नागपंचमी
नागपंचमी
श्रावण महिन्यातील नागपंचमी या सणाला विशेष महत्त्व असुन हा श्रावण महिन्यातील हा पहिला सण आहे.
याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचा पराभव करून यमुना डोहातून सुरक्षीत वर आले तो दिवस होता श्रावण शुध्द पंचमीचा. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात.
श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात पाटाभोवती रांगोळीने सुशोभित करून धुपदिप दाखवून श्रध्देने व मनोभावें पूजाअर्चा करावी.
*नैवेद्य:-*
नागपंचमी या दिवशी दूध- लाह्याचा नैवेद्य व गव्हाची खिर- कानोले तसेच काही भागात पुरणपोळीचा देखील नैवेद्य दाखविला जातो. नागदेवतांना हाथ जोडून मनोभावे प्रार्थना करावी कि हे देवा माझे व माझ्या कुटुंबाचे संरक्षण कर.
*नागपंचमी या दिवशी काय करू नये*
नागपंचमी या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगर चालवत नाही.
जमीन खणत नाही
चुलीवर तवा ठेवू नये,
तळू नये , काहीही चिरू नये इत्यादी नियम पाळले जातात.
*कहाणी:-*
आटपाट नगर होते त्या नगरात एक गरीब शेतकरी कुटुंब राहत होते. त्या शेतकर्याला दोन मुले व एक मुलगी होती. सकाळी लवकर उठून तो आपल्या शेतात जमीन नांगरत असताना शेतकर्याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने दुःख व क्रोध अनावर झाला.त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.
दुसर्या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागून आपल्या वडीलाकडून झालेल्या चुकीची माफी मागितली. त्या मुलीची श्रद्धा व भक्ती पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.
*नागपंचमी चे महत्व:-*
भगवान शंकरांच्या डोक्यावर चंद्र विराजमान आहे. चंद्र हा मनाचा ग्रह आहे. मनात भगवान शंकराची भक्ती म्हणून नागपंचमीला नागाला दूध अर्पण करण्याची प्रथा पूर्वीपासून प्रचलित आहे.
नाग भगवान शंकराच्या गळ्यात विराजमान आहे. त्यामुळे नागदेवतांचे पूजनाचे विशेष महत्त्व आहे.
*नागपंचमी उपवासाचे महत्त्व :-*
नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि भगवान शंकराची मनोभावे पूजाअर्चा केल्याने सर्पदंश आणि अकाली मृत्यूचा धोका टळतो. तसेच भगवान शंकराची पूजा व आराधना केल्याने ग्रहदोष दूर होतात.
