गाव करी ते राव न करी ………
गाव करी ते राव न करी ………
ती मे महिन्यातील एक रणरणती दुपार होती. भर दुपारी समुद्रगावच्या वेशीवर एक बस आली. काहि प्रवाशांना स्थानकावर सोडून बस पुन्हा मार्गस्थ झाली. थोडा वेळ जातो न जातो, तोच बसच्या समोरच्या बाजुने धुर निघु लागला आणि ती रस्त्यातच बंद पडली. प्रवासी खाली उतरुन ड्रायव्हर आणि कंडाक्टरसह नादुरुस्त बसकडे निरखुन बघु लागले. आसपास आसरा मिळविण्यासाठी एकहि झाड शिल्लक नव्हते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्या तर बांधला पण रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून प्रवाशांची सोय केली जाऊ शकते, हे ते सोईस्करपणे विसरले. आता दुसरी बस येईपर्यंत प्रवाशांचा हिरमोड झाला. जवळजवळ दुपारचा एक वाजत आला होता. ऊन “मी” म्हणत होते. तशातच एका वृध्द प्रवाशाला ऊन्हामुळे भोवळ आली आणि ती व्यक्ती बेशुध्द होऊन रस्त्यातच पडली. सर्वांची धांदल उडाली. शेवटी कशीबशी ॲम्ब्युलन्सची सोय झाली आणि त्या वृध्द व्यक्तीला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र झाडांच्या अभावी होणारी होरपळ त्या दिवशी सर्वांनीच अनुभवली. सुमारे दोन तासांनी दुसऱ्या बसची सोय झाल्यावर प्रवासी पुढील प्रवासाला निघाले. मात्र नादुरुस्त बस चे ड्रायव्हर आणि कंडाक्टर तसेच त्या उन्हाची काहिली सहन करत करत बसच्या आडोशाला बसुन राहिले.
हळुहळू दिवस मावळला आणि रात्री समुद्रगावातील सर्व गावकरी प्रकाशाच्या शोधात सर्वत्र फिरु लागले. कारणही तसेच होते. वीजेच्या वाढत्या मागणीमुळे आणि शहरांना प्राधान्याने वीज पुरवावी लागत असल्यामुळे खेडोपाडी संध्याकाळी 7 नंतर “लोडशेडिंग” केले जात. त्यामुळे गावकरी कंदिल, मेणबत्ती, पेट्रोमॅक्सचा दिवा अशी साधने शोधत गावच्या पारावर बसुन रहात. मुलांचा अभ्यास, आजारी व्यक्तींचे औषधपाणी, गृहिणींचा स्वयंपाक अशा सर्व गोष्टी अंधारातच कराव्या लागत. गेल्या अनेक वर्षांपासुन गावाची वीजेसाठी होणारी ही दुर्दशा बघत बघतच कित्येक पिढया लहानाच्या मोठया झाल्या. घराप्रमाणेच शेतात देखील रात्रीच्या वेळी आंधारातच स्त्री पुरुषांना पाणी देण्यासाठी आणि आखाडयाचे रक्षण करण्यासाठी जावे लागत.
वीज संकटाबरोबरच पाण्याची टंचाई हा गावाला सतत भेडसावणारा प्रश्न होता. घरोघर हातपंप असले तरी मुळात जमिनीची पाणीपातळी खोल गेलेली असल्यामुळे घरातील सर्व सदस्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच सांडपाण्यासाठी दूरदूरपर्यंत वणवण भटकावे लागत असे. शेतातील पिकांना पाणी देण्यात देखील जमिनीची ही खालावलेली पाणी पातळी मोठा अडसर होता. विविध नैसर्गिक अडचणींनी बेजार झालेले समुद्रगावचे लोक विविध नागरी समस्यांनी देखील त्रस्त होते. दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल चे भाव, हवेचे प्रदुषण, स्मशानात प्रेते जाळण्यासाठी होणारा लाकडांचा अपुरा पुरवठा, शेतात नैसर्गिक शेणखताचा होणारा तुटवडा, रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे खालावलेली जमिनीची प्रत अशा कितीतरी समस्या त्यांना छळत होत्या.
अशातच एक दिवस एक पर्यावरणतज्ञ त्या गावात आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. समुद्रगावच्या गावकऱ्यांच्या समस्या वारंवार वर्तमानपत्रात वाचुन येथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी गावात काहि काळ मुक्काम करण्याचेदेखील ठरवले. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत, गावकरी, राज्य सरकार यांचा समन्वय साधत गावाला भेडसावणाऱ्या समस्यांवर नावीण्यपूर्ण उपाय सुचवले. गावकऱ्यांसह ग्रामसभेची देखील त्यांना योग्य ती साथ मिळाली.
प्रारंभी त्यांचे लक्ष गावातुन जाणाऱ्या राष्ट्रिय महामार्गाकडे गेले. महामार्ग कितीही चांगला असला, तरी त्याच्या दुतर्फा “ झाडोरा ” नसल्यामुळे वाढत्या तापमानामुळे ते पर्यावरणतज्ञ चिंतीत झाले. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने विविध वृक्षारोपणविषयक संस्थांशी संपर्क साधला. शासनाची “सार्वजनिक वृक्षारोपण मोहिम” गावात यशस्वीपणे राबविली. याचा परिणाम म्हणून केवळ राष्ट्रिय महामार्गच नव्हे तर गावातील प्रत्येक घर – आंगण, शाळा, कार्यालये, गल्ली ही वृक्षमय झाली. समुद्रगावाला “हरित गावाचा पुरस्कार” मिळाला.
गावाला जाणवणाऱ्या पाणी समस्येचा या पर्यावरण तज्ञाने बारीक अभ्यास केला. गावकरी, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने विविध विधायक उपक्रम राबवुन पाणी पातळी वाढवण्यास सुरुवात केली. गावातील मोकळया जागा शोधुन त्यावर तलाव खोदले. शेतात चर खणून पाणी साठवण्याची सोय केली. “मागेल त्याला शेततळे” ही शासनाची योजना प्रभावीपणे राबवुन प्रत्येक शेतात “ शेततळे “ खोदुन शेतातील पाण्याची पातळी वाढवली. शेतातील विहिरींचे लोकसहभाग आणि शासकीय अनुदानातुन बांधकाम, खोलीकरण केले. शासनाची “पोखरा” योजना यासंदर्भात उपयुक्त ठरली. गावाच्या जवळून वाहणाऱ्या नदिच्या पात्राचे रुंदिकरण आणि खोलीकरण केले. गावातील प्रत्येक घराच्या छतावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचे “पुनर्भरण ” करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यामुळे गावातील जमिनींची पाणी पातळी सुधारली.
गावाला भेडसावणाऱ्या वीज प्रश्नावर पर्यावरण तज्ञाने अपारंपारिक ऊर्जास्त्रोताचा तोडगा सुचवला. घराघरावर “ सोलार पॅनल “ बसवले. त्याची सुरुवात ग्रामपंचायतीपासुन केली. मंदिरे, बॅन्का, कारखाने, मंगल कार्यालये, दुकाने अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी सोलार ऊर्जा निर्माण करण्यात येऊ लागली. मुख्य म्हणजे शेतात देखील “ सौर कृषी पंप योजना ” राबवली. त्याकरीता सोलार पॅनलची प्रत्येक शेतात उभारणी केली. रात्री प्रकाशाची सोय झाली आणि सोलार पंपामुळे पिकांना पाणी देणे शक्य झाले.
गावातील इतर समस्या देखील त्या पर्यावरण तज्ञाने सोडवल्या. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गावात “घनकचरा व्यवस्थसापन प्रकल्प ” राबवला. ओल्या कचऱ्यापासुन खत निर्मिती केली. वाढत्या पेट्रोल च्या किंमतीवर उपाय म्हणून काहि मोजक्या गावकऱ्याच्या घरी “ ईलेक्ट्रीक गाडया ” विकत घेण्यास प्रोत्साहन दिले गेले. त्यामुळे पेट्रोल च्या वाढीव किंमतीपासुन काहि प्रमाणात का होईना गावकऱ्यांना दिलासा मिळाला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन केंद्र सरकारच्या अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाकडून गावात ईलेक्ट्रॉनिक गाडयांसाठी एक “चार्जींग स्टेशन ” मंजुर करुन घेतले.
शेतातील पिकांच्या योग्य वाढीसाठी शेणखत आवश्यक असते, हे सर्व गावकऱ्यांना पटत होते. परंतु पर्यावरण तज्ञाने त्यासाठी पुढाकार घेत गावात एक “ गोशाळा “ उभारली. गावात फिरणाऱ्या मोकाट गाई तेथे बांधण्यात आल्या. या गोशाळेची मोठया प्रमाणावर जाहिरात करत शासन तसेच खाजगी धनिक व्यक्तींकडून तिच्यासाठी मोठे अनुदान मिळवले. पुढील काहि महिन्यांत गाईंची संख्या वाढल्यामुळे शेणखताचा प्रश्न मिटला. याच शेणापासुन पुढे ओंडके बनवण्याचे एक यंत्र सदरील गावच्या स्मशान भुमीत बसवण्यात आले. त्यामुळे मृत व्यक्तींच्या दहनासाठी होणाऱ्या लाकुड टंचाईचा प्रश्न मिटला.
एकुणच समुद्रगावच्या गावकऱ्यांनी या पर्यावरण तज्ञाच्या मदतीने ग्रामपंचायत, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योग्य समन्वयातून स्वत:ला भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवल्या आणि गावाचा “ पर्यावरणपूरक शाश्वत विकास ” साधला. त्यांच्या या प्रगतीकडे बघुन ग्रामदेवता सुखावली आणि मनोमन त्यांना आशिर्वाद देत म्हणाली –
पर्यावरण रक्षणाची प्रबळ इच्छा उरी,
गाव करी ते राव न करी ……..
