sagar bandarkar

Drama Horror Thriller


3  

sagar bandarkar

Drama Horror Thriller


मोह, माया आणि मी

मोह, माया आणि मी

14 mins 958 14 mins 958

शुक्रवारची एक सुंदर सकाळ. नेहमीप्रमाणे माधव आपल्या कार्यालयात वेळेवर हजर झाला. आज तसं फारसं काम नसल्याने विकेंडला काय करावं याचा विचार चालला होता. तासभर लोटला तरी अजून काही ठरत नव्हतं. मन चलबिचल होत होतं. विकेंडला घरी थांबायची सवयच नव्हती त्याला. हातातला कॉफीचा मग घेऊन जरा खिडकीजवळ गेला. बाहेर पहिले तर आभाळात काळे ढग दाटून आलेले दिसले आणि बघता बघता काही क्षणात पाऊस धो धो बरसू लागला. पुढचे तीन तास पाऊस सतत कोसळत होता. व्हाट्सअप बातम्या येऊ लागल्या, कि शहरामध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे. अजून काही तास असाच पाऊस पडेल असे टिव्हीवर सांगण्यात येतं होत. अचानक बॉस आले; लवकरात लवकर घरी जाण्याची सूचना केली. सकाळी येताना पाऊस नसल्याने माधवने रेनकोट पण आणला नव्हता. तशीच बाईक काढली आणि भिजतच घरी जायला निघाला. पंधरा-वीस मिनिटे गाडी चालवल्यावर अचानक त्याला एका झाडाखाली एक ओळखीची व्यक्ती दिसली. सुबोध सारखाच कोणीतरी होत. पाठीवर बॅग आणि हातात ट्रेकिंगला वापरतात ती काठी दिसली. पाऊस जोरात असल्याने स्पष्ट दिसत नव्हतं तरी थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली आणि गाडी वळवून परत मागे आला. तर तो सुबोधच होता.


सुबोधला पण माधवसारखी नवनवीन ठिकाणं फिरायची आवड! म्हणून तो असाच कुठेही भटकत असायचा. माधव ने विचारलं अरे एवढ्या पावसात इकडे काय करतोय. चल! घरी चल! सोडतो तुला गाडीवर. सुबोध काही न बोलता गाडीवर बसला. त्यांच्यात संभाषण सुरु झाले. माधव ने पुन्हा विचारलं इकडे का थांबला होतास ? तर तो बोलला मी तर कायमचाच थांबलो आहे. म्हणजे ? काही नाही तू गाडी चालावं. माधव ने विचारलं कुठे गेला होतास रे ? तसं सुबोध ने सांगायला सुरुवात केली. दूर डोंगरात वळू नावाचं गाव आहे. त्या गावातून जंगलामध्ये २ तास चाललं कि एक गुप्त धबधबा आहे. तिथेच एक सुंदर मंदिर सुद्धा आहे. सुबोध ने त्याचे वर्णन इतके सुरेख केले होते कि कोणालाही तिकडे जावंस वाटेल. बोलता बोलता अचानक थांबला. 'पण तिकडे जाऊ नको' एवढं सांगून अचानक एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. पण ते वर्णन ऐकून माधवने मनोमन ठरवलंच होतं, कि या वीकेण्डला आपण तिकडेच जायचं. पण गाडी मधेच का थांबवायला सांगितलीस विचारलं तर काही बोलला नाही. मग परत विचारलं कि झाडाखाली का थांबला होतास? तर म्हणाला त्या धबधब्यावर जाऊन आलास कि कळेल. सुबोधचे असे विचित्र वागणे त्याला खटकले, पण त्याकडे दुर्लक्ष करत घरी गेला आणि उद्याची निघायची तयारीला लागला.


नेहमीच्या जवळच्या मित्रांना त्याने फोन करायला सुरवात केली. पण कोणीही यायला तयार नव्हते. त्यातल्या एका मित्राने तर माधवला सावध केले कि त्या ठिकाणी जाऊ नको, ते ठिकाण आडवाटेला आहे. तिकडे जाण्यामध्ये खूप धोका आहे. त्या ठिकाणी लोकांना वेगवेगळे भास होतात आणि बऱ्याचदा गेलेली काही लोक परतली सुद्धा नाहीत. हे ऐकून तर माधवला आश्चर्यच वाटले. असं खरंच आहे का जाणून घेण्यासाठी त्याने सुबोधला फोन केला पण त्याचा फोन संपर्क कक्षेच्या बाहेर आला. थोड्या थोड्या वेळाने अजून ३-४ वेळा फोने केला पण पुन्हा तेच. पण मग त्याने एकट्याने जायच ठरवलं होतंच कि तेवढ्यात मला फोन केला आणि येतो का विचारलं. तसा मी पण जायला तयार झालो. एरवी मी पूर्ण गावाची माहिती घेतल्याशिवाय निघत नाही पण या वेळेस अचानक विचारल्याने माहिती गोळा करायला पुरेसा वेळ नव्हता. तरी मी तयार झालो होतो. मला त्याने या सर्व गोष्टींची काहीच कल्पना दिली नाही. त्याने फक्त एवढेच सांगितले कि सुबोध भेटला होता तो जाऊन आला आहे परवा. ठीक आहे म्हंटल.


सकाळी ७ वाजता बाईकने निघायचं ठरलं. एक रात्र आम्ही तिकडे थांबणार होतो अशा बेताने बॅग भरली होती. सकाळी माधव बाईक घेऊन बाहेर उभा होता. घरून निघताना मला एक सवय आहे कि 'सद्गुरू तुम्ही माझ्या सोबत चला' असं म्हणायची. असं बोलून बाहेर पडलो. आईला आवाज दिला, आई येतो गं उद्या रात्री पर्यंत. आज रामाचा जप न केल्याने चुकल्या चुकल्या सारखं वाटत होत. गाडीवर बसून सवारी निघणार तेवढ्यात एक मांजर डावीकडून उजवीकडे आडवी गेली. हा तर उपशकून किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल आहे हे जाणवले. जर मांजर उजवीकडून डावीकडे गेली तर मी शुभ मानतो पण आज उलट दिशेने गेली होती. तरी पण जय शिव शंकर म्हणत गाडी काढली आणि निघालो वळू गावाच्या दिशेने. गूगल वर ते गाव दिसत नसल्याने जवळच्या गावाचे नाव मॅप मध्ये टाकून बघितले तर ४ तास लागणार होते. मग मी ठरवलं कि २-२ तास गाडी चालवायची. सकाळची वेळ असल्याने रस्ते पण रिकामे होते. थोड्या अंतराने मेन हायवेला गाडी येणार तेवढ्यात पुन्हा मांजर आडवी गेली. आता मात्र मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी गडबड होणार आहे जाणवत होत. माधव गाडी चालवत होता आणि मी मागे बसून गार वाऱ्याचा आनंद घेत होतो. तेव्हा पाहिलं कि काही लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. काही विडिओ करत होते. माधवची गाडी हि काही स्पोर्ट्स बाईक नव्हती. तरी का असे बघतायत कळलं नाही. त्याला म्हंटल गाडी मला चालवायला दे. एरवी तो देत नसे पण या वेळेस त्याने लगेच दिली. तेव्हा माझ्या लक्षात आले कि गाडीचे आरसे फुटले होते. त्याला विचारलं कि हे कधी झाले? तर म्हणाला कि येताना गाडी पडली आणि फुटले ते आरसे. म्हटलं बोलला का नाही आधी, लागलं का कुठे. तर म्हणाला, नाही! हे सोड रे आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायचे. तशीच गाडी २ तास पळवली आणि घाटात एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो.


कौलारू घर त्याला एक मोठी खिडकी पाडून दुकान बनवले होते. समोर चार वासे लावून मांडव घातला होता. त्याखाली २ मोठे बाकडे होते. बाजूला काही गुरं चरत होती आणि त्यांना राखायला एक ८ वर्षाचा चिमुकला होता. लाल टी-शर्ट, हाफ चड्डी एका हातात काठी, दुसऱ्या हातात एक पुस्तक, हसरा आणि आनंदी चेहरा. जणू त्याच स्वतःचच एक वेगळं विश्व होत आणि त्यात तो रममाण होता. त्याला पाहून खूप नवल वाटत होत. केव्हढासा तो जिव आणि एवढे मोठे प्राणी राखतो. २ चहा द्या काका आणि एक पारले-जी चा पुडा. माधव फक्त चहा प्यायला आणि मी पुडा फस्त केला. अजून दोन पुडे घेतले एक गाईला दिला आणि दुसरा त्या चिमुकल्याला द्यायला गेलो. पण तो काही घ्यायला तयार नव्हता. अरे घे रे रोज कुठे येणार आहे मी तुला द्यायला, असं म्हटल्यावर तो बोलला पुडा घेतो पण आधी या गाईच्या पाठीवरून हात फिरवा. का बरं ? पण तो अडून बसला हात फिरवा; मगच पुडा घेतो. मग मी हात फिरवला आणि त्याने तो पुडा घेतला. आता म्हणाला तुमच्या मित्राला सांगा, हे ऐकताच माधव घाबरला, नाही नाही म्हणाला. छ्या काहीपण काय..! काही कळलं नाही तो मुलगा असं का करायला सांगतोय. पण माधव तू का नाही म्हणतोयस ? माधव काही न बोलता गाडीजवळ जाऊन उभा राहिला. तो मुलगा माझ्या जवळ येऊन बोलला जिकडे जातंय तिकडे जाऊ नकोस घात होईल. हे ऐकून मला दरदरून घाम फुटला. पुढे काही विचारणार तेवढ्यात तो पळून गेला. काकांना विचारलं किती रुपये झाले? ३८ रुपये. काकांनी पण एका चहाचे पैसेच लावले नव्हते. पाटीवर चहा ८ रुपये लिहिला होता मग ३८ कसे झाले विचारलं तर म्हणाले तुम्ही त्या मुलाला एक पुडा म्हणून मी स्वतःहून पैसे कमी लावलेत. मी पैसे घेण्याचा आग्रह केला पण नको देऊ बाळा स्वतःची काळजी घे म्हणाले. मी हो म्हंटल आणि तिथून निघालो.पण डोक्यात या सगळ्या घटनांचा विचार सुरु झाला होता.


गाडी चालू केली आणि निघालो त्या गावाच्या दिशेने. माधव म्हणाला आता गाडी थेट गावातच थांबावं. मध्ये कुठेच थांबू नको. म्हणजे अशा घटनांना तोंड द्यायला नको. त्याला म्हंटल तुझ्या मोबाइलला मॅप चालू कर, तर तो म्हणाला मोबाईल मी घरी विसरलो आहे. काय ? अरे मूर्ख आहेस का? असा कसा विसरला तू आणि आता बोलतोयस. तू गाडी चालवं कोण मूर्ख आहे ते काळ ठरवेल. अशे छोटे छोटे वाद आमच्यात पूर्ण रस्त्यात सुरूच राहिले. दुपारी १२.३० वाजता त्या गावात पोहचलो.


एका भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली गाडी थांबवली. त्याच्या पारावर बसून सोबत आणलेला डब्बा खायला बसलो. समोरच एक शाळेचं मैदान होत. पाऊस नसल्याने ऊन बरंच होत. भर दुपारी एवढ्या उन्हात कसे खेळतात हे.त्यांना बघून मला माझं लहानपण आठवलं आणि हल्लीची शहरातली मुलं एसी मध्ये बसून गेम खेळतात. एक एक घास चघळत त्यांना पाहत होतो. अचानक तोच लाल टी-शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला मुलगा त्यांच्यात दिसला आणि मला जोराचा ठसका लागला. गडबडीने पटकन पाणी पिऊन त्या मैदानात गेलो पण तो दिसला नाही. परत पिंपळाच्या पारावर आलो तर एक म्हातारे आजोबा त्या पारावर येऊन बसले होते. सफेद दाढी, चेहऱ्यावर चुरमुटया, एका हातात कडं, पांढरा शुभ्र झब्बा-लेहंगा आणि त्यांच्या पण हातात काठी होती. मी विचारलं, आजोबा आम्हाला त्या गुप्त धबधब्यावर जायचे आणि तिकडे एक सुंदर मंदिर पण आहे ऐकले. तसे ते उजवीकडे बोट दाखवत म्हणाले अरे तो धबधबा या समोरच्या वाटेने गेला कि येईल. तरी २ तास चालावं लागेल. पण रात्र व्हायच्या आत परत या. तिकडे थांबले कि थांबले परत येत नाहीत लोक आणि हो तिकडे कोणतंही मंदिर नाही. माझ्यातर अंगावरच काटा आला आम्ही तर तिकडे थांबणार होतो आणि ते मंदिर पण पाहायचं होत. पण तुम्ही बोललात म्हणून लवकर परत येऊ.


आजोबा तुम्ही इकडचेच का? किती वर्षांपासून राहता? तर म्हणाले नाही रे बाळा, बऱ्याच वर्षांपूर्वी इकडे आलो होतो आणि इकडेच अडकलो. अडकले म्हणजे? काही नाही रे इकडच्या निसर्ग सौन्दर्यातच मन रमलं मग इकडेच राहिलो. तिकडे जाता आहात तुम्ही, पण तुझा हा मित्र तिकडे काही मजा करू शकत नाही. कशाला घेऊन जातोयस. हे माझ्या समजण्या पलीकडे होतं. पुढे माधवला म्हणाले अरे तू बस इकडेच गप्पा मारू असंही कोणी माझ्याशी बोलत नाही गावात. आता फक्त मी माझ्या मनाची समजूत घालत होतो कि सर्व काही ठीक होईल. काहीतरी अभद्र घडणार आहे सतत जाणवत होतं. म्हणून मी माधवला म्हटलं चल लवकर जेव. लवकर जाऊन लवकर परत येऊ. तसा तोही तयार झाला. पुढे संपूर्ण पायवाट होती. म्हणून गाडी शाळेजवळ लावली आणि चालायला सुरवात केली. त्या आजोबांना टाटा करायला मागे वळलो तर आजोबा तिथे नव्हते, कदाचित उठून गेले असतील. थोडा रस्ता गावातून जात होता. दुपारचे २ वाजले होते. २ तास जायला आणि २ तास यायला असे ४ तास आणि धबधवार अर्धा तास थांबू म्हणजे पुन्हा गावात ६.३० पर्यंत येऊ अशा हेतूने निघालो.


गावातून चालताना का कोण जाणे पण कुत्रे आमच्याकडे बघून खूप भुंकत होते. गावात पाण्याची वेळ झाली होती म्हणून बरीच लोक नळावर जमली होती. सगळीकडे पाण्याने मातीचा चिखल झाला होता. प्रत्येक नळावर ४-४ लोक रांगेत उभी होती. त्या पैकी एका ठिकाणी पुन्हा तोच मुलगा दिसला. पण या वेळेस त्याच्या अंगात कपडे नव्हते, एक फाटकी चड्डी घातली होती. मी लगेच त्याच्याकडे गेलो. त्याला विचारलं, सकाळी भेटला तो तूच होता ना? पण तो काही बोलायलाच तयार नव्हता, मी त्याचा हात धरून पुन्हा पुन्हा विचारलं! तर आजूबाजूची लोक बोलली तो तर मुका आहे, त्याला बोलताच येत नाही. आता तर कहरच झाला होता. एका दिवसात एवढ्या विचित्र घटना कशा काय घडू शकतात. लवकर परत यायचं होत म्हणून जास्त वेळ न थांबता लगेच तिथून निघालो.


माधव पुढे जाऊन थांबला होता. मी मागून जाऊन त्याला गाठलं. या सगळ्या घटनांची चर्चा करत चाललो होतो. माधव माझी समजूत काढत होता. आपण राहूया तिकडे, काही नाही होता. हे फक्त मनाचे खेळ आहेत. पण मी तयार नव्हतो. चालता चालता आता डोंगर जवळ आला होता आणि झुळझुळ वाहणार पाणी आमच्या पायाखाली येत होत. म्हणजे लवकरच पोहचू असा अंदाज बांधला. पण अचानक अंधार व्हायला सुरुवात झाली. पण घड्याळात तर अजून साडेतीनचं झाले होते. मग लक्षात आलं कि पाऊस येणार आहे. म्हणून पावले लवकर लवकर उचलू लागलो. थोडी धाप लागायला लागली. अजून अर्ध्या तासात आम्ही पोहचणारच होतो कि, जोराचा पाऊस सुरु झाला आणि आमचा वेग मंदावला. थोड्या उशिरा का होईना, डोंगराच्या पायथाला पोहचलो. आता पाण्याचा जोरात आवाज येत होता. तिथून पुढे एक वळसा घेतला आणि भव्य दिव्य असे विहंगम दृश्य समोर होते.


फेसाळणारे पाणी आणि खळखळणारा धबधबा डोळ्यासमोर वाहत होता. मी सुखावलो होतो पण माधव त्या मंदिराच्या शोधात भर पावसात सैरभैर फिरत होता. कुठे आहे ते मंदिर, इथेच असेल कुठेतरी असं स्वतःशीच बोलत होता. धबधब्याच्या आतल्याबाजूला एक गुंफा होती. मी तिथे आश्रय घेतला. माधवला बोलवत होतो पण तो यायला तयार नव्हता. त्याला समजावलं कि आपण परत कधी येऊ तेव्हा बघ! पण तो ऐकतच नव्हता. शेवटी थोड्यावेळाने तो गुफेत आला. धो धो कोसळणारा पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. ५.३० वाजता तिथून निघायचं मी ठरवलं होत. पण माधवने ठरवलं होत कि रात्री या गुंफेतच राहायचे. सकाळी उठून ते मंदिर शोधू, मगच घरी जा. मी खूप विरोध करूनही तो निघायला तयार नव्हता आणि मी त्याला एकट्याला सोडून पण जाऊ शकत नव्हतो. नाईलाजाने मी त्या गुफेत रात्री थांबायचं ठरवलं.

संपूर्ण गुफा टॉर्च मारून एकदा नीट तपासून घेतली आणि एका कोपऱ्याला बॅग ठेवून टेकून बसलो, कारण मला रात्र जागून काढायची होती. मी झोपणार नव्हतो. लोकं जिवंत का परत जात नाहीत याच कारण शोधायचं ठरवलं. माधवचा राग आला पण पर्याय नसल्याने त्याच्याशीच गप्पा मारत बसलो. तेव्हा माधव मला काल सकाळी ऑफिस पासून ते सुबोध भेटला ती घटना सांगत होता. हळूहळू काळाकुट्ट अंधार झाला, ८ च्या सुमाराला पाऊस थांबला. खळखणाऱ्या पाण्याच्या सोबतच रातकिड्यांचा किर्रर्र आवाजाने थैमान घातले होते. तेवढ्या बाहेर काही हालचाल जाणवली, पण बाहेर जाण्याची हिम्मत होत नव्हती. माधव नुसता निवांत पडून होता. त्याला कशाचंच काही पडलं नव्हतं. मोबाईल पॉवरबँकला लावून चार्जिंगला ठेवला आणि हेडफोन लावून देवाची गाणी ऐकत बसलो. बाहेर पुन्हापुन्हा काही ना काही हालचाल जाणवत होती. मी खूपच घाबरलेलो पण माधवच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश मात्र नव्हता. काही गाणी ऐकून झाली तेवढ्यात समोरून कोणीतरी येताना दिसलं. जर हिंस्र प्राणी असेल तर आता आपण काही वाचणार नाही असं वाटलं. पण टॉर्च मारली तर ते सकाळवाले आजोबा आले होते. ते एवढ्या अंधारातून आम्हाला शोधात आले होते. म्हणाले तुझी काळजी वाटली रे पोरा म्हणून आलो. त्यांच्या येण्याने थोडा धीर मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारताना कळलं त्यांनी इकडे येणाऱ्या बऱ्याच लोकांना योग्य वाट दाखवून गावापर्यंत सोडले होते. बऱ्याच गप्पा रंगल्या. रात्रीचा शेवटचा प्रहार सुरु असताना गप्पा मारता मारता कधी डोळा लागला कळलंच नाही.


अचानक खडबडून जाग आली, पहाट झाली होती. माधव आणि आजोबा जागेवर नव्हते, त्यांच्या नसण्याने पक्ष्यांचा किलबिलाट मला कर्णकर्कश्य वाटू लागला. मी धावत बाहेर गेलो तर माधव पाण्यात दगडं मारत बसला होता. जीवात जीव आला. पण आजोबा कुठे गेले काही कळलं नाही. माधवला विचारलं तर म्हणाला मी उठलो तर नव्हते ते. रात्र जिवंतपणे काढल्याने फार छान वाटत होतं.


समोरून सूर्योदय होत होता आणि त्याची सोनेरी किरणे थोड्या दूरवर असलेल्या मोठ्या खडकावर पडली. बघता बघता त्या खडकाचे मंदिर झाले. माधव आणि मी दोघेही आश्चर्यचकित होतो. सूर्याच्या वाढत्या प्रकाशाबरोबर ते मंदिर अधिकच सुंदर दिसू लागले. त्यावर अगदी पायथ्यापासून कळसापर्यंत संपूर्ण नक्षीदार कोरीवकाम होते. आम्ही लगेच बॅग घेतली आणि त्या दिशेने निघालो. मी रोज सकाळची सवयीप्रमाणे कानात हेडफोन घातले आणि रामाचा जप सुरु केला. पण आता पडणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर ते मंदिर विद्रुप दिसायला लागले. काहीच कळत नव्हते हे काय होते. म्हणून हेडफोन काढले तर मंदिर पुन्हा सुंदर दिसले. मग लक्षात आलं कि ही काहीतरी माया आहे आणि ती रामनामाने दूर होत आहे. रामनामाच्या प्रत्येक उच्चाराबरोबर ते मंदिर एका पडक्या वाड्यामध्ये बदलत गेले.


आता माझा धीर सुटला होता. मी रामनाम जोरजोराने घ्यायला लागलो, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. माधवला थांब थांब सांगत होतो. पण तो काही केल्या थांबत नव्हता. तो मायावी चक्रव्यूहामध्ये पुरता अडकला होता. जरा जोरात ओरडल्यावर तो एक ठिकाणी थांबला. मी त्याच्यापर्यंत पोहचणार तेवढ्यात पायाखाली एक बॅग आढळली. ती बाजूला सारली आणि पुढे गेलो तर एक ट्रेकिंगला वापरतात ती स्टिक समोर पडली होती. ती पण बाजूला केली आणि माधव थांबला होता त्या ठिकाणी पोहचलो तर त्याच्या पुढ्यात, पाण्यात फुगलेलं एक शव पडलेलं होत. खूप खराब अवस्थेत होतं ते. पण नीट बघितल्यावर लक्षात आलं की ते सुबोधचं शव आहे. आता मात्र मी ओक्साबोक्शी रडत होतो. तेव्हा माधवने सांगितलेली परवाची घटना आठवली. म्हणजे माधवच्या गाडीवर सुबोध नसून त्याचं भूत किंवा आत्मा होता आणि तोच आपल्याला इकडे घेऊन आला असं मला वाटत होतं. जेणेकरून त्याच्या घरच्यांना त्याचं शव मिळेल.


माधव अजूनही शांत होता त्याला सुबोधच्या जाण्याचं दुःख बिलकुल वाटत नाही. हे पाहून मला त्याची खूप चीड येत होती. मी माधवला बोलत होतो चल कोणालातरी घेऊन येऊ. याला असा सोडून नाही जाऊ शकत. पण तो त्या पडक्या वाड्याच्या दिशेने पुन्हा निघाला आणि बोलला मूर्ख कोण आहे कळलं? मी जरा चपापलो. म्हणजे सुबोध आता या जगात नाही याला आधीपासूनच माहित होतं. पण कसं? आणि माहित होतं तर आधी का नाही बोलला? मला का घेऊन आला इकडे? असे नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले.


माधवला वाड्याच्या दिशेने जाण्यापासून थांबवण्यासाठी किंबहुना त्याचा जीव वाचवण्यासाठी मी त्याच्या मागे धावत होतो. तेवढ्यात डाव्या बाजूने जंगलातून तो लहान मुलगा आला. तोच मुलगा जो पुन्हापुन्हा दिसत होता. या वेळेस त्याचा अवतार तेजस्वी पुरुषासारखा होता. सफेद सोवळं नेसलेलं, गळ्यात जानवं आणि चेहऱ्यावर तेज होतं. त्याने मला थांबवलं आणि बोलला तो जातोय त्याला जाऊ दे. तो तिकडे जाण्यासाठीच इकडे आला आहे. त्या तेजस्वी मुलाने मला असे काही धरून ठेवले की माझे पाऊलच उचलले जात नव्हते. मला माझ्या परिस्थितीवरच कीव येत होती. माझ्या डोळ्यादेखत एक मित्र मृत्यूच्या दारात जात होता आणि मी काहीच करू शकत नव्हतो. बघताबघता माधवने त्या वाड्यात प्रवेश केला आणि तो वाडा अदृश्य झाला. मी तिथेच हुंदके देत रडत बसलो. हे खरंच घडते की एक वाईट स्वप्न आहे कळतं नव्हतं. तो मुलगा बोलला गावात कोणीतरी आले तुझ्या शोधात, तुझ्या गाडीजवळ उभे आहेत ते. चल तिकडे पटकन. मी म्हटले अरे सुबोधला कसा सोडू मी. तो म्हणाला त्याला घ्यायला येणार आहेत लोकं पण तू आधी इकडून निघ आणि एक लक्षात ठेव पाठीवरच्या बॅगेतलं पुस्तक कायम सोबत ठेवत जा. बॅगेत ते दत्तगुरूंचे पुस्तक आहे ते तुला कसं कळलं? तर म्हणाला मला सगळे माहित असते तू निघ इकडून पटकन.


मी गावाच्या दिशेने मदतीसाठी धावत सुटलो, अडखळलो, पडलो पण दीड तासात गावात आलो. पुन्हा त्या वाटेवर तो मुलगा फाटकी चड्डी घालून समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. तिथे न थांबता पिंपळाच्या झाडाजवळ पोहचलो. समोरच्या शाळेजवळ उभी केलेली गाडी जळालेल्या अवस्थेत होती. गाडीजवळ पोलीस उभे होते. तिथे जाणार तेवढ्यात आजोबा पुन्हा दिसले. ते म्हणाले तुला म्हटलं होतं. तुझा मित्र तिकडे काही मजा करू शकत नाही. मी रडक्या स्वरात त्यांना विचारलं, तुम्हाला माहित होतं की तो मरणार आहे, तर आधी का नाही सांगितलं? आजोबा एवढंच बोलले जसं मी मरून बरीच वर्षं झाली तसा तुझा मित्र मरुन २ दिवस झालेत. मेलेल्याला कसा वाचवणार होतास? मी त्यांच्यावर रागावून बोललो काहीपण बोलू नका आणि थेट गाडीकडे निघालोच होतो, की ते पोलीस तुला सांगतील सगळं! जा तिकडे! असं बोलून आजोबा अदृश्य झाले. तसा मी थरथर कापू लागलो.


तसाच थरथरत गाडीजवळ आलो. पोलिसांनीतर प्रश्नांची झडी लावली. ही गाडी का चोरलीस? जळालेली गाडी तू कशी चालवलीस? चालवलीस तर चालवलीस पण हायवेवर स्टंट का केलेस? त्यांचे सगळे प्रश्न मी ऐकून मी चक्रावून गेलो. नंतर त्यांनी पुरावा म्हणून मला मोबाईलमधला व्हिडिओ दाखवला. मी गाडीच्या मागच्या सीटवर बसलोय आणि गाडी आपोआप चालत होती. मुळात तिथे माधव असणे अपेक्षित होतं. हे कसं काय शक्य आहे विचारता ते म्हणाले, परवा रात्री माधव गाडीने चालला होता. पण रस्त्यात त्याचा अपघात झाला आणि तो जागीच गेला. पेट्रोलची टाकी फुटून गाडीला आग लागली. रात्री गाडी तिथेच बाजूला उभा केली होती आणि तू सकाळी ती चोरलीस. या वेळेस मात्र मी जमिनीवर कोसळलो.


Rate this content
Log in

More marathi story from sagar bandarkar

Similar marathi story from Drama