STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Inspirational

4  

Amruta Shukla-Dohole

Inspirational

नात्याचा प्रवास

नात्याचा प्रवास

6 mins
286

“ आई ने दिलयं.” हातातला डबा पुढे करत पार्थ म्हणाला ,” आणि हे ही….”


“ काय आहे?” रुचिराने आश्चर्याने विचारले.


“ आई ने आज खुप दिवसांनी स्वतः हा गाजराचा हलवा केलाय…आणि हे पेंटिंगसुद्धा गेल्या दहा दिवसांपासून करत होती, कालच पुर्ण झालंय आणि तुला द्यायला सांगितलय .” पार्थ आनंदाने म्हणाला.


“ कसा झालाय हलवा? पेंटिंग तर नंबर एक दिसतंय…” रुचिरा उत्सुकतेने पेंटिंग पहात म्हणाली.


“ अगदी पहिल्यासारखाच झक्कास झालाय हलवा… आता परत सगळं पहिल्यासारखं सुरू होतंय हळूहळू! पण मावशी हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं बरं… नाही तर आज आईची स्थिती माहित नाही कशी असती…तु नसती तर आमचं वागणं चुकतंय हे समजलंही नसतं आम्हाला.” पंचवीशीचा पार्थ आताही शहारल्यासारखा झाला.


“ अरे, प्रत्येकाला जशी स्पेसची गरज असते तशीच प्रत्येकाला सुसंवादाचीही गरज असतेच. पण हेच बरेच लोकं विसरतात आणि मग अशा समस्या निर्माण होतात. वेळेतच सगळं समजलं तर सावरायला सोपं होतं.” 


श्यामल आणि रोहित एक उच्चमध्यमवर्गीय एकमेकांना साजेसं जोडपं. पार्थ आणि प्राजक्ता दोन मुलं. रोहितला सुरूवातीला एका कंपनीत नौकरी तर श्यामल शाळेत शिक्षिका. लग्नानंतर तीन वर्षांनी पार्थ आणि सहा वर्षांनी प्राजक्ताचं आगमन. प्राजक्ता दोन वर्षांची होईपर्यंत कधी रजा ,कधी आई ,कधी सासूबाई यांच्या मदतीमुळे श्यामलची नौकरी सुरू होती. थोडी धावपळ व्हायची सगळं करतांना, पण मुलांना सांभाळायचं टेन्शन नसल्याने ती ते बऱ्यापैकी मॅनेज करायची. 


सासूबाई पडल्या आणि बिछान्याला खिळल्या. श्यामलने पुर्णवेळ मदतनीस ठेऊन पाहिली, पाळणाघर आजमावले, पण शेवटी कंटाळून नौकरी सोडण्याचाच पर्याय योग्य वाटला. रोहितचंही एव्हाना प्रमोशन झाल्यामुळे आर्थिक प्रश्न नव्हताच! 


स्वभावतःच जुळवून घेणारी असल्यामुळे तिने लवकरच दिनचर्येचा बदल स्वीकारला . आता ती पुर्णवेळ गृहिणी तर होतीच, पण सासुबाईंची केअरटेकर, मुलांची शिक्षकही होतीच आणि रोहितचं तर आता तिच्यावाचून सगळंच आडू लागलं. 


बघता बघता आईच्याच अवतीभवती बागडणारी मुलं मोठी झाली. त्यांना त्यांची स्पेस लागू लागली. रोहित तर आता मोठ्या हुद्द्यावर असल्याने सतत व्यस्त राहू लागला . घरासाठी वेळ काढणंच जणू विसरला. सासूबाईंचा बिछानाही सातआठ वर्षांपूर्वीच रिकामा झाला होता. प्रत्येक कामाला आता मदतनीसही होत्या. एकंदरीत वेळच वेळ होता आता श्यामल कडे! पण आजपर्यंतच्या व्यापात तिच्या आवडीनिवडी , छंदही ती विसरून गेली होती. आता वेळ अंगावर येऊ लागला.


इतके दिवस ती सांगेल तसं वागणाऱ्या मुलांना आता तिच्या सुचना ‘किरकिर ‘वाटू लागल्या. रिकामपणामुळे ती लुडबूड करतेय हाच त्यांचा समज होता.काहीही सांगितलं की “ जस्ट चील मॅाम …” कधी हसत, कधी नाखुशीने तर कधी रागात उत्तर मिळू लागलं. रोहितचं तर ‘टेकन फॅार ग्रॅन्टेड ‘ असंच वागणं होतं आता तिच्याशी. काही सापडलं नाही तर चिडणार, बाहेर काही झालं की चिडणार, मनासारखं नाही झालं की चिडणार!


“ मम्मा, प्लीज आता असं माझं कपाट मला न विचारतां आवरू नको… आय ॲम ग्रोन अप नाऊ….”


“ आई, इतकी बंधनं नको माझ्या कपड्यांवर…समजतं मला आता काय योग्य नि काय नाही ते….”


“ लक्ष कुठे असतं गं तुझं… नुसता वेंधळेपणा… बाहेर जरा बघ …किती स्मार्टली कामं करतात बायका…”


“ प्लीज….सुरू झालं का तुझं … मला शांतता हवीय… आय वॅान्ट सम स्पेस….”


“ काय तेच ते इंडियन पदार्थ करतेस… काही तरी नवं वेगळं पाहिजे यार… असं करतो मी आज पार्सलच बोलावतो….”


“ मी माझा बर्थ डे बाहेरच सेलिब्रेट करणार आणि खाणार आहे मित्रांसोबत , तु केलेल्या श्रीखंड पुरीचा आज आग्रह नको करू प्लीज…”


कधीकधी म्हणता म्हणता आता अशी वाक्ये रोजचीच झाली होती घरात ! श्यामल सुरूवातीला हिरमुसायची, त्रागा करायची, रागवायची…. पण नंतर दुरूत्तरं वाढली… ती आता भरून आलेले डोळे कसेतरी थोपवायचा प्रयत्न करायची… कधी जमायचं तर कधी नाही…. नाही जमलं तर त्यावरून परत बोलणं ! 


काहीच दिवसात ती शांत , एकलकोंडी ,अबोल झाली. कामं करायची अन् बसून रहायचं तास न् तास विचार करत! तसंही सगळे आपापल्या कामात व्यस्त , कुणाच्या लक्षातच आलं नाही लवकर.


“ मम्मा, पोळ्या नाही केल्या?”

“ भाजीत मीठच नाही… वरणाला तर काहीच चव नाही.”

“ मम्मा किती दिवस झाले तु खायला काही वेगळं केलंच नाही.”

“ माझे कपडे धुवायला नाही टाकले?”

“ माझे कपडे प्रेसला नाही दिले?”

असा आरडाओरडा आता घरात व्हायला लागला कारण श्यामल तासन् तास खिडकीत बसून रहायची आणि मग त्याला उपाय म्हणून पुर्णवेळ मदतनीस घरात राहू लागली .तिच्या परीने सगळं पाहू लागली. 


ती अबोल होत होती, पण मदतनीस असल्याने कामं सगळी जिथल्या तिथे होत होती तोपर्यंत कुणी तिची पर्वा केली नाही. आता तिच्यात झालेला हा बदल, तिचं तठस्थ, निर्विकार रहाणं, एकटंच बसणं लक्षात येण्याइतकं वाढलं. कोणत्याही गोष्टीला तिचा प्रतिसाद एक तर शून्य असायचा नाहीतर खुपच ॲग्रेसीव्ह तरी असायचा. तिचं बदलतं वागणं आता चिंताजनक वाटू लागलं. 


डॅाक्टरांचा सल्ला झाला, मेनोपॅाज आणि संप्रेरकांच्या असमतोलामुळे होतं असं बऱ्याच स्त्रियांना ,असं कॅामन उत्तर मिळालं .काही गोळ्या सुरू झाल्या. परत सगळे आपल्या स्पीडमध्ये आणि स्पेसमध्ये रमले. आता खरं म्हणजे सुसंवाद नसला , तरी संवादाची गरज होती. तिने प्रतिसाद दिला नाही तरी बाकीच्यांची जबाबदारी होती. 

श्यामल स्वतःतच हरवलेली असायची. मूकपणे बसलेली असायची.


अशातच रुचिराच्या नवऱ्याची बदली इथे झाली. श्यामलचा पत्ता काढत ती पोहोचली श्यामलला भेटायला.

दोघी एकाच बाकावर बसणाऱ्या शाळेतील जीवलग मैत्रिणी. रुचिराचं ब्युटीपार्लर होतं, जिथे बदली होईल तिथे ती पार्लर चालवायची आणि मैत्रिणींचा गोतावळा जमवायची. रोज बऱ्याच बायकांच्या संपर्कात असायची,गप्पांतुन बायकांचे कितीतरी प्रॅाब्लेम्स समजायचे. अगदी जवळच्या नात्यांतही बसलेल्या निरगाठी माहित व्हायच्या, त्यांच्या कडूनच त्या सोडवायचे प्रयत्नही समजायचे ! एकंदरीत ती स्त्रियांच्या मनाचे ,भावनांचे अनेक पदर आणि त्यातील नाजुक विण यांनी समृद्ध होती. 


श्यामलच्या मानसिकतेचा तिला अंदाज यायला मुळीच उशिर लागला नाही. श्यामलला शाळाकॅालेजात मिळालेल्या बक्षिसांची माहिती मुलांना नव्हतीच, तिच्या पेंटिंगचा छंदही कुणालाच माहित नव्हता. संसाराच्या जबाबदारीत सगळंच निसटलं होतं, हरवलं होतं. सुरूवातीला तर वेळ नव्हताच, पण जेव्हा वेळ मिळाला तेव्हा श्यामलनेही हरवलेलं शोधण्याचा मुळी प्रयत्नच केला नव्हता ! तो तिने केला असता तर आज नक्कीच पहिल्यासारखीच प्रसन्न श्यामल सगळ्यांना दिसली असती.


“ श्यामल, ‘ स्पेस हवी ‘ ही मुलांची इच्छा तु संधी म्हणुन घ्यायला हवी होती, पण तु ते नकारात्मकतेने घेतलं. तुझी आता कुणाला गरज नाही हा न्यूनगंड इतरांमुळे जरी आला असला तरी तु स्वतः तो वाढीला लावला“. रूचिरामुळे श्यामलला स्वतःच्या चुकीची जाणिव होऊ लागली, पण कुटुंबाच्या मदतीशिवाय मानसिकता लगेच बदलणं अवघड होतं. 


रूचिराचं तिच्या घरी येणंजाणं वाढलं तसं मुलं तिच्यासोबत चांगलीच रूळली, इतकी की आईच्या अशा कधी अबोल ,तर कधी तुसड्या निरूत्साही वागण्याची तक्रारही करू लागली.कारण तिच्या एकीच्या गुपचूप बसण्याने घरात नकोनकोशी शांतता राहू लागली. सगळं घरच हसणं बोलणं विसरलं होतं. त्यातून सगळ्यांनाच बाहेर तर पडायचं होतं, पण कसं ते सुचत नव्हतं!


“ भाऊजी, तुम्ही आतापर्यंत तिला गृहित धरलं, तिच्यावर विसंबून राहिलात पण स्वतःला गरज होती तितकंच ! तिला जेव्हा भावनिक गरज होती तेव्हा वेळ द्यायला तुम्ही कमी पडला….. तो क्वालिटी टाईम आता तिला द्या, रोज वॅाक ला जाताना तिला घेऊन जा. मावशीला चहा, जेवण न मागता तिला मागा. तिची अजूनही तुम्हाला तितकीच गरज आहे हे तिला जाणवू द्या….”


“ तुमची मम्मा सुगरण आहेत, तिच्याकडे लहानपणीसारखा हट्ट करा, एखाद्या आवडत्या भाजीसाठी,इडलीसाठी, पुरणपोळीसाठी ! रूम आवरतांना, कपाट आवरतांना तिची मदत मागा, अगदी नको असली तरी, तिच्या समाधाना साठी खोटा हट्ट करा ! मग बघा किती उत्साह आणि उर्जा संचारते तिच्या अंगात….”


“ बायका नवऱ्यासाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी आपल्या आवडीनिवडी विसरतात, त्यांना नेहेमीच दुय्यम स्थान देतात. त्या घरातच , एका जागीच स्थिर आणि मजबुतीने उभ्या असतात म्हणून घरातला प्रत्येक जण वेगाने प्रगति करू शकतो, पुढे जातो आणि सोयीस्कर पणे तिला , तिच्यामुळे मिळालेल्या बळाला, सपोर्टला सहज विसरतो ! कालांतराने सगळ्यांचा वेग इतका वाढतो कि ती खुपच मागे पडल्यासारखी वाटते, तिला समजत नाही असंही वाटतं आणि मग सुरू होतं स्पेसच्या नावाखाली टाळणं किंवा दुरूत्तरं करणं ! ज्यांच्यासाठी सगळं सोडलं , त्यांचं तिच्यावाचून काहिच अडत नाही ही भावना तिच्या मनात न्यूनगंड निर्माण करते, त्यात बाकीच्यांचं असं अजाणतेपणात चुकलेलं वागणं अजून भर घालतं….”


प्रत्येक भेटीत रूचिरा असं काहीतरी महत्वाचं आणि पटेल असं सांगायची , सगळ्यांनाच, श्यामललाही ! सगळ्यांनीच वागण्यात, बोलण्यात , विचारात प्रयत्नपुर्वक बदल केला आणि लवकरच सगळं घर परत हसतं खेळतं झालं !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational