Kedar Kendrekar

Tragedy

4  

Kedar Kendrekar

Tragedy

“ त्यांच्या स्वप्नातील भारत ”

“ त्यांच्या स्वप्नातील भारत ”

4 mins
266


ही कथा आहे स्वातंत्र्यपूर्व भारतातील तीन वेगवेगळया सामाजिक वर्गातील व्यक्तिंची. त्यांनी स्वातंत्र्यानंरच्या सुजलाम् सुफलाम् भारताचे स्वप्न बघितले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर भारताचे चित्र बघुन हसत खेळत सुखाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्वप्नातील भारत त्यांनी जसा कल्पिला होता, तसाच आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर तो आहे का ? हा खरा प्रश्न आहे !


आज 14 ऑगस्ट 1947 ….. ब्रिटिशांच्या अधिकृत घोषणेनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळ जवळ आता निश्चित झाले होते. समस्त भारतीय जनता ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होती, तो क्षण अखेर आला आणि 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या त्यांच्या ऐतिहासिक भाषणास सुरुवात केली. “संपूर्ण जग निद्रावस्थेत असताना उद्या सकाळी भारत देश एका नवीन युगात प्रवेश करेल….” असा काहिसा या भाषणाचा मतीतार्थ होता. हे युग अर्थातच स्वातंत्र्याचे असणार होते !

बुधा हा सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील पन्नाशीकडे झुकलेला गृहस्थ हे सर्व ऐकत होता. हे ऐकत असतानाच त्याच्या डोळयात आनंदाश्रु दाटून आले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांनी शेतकरी वर्गाचे केलेले शोषण आणि शेतमालाची केलेली लूट या सर्वांचा तो प्रत्यक्ष साक्षिदार होता. 1857 च्या स्वातंत्र्य युध्दात त्याच्या वडिलांनी पराक्रम गाजवला होता. बुधा कळत्या वयाचा होईपर्यंत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत टिळक युगाचा अस्त होऊन गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाची सुरुवात झाली होती. मवाळ – जहाल संघर्ष तर केव्हाच मागे पडला होता. या सर्वांची जागा आता गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाने घेतली होती. बुधा ऐन 20 / 25 वर्षांचा असताना त्याने गांधीजींनी चालवलेल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यास सुरुवात केली होती. “असहकार आंदोलन”, “सविनय कायदेभंग आंदोलन” हे या चळवळीतील महत्वाचे टप्पे होते. या सर्वांचा शेवट 9 ऑगस्ट 1942 च्या “चले जावो” आंदोलनात निर्णायक पध्दतीने झाला आणि पुढील पाच वर्षांनी भारतीय स्वातंत्र्याचा सोनेरी दिवस उजाडला. एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून बुधा भारतीय स्वातंत्र्य आणि त्यांनंतरच्या संभाव्य कृषी सुधारणा या गोष्टींचा स्वत:च्याच मनाशी विचार करत होता. या सगळया विचारांचा मतीतार्थ इतकाच होता, की आता तरी शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील !

बेहराम हा देखील बुधाच्याच वयाचा पण श्रीमंत पारशी कुटूंबात जन्मलेला गृहस्थ होता. त्याचे वडिल तत्कालिन पारशी समाजातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत गृहस्थ होते. त्यांनी स्वत: भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. क्रांतिकारकांना लागणाऱ्या शस्त्रांस्त्रांच्या खरेदिसाठी त्यांनी त्या काळात आर्थिक मदत केली होती. टिळक युगात राष्ट्रिय सभेच्या अधिवेशनात हजेरी लावली होती. नंतरच्या गांधी पर्वाची सुरुवात झाल्यावर गांधीजींच्या अहिंसात्मक आंदोलनात देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता. बेहरामवर देखील देशभक्तीचे संस्कार केले. बेहरामने देखील आपली संपत्ती देशाच्या विकासासाठी कशी उपयोगात येईल याचाच विचार केला. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा होताच त्याने स्वत:च्या कंपनी आणि कारखान्यातील शेअर्सची भारत सरकारला विक्री करुन या सर्व संपत्तीचे राष्ट्रियीकरण केले. ही संपत्ती आता देशकार्यासाठी वापरली जाईल. सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या “ कल्याणकारी योजना “ या पैश्यांतून आखल्या जातील. असा विचार करुन बेहरामने शेवटि स्वतंत्र भारतात अखेरचा श्वास घेतला.

बुधा आणि बेहराम यांच्याच वयाचा आणि त्यांचा समकालिन एक सर्वसामान्य बुध्दिजीवी मध्यमवर्गीय कुटूंबात जन्मलेला नारायण हा देखील या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा सोहळा बघत होता. आपल्या हुशारीच्या जोरावर स्वातंत्र्यपूर्व काळातील “ भारतीय प्रशासकीय सेवा “ (Indian civil services) ही खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन नारायण तत्कालिन ब्रिटिश प्रशासनात मोठया हुद्दयावर कार्यरत होता. परंतु “ आपण कितीही मोठे अधिकारी असतो, तरी ब्रिटिशांची चाकरी करत आहोत,” ही सल त्याच्या मनाला सतत बोचत होती. पण आज ना उद्या आपली भारत माता स्वतंत्र झाल्यावर आपण आपल्या देशाची सेवा करणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जाऊ अशी त्याला खात्री होती. भारतीय स्वातंत्र्याच्या घोषणेने नारायणच्या मनात देशसेवेच्या विचारांचे भरते आले. त्याच्यातील देशभक्त जागा झाला. स्वातंत्र्योत्तर भारतात त्याच्या सेवेचा दर्जा बदलला. ती सेवा आता I.C.S. ऐवजी I.A.S. (Indian administrative Services) या नावाने ओळखली जाऊ लागली. प्रशासकीय अधिकारी हे सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबध्द असतात. हा नारायणच्या मनातील विचार अधिकच दृढ झाला. स्वातंत्र्यपूर्व भारतात प्रशासकीय सेवेत रुजू झालेला नारायण कालांतराने स्वातंत्र्योत्तर भारतात सेवानिवृत्त झाला आणि सुखाने पुढील जीवन जगू लागला.

             15 ऑगस्ट 1947 च्या स्वातंत्र्याच्या “ त्या “ महत्वूपर्ण घटनेचे बुधा, बेहराम आणि नारायण हे तीन महत्वाचे साक्षीदार होते. संपूर्ण भारतीय जनतेचे ते प्रातिनिधीत चेहरे होते. आज 75 वर्षांनंतर त्यांचे स्मरण करण्याचे कारण म्हणजे आमच्या भारत देशाच्या “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव “ ! इतक्या वर्षांनंतर नैतिकतेला तिलांजली देऊन नियम – कायद्यांकडे साफ दुर्लक्ष करुन आणि कोरोना सारख्या अभूतपूर्व संकट काळात भारत देशाची होणारी वाटचाल ही खरोखर विचार करायला लावणारी आहे.

75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशांकडून होणाऱ्या शोषणाचा आम्ही विरोध केला आणि स्वातंत्र्य मिळवले. पण आजही बुधा सारख्या लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात आम्ही यशस्वी ठरलो का ? हा खरा प्रश्न आहे !

                            कित्येक बँकांची करोडो रुपयांची कर्जे घेऊन देश बुडवणाऱ्या आणि परदेशात पळून जाणाऱ्या उद्योगपतींच्या कथा ऐकल्यानंतर बेहराम सारख्या देशभक्त उद्योगपतींनी पाहिलेल्या आर्थिक आणि औद्योगिकदृष्टया संपन्न भारत देशाच्या स्वप्नाचे काय झाले ? हा खरा प्रश्न आहे !

रोजच्या रोज वर्तमानपत्रात लाचखोरीच्या बातम्या वाचून खालपासून वरपर्यंत सर्व हुद्दयांवरील कोणता ना कोणता तरी प्रशासकीय अधिकारी पकडला गेल्याचे वाचून नारायणसारख्या  स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रशासकीय अधिकाऱ्याने पाहिलेले स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासकीय सेवेचे स्वप्न धुळीला मिळाले की काय ? हाच खरा प्रश्न आहे !

 सरतेशेवटी खाजगीकरण – उदारीकरण – जागतिकीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, खालावलेली प्रशासकीय व्यवस्था, प्रचंड लोकसंख्या वाढ अशी अनेक कारणे देऊन एक सर्वसामान्य भारतीय म्हणून मी स्वत:च्या मनाची समजुत करुन घेतो.

पण एक मात्र खरे, सर्वच मानवी घटकांमध्ये मोठया प्रमाणावर नैतिकतेचा ऱ्हास झालेला असल्यामुळे आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळातील त्या पिढयांनी बघितलेला “ त्यांच्या स्वप्नातील भारत ” साकार करण्यात कुठेतरी अपयशी ठरलो आहोत , हे अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते !


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy