलला सावरू की स्वतःला सावरू! त्याची मतीच खुंटली होती. थोडा वेळ स्मशान शांतता होती. आवाज उरला होता तो फ़क्त हुंदक्यांचा फक्त मिनलचे हुंदके तेवढे ऐकू येत होते. अक्षय तिच्या जवळ गेला. त्याची तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. तरी धैर्य एकवटून तो तिला म्हणाला, "मिनू, तू बाबांना सांगितले? पोलिसात कम्प्लेंट केली?"

"नाही अक्षय! ना मी बाबांना सांगितले ना पोलिसांना. बाबा हार्ट पेशंट आहेत, त्यांना ही गोष्ट सहन नसती झाली. माझा

एकुलता आधारही मी गमावून बसले असते. आणि पोलिसांत गेले असते तर माझी समाजात छी थू झाली असती. ते पैसेवाले लोक आहेत त्यांनी पैशाच्या जोरावर माझीच बदनामी केली असती...."

"....मिनू, अगं त्या माणसाला धडा शिकवायला नको का?? आणि पोलिसांनी तुझे नाव जगजाहीर न करता त्या नालायक माणसाला शिक्षा दिली असती... आणि काय गं, तू मला का नाही सांगितलेस?? फाडून टाकला असता साल्याला उभा!"


"तू तुझ्या क्लिनिकच्या कामात बिझी होतास आणि.... आणि..."


"आणि काय मिनल?" अक्षयने काहीशा रागात आणि कळकळीने विचारले.

"...आणि... काही दिवसांनी सम्राट राव घरी आला होता. त्याने मला धमकी दिली होती की, तू जर कुणाला बोललीस तर तुझ्या आत्याला कायमची घरी पाठवून देईन. ही गोष्ट गुप्तच राहायला हवी... म्हणून मी गप्प बसले. खूप बोभाटा झाला असता. माझे करीयर, बाबांची प्रतिष्ठा पणाला लागली असती. आणि आत्यालाही त्रास झाला असता. म्हणून मी काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला."


"पण तुझ्या सन्मानाचे काय मिनू?"


"तो मी सांभाळला आहे अक्षय! मी म्हणूनच लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे."

  

असे बोलून ती पुन्हा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. तेवढ्यात सुमेधा तिथे येऊन पोहचली. आणि तिने हे दृश्य पाहिले. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिला मिनल व अक्षय लहानपणीचे मित्र आहेत हे माहीत होते पण दोघातल्या मोकळ्या स्वभावामुळे दोघांचे प्रेमसंबंध असावेत अशी तिला शंका यायची. आज तिने जे पाहिले त्याचवेळी सुमेधाची तळपायाची आग मस्तकाला गेली. कोणतीही विचारपुस न करता तिने मिनलच्या थोबाडीत मारली. आणि अक्षयकडे रागात पाहून ती तावातावाने तिथून निघून गेली. तशी मिनल पण तिथून निघून गेली. पाठोपाठ अक्षयही घरी गेला. सुमेधाने बॅग भरली होती. ती अक्षयला वाट्टेल तसे बोलली. खूप कटकट करून ती पुन्हा येणार नाही असे म्हणून ती त्याच पाऊली माहेरी निघून गेली. अक्षयने खूप समजावण्याचा प्रयत्न केला की त्याचे आणि मिनलचे काय बोलणे झाले... पण तिला काहीही समजून घ्यायचं नव्हतं. अक्षय आधीच मिनलच्या गोष्टींनी खूपच डिस्टर्ब होता. त्यात सुमेधाची कटकट आणि तिचे घर सोडून जाणं... या सगळ्या गोष्टींनी त्याचे चित्त विचलित झाले. त्याचे डोके सुन्न झाले होते. काय करावे त्याला सूचत नव्हते. त्याने बाईक काढली, वाट मिळेल तिकडे भरधाव पळवली. गाडीच्या वेगाबरोबरच त्याच्या विचारांचा पण वेग वाढला होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. दोन गोष्टी आज त्याच्यासाठी खूप त्रासदायक घडल्या होत्या. त्याचं डोकं एवढं सुन्न झालं होतं की मागच्या ट्रकचा हॉर्नही त्याला ऐकू आला नाही आणि ट्रक ड्रायव्हरला वाटले की हॉर्न ऐकून तो गाडी बाजूला घेईल पण... तसे झाले नाही.... आणि... आणि...

      

तिथूनच अक्षयला नागपूरच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. घरच्यांना कळवण्यात आले. मिनलसह सगळे हॉस्पिटलला पोहोचले. अक्षयच्या आई-वडिलांची अवस्था पाहवत नव्हती. मिनलने त्यांना दिलासा दिला. डॉक्टरांशी तिने अक्षयच्या केसबद्दल चर्चा केली. डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे तो बेशुद्ध होऊन कोमात गेला असल्याचे तिला कळले. तिला धक्काच बसला. अक्षयच्या या अवस्थेला आपण जबाबदार आहोत असे समजून मिनलला रडू आले. तिच्या डोळ्यातले अश्रू तिने गुपचूप एका कोपऱ्यात जाऊन टिपले. तिने त्याच्या आई-बाबांना सांगितले, मी आहे ना तुम्ही काळजी करू नका. मी इथे त्याच्याबरोबर राहीन. काहीही गरज वाटल्यास तुम्हाला सांगेन. पण तुम्ही घरी जा. मिनलही डॉक्टर असल्यामुळे ते थोडे निश्चिंत होऊन घरी गेले. तिकडे जाऊन सुमेधाला अक्षयबद्दल कळवले पण ती अक्षयला पाहायला आली नाही. त्याचे आई-वडील हताश झाले. एकुलत्या एक मुलाच्या नशिबी आलेले हे सगळे दुःख पाहून त्यांचे काळीज तुटले.

   

इकडे मिनल अक्षयला एक मिनिटही सोडत नसे. अक्षयच्या या परिस्थितीला ती स्वतःला जबाबदार धरत असल्यामुळे ती त्याची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होती. आणि ती हाही विचार करत होती की,  तिच्यामुळेच सुमेधा घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे तिने स्वतः सुमेधाला फोन करून माफी मागण्याचे आणि सत्य काय आहे ते सांगण्याचे ठरवले होते.... सुमेधाने तिचा फोन उचलला नाही. मिनलला वाईट वाटले. पण तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.

  

तिचे लक्ष आता अक्षय कोमातून कधी आणि कसा बाहेर येईल याकडे होते. ती त्याची खूप काळजी घेत होती. तो लवकर बरा व्हावा म्हणून चांगल्या चांगल्या डॉक्टरांशी तिने संपर्क करून अक्षयचा इलाज सुरू केला. दुपारच्या वेळी ती जणू अक्षय तिला ऐकतोच आहे अशा आविर्भावात त्याच्याशी गप्पा मारत असे.


"तुला आठवते आक्या आपण कॉलेजमध्ये किती धमाल करायचो? कॅन्टीनमध्ये तर सँडविचवर काय ताव मारत असू.. आणि ती कुल्फी.... wow... आणि annual day च्या दिवशी तर काय धम्माल यायची ना! फीशपोंडमध्ये तर एकमेकांची खेचण्यात तर परमसुख मानायचे सगळे आणि आक्या... तुझी ती अनामिका.... तिने बोलायला हवे होते... आणि ती बोलता बोलता थांबली... ती आली असती तर तू लग्न केले असते ना? हो तू वाटच पाहत होतास तिची.. पण ती नाही येऊ शकली..." असे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते अक्षयच्या हातावर पडले. का कुणास ठावूक पण ते अश्रू संजीवनी शिंपडल्यासारखे, त्याला जीवनदान देऊन गेले अन् तो कोमातून बाहेर येऊ लागला होता. त्याचा हात हलला, ओठ काहीसे पुटपुटत होते. मिनलला आनंद झाला. तिने लागलीच डॉक्टरांना बोलावले. तब्बल दोन महिन्यांनी अक्षय कोमातून बाहेर आला. अक्षयच्या आई-बाबांना फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली. तसे ते हॉस्पिटलमध्ये धावत आले. मिनल तर खूप खुश झाली. तिची सगळी मेहनत कामी लागली होती. अक्षयला अजून १ आठवडा तरी under observation ठेवावे लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे पडले.

    

अक्षयजवळ मिनल होतीच. अक्षय शून्यात डोळे लावून पाहात बसायचा. जखम ओली असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा ताण सहन होणार नाही हे तिला माहीत होते. आणि अक्षय मागच्या गोष्टींचा विचार करेल म्हणून, मिनल त्याला लहानपणीच्या गमतीजमती, कॉलेजच्या गोष्टी सांगून त्याचे लक्ष वर्तमान परिस्थितीतून हटवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. कारण अक्षयचे गप्प बसण्याचे कारण मिनलला माहित होते. तो तिला म्हणाला, "सुमेधा नाहीच आली ना? मी अशी काय चूक केली गं? की तिने असे वागावे?" हे बोलत असताना त्याच्या डोळ्याचा कडा पाणावल्या.

मिनल म्हणाली, "please, नको त्रास करून घेऊ.... मी तिला स्वतः घेऊन येईन तू काळजी करू नकोस. माझ्यामुळे ती गेलीय."

"नाही मिनू, आता ते शक्य नाही. तिला यायचे असते तर ती तेव्हाच आली असती. ती तुझा अपमान करेल. आणि ते मला चालणार नाही. कारण तुझी काहीही चूक नाहिये." हे ऐकुन मिनूचे डोळे डबडबले.

"मिनू, ती बायको असूनही अशी वागली? अन् तू तब्बल दोन महिने माझ्यासाठी इथे.... काय बोलू मी... शब्द नाहीत माझ्याकडे..."

"दोस्ती की हैं... निभानी तो थी....."

"का आणि किती खोटे बोलशील मिनू...."


दाराच्या दिशेने एक आवाज आला....

दोघांनी दाराकडे पाहिले.. तर दारात सीमा उभी होती. अक्षय आणि मिनल ची common फ्रेंड होती सीमा!

    

मिनल घाईत दाराजवळ गेली. आणि सीमाला डोळ्यांनीच इशारा करून गप्प बस म्हणाली. पण सीमाने ऐकले नाही. तिला टाळून ती अक्षयजवळ गेली.


"अक्षय तुला तुझ्या अनामिकाला भेटायचे?"

डोळे बंद कर... अक्षयला कळत नव्हते काय चाललंय. त्याने सीमाच्या सांगण्यावरून डोळे बंद केले. तशी सीमा रागात मिनलजवळ गेली आणि तिचा हात धरून अक्षयसमोर उभी केली.

"आता उघड डोळे..."


अक्षय डोळे उघडून इकडे तिकडे पाहू लागला. पण या दोघींशिवाय तिसरे कुणी नव्हते.

सीमाने मिनलला अक्षयजवळ नेले. आणि मिनलचा हात अक्षयच्या हातात देऊन बोलली, " ही... ही आहे तुझी अनामिका..." हे बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले.

अक्षय अवाक् झाला. त्याला काय ऐकतोय यावर विश्वास बसेना. त्याने मिनलकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले... मिनलनेही डबडबलेल्या नजरेनंच होकार दिला.

   

त्याचा आनंद व्यक्त करायला अक्षयजवळ शब्द नव्हते. तो मिनलचे हात हातात घेऊन थोडावेळ डोळे मिटून शांतपणे पडून राहिला. त्याने मनात विचार केला. निसर्गाची किमया काय न्यारी आहे! याच व्हॅलेंटाईन डेला ज्या अनामिकेने माझ्या जीवनात अप्रत्यक्षपणे प्रवेश केला होता. त्याच व्हॅलेंटाईन डेला तिने प्रत्यक्षपणे माझ्या समोर यावे! त्याने डोळे उघडले त्याच्या हातात असलेल्या मिनलच्या हातांचे त्याने चुंबन घेतले.

     

मिनलमधली अनामिका आजवर बाहेर का आली नाही याचा उलगडा अक्षयला आता झाला होता.

     

अक्षय तिला एवढेच बोलला, "मिनू, प्रेम म्हणजे दोन पवित्र मनांचे बंधन असते, दोन शरीरांचे नाही!"

     

....आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले! कधीही विलग न होण्यासाठी!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama