मला समजलेले कृष्णमूर्ती ९
मला समजलेले कृष्णमूर्ती ९
प्रकरण९
मी कोण?
मी कोण ते आपल्याला माहित आहे काय? कल्पना, स्मरण, निर्णय, अनुभव ,नाव देता येण्यासारखे व नाव देता न येण्यासारखे हेतू ,कांहीतरी होण्यासाठी किंवा काही तरी न होण्यासाठी केलेले प्रयत्न ,जात, धर्म, वर्ण, राष्ट्र, परंपरा, प्रांत, देश, कुटुंब, समाज ,व्यक्ति, याबद्दलचे सुप्त मनाने संग्रहित केलेले संस्कार ,मग हे सर्व कर्म रुपाने फळास आलेले असो किंवा कल्पना रूपाने फळास आलेले असो,किंवा अजून ते व्यक्त झालेले नसोत ,माझ्या हिशेबी हे सर्व म्हणजे मी .यामध्ये आपली इतरांशी असलेली चढाओढ, व काहीतरी बनण्याची वासना, हीही आहे .या सगळय़ांची प्रक्रिया म्हणजे "मी" .जेव्हा आपली या "मी"शी समोरासमोर गाठ पडते तेव्हा आपल्याला आढळून येते की हा "मी' अत्यंत दुष्ट आहे .
दुष्ट शब्द मी मुद्दाम योजित आहे. कारण मी हा दुभंगविणारा, इतरांपासून अलग पाडणारा, दुरावणारा,आहे . याच्या हालचाली मग त्या कितीही उज्ज्वल असोत, त्या वेगळे डबके निर्माण करतात.त्या फोडणार्या, विघटन करणाऱ्या,विनाश करणाऱ्या, आहेत .जेव्हा प्रेम असते तेव्हा "मी" नसतो.हे आपल्याला क्वचित काही विलक्षण असामान्य क्षणी अनुभवाला आले असेल. प्रत्येक अनुभव "मी"ला कशी बळकटी आणतो, ते समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. जर आपल्याला कळकळ असेल, तर अनुभव म्हणजे काय? हे आपण समजून घेणे जरुरीचे आहे .
अनुभव आपण कशाला म्हणतो ?आपले जीवन ही एक अनुभव मालिकाच आहे, असे आपण म्हटले तरी चालेल .आपण सतत कांही ना कांही अनुभवीत असतो . अनुभवाविना जीवनाची आपण कल्पनाही करू शकत नाही .आपल्यावर सतत काही ना काही संस्कार होत असतात .या संस्कारांचा आपण आपल्या धारणेप्रमाणे अनुवाद करीत असतो .त्या अनुवादा प्रमाणे अापण कर्म करीत असतो .हा "मी" फार हिशोबी व धूर्त आहे .इंद्रियांनी आपण जे काही बघतो ते व आपल्या त्याबद्दलच्या प्रतिक्रिया ही दोन एकमेकांवर उलटसुलट क्रिया व प्रतिक्रिया आव्हान व जबाब याप्रमाणे कार्य करीत असतात.
त्याचप्रमाणे जागृत मन व सुप्त मन हीही एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया या प्रमाणे कार्य करीत असतात.अशा प्रकारे दोन पातळ्यांवर दोघा दोघांची देवघेव सुरू असते . मी जे काही पाहतो, मला जे काही जाणवते, त्याला माझ्या संस्कार संग्रहाप्रमाणे मी जबाब देतो .माझ्या श्रद्धा, माझे ज्ञान, माझ्या भावना, यानुरूप मी दिलेला जबाब, म्हणजेच अनुभव नाही काय?मी जेव्हा तुम्हाला पाहतो त्या वेळी एक प्रतिक्रिया निर्माण होते .त्या प्रतिक्रियेचे नामकरण, म्हणजेच संस्कारानुरुप त्या प्रतिक्रियेला ओळखणे होय .म्हणजेच अनुभव .मी जर त्या प्रतिक्रियेला नाव दिले नाही ,नाव (कुठचेही )देऊ शकलो नाही, तर तो अनुभव नाही . नाव देणे, ओळखणे, हे माहीत असल्याशिवाय घडणे होणार नाही .माहित असणे म्हणजेच संस्कार संग्रह असणे .तुमचे स्वतःचे जबाब पाहा आणि तुमच्याबद्दल काय घडत आहे ते पहा.प्रतिक्रिया व नामकरण एकाच वेळी घडतात .प्रतिक्रिये बरोबर जर नामकरण चालू नसेल तर तो अनुभव नाही .मी जर तुम्हाला ओळखलेच नाही तर तुम्हाला भेटण्याचा अनुभव मला कसा येणार ?नामकरण म्हणजेच ओळखणे,पूर्व संस्कारांशी ताडून पाहणे, तुलना करणे, हे सर्व अगदी साधें सरळ सोपे नाही काय ? म्हणजेच जर मी माझ्या धारणे प्रमाणे, स्मरणा प्रमाणे, पूर्वग्रहाप्रमाणे, जबाब दिला नाही, तर मला अनुभव आला, असे तरी मी कसे काय ओळखणार ?
त्यानंतर निरनिराळ्या वासनांचा खेळ पाहूया. मी निरनिराळया वासना निर्माण करतो.माझे रक्षण होत असावे,मी अंतर्यामी सुरक्षित असावे,मला ईश्वर भेटावा ,मला गुरू पाहिजे, इत्यादी. धारणेतून आलेल्या प्रतिक्रियेला आपण आकार देतो.नाव देतो व म्हणतो मला अशी वासना आहे.आणि मग ती वासना क्रिया बनते .नंतर पुन्हा धारणेतून,वासनापूर्तीच्या इच्छेने, क्रिया सुरू होतात, तेच कर्म.वासना मी निर्माण केली आहे. त्याला मी नाव दिले आहे. त्याला मी आकार दिला आहे.नंतर जेव्हा एखादी क्रिया होते ,तेव्हा निर्माण झालेल्या प्रतिक्रियेला नाव देऊन ,मी ही प्रतिक्रिया जुन्या स्मरण संग्रहाशी ताडून पाहतो .व ओळख पटली की आपण म्हणतो "मला अनुभव आला आहे" . "मला ईश्वर भेटला आहे" .किवा "मला ईश्वर भेटला नाही".तुम्ही ही नामकरणाची, तुलनेची, सर्व प्रक्रिया जाणत आहात.अनुभव म्हणजे वासना नव्हे काय ?वासनाच तुम्हाला अनुभव देत नाहीत काय ? जेव्हा"मी" मन शांत असले पाहिजे असे म्हणतो .तेव्हा काय होते? काय होत असते ?मी मन शांत असण्याचे महत्त्व जाणतो.हे जाणणे धारणेचे फळ असते ."धारणा" उपनिषदांनी तसे सांगितले आहे ."धार्मिक ग्रंथ तसे म्हणतात" "सर्व संतांचे" तसे आवर्जून म्हणणे आहे .माझे मन हे सारखे दिवसभर इतका चावट पणा करीत असते, की ते जर शांत होईल तर किती बरे होईल, असे मला वाटते .यातील कोणतीही किंवा याची कोणतीही समवाईरूप स्वरूपाची प्रतिक्रिया असेल.
केव्हां केव्हां मन शांत असणे, प्रसन्न असणे,मन निस्तरंग असणे,चांगले असे मलाही जाणवते .वासना काय तर मला शांत मन पाहिजे, मला शांतता अनुभवायची आहे .मग ही प्रतिक्रिया प्रहार होते .जबाब येतो शांती मला कशी बरे प्राप्त होईल?शिस्त पालन, योगसाधन, मार्गानुकरण, इत्यादी अनेक मार्ग मी निरनिराळ्या पुस्तकांमध्ये वाचलेले आहेत किंवा संतानी सांगितलेले मला माहिती आहेत .नंतर त्या मार्गाचे अनुकरण करून मी इच्छित फळ साध्य करण्याचा प्रयत्न करतो.वासनेची तृप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो. प्राप्त झालेली प्रत्येक स्थिती, मला माहीत असलेल्या,आपणच ठरविलेल्या, शांतीच्या स्थितीशी,ताडून पाहतो .ओळख पटली कि म्हणतो ही शांती आहे .अथवा ही शांती नाही .वस्तुतः काय झाले वासनेने अनुभव दिला .वासना होती, कल्पना होती, आकार माहिती होता, म्हणूनच तुलना झाली, ओळख पटली, नामकरण झाले व शांती प्राप्त झाली कि नाही ते ठरले. यात "मी"ने काय केले?स्वतःला "मी"ने अनुभवात पक्के रोवून घेतले.अनुभवामुळे मी बळकट झाला .हा "मी" स्वतःच केलेल्या कुंपणांने, स्वतःच खणलेल्या खंदकाने ,स्वतःला जास्त बळकटी आणित असतो .किंवा स्वतःच केलेल्या जाळ्यात, जास्त जास्त गुरफटत जात असतो .किंवा स्वतःच्या अंगातून तंतू काढून, स्वतःला जास्त जास्त लठ्ठ करीत असतो .
