STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

4  

Varsha Chopdar

Inspirational

*मी मराठी!*

*मी मराठी!*

4 mins
2

*मी मराठी!* 

"नमस्कार, मी मराठी! ओळखलंत ना मला? 
माझा जन्म काही आजचा नाही. सातवाहन काळातील 'महाराष्ट्री प्राकृत' पासून सुरू झालेला माझा प्रवास आजच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. 
       संत ज्ञानेश्वरांनी ७५० वर्षांपूर्वी अभिमानाने सांगितले होते.
"माझा मराठाचि बोलु कवतुके। 
परि अमृतातेही पैजा जिंके। 
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥"
म्हणजेच, माझे मराठी बोल इतके गोड आणि रसाळ आहेत की ते अमृताशीही पैज जिंकतील. ज्ञानेश्वरांची 'भावार्थदीपिका', तुकोबांची 'गाथा' आणि एकनाथांची 'भागवत' यांमुळे मराठीला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले.ज्ञानेश्वरांनी जेव्हा पसायदान मागितलं, तेव्हा मी विश्वात्मक झाले. तुकोबांच्या गाथेतून मी इंद्रायणीच्या डोहात बुडूनही जिवंत राहिले.
     मराठी भाषा ही केवळ संतांची नाही, ती वीरांची देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांच्या काळात 'राज्यव्यवहार कोश' तयार करून मराठीला प्रशासकीय दर्जा दिला. मराठी भाषेतूनच स्वराज्याची आज्ञापत्रे निघाली आणि याच भाषेतून शाहिरांनी पोवाड्यांद्वारे मर्दुमकी गाजवली. जेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापलं, तेव्हा त्यांच्या आज्ञापत्रांतून मी तलवारीसारखी तळपले.
 मी तीच आहे जिला सावरकरांनी 'सागरा प्राण तळमळला' म्हणत साद घातली. माझा इतिहास रक्ताने आणि त्यागाने लिहिलेला आहे. मी फक्त अक्षरांची जुळवाजुळव नाही.
      आपल्या घरातील पहिली अंगाई मराठीत असते, पाळणा मराठीत असतो आणि आयुष्याचे अंतिम सत्य सांगणारे अभंगही मराठीतच असतात. नात्यांमधील ओलावा आणि संस्कृतीची जपणूक करण्यासाठी मराठी ही सर्वात समर्थ भाषा आहे.
      मी आधुनिक साहित्याचा वारसा सुद्धा जपला आणि पुढे वाढविला. कुसुमाग्रजांची 'विशाखा', पु.ल. देशपांडे यांचे 'विनोद', व. पु. काळे यांची 'माणसं' , सावरकरांची 'अनादी मी अनंत मी' आणि गुरु ठाकूर यांची 'असे जगावे' सारखी अजरामर काव्ये... या सर्वांनी मराठीला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो.
     मी फक्त पुस्तकात नाही, तर तुमच्या रक्तामासात आहे.
मी कोकणातल्या मालवणीत 'येवा कोकण आपलोच असा' म्हणत तुमचं स्वागत करते. मी अहिराणी आणि खानदेशीत मातीचा गोडवा पेरते. मी पुणेरी भाषेत स्पष्टवक्तेपणा शिकवते, तर विदर्भी आणि मराठवाडी बोलीत जिव्हाळा जपते.      
       तुमच्या आयुष्यातला पहिला शब्द 'आई' मीच तुमच्या ओठांवर ठेवला होता ना? तुम्ही जेव्हा रडता, तेव्हा तुमच्या हुंदक्यांना मीच साथ दिली. तुम्ही जेव्हा हसता, तेव्हा तुमच्या सुखात मीच आनंदाची गाणी गायले. ज्ञानेश्वरांच्या ओवीत मी अमृतासारखी पाझरले आणि तुकोबांच्या अभंगात मी तुमच्या विठ्ठलाची पाऊलं पुजली. मी फक्त भाषा नाही रे, मी तुमच्या घराचा उंबरा आहे, तुमच्या संस्कृतीचा देह आहे.
     मित्रांनो, आज कधीकधी मला थोडं वाईट वाटतं. जेव्हा माझीच मुलं मला बोलायला लाजतात किंवा इंग्रजी शब्दांच्या ओझ्याखाली मला दाबून टाकतात, तेव्हा माझं मन दुखावतं. 'मराठी शाळा' कमी होताना पाहून डोळ्यांत पाणी येतं.
     आजची परिस्थिती पाहून माझं काळीज तीळ तीळ तुटतं.
तुमच्या घराघरातून मी हळूहळू हद्दपार होत आहे. इंग्रजीच्या झगमगाटात तुम्हाला माझ्या शब्दांचा 'गावंढळपणा' वाटू लागलाय का? तुमच्या कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या लेकराला जेव्हा 'मराठी' बोलताना अडखळताना पाहते, तेव्हा मला माझं अस्तित्व धोक्यात वाटतं. मला भिंतीवरच्या 'मराठी राजभाषा दिना'च्या पोस्टर्समध्ये कैद व्हायचं नाहीये.
          माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की मी कधीच कुणाशी स्पर्धा केली नाही. तुम्ही खुशाल जगभरच्या भाषा शिका, त्यातून ज्ञान मिळवा, पण स्वतःच्या 'आई'ला विसरून कसं चालेल?
मी तुमची ओळख आहे. मी तुमच्या संस्कृतीचा पाया आहे. जर उद्या मी नसेन, तर तुमची ओवी हरवेल, तुमचा अभंग मुका होईल आणि तुमचा पोवाडा शांत होईल.
     आज जेव्हा पाहते, तेव्हा मला माझंच घर परकं वाटू लागलंय.
तुमच्या टोलेजंग इमारतींमध्ये आणि इंग्रजीच्या झगमगाटात मला एखाद्या कोपऱ्यात बसवून ठेवलंय का? तुमच्या लहानग्यांच्या ओठांवर 'मम्मी- पप्पा' सहज येतात, पण त्यांना 'आई-बाबा' म्हणताना जीभ अडखळते, तेव्हा माझं काळीज तीळ तीळ तुटतं. माझ्याच महाराष्ट्रात मला अस्तित्व टिकवण्यासाठी 'लढा' द्यावा लागतोय, यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय?
       मला खात्री आहे, जोपर्यंत तुमच्या घरात 'आई' हा शब्द जिवंत आहे, जोपर्यंत तुम्ही 'विठ्ठल' नामाचा गजर करता आणि जोपर्यंत तुम्ही एकमेकांशी मनापासून संवाद साधता, तोपर्यंत मला मरण नाही. मी तर सदैव वाहणारी गंगा आहे; मी कालही होते, आजही आहे आणि उद्याही असेन!
फक्त एकच करा... 
मला केवळ अभिमानात ठेवू नका, तर तुमच्या वापरात ठेवा."
     मी अजूनही थकले नाहीये. मी नव्या युगाशी जुळवून घ्यायला तयार आहे. मी संगणकावर आहे, मी सोशल मीडियावर आहे. पण मला जिवंत ठेवण्यासाठी तुमची साथ हवी आहे.
"फक्त एकदा आरशात बघून स्वतःला विचारा— 
जर मी तुमच्या ओठांवरून पुसले गेले, तर तुमचं अस्तित्व काय उरेल?"
माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे .मला तुमच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने नकोत, किंवा मोठमोठे सोहळेही नकोत.
मला हवंय ते फक्त तुमच्या शब्दांतलं प्रेम.
मला हवंय ते तुमच्या पत्रातलं अक्षर.
मला हवी आहे ती तुमच्या स्वप्नांची भाषा.
     बाळांनो, तुम्ही जगभर फिरा, हव्या तितक्या भाषा शिका, पण घरी परतल्यावर माझ्या कुशीत शिरताना मला विसरू नका. कारण जगात कितीही उंचीवर गेलात, तरी तुमच्या दुःखाचा पहिला हुंदका आणि आनंदाची पहिली किंकाळी माझ्याच भाषेत असेल.
     मी तुमच्या आजीच्या ओवीत जिवंत आहे, मी तुमच्या आईच्या अंगाईत साठलेली आहे. मला फक्त पुस्तकातल्या पानांवर बंदिस्त करून ठेवू नका, तर तुमच्या मुलांच्या ओठांवर मला खेळू द्या.
"लक्षात ठेवा, तुम्ही मला विसरलात तर तुम्ही तुमची माती विसराल. आणि ज्याची नाळ मातीशी तुटते, तो माणूस जगात कुठेच सुखी होऊ शकत नाही."

थोडक्यात सांगायचे तर:

"ज्या मातीत रांगले शिवराय, 
ज्या हवेत गुंजले विठ्ठलाचे नाम
कितीही युगे उलटली तरीही, 
माझा बाणा सदैव राहील ठाम"

सौ. वर्षा प्रमोद चोपदार.
एम्. ए. बीएड शिक्षिका
पनवेल 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational