मंदिरा- एक सावट
मंदिरा- एक सावट
ही घटना आहे अतिशय समृद्धतेने नटलेल्या कोल्हापूर शेजारील अर्जुनवाड या गावातील. निलेश हा या गावातीलच अतिशय चुणचुणीत मुलगा होता. निलेश त्याची बहीण नेहा त्यांचेआईवडील असे चौघांचे कुटुंब गावात गुण्यागोविंदाने राहत होते. निलेश चे वडील (अण्णा) मुंबईतील मिल कामगार होते मिल बंद पडल्यामुळे ते त्यांच्या मूळ गावी आले होते. वाटणी झाल्यामुळे वडिलोपार्जित थोडीफार शेती त्यांच्या वाट्याला आली होती. ती पूर्वी अर्धलीला दिली होती. आता हातात काम नसल्यामुळे ते स्वत:च शेती करत होते.
एके दिवशी संध्याकाळी निलेश गावातील किराणामालाच्या दुकानात साहित्य आणण्यासाठी गेला होता. निलेशचे घर ते दुकान या रस्त्यावर एक वडाचे झाड होते. निलेश सामान घेऊन पळत पळतच घरी निघून आला. घरी आल्यावर निलेश खूप घाबरला होता. त्याच्या आईने त्याला विचारले काय झाले पण तो काही सांगायच्या मनस्थितीत नव्हता. तसाच तो न जेवता झोपून गेला. दुसऱ्या दिवशी त्याला खूप ताप आला. आईबाबा त्याला डॉक्टर कडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिले व काही गोळ्या लिहून दिल्या. पण औषधाचा कोणताच परिणाम त्याच्यावर होत नव्हता. पण विचित्र घटना घडण्यास सुरुवात झाली होती.
एके दिवशी निलेश ची आई दारातील तुळशीला पाणी घालण्यासाठी सकाळी बाहेर गेली तर दारात मेलेली कोंबडी आढळून आली. तिचे मुंडके कापून टाकले होते जणू कोणीतरी बळी देऊन ती कोंबडी दारात टाकली होती. आजूबाजूला विचारपूस केली पण हे कोण केलं त्याचा थांगपत्ता लागला नाही.
अशा एक ना अनेक घटना घडत होत्या जसे घरातील भांडी अचानक पडणे, कपाटातील कपडे विस्कटून टाकणे. एके दिवशी तर त्यांचा पाळीव कुत्रा सकाळी मेलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची कुणीतरी मान पिरगाळून त्याला मारले आहे असे वाटत होते. घरातील सर्वजण या अनाहूत घडणाऱ्या घटनांमुळे फारच घाबरले होते. निलेश ची आई म्हणाली काहीतरी भुताटकी आहे वाटतं चौकशी करूया पण निलेश च्या बाबांचा भुताखेतांवर विश्वास नव्हता ते म्हणाले आपण येथे आलेले गावातील काही लोकांना आवडले नसेल. म्हणून मुद्दामच आपल्याला भीती घालण्यासाठी हे कोणीतरी करत असेल. जेणेकरून आपण गाव सोडून निघून जावे असे त्यांना वाटते.
निलेश च्या वागण्यातही बराच बदल झाला होता तो आता घरातल्यांशी नीट बोलत नसे. नेहाला निलेश ची खूप काळजी लागून राहिली होती ती कायम त्याला बोलते करायचा प्रयत्न करत असे पण निलेश मात्र ती मला बोलावत आहे. ती मला न्यायला आली आहे असे बडबडत असे. कोण आले आहे कोण बोलावत आहे असे विचारल्यावर निलेश गप्प बसत असे आणि त्याच्याजवळ असलेली जुनी बांगडी गोल फिरवत खेळत असे.
एके रात्री सर्वजण झोपले असताना निलेश जाबडू लागला ती आली आहे ती मला नेत आहे. नेहा त्याच्या बाजूलाच झोपली असल्याने तिला जाग आली तिने विचारले कोण नेत आहे. तसा निलेश म्हणाला ताई ती माझा पाय ओढत आहे. तसे नेहा म्हणाली अरे इथे कोणी नाही पण निलेश सारखे एकच सांगत होता ती माझा पाय ओढत आहे. म्हणून नेहाने बघू कोण आहे असे म्हणत त्याच्या पायाला हात लावला आणि ती जोरात किंचाळली कारण तिच्या हाताला लांब नखांचा स्पर्श झाला होता आणि तो हात निलेश चा पाय ओढत होता. नेहाचा आवाज ऐकून आई-बाबाही उठले. बाबांनी रूममधील लाईट लावला आणि विचारले काय झालं. निलेश आणि नेहा घामाघूम होऊन एका कोपर्यात बसले होते. आईने त्यांना पाणी देऊन थोडा धीर दिला आणि पुन्हा विचारले काय झालं होतं तसं नेहाने अडखळत घडलेली हकीकत आपल्या आई-वडिलांना सांगितली. यावर अण्णा म्हणाले अरे काही नाही स्वप्न पडल असेल तिला पण नेहाच्या आईने मात्र मागील काही दिवसांपासून घटणाऱ्या घटनांचा पाढाच वाचला आणि आपण कुठेतरी चौकशी करूया असे सांगितले. अण्णा मात्र मानेनेच हो म्हणाले.
सकाळीच सर्वजण गावाच्या वेशीवर राहणाऱ्या देवर्षी कडे गेले. देवर्षी ने त्यांचे सर्व ऐकून घेतले आणि थोडावेळ डोळे मिटून ध्यान लावले. देवर्षी ना त्या वाईट शक्तीची जाणीव झाली होती. त्यांनी डोळे उघडले आणि ते सांगू लागले की हा एका स्त्रीचा अत्रुप्त आत्मा आहे. आत्म्या बद्दल सांगताना त्यांचा चेहराही घामाघूम झाला होता. नेहाची आई म्हणाली यावर उपाय काय तर देवर्षी म्हणाले की यावर माझ्याकडे कोणताही उपाय नाही हे ऐकून नेहाची आई रडू लागली व म्हणाली काहीतरी उपाय असेलच की. देवर्षी सांगू लागले की या आत्म्याला फक्त भुतांचा राजा वेताळ वश करू शकतो. यावर अण्णा म्हणाले आजारापेक्षा औषध त्रासदायक व ते सर्वांना घेऊन तिथून निघाले नेहाची आई सांगत होती अहो उपाय करून बघूया तरी पण अण्णा मात्र म्हणाले की तू बोललीस म्हणून मी इथे आलो तो देवर्षी ढोंगी होता आपल्या कडून पैसे काढण्यासाठी तो आपल्याला भीती घालत होता चल इथून. नेहाच्या आईला त्यांचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता तिही त्यांच्या मागून निघाली. आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले याची जाणीव अण्णांना नव्हती.
एके दिवशी सकाळी नेहाचे काका त्यांच्या घरी आले आणि अण्णांना म्हणाले यावर्षी मी ऊस लावायचं म्हणतोय उसाला चांगला दर आहे तु पण ऊस लाव. आपल्या येथे मुबलक पाणी आहे ऊस लावला तर यंदा चांगली मिळकत होईल. तसे अण्णा म्हणाले अरे माझे कोणत्याही कारखान्यात भाग नाहीत मी कोणत्याही कारखान्याचा सभासद नाही मग ऊस कोण नेणार? यावर त्यांचा भाऊ म्हणाला अरे आता कारखाने कॉन्ट्रॅक्ट करून सुद्धा ऊस नेतात. चांगली मिळकत मिळते म्हटल्यावर अण्णाही तयार झाले. काही कामगार सोबत घेऊन अण्णांनी ऊस लागवड चालू केली कामगार यांनी अंगावर काम घेतल्यामुळे ते रात्री थांबून काम करू लागले अचानक एके रात्री एक कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आला त्याला बाकीच्यांनी उचलून दवाखान्यात नेले अण्णांच्या शेतात तो बेशुद्ध पडल्यामुळे अण्णाही दवाखान्यात गेले काही वेळाने कामगाराला शुद्ध आली आणि तो एक सारखा बडबडू लागला ती मारील मला वाचवा. अण्णांना हे ऐकून धक्काच बसला तरीही चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवता इतर कामगारांना म्हणाले काहीतरी जनावर पाहिल असेल रात्रीच्या अंधारात त्यामुळे घाबरला असणार व ते घरी निघाले. घरी आले तरी डोक्यातून त्या कामगाराचा विचार जात नव्हता. तो कामगार परत कामावर आला नाही. काही दिवसांनी बातमी आली की तो गेला. अण्णा त्याच्या घरी गेले आणि त्याच्या बायका मुलांची विचारपूस करण्यासाठी तिथे गेल्यावर त्या कामगाराची बायको अण्णांना दुषणे देऊ लागली म्हणाली की तुमच्या इथे कामाला जाऊन आल्यापासून यांची तब्येत बिघडली ती आली ती आली असे ते नेहमी बडबडत बसत आणि कालच्या अमावस्येच्या रात्री ते असेच उठून किंचाळत होते आणि त्यातच त्यांना अटॅक येऊन गेला आणि त्यातच गेले सर्व तुमच्यामुळे झाले. अण्णा सुन्न मनस्थितीत तिथून निघाले त्यांचे मन अजूनही मानायला तयार नव्हते की काहीतरी वाईट शक्ती त्यांच्या घरी व शेतात वास करते. अण्णा घरात शांत बसून होते, निलेश च्या आईने विचारले काय हो काय झाले. अण्णांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर निलेश ची आई म्हणाली आता तरी देवर्षी कडे जाऊया आणि त्यांनी सांगितलेला उपाय करूया. अण्णांना हे ऐकण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते तयार झाले.
