STORYMIRROR

Kedar Kendrekar

Inspirational Others

3  

Kedar Kendrekar

Inspirational Others

# My Dad My Hero # वडिलांसोबत घालवलेले “वाचनीय क्षण”

# My Dad My Hero # वडिलांसोबत घालवलेले “वाचनीय क्षण”

3 mins
302

“वाचाल तर वाचाल!” ही म्हण आपण सर्वजण अगदि लहानपणापासून ऐकत आलो आहोत. खरं तर वाचन हा एक “संस्कार” आहे. संस्कार हा केवळ दयायचा नसतो , तर प्रत्यक्ष कृतीत आणुन तो संक्रमित करायचा असतो. नेमकी हीच कृती माझ्या बाबांनी माझ्या बाबतीत केली , म्हणुन माझे बाबा माझ्यासाठी “हिरो” ठरले !

मला लहानपणापासुन जसं कळायला लागलं मी बाबांना अनेकविध विषयांवर वाचन करताना बघत आलो आहे. त्यांच वाचन केवळ अफाटच होत असं नव्हे , तर “चौफेर” होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ते स्वत: एम्.बी.बी.एस. डॉक्टर होते. परंतु त्यांनी त्यांच्या ज्ञानाची कक्षा ही केवळ वैदयकीय क्षेत्रापुरतीच मर्यादित ठेवली नव्हती याचा मला सार्थ अभिमान वाटतो. अर्थातच वाचनाचे हे परंपरागत संस्कार त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच माझ्या आजोबांकडून मिळाले होते , यात काहीच शंका नाही ! कारण माझे आजोबा हे एक उत्तम “जज्ज” होते. 80 च्या दशकात त्यांचा मृत्यु झाला. त्यापुर्वीची सामाजिक व्यवस्था आणि त्यांचे शिक्षण हे खरोखरच विचार करायला लावणारे होते. तर माझी आज्जी सुध्दा वाचनाच्या बाबतीत तितकीच चोखंदळ होती. कारण ज्या काळात स्त्रीया चुल व मुल या संसारचक्रात गुरफटुन जात त्या काळात तिने कितीतरी धार्मिक ग्रंथाचे वाचन सुरुच ठेवले होते. शिवाय रोजचे वर्तमानपत्र वाचुन ती तत्कालिन ताज्या सामाजिक घडामोडींचा वेध अवर्जुन घेण्यास मागे राहात नसत !

मी बाबांच वाचन आणि संकलन या दोन्ही गोष्टी जवळून बघितल्या आहेत. अगदि मागील वर्षी कोरोना आजाराने त्यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या सामानाची आवराआवर करताना त्यांना त्यांच्या जेष्ठ व्यक्तींची आलेली पत्रे आणि त्यांच्या मित्रपरिवाराशी त्यांचे झालेले पत्रव्यवहार मी अवर्जुन जपुन ठेवले आहेत. या पत्रांशिवाय त्यांच्या आवडत्या “पर्यावरण” या विषयावर आधारीत कितीतरी लेख त्यांच्या संग्रही होते. “पर्यावरण” हा त्यांचा आवडता विषय असल्यामुळे त्यांच्याजवळ पर्यावरण विषयक पुस्तकांचा भरपुर खजिना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाल्यामुळे संघ विचारांचा देखिल त्यांच्यावर प्रभाव पडला. यातुन समाज कार्य आणि देशप्रेम विषयक पुस्तकांचे एक चांगले संकलन आमच्या घरात होऊ शकले. त्यांच्या दररोजच्या वाचनात दैनंदिन वर्तमानपत्रांशिवाय साप्ताहिक सकाळ , साप्ताहिक विवेक , लोकप्रभा अशा कितीतरी मासिक , पाक्षिकांचा समावेश होत होता. गंमत म्हणजे मी लहानपणापासुन संगीत विषयाचा अभ्यास करत असल्यामुळे मी मागवत असलेले “संगीत” मासिक तसेच “संगीत कला विहार” गांधर्व मंडळाचे मुखपत्र देखिल ते तितक्याच उत्साहाने वाचत.

बाबांचे हेच वाचनाचे संस्कार माझ्यावर त्यांच्यासोबत घालवलेल्या कित्येक “वाचनीय” क्षणांचे साक्षीदार बनले. यातुन एकाच विषयाकडे किंवा समस्येकडे बघण्याची बहुविध दृष्टी माझ्यात विकसित झाली. बाबांचे वैशिष्टय म्हणजे ते केवळ वाचन करुन तेव्हढयापुरते स्वत:ला थांबवत नसत, तर त्यावर नंतर चर्चा आणि चिंतन करुन त्यास कृतीची जोड देण्याचा प्रयत्न करत असत. हीच सवय नंतर मला देखील उपयुक्त ठरली. प्रथितयश वर्तमानपत्रांत लिहिणारी लेखक मंडळी किती विचार करते, कशी लिखाण करते याचे त्यांना खूप कौतुक वाटत. आकाशवाणी परभणी केंद्रावर पर्यावरण विषयक लेखमाला देताना त्यांनी आत्तापर्यंत जमा केलेल्या पर्यावरण विषयक लेखकांचे पत्ते आणि नावे यांचा काहि वापर करता येऊ शकेल काय ? याबाबत त्यांनी माझ्याशी चर्चा केल्याचे आज आठवते. तर असे होते माझे वाचनीय बाबा ! त्यांनी केवळ पुस्तकेच वाचायला नाही शिकवले, तर माणसे देखील वाचण्याची सवय आमच्यात विकसित केली.

आज संगीत , शिक्षणशास्त्र आणि इतिहास हे तीन माझे आवडीचे विषय असून या तिन्ही विषयात मी बाबांच्याच प्रेरणेने पदव्युत्तर शिक्षण मिळवले. या तीन्ही विषयांशी संबंधीत पुस्तकांचा साठा करण्याचा मी आजही प्रयत्न करत आहे.

बाबांच्या अनेक आठवणी माझ्या मनात चिरकाल राहतील , त्यातीलच एक वाचनीय आठवण इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी इथे केला आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational