मनूचा वाढदिवस
मनूचा वाढदिवस
राकेश मुंबईत एका कंपनीत नोकरी करत होता.लॉकडाऊनच्या काळात तो आपल्या कुटुंबासोबत गावी आला होता.राकेशची आठ वर्षांची मुलगी आजी आजोबा यांच्यासोबत खूप रमली होती.अगदी जाणकार माणसासारख ती सतत आजी आजोबांना कोरोना काळात कशी काळजी घ्यावी हे सांगत होती.एक दिवस रामराव भाजी आणायला बाहेर चालले होते.दारात मनू खेळत होती.बाहेर जाणाऱ्या आजोबांना ती ओरडली, काय हे आजोबा! तुम्हाला किती वेळा सांगितलं, बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा.हाताला सॅनिटायझर लावलं का?नसेलंच लावलं.थांबा!
मनूने इवल्याशा हातांनी आजोबांना मास्क लावला.त्यांच्या हातांना सॅनिटायझर लावलं.रामरावांना आपल्या नातीच भारी कौतुक वाटलं.आजोबा,भाजी घेऊन लगेच घरी या.बाहेर फिरू नका.बाहेर तो कोरोना आहे ना! हो ग छकुली! नातीची काळजी लक्षात घेऊन रामराव मित्रांशी गप्पा न मारता भाजी घेऊन लगेच घरी आले. राकेश सर्वांना म्हणाला,मला एक दिवसासाठी मुंबईला जाऊन यावं लागेल.कंपनीचं थोडं काम आहे.हे ऐकून मनू बाबाला जाऊन बिलगली.बाबा,तु मुंबईला नाही जायचंस.तिथे ना कोरोना आहे.तो तुला खाईल.अरे बाबा माझा वाढदिवस खूप मोठा करायचा आहे ना.किती दिवसांनी आपण गावी आलो आहोत.आजी आजोबा सोबत माझा वाढदिवस करायचा आहे.तु कुठेही जायचं नाहीस.राकेशला लाडक्या मनूची मिठी सोडवणं अवघड झालं.तिला त्यान कसंबसं समजावलं.सकाळी मनू झोपली असताना तो मुंबईला गेला.
दोन दिवसांनी राकेश परत आला.मनू धावतच बाबाला मिठी मारणार, इतक्यात राकेश म्हणाला,मनू थांब तिथेच.मला दहा दिवस तुमच्या पासून दूर रहावं लागेल.मनू रडायला लागली.आजोबांनी मनूला समजावलं.राकेशचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्याला वरच्या खोलीत ठेवलं.मनूला खूप वाईट वाटलं.तीनं तिच्या लाडक्या डॉलीला हातात घेतलं आणि ती घरामागील झाडाखाली जाऊन बसली.डोळे पुसत पुसत,"डॉली,बघ ना ग! माझ्या लाडक्या बाबाला त्या कोरोनाने शेवटी पकडलंच!तरी मी त्याला सांगत होते,तू मुंबईला जाऊ नकोस.तुला तो कोरोना खाईल!पण बाबानं माझं अजिबात ऐकलं नाही.ऊं ऊं ऊं! ए डॉली, माझ्या बाबाला काही होणार नाही ना?माझा बाबा लवकर बरा होऊ दे ग.मी देवबाप्पाला सांगेन, त्याला लवकर बरं करायला.तुही सांग हं!बघ ना ग,आजी आजोबा यांच्यासोबत यावेळी पहिल्यांदाच माझा वाढदिवस गावी साजरा करायचा होता.मला आजी नऊवारी घालणार होती.मी आजी आजोबांना मस्त लावणी डान्स करून दाखवणारं होते.माझी आई घरीच व्हेज केक बनवणार होती.अग,माझे आजी आजोबा आंड्याचा केक खात नाहीत ना! पण सारा बेत फिसकटला.छे!
पण डॉली,अग,माझा वाढदिवस पुन्हा साजरा करता येईल.पण आधी माझा बाबा बरा व्हायला हवा.माझ्या बाई म्हणाल्या होत्या,न भीता व्यवस्थित काळजी घेतली की,कोरोना लगेच बरा होऊ शकतो.चल डॉली,उठ,मला आता माझ्या बाबाची काळजी घ्यायला हवी.मी त्याला लवकर बरा करेन.मी आजारी पडले की,माझा बाबा, माझ्या उशाशी बसून माझी काळजी घ्यायचा.पण मी लांबूनच त्याची काळजी घेईन.व्हिडीओ कॉल करून त्याला गोष्ट सांगेन गाणी म्हणून दाखवेन.त्याला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात.मी त्याला रोज सकाळी फुलं नेऊन देईन.आता ठरलं माझं!आधी बाबाला बरं करायचं! मगचं माझा वाढदिवस!
मनू आईसोबत बाबासाठी जेवन घेऊन गेली.बाबा,हे बघ, तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचं जेवण आणलं आहे.पटकन खाऊन घे.आणि सगळं संपवायचं ह!हो,हो,माझे आई,खातो सगळं.अरे, थांब थांब,आधी हात स्वच्छ धुवून घे.लेकीचं हे रूप पाहून सरिता आणि राकेश खळखळून हसले.
मनूचे रोजचे व्हिडिओ कॉल,तीचा गोड, हसरा चेहरा,आईसारखी तीची भूमिका यामुळे राकेशला त्याच्या आजाराचं काहीच वाटलं नाही.एक दिवस सरिता एकटीच राकेशसाठी जेवण घेऊन आली.अग सरिता, आपल्या मनूचा वाढदिवस दोन दिवसांवर आलाआहे. ठरल्याप्रमाणे मनूचा वाढदिवस मोठा करा हं!मी वरुन पाहीन.लेकीला लांबूनच शुभेच्छा देईल.आणि हे बघ सरू, माझ्या लेकीला तो परीचा गुलाबी ड्रेस घालं हं!माझी लाडकी खरोखरच परी दिसायला हवी.इतक्यात बाबासाठी काढा घेऊन आलेली मनू म्हणाली,ते काही नाही हं बाबा!माझा वाढदिवस तू जेव्हा बरा होशील तेव्हाच करायचा.तू मला केक भरवल्याशिवाय माझा वाढदिवस होऊच शकत नाही.समजूतदार लेकीला पाहून राकेश आणि सरिताच्या डोळ्यात पाणी आले.