पुन्हा एकदा अण्णा त्यांची बायको देवर्षी कडे पोहचले. निलेश च्या आईने देवर्षी ची माफी मागितली आणि तुम्ही फक्त आम्हाला मदत करू शकता असे म्हणू लागली. त्यावर देवर्षी म्हणाले ते माझं कर्तव्यच आहे. ते त्या आत्म्याबद्दल अधिक माहिती सांगू लागले. एखादी वाईट स्त्री जेव्हा मरते तेव्हा ती अतृप्त आत्मा होते. शेजारील गावातील पाटीला च्या मुलाचे मंदारचे लग्न होत नव्हते गावातील लोकांना शेतीबरोबरच नोकरीवाला जावई हवा होता त्यामुळे पाटलांनी आपल्या मुलासाठी कर्नाटकातील स्थळ शोधून काढले मुलगी ही दिसायला देखणी असल्यामुळे पाटलांचा मुलग्याने लगेच होकार दिला. ठरल्याप्रमाणे विधिवत लग्न झाले सर्वजण खुश होते. मुलीचे नाव बदलून मंदारला शोभेल असे मंदिरा ठेवण्यात आले. पण म्हणतात ना नाव असेल त्याच्या उलटे व्यक्ती वागते. घरात सर्व सुख सोयी असल्या तरी मंदिराचे मन त्यात लागत नव्हते गावात सर्वात जास्त पैसा आपल्याकडे असावा असे तिला वाटायचे यासाठी ती तंत्र-मंत्र याची मदत घेऊ लागली. ती कर्नाटकात सर्व काही शिकली होती. मंदार मात्र आपल्या बायकोचा कोणताही शब्द खाली पडू देत नव्हता तिला लागेल त्या वस्तू तो घरी आणत असे मग ते मनोरंजनाचे साधन असो किंवा काळी जादू करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू. त्याला इतकेच वाटत होते की आपल्या बायकोने खुश राहावे. या जगात अचानक काही निर्माण होत नाही एकीकडे भर करायची झाली तर दुसरीकडे खड्डा करावाच लागतो या उक्तीप्रमाणे मंदिरा गावातील इतर लोकांवर जादू टोणा करू लागली. दुसऱ्याच्या वैभवला लागलेली कळा आपल्याला वैभव प्राप्त करून देईल असे तिला वाटत असे. गावात अचंबित करणारे घटना घडू लागल्या. गावातील लहान मुले अचानक गायब होऊ लागली. तरणीताठी मुले अचानक मयत होऊ लागली सुरुवातीला कोणाला काहीच कळत नव्हते पण हळूहळू सर्वांना लक्षात येऊ लागले की मंदिरा गावात आल्यापासून गावात या घटनांची सुरुवात झाली आहे. सर्व गावकरी एकत्र आले व पाटलांच्या घरावर चाल करून गेले. गावकरी येतायेत याची चाहूल लागल्यामुळे मंदिरा मागच्या दरवाज्याने पळाली गावकऱ्यांनी घरी शोध घेतला. ती मिळाली नाही म्हंटल्यावर गावात इतरत्र तिचा शोध चालू झाला. ती भटकत इकडून तिकडे फिरत आपल्या गावात आली. ती आसरा शोधू लागली. ती दारोदार फिरू लागली. एव्हाना सर्वत्र तिच्याबद्दलची वार्ता पसरली होती. कोण तिला हडळ म्हणत होते तर कोण चेटकिन तर कोण डाकीण. त्यामुळे तिला समोर पाहताच लोक आपले दार लावून घेत तर काहीजण तिच्या दिशेने वस्तू भिरकावत. ती आपल्या गावात आहे ही वार्ता शेजारील गावात समजली आणि त्या गावातील लोक आपल्या गावात आले. रागाच्या भरातील गावकऱ्यांनी तिला गावातील वडाच्या झाडाला बांधले आणि तिच्यावर काठी आणि दगडांचा मारा करू लागले. तितक्यात तेथे मंदार आणि त्याचे बाबा आले. ते गावकर्यांना समजावण्याचा अतोनात प्रयत्न करत होते पण कोणी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जे गावात वाईट घडले ते तिच्यामुळेच घडले. त्यामुळे ती जिवंत राहता कामा नये असे जो तो बोलू लागला. मंदार म्हणत होता अरे तिचा नाही तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा तरी विचार करा पण चिडलेल्या गावकऱ्यांच्या हातून मंदिराचा खून झाला. म्हणतात की राग हा माणसाचा शत्रू असतो त्याप्रमाणेच गावकऱ्यांनी वाईट शक्तीला संपवलं नव्हते तर एका अतृप्त शक्तीला ला जन्माला घातले होते. त्यानंतर गावात वारंवार अनपेक्षित घटना घडू लागल्या.
शेवटी गावकऱ्यांनी मांत्रिकाला बोलवले. त्याच्याही लक्षात आले की त्या शक्तीला नष्ट करणे त्याच्या हातात नाही पण तो तिला बंदिस्त करू शकतो. मग त्याने त्या आत्म्याला वडाच्या मुळाशी कैद करून ठेवले. तुमच्या मुलांने त्या आत्म्याची कोणतीतरी वस्तू तेथून बाहेर काढली आहे त्यामुळे तो आत्मा वडा पासून मुक्त झाला आहे. अण्णा म्हणाले यावर उपाय काय देवर्षी म्हणाले ती वस्तू शोधून होती तिथे परत ठेवावी लागेल तसेच महादेवाचे अनुष्ठान करावे लागेल. कारण वेताळ हा जरी भुतांचा राजा असला तरी शिवगण असल्यामुळे महादेवाचे अनुष्ठान केल्याने तो लवकर प्रसन्न होऊन आपल्याला यातून सोडवू शकेल. देवर्षी ने त्यांना अभिमंत्रित पाणी आणि देवाचा अंगारा दिला तसेच ती वस्तू शोधून पुन्हा होती त्या ठिकाणी ठेवण्यास सांगितले. अण्णा घरी गेली व घरात वस्तू शोधू लागले त्यांनी निलेश ला विचारले की तू वडाच्या झाडात जवळून काही आणले आहेस का पण तो काही सांगत नव्हता तेवढ्यात नेहा म्हणाली की तिने निलेश कडे एक जुन्यातली बांगडी पाहिली आहे.
(त्या दिवशी दुकानातून येताना निलेशचे वडाच्या झाडाकडे लक्ष गेले होते तेथे काहीतरी चकाकते त्याला दिसले म्हणून त्यांने जवळ जाऊन पाहिले तर वडाच्या मुळापाशी काहीतरी चमकत होते ते हाताला येत नव्हते म्हणून त्याने बाजूचा दगड घेऊन तिथे उकरले तर त्याला तिथे बांगडी मिळाली त्याने ती बांगडी खिशात ठेवली तितक्यात तेथे त्याला भयानक आकृती दिसली ती त्याला बोलवत होती म्हणून तो घाबरून पळत पळत घरी आला होता.)
अण्णांनी प्रथम त्यांच्याजवळील अभिमंत्रित पाणी घरात सर्वत्र शिंपडले व निलेश कडील ती बांगडी घेऊन ते त्या वडाच्या झाडाजवळ आले. एव्हाना संध्याकाळ झाली होती सर्वत्र अंधार पसरला होता आणि ते झाड फारच भयानक वाटत होते. वडाच्या मूळाशी खोदू लागले त्याबरोबरच झाडावरून चित्रविचित्र आवाज येऊ लागले अण्णा घाबरले त्यांनी आपल्या खिशातील अंगाऱ्याच्या पुडीला हात लावला त्यामुळे त्याला थोडा धीर आला आणि त्यांनी पटकन सोबत आणलेली बांगडी तेथे पुरुन ते घरी आले.
इकडे अण्णांच्या बायकोने अनुष्ठानास सुरुवात केली होती. अनुष्ठान सुरुवात झाल्याबरोबर अत्रुप्त आत्मा बाहेर जाण्यासाठी धडपडू लागला. ती शक्ती निलेश ला आपल्या सोबत नेऊ पाहत होती. पण घराभोवतीही अंगारा टाकल्यामुळे ते तिला शक्य होत नव्हते. अण्णाही वेताळाचे आव्हान करू लागले. दोघेही मनोभावे आव्हान करत असल्यामुळे वेताळ अदृश्य रूपात तेथे आले. वेताळ तिथे येताच निलेश जागेवरच चक्कर येऊन कोसळला आणि एक काळीकुट्ट सावली घरातून बाहेर जाताना दिसली. हे पाहून नेहा जोरात किंचाळली. आईने तिला जवळ घेतले आणि अण्णांनी निलेश ला उचलून देवाजवळ घेतले आणि त्याला अंगारा लावला व ते अभिमंत्रित पाणी त्याच्यावर शिंपडले. त्याबरोबर निलेश उठून बसला आणि म्हणाला आई मला काय झाले होते मला काही आठवत नाही माझे डोके खूप दुखते आहे यावर आई म्हणाली बाळा घाबरू नको जे वाईट घडायचे होते ते घडून गेले आहे आता आपण सुखरूप आहोत काळजी करायची आता काही गरज नाही देव आपल्या सोबत आहे.