अशा प्रकारे चाणाक्षपणाने, दूरदर्शीपणाने, चतुरपणे, "मी" आपली बळकटी व सामर्थ्य वाढवीत नसतो काय? मला सत्य समजले पाहिजे ही माझी वासना आहे .ही माझी इच्छा आहे .नंतर सत्य म्हणजे काय याचा मी माझ्या कल्पनेप्रमाणे, कुवतीप्रमाणे, आराखडा काढतो ,मला निरनिराळ्या पुस्तकात काय लिहलेले आहे ते माहित आहे .निरनिराळे लोक त्याबद्दल बोलत असतात ते मी ऐकलेले आहे .धार्मिक ग्रंथात तर ते सर्व सविस्तर सांगितलेले आहेच.मला ते सर्व पाहिजे आहे .मला ते सर्व अनुभवावयाचे आहे.आता काय होते, ही इच्छा,ही वासना,निर्माण झाली आहे . व जेव्हा मी अनुभवतो, म्हणजेच ओळखतो,ताडून बघतो ,व ठरवितो मी सत्य जाणले आहे . किंवा मी सत्य जाणले नाही.मीच निर्माण केलेली स्थिती ओळखतो .मी जर ती स्थिती ओळखणार नाही, म्हणजेच ज्या स्थितीशी गाठ पडेल ,त्यावेळी उत्पन्न झालेल्या प्रतिक्रिया ,मी ठरविलेल्या प्रतिक्रियांशी जुळल्या नाहीत , तर मी त्याला सत्य असे म्हणणार तरी कसे ?जर मी ती स्थिती मुळीच ओळखली नाही ,तर ते सत्य आहे की असत्य आहे हे तरी मी कसे म्हणणार ?मी ती ओळखतो म्हणूनच मी ती अनुभवतो .आणि हा अनुभव "मी" ला बळकटी देतो.
विचार करा अनुभव "मी" बळकट करीत नाही काय ?अश्या तर्हेने मी स्वतःला अनुभवात जास्त जास्त खोल पुरून घेत असतो .आणि मग तुम्ही म्हणता "मी जाणतो" "ईश्वर आहे"."सत्य आहे" किंवा "सत्य नाही"."देव कल्पना खोटी आहे" .तुम्ही म्हणता एखादी विशिष्ट राजकीय पद्धत बरोबर आहे आणि दुसरी एखादी चूक आहे . अशा प्रकारे प्रत्येक अनुभव "मी"चे दृढीकरण करीत असतो.जो जो अनुभवाचे खंदक जास्तजास्त रुंद,जास्त जास्त खोल, तो तो मी जास्त सुरक्षित, असे हे आहे.या सर्व अनुभवाचे फल काय, तर तुमचे व्यक्तिमत्त्व जास्त भव्य दिव्य व उज्ज्वल बनते .तुम्ही महान विद्वान बनता. तुम्ही प्रचंड चारित्र्य संपन्न, विलक्षण शीलवान व महान श्रद्धावान बनता.मग तुम्ही या श्रद्धा ,ज्ञान, दिव्यता, भव्यता, चारित्र्य, शील संपन्नता, याचे प्रदर्शन सुरू करता .तुम्हाला माहित असते, कि इतर तुमच्या सारखे हुषार नाहीत, तुमच्याजवळ वक्तृत्व व लेखनशैली असली आणि तुम्ही धूर्त असला तर मग बघायलाच नको ."मी" अजून कार्य करीत आहे.तुमची सर्व धारणा ,श्रद्धा, अनुभव,ज्ञान ,परंपरा, गुरू, जात, धर्म, म्हणजे तुमचे इतरांपासून दुरीकरण आहे.या "मी"मुळेच तुम्ही सगळ्यांना दुरावता.म्हणूनच झगडा व विरोध आहे.अपव्यय आहे .
