नात
नात
नात जपलं की जपून राहत आणि तक्रार केली की तुटून जात ..मग ते रक्ताचं असो किंवा मानलेले असो ..खूपदा तर रक्ताच्या सख्ख्या नात्यापेक्षा मानलेली नाती आपल्याला खूप सुख देऊन जातात ..नकळतपणे ती जुळून जातात आणि खूप दृढ होतात..अशा काही गोड आठवणी देऊन जातात की विसरणं अशक्यच.
असच एक जमलेलं नात ..पुजाच लग्न वयाच्या 17 व्या वर्षी झालं ..म्हणजे बालविवाहच म्हणा ना ..बीन आईच लेकरू म्हणून आजीने खूप लाडात वाढवलेली ती ..पण ती 7वीला गेली आणि त्याच वर्षी जिवाभावाची आजी तिला सोडून गेली. पूजा हळूहळू जबाबदार बनायचा प्रयत्न करू लागली ..आधी आजीमुळे सर्व काही मनाप्रमाणे वागणारी आई बदलली ..
मनात खूप मळभ यायचं ..त्यातूनच स्वतःला खंबीर बनवत राहिली ..तिच्या शिक्षणात घरातल्या कोणालाच काही रस नव्हता ..वडिलांना वाटायच की त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करावी आणि आईला वाटायच हिने घरातली काम करावी ..अशातच मग वैतागुन 12 वी मध्येच शिक्षण सोडलं ..ना कॉलेजमध्ये जायला मिळायचं ना अभ्यास करायला ..
आणि मग घरच्यांनी तिच्या लग्नाचा घाट घातला ..आणि मग लग्न ठरलं ..17वर्षाची ती नवरी बनून सासरी गेली ..घरचे सगळे नियम समजवुन घेणं चालूच होतं ..ती स्वतःला त्यांच्यात ऍडजस्ट करत होती ..पण काही गोष्टी मध्ये त्यांना पटतच नव्हतंच आणि अशातच काही कारणाने त्यांना घरातून बाहेर पडाव लागलं ..
वरळी ला तिच्या दूरच्या नंदेच घर होत एका चाळीमध्ये ..एकच खोली होती ती ...मग हे दोघे तिथे गेले ..अचानक या घटनेमुळे पुष्कर तिचे मिस्टर तिच्यावर खूपच चिडलेले होते ..रडून रडून तिचे डोळे सुजलेले होते ..संध्याकाळची वेळ होती ..पुष्करने तिला तिथेच सोडलं आणि निघून गेले ..घर खूप वर्षांपासून बंद होत ..आत ना पाणी होत ना कुठलंच सामान ..ती तशीच दरवाज्यात बसली होती ..डोळे मध्ये मध्ये नकळतपणे वहात होते ..ती करणार तरी काय होती?
इतक्यांत एक छोटीशी परी आली ती बोलली मावशी तू नवीन आलीस का इथे ? अचानक आलेल्या आवाजाने तिने दचकून पाहिलं तर ती 6-7वर्षाची चिमुरडी मावशी म्हणून एकदम प्रेमाने तिची विचारपूस करत होती ..तिच्या पाठोपाठ तिची आई आली ..त्यांना तिथे सगळेच मम्मी म्हणायचे.
मम्मी : तुम्ही नवीन आलात का? काही सामान नाही आणलं का? इतक्याक त्यांची आणि तिची नजरानजर झाली आणि त्या नजरेतून काय समजायचं ते त्या समजल्या ...मग काहीही न विचारता सरळ झाडू आणि सुपली घेऊन आल्या ..मग त्यांच्या मुलींना पण आवाज दिला आणि स्टूल आण ग पाणी आन ग ..
त्या सरळ आत शिरल्या आणि जाळ्या काढल्या , झाडू मारला ..पाणी आणून व्यवस्थित फारशी धुवून काढली ..इतक्यात त्यांची बहीण चहा आणि फरसाण घेउन आली ..हे सगळं पूजाला एखादं स्वप्न वाटत होतं ..यांना तर ती ओळखत पण नव्हती ..आणि या तिच्यासाठी इतकं करत होत्या ..ते ही एका शब्दाने न विचारता ..
मम्मी: नाव काय ग तुझं? आत्ताच लग्न झालय का? बरं नसेल सांगायचं काही तर राहुदेत ..घे चहा आणि फरसाण खाऊन घे..तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला होता त्या माऊलीने आणि तिचे डोळे पुन्हा वाहू लागले ..त्यांनी तिचे डोळे पदराने पुसून जवळ घेतलं..
मम्मी: हे बघ जे झालं ते झालं .. तुला काहीही लागलं तर सांग..,मला सगळे मम्मी म्हणतात ..आणि या माझ्या मुली ..नेहा, अर्चना,आणि हा छोटा शुभम ..(इतक्यात एक क्युट ..जाडजूड मुलगी धावत आली तिच्या धक्क्याने मम्मी पडता पडता वाचल्या) ही पण माझी मुलगी अकु..थोडी वेडसर आहे पण मन खूप छान आहे हीच ..घाबरू नकोस हा..बर मिस्टर सामान आणायला गेलेत का तुझे? आले की सांग मला मी जाते आता आमची स्वयंपाकाची वेळ झाली ..काही लागलं तर सांग ..आणि न मागताच, 2 लिटर प्यायच्या पाण्याची बाटली आणि एक बादलीभर बाथरूम मध्ये वापरायला पाणी आणून दिल..जाता जाताच बोलल्या ..पाणी जपून वापर ग उद्या सकाळी येईल आता नाही येणार पाणी ..आणि इतका तुटवडा असताना या माऊलीने त्यांचं घर धुतल..घरात वापरायला पण पाणी दिल..
आजच्या जगात अशी देव माणसे आहेत खरच विश्वासच बसत नव्हता..
नंतर पुष्कर स्टोव्ह आणि काही भांडी, सोबत थोडं रेशन घेऊन आले ..आणि येतानाच जेवण पण घेऊन आले ..मम्मी आल्या पाहिलं त्यांचं जेवण चालू आहे, मग काही न बोलता निघून गेल्या ..
नंतर हळू हळू पूजा आणि मम्मी च नात खूप छान बनत गेलं ..त्या पूजाला समजून सांगायच्या..जीव लावायच्या ..तिनी केलेला प्रत्येक पदार्थ त्यांना आवडायचा.. पूजाने काही केलं की त्यांना, आणि त्यांनी काही केलं की पूजाला हा तर अलिखित नियम बनला होता ..त्यांच्याकडून पूजा माणुसकी शिकली..जगात कस वावरायच, स्वतःला कस सांभाळायचं, हे शिकली ..तिथे कुठे काय मिळत , कुठून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं..रॉकेल कुठे कमी भावात मिळेल..
रात्री पुष्कर 10 नंतर घरी यायचे ..तर सगळी बच्चा कंपनी पूजाच्या सोबतीला असायची.. मम्मी एकेकाला जेवायला घालून पाठवत राहायच्या ..पूजाला कधीच एकट पडू दिल नाही त्यांनी ..अशी रक्ताची नसली तरी जीवाभावाची आई तिला भेटली होती ..
नंतर ते पुण्याला आले, तरी जेव्हा पण पूजा मुंबईला जायची त्यांना भेटायचीच..तेव्हा ना मोबाईल होते ..ना त्यांच्याकडे फोन होता ..आणि पूजा चा पण फिक्स पत्ता नव्हता ..बरेच वर्ष त्यांची भेट होत राहिली ..आणि एक वर्ष पूजा तेथे गेली तर ते घर सोडून गेले होते ..पत्ता कोणाकडेच नव्हता ..ना नंबर.. खूप वाईट वाटलं ..आजूनपन पूजा त्यांना शोधायचा प्रयत्न करत आहे ..पण नाही सापडले ..आता खंत वाटते, तेव्हा जो पण पत्ता होता, त्यांना द्यायला हवा होता निदान तेथे तरी पत्र आले असते आणि सगळे कॉन्टॅक्ट मध्ये राहिले असते ..पण एक नक्की त्या जिथे पण असतील तिथून त्यांचे आशिर्वाद नक्कीच सोबत असतील ..
