गमतीचे कॅलेंडर
गमतीचे कॅलेंडर
मित्रांनो! कसे आहात? मजेत ना? मला सांगा तुम्ही एखादी वस्तू नवीन घेतली तर काय करता? पहिल्यांदा खूप आनंदी होत असाल ना ? मग त्या वस्तूची पाहणी, तपासणी केली जाते. उदा. पुस्तक घेऊ या. नवीन पुस्तक हातात मिळाले की काही जण पुस्तकातील पानांचा सुगंध घेतात, तर काही पुस्तकातील प्रस्तावना, मनोगत वाचतात, अनुक्रमाणिका बघतात, तर अनुक्रमाणिका बघून एखादा घटक वाचून ते पुस्तक कसे आहे, त्याचा अंदाज घेतात.
प्रत्येक जण आपल्या आवडीनिवडीनुसार वस्तूंची खरेदी करत असतो. काही वस्तू आपल्याला भेटीच्या स्वरूपात मिळत असतात, पण एक अशी वस्तू आहे की जिची खरेदी न चुकता सगळ्यांनाच करावीच लागते असे काय नाही ओळखलंत! अहो! ही वस्तू पाहुण्यासारखी घरात येते, पण वर्षभर घरात ठिय्या मांडून बसते. पण वर्ष संपताच तिच्या जागी तशीच नवीन वस्तू येते बरोबर ते आहे कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका याचे
आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. वार, दिनांक, शके, मराठी महिने, इंग्रजी महिने, तिथी, दिनविशेष, शुभदिनांक, त्याज्य दिवस, सर्व प्रकारचे योग, सर्व प्रकारचे मुहूर्त, पाककृती, राशिभविष्य इ. प्रकारची माहिती आपल्याला यातून समजते. ३१ डिसेंबर २०१६ रोजी अचानक एक विचार मनात आला आणि काही व्यक्तींना एकच प्रश्न विचारून त्यांनी दिलेली उत्तरे संकलित करण्याचा छोटासा केलेला हा प्रयत्न. तो प्रश्न असा होता की, सर्वप्रथम नवीन वर्षाचे कॅलेंडर हाती पडले की तुम्ही काय करता? त्यावर वेगवेगळी गमतीदार उत्तरे मिळाली.
कामाला जाणारे त्यापैकी ज्यांना सुट्टी खूप आवडते ते पहिल्या सुट्टया बघतात. त्यात सण सुट्टीच्या दिवशी आले नाहीत नाही? हे तपासतात; कारण त्यांची एक सुट्टी कमी होते ना! मग उगाचच चूक चूक. काहीजण पूर्व वर्षाचे म्हणजे बारा महिन्यांतील स्वतःची असलेली राशी भविष्य वाचून काढतात, त्याची पण गंमत काय, तर शेवटून सुरुवात करतात. काही जण आपल्या वाढदिवसाचे वार बघतात. कामाच्या दिवशी असेल तर हिरमुसतात आणि सुट्टीच्या दिवशी आला की आधीच वाढदिवसाचे नियोजन करण्यास सुरुवात करतात. काही तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचे आणि खास मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस त्यांच्या तारखेला लिहून ठेवायला आवडेत. त्यांचे कारण विसर पडू नये आणि दुसरे म्हणजे सर्वात प्रथम आपणच शुभेच्छा देऊ हा त्या मागील असलेला उद्देश साध्य करावयाचा असतो, तर काही जण जुने कॅलेंडर समोर ठेवून मोठ्या उत्सवांच्या, सार्वजनिक मंडळाला दिलेल्या देणग्यांचा हिशोब लिहून 'ठेवतात, जेणेकरून या वर्षी कितीने देणगी वाढली यांचा अभ्यासच करतात. विवाह न जमलेले पण मुलगी/मुलगा बघायला जाणारे शुभ/अशुभ दिवस बघतात, तर पसंती . झाली असता विवाह मुहूर्त बघतात. खाण्याची आवड असलेले पाककृती बघतात आणि तसे बनवण्याचा जणू काही त्याच दिवशी संकल्प करतात. गावी जाण्याची आवड असणारे गावची यात्रा कधी आहे हे बघतात. गणेशोत्सव, दिवाळी यांच्या तारखांचा अंदाज घेतात. पूजा-अर्चा, व्रत वैकल्ये जपणारे पूजेची तयारी, स्वरूप इ.ची माहिती वाचतात. महिनावर दुधाच्या बिलाची नोंद कॅलेंडरवर केली जाते. दूध, पेपर कोणत्या दिवशी आला नाही याची नोंद केली जाते आणि महिन्याच्या शेवटी हिशोब केला जातो. या नोंदी कॅलेंडरवरच का केल्या जातात, तर त्या कधीही हरवत नाहीत आणि महिनावार हिशोबाचा ताळमेळही बसतो. या कॅलेंडरचा एक खास मित्र आहे. कोणता? पेन. अहो, कॅलेंडर व पेनचा खूप घनिष्ठ संबंध आहे. त्याच्यावर सर्व नोंदी पेनानेच केल्या जातात ना.
अशा अनेक व्यक्तींमधून एका व्यक्तीने तर अजबच सांगितले की, आपण कॅलेंडर बनविणाऱ्या व्यक्तींना जाऊन भेटले पाहिजे. आपल्या सोयीनुसार दिनविशेष/सण या सुट्टया शनिवार-रविवारला जोडून घेऊन त्याचे नियोजन करावे. जेणेकरून सलग दिवस सुट्टीचा आनंद लुटता येईल. खरंच असे झाले तर किती मज्जाच मजा...
जर तसे होत नसेल तर वैयक्तिक आपण जेथे काम करतो त्या सर्वांच्या मदतीने कॅलेंडरमध्ये सुट्ट्यांचे नियोजन केले पाहिजे. शिक्षक तर शैक्षणिक माहितीसाठी याचा वापर करतात. काय पटतंय ना! अशा अनेक गमती-जमती घडत असतात. . आपले नवीन वर्ष चैत्र या मराठी महिन्यानुसार चालू होत असले तरी हे कॅलेंडर मात्र इंग्रजी महिना जानेवारीपासूनच चालू होते आणि आपली धावपळसुद्धा....
चला नवीन वर्ष सुरू झाले रे.... कॅलेंडर बघून विविध नियोजन करू या रे !