जर तुम्ही खरोखरच गंभीर असाल, जर तुम्हाला खरोखरच कळकळ असेल, तर हे केंद्र पूर्णपणे वितळवून टाकले पाहिजे .त्या केंद्राचे बेसावधपणे सुद्धा समर्थन करता कामा नये.यासाठी अनुभवाची संपूर्ण प्रक्रिया लक्षात आली पाहिजे. मनाला "मी"चाआराखडा न काढणे ,वासना न धरणे, अनुभव न घेणे, शक्य आहे काय ?सर्व अनुभव पोकळ आहेत. ते नाशकारक आहेत .ते सत्य नाकारणे आहे. असे वस्तुत: असताना, अनुभवसंपन्नता म्हणजे भरीवता, असे आपण समजत नाही काय?जास्त जास्त अनुभव, तथाकथित भव्य दिव्य अनुभव, म्हणजे भरीव कार्य, असे आपण समजत नाही काय ?यालाच आपण जीवन सफलता असे म्हणत नाही काय?ही सर्व प्रक्रिया उखडणे, कांहीही न ओळखणे, कुठचाही अनुभव न घेणे, हासुद्धा अनुभव न घेणे, हे तुमच्या हिशोबी निष्फळ फोल व्यर्थ आयुष्य नाही काय ?तुम्ही माझ्या बरोबरआहात काय? तुम्ही जागे आहात काय ?तुम्ही व मी व्यक्ती म्हणून या "मी"च्या पाळा मुळापर्यंत जाऊन त्याला संपूर्णपणे समजू शकू काय?हा "मी"कशामुळे वितळतो.धार्मिक व इतर ग्रंथांनी तुलना, ओळख, हा मार्ग सांगितलेला आहे .
ते म्हणतात स्वतःला सर्वत्र पाहा म्हणजे "मी" नाहीसा होईल.परंतु ओळख तुलना नामकरण या "मी"च्याच हालचाली आहेत.विश्व मग ते कितीही व्यापक असो तो आराखडा "मी"नेच काढलेला आहे .तोच मी अनुभवतो आणि अशाप्रकारे "मी" जास्त बळकट होतो .सर्व श्रद्धा, ज्ञान,यम नियम, व इतर शिस्त, या "मी"चे दृढीकरण करतात .असे एखादे तत्त्व आपण शोधू शकू काय?कि जे हा "मी" विरघळवील?हा प्रश्नच चुकीचा आहे .हेच तर आपल्याला पाहिजे आहे.आपल्याला असे एक काही तरी हवे आहे की ज्याचा स्पर्श "मी" नष्ट करील.श्रद्धा, ज्ञान, ध्यान, दर्शन, इत्यादि अनेक मार्ग सांगितलेले आहेत.यातील एक श्रेष्ठ दुसरा कनिष्ठ असे मुळीच नाही .सर्व एकाच पातळीवरचे आहेत .हे सर्वच "मी"चे सामर्थ्य वाढवतात.हा मी कार्यमग्न असताना, त्याचे विनाशकारक चाळे व त्याचे बळ मी पाहू शकेन काय?त्याला काहीही नाव द्या पण मीचे कार्य म्हणजे दूरीकरण नाश अपव्यय .हा मी विरघळवून टाकण्याचा मार्ग मला पाहिजे आहे .मी ,हा "मी" केवळ अंतर्यामीच नव्हे तर अखंड बाहेरही कार्यमग्न असलेला पाहतो .त्याच्या कार्यमग्नतेने नेहमीच उतावळेपणा,भीती, निष्फळता,क्लेश,दुःख, अपव्यय, ही येतात.
असे आहे तर मग हा 'मी" विभागाश:नव्हे तर संपूर्णपणे नष्ट करणे शक्य आहे काय ?असा प्रश्न तुम्ही कदाचित स्वतःला पूर्वी विचारला असेल, आपण याच्या पाळा मुळापर्यंत जाऊन त्याचा विनाश करू शकू काय?योग्य कर्म करण्याची ही सुरुवात ठरेल असे तुम्हाला वाटत नाही काय?मला अर्धवट शहाणपणा नको तर मला संपूर्ण शहाणपणा पाहिजेे .आपल्यापैकी बहुतेक जण कुठच्या ना कुठच्या पातळीवर शहाणे असतात. विभागश:शहाणे असतात. शहाणपणा निरनिराळ्या पद्धतींचा असतो.पण संपूर्ण शहाणा कुणीही नसतो ."मी" विरहित अस्तित्व म्हणजेच संपूर्ण शहाणपणा.हे शक्य आहे काय? "मी" संपूर्णपणे नष्ट होणे शक्य आहे काय ?"मी" गैरहजर असणे शक्य आहे काय?तुम्हाला माहीत आहे कि हे शक्य आहे .काय झाले ,काय केले, म्हणजे हे शक्य होईल.कुठच्या तत्त्वाच्या स्पर्शाने, हे शक्य होईल.ते तत्त्व मी शोधून काढू शकेन काय?जेव्हा मी हा प्रश्न विचारतो, तेव्हा त्यातच गर्भित सूचना आहे, कि माझी खात्री आहे कि ते शोधून काढता येईल.म्हणजे "मी" एक अनुभव निर्माण करीत आहे व त्यामुळे "मी" ला जास्त बळकटी येणार आहे.मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात आले काय ? तुम्हाला समजले काय ?"मी"ला ओळखण्यासाठी फार जागृत पहारा लागतो .तीक्ष्ण अखंड साक्षित्व लागते .अखंड जराही न थांबता जागृतता लागते.नाहीतर झटकन तो "मी" आपल्या नजरेखालून निसटतो.
मी अत्यंत प्रामाणिक आहे .मला "मी"ला वितळवून टाकायचे आहे.हे मी ज्याक्षणी म्हणतो त्याच क्षणी यात हे गर्भित आहे कि मला माहीत आहे "मी"ला विरघळवता येते.म्हणजे "मी" विरघळला हा "मी"चा अनुभव झाला.आणि अशा रीतीने "मी"ने बळकटी प्राप्त करून घेतली.हा "मी" फार चाणाक्ष चतुर व धूर्त आहे .त्याचे मार्ग अत्यंत गूढ व थक्क करून टाकणारे आहेत.त्यावर नजर ठेवण्यासाठी फार चतुरता पाहिजे .तेव्हा हा "मी" अनुभव घ्यायचा ओळखायचा केव्हा थांबेल ?हे कसे काय शक्य आहे बुवा ?
सृजनशील स्थिती हा "मी"चा अनुभव नसतो. ती अनुभवातीत आहे.जेव्हा मी नसतो, तेव्हाच सृजनशीलता असते.सृजनशीलता हे बुद्धीचे कार्य नाही .ते मनाचे कार्य नाही. तो मनाने काढलेला आराखडा नाही.ते कांहीतरी अनुभवातीत असे आहे .तेव्हा मनाला स्तब्ध होणे, न ओळखण्याच्या स्थितीतअसणे, न अनुभवण्याच्या स्थितीत असणे, हे शक्य आहे काय?म्हणजेच सृजनता असणे, मी हजर नसणे, शक्य आहे काय ?हा खरा प्रश्न आहे असे तुम्हाला वाटत नाही काय ?मनाची प्रत्येक हालचाल भरीव वा पोकळ, होकारार्थी किंवा नकारार्थी, हा अनुभव आहे .त्याने उलट "मी"चे दृढीकरण होते. हा अनुभव आहे.न ओळखण्याच्या स्थितीत असणे मनाला शक्य आहे काय ?हे फक्त पूर्ण शांततेतच शक्य आहे .ही शांतता हा मनाचा अनुभव नाही .त्यामुळे मीचे दृढीकरण होत नाही. असे एखादे "मी"हून वेगळे तत्त्व आहे काय?ज्याच्या स्पर्शाने "मी"वितळतो. "मी"च्याही वरच्या पातळीवर अशी एखादी आत्मिक वस्तु आहे काय? कि जी "मी" चा नाश करू शकते .त्याला दूर करू शकते .आपली अशी समज आहे कि अशी एक वस्तू आहे .बर्याच धार्मिक लोकांचीही तशीच समजूत आहे. जडवादी म्हणतात कि "मी"चा नाश ही अशक्य गोष्ट आहे."मी"ला हवे ते वळण देता येईल.ताब्यात ठेवता येईल. अाकार देता येईल .राजकीय आर्थिक सामाजिक शिस्तीत ठेवता येईल .त्याची फोड करता येईल .अशा तर्हेने हा "मी" अत्यंत भव्य दिव्य उज्ज्वल शीलसंपन्न चारित्र्यसंपन्न जीवन जगू शकेल. हा "मी' अत्यंत नीतिमान करता येईल.तो न कुरकुरता विशिष्ट सामाजिक आचरण करील.तो त्यात ढवळाढवळ करणार नाही .तो एखाद्या यंत्राप्रमाणे वागेल.जडवाद्यांचे हे म्हणणे आपल्याला माहीत आहे.
खरोखर जे धार्मिक नाहीत, परंतु ज्यांना अापण धार्मिक म्हणतो,असे लोक म्हणतात - मूलत: असे एक तत्व आहे कि जर त्याचा स्पर्श "मी"ला होईल तर हा "मी" नष्ट होईल. असे एखादे "मी"ला विरघळवणारे तत्त्व अस्तित्वात आहे काय?कृपा करून आपण काय करीत आहोत ते पाहा.आपण या "मी"ला एका कोपऱ्यात चेपीत आहोत.आता काय होते ते बघा .असे एखादे तत्व जे काल रहित व कालातीत आहे व मी च्या बाहेर आहे- बाहेर असणे आपल्याला आवडेल-त्याची आपण प्रतिष्ठापना करीत आहोत.आणि मग अशी आशा करतो ,की ते तत्त्व कधी ना कधी, आज ना उद्या येईल व या "मी"चा नाश करील.या दुष्ट "मी"चे निर्दालन करील.त्यालाच अापण परमेश्वर म्हणतो.अशी एखादी वस्तू ,जिच्याबद्दल मन कल्पना करू शकेल,अस्तित्वात असणे शक्य आहे काय? ती असेल किंवा नसेल, त्याचा इथे प्रश्न नाही.मन जेव्हा एखाद्या कालरहित व कालातीत वस्तूचा शोध घेते, इच्छा करते कि आज ना उद्या त्याचा स्पर्श आपल्याला होईल, व हा मी नष्ट होईल.त्याच वेळेला "मी"ला बळकटी आणण्याचे कार्य चालू नाही काय?ज्या क्षणी यावर तुम्ही श्रद्धा ठेवता, त्याच क्षणी "मी"च्या दृढीकरणाला सुरुवात झाली नाही काय ?ज्या क्षणी तुम्ही म्हणता "सत्य आहे" "ईश्वर आहे"कालातीत अखंड अमर अशी स्थिती आहे .त्या क्षणी "मी" आपल्याला अनुभवाच्या आधारे बळकटी आणण्याला सुरुवात करीत नाही काय?या तत्त्वाचा "मी"ने आराखडा काढला आहे. हा "मी" मग आशा करतो कि ते प्रगट होईल व स्वतःचा नाश करील.अश्या प्रमाणे कालातीत स्थितीमध्ये चिरंतन अस्तित्व असा आराखडा "मी" ने काढलेला आहे .नंतर त्याला तसा त्याला अनुभव आला, कि तो "मी"ला जास्त सुरक्षित करतो.तुम्ही "मी"चा नाश केला नाहीत तर फक्त त्याचे गुणधर्म बदललेत. "मी"आहेच.कारण तुम्ही त्या स्थितीचा अनुभव घेतला आहे. अशा प्रकारे अथपासून इतिपर्यंत आपली हालचाल एकाच प्रकारची असते .आपण फक्त आपली कल्पना करून घेत असतो कि आपली वाढ होत आहे.आपली उत्क्रांती होत आहे. अापण जास्त जास्त सुंदर बनत आहोत .पण जर तुम्ही सूक्ष्मपणे आपले स्व-निरीक्षण कराल तर तुम्हाला आढळून येईल कि हा मी निरनिराळ्या पातळ्यांवर, निरनिराळ्या नावाखाली, व निरनिराळ्या चिठ्या गळ्यात अडकवून वावरत आहे.
जेव्हा तुम्ही ही सर्व प्रक्रिया पाहता, या मीची प्रचंड धूर्त व असामान्य बुद्धी आणि गूढ असे स्व-दृढीकरण करण्याचे मार्ग पाहाता;ओळख, सद्गुण, तुलना, अनुभव,श्रद्धा,ज्ञान,यांच्या स्वत: भोवती तटबंद्या उभारताना पाहता,स्वतःच निर्माण केलेल्या पिंजर्यात घिरट्या घालताना पहाता, वर्तुळात केंद्राभोवती फिरताना बघता, तेव्हा काय होते. जेव्हा तुम्ही या सर्व प्रक्रियेबद्दल जागृत होता, ती पूर्णपणे ओळखता, तेव्हा शिस्तीने नव्हे, बक्षिसाच्या आशेने नव्हे, किंवा भीतीच्या दबावामुळे ही नव्हे, आपोआपच काहीही न करता अपरिहार्यपणे तुम्ही अत्यंत शांत होत नाही काय?जेव्हा मनाची प्रत्येक हालचाल म्हणजे मनाचे दृढीकरण आहे हे तुम्ही जाणता, त्याचे साक्षित्व करता, जागृत पाहारा करता, त्याची प्रत्येक हालचाल ,अलिप्तपणे, गमतीने सर्व काही ओळखून, निवड रहित भूमिकेतून अवलोकन करता, तेव्हा तुम्ही अशा एका टप्प्यापर्यंत येता, कि आराखडा काढलेल्या स्थितीमध्ये नव्हे, तर आपण त्याच स्थितीत आहोत जिथे मन अत्यंत शांत स्थिर व निस्तरंग झाले आहे. मनाला मुळी काही निर्माण करण्याची कुवतच राहिलेली नाही असे आढळून येते .मन जे काही निर्माण करते ते वर्तुळातील असते.ते "मी"च्या क्षेत्रातील असते .
जेव्हा मन निर्मिती करण्याचे थांबते तेव्हांच खरी निर्मिती होत असते .ती ओळखण्यासारखी स्थिती नाही. सत्य हे ओळखावयाचे नसते श्रद्धा ज्ञान अनुभव सद्गुण मशागत हे सर्व काही सत्य प्रगट व्हायचे असेल तर गेले पाहिजे.आपल्या सद्गुणांबद्दल ज्याला जाणीव आहे, जो सद्गुणांची मशागत करीत आहे, त्याला सत्य कधीच सापडणार नाही. तो अत्यंत सभ्य मनुष्य असू शकेल, परंतु अत्यंत सद्गुणी व सभ्य असणे, आणि सत्पुरुष असणे ,ही सर्वस्वी फार भिन्न आहेत.सत्पुरुषाला सत्याने मिठी मारलेली असते .सद्गुणी मनुष्य महान् शीलवान् चारित्र्यवान् असेल. परंतु असा चारित्र्य संपन्न पुरुष शील, सद्गुण्, धर्म ,नीति, यांचा पाठलाग करीत असतो. त्यांचे आचरण करीत असतो आणि अशा रीतीने "मी"ला शील, चारित्र्य, नीती, इत्यादिकांच्या तटबंद्या उभारून सुरक्षित करीत असतो.जेव्हा तो म्हणतो तृष्णा असता कामा नये, त्याच क्षणी तो तृष्णा रहित स्थितीची वासना करतो.जेव्हा तो निरीच्छ होतो त्या वेळेला हा निरीच्छतेचा अनुभव "मी"ला बळकटी आणतो.आणि म्हणूनच केवळ भौतिक वस्तूंचे नव्हे, तर श्रद्धा आणि ज्ञान यांचेहि दारिद्र्य असणे, फार महत्त्वाची गोष्ट आहे .अत्यंत श्रीमंत ,ज्ञानसंपन्न व श्रद्धावान् पुरुष अंधाराशिवाय काहीही ओळखू शकणार नाही .सर्व प्रकारच्या खोड्या व क्लेश यांचे तो केंद्र बनून राहील .परंतु जर तुम्ही व मी व्यक्ती म्हणून या "मी"ची संपूर्ण प्रक्रिया पाहू ,तरच प्रेम म्हणजे काय याचा बोध आपल्याला होईल.
मी तुम्हाला खात्री देतो कि ही व फक्त हीच क्रांती कदाचित जग बदलू शकेल .प्रेम "मी" करू शकत नाही ."मी" करतो अनुभवितो ते प्रेम नव्हे जेव्हा तुम्हाला प्रेमाचा बोध होतो तेव्हा मी हजर नसतो .प्रेम हे ओळखता येत नाही. प्रेम हे अनुभवता येत नाही. --
