कौतुक
कौतुक


विषय - कौतुक
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ----
खूप दिवसानंतर कुसुमाग्रज यांच्या या कवितेची आठवण झाली त्याला कारण देखील साजेसे होते, ते कारण म्हणजे कौतुक. कौतुक म्हणजे प्रशंसा, केलेल्या कामाची पोहोच पावती.
कौतुक करणे, हे फार मोठे काम झाले आहे कारण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार कौतुक करावयाचे असल्यास 'हात आखडता घेणे ' या वाक्प्रचाराची पुनरावृत्ती होते. कौतुक केले तर ती आपल्याला डोक्यावर बसेल की काय? अशी शंका या महान व्यक्तींना होत असावी. पण जो काम करतो, त्याला फक्त 'चार कौतुकाच्या शब्दांची' गरज असते. कौतुकास्पद शब्दांनी प्रोत्साहन मिळत असते. याबाबत अधिक माहिती 'ताराबाई शिंदे' यांच्या 'स्त्री -पुरुष तुलना' या पुस्तकातून आपल्याला मिळतेच.
' निंदकाचे घर असावे शेजारी' या उक्तीप्रमाणे चांगल्यातील वाईट गुण लोक लगेच शोधतात .वाईट गुणच निदर्शनास येतात.
'कौतुक ' ही अशी गोष्ट आहे की ते करायला फार मोठे मन लागते .एक उदाहरण पाहूया, एखादे गाणे सुरू असताना गायकांनी एखादी घेतलेली गाण्यातील जागा, हरकत हे ऐकून वा खूपच छान! किंवा लय भारी !अशी उत्स्फूर्त निघालेली दाद कधीही प्रशंसनीय असते. हे काय कोणीही करेल--- किंवा मी त्याचे कौतुक करू की नको असे विचार करणारे, समोरच्याला तोंडावर छान- छान बोलणारे सुद्धा भाऊगर्दीत ओळखले जातात.
एकच प्रसंग असला तरी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाचा कौतुकाविषयीचा अनुभव वेगळा असतो. हेच बघाना ,एक पुस्तक प्रकाशित झाले आणि प्रथम घरापासून सुरुवात झाली मुलांनी आईची खूप प्रशंसा केली तर नवऱ्याने ठीक आहे, तुझी इच्छा होती, पुस्तक प्रकाशित झाले. आता पुरे. काहींनी पुस्तक वाचून त्या विषयी चर्चा केली आणि आपले अभिप्राय दिले, तर काहींनी कौतुकही केले , ते असे - त्यांच्या घरी काय कामाला बाई असेल . मग काय ? त्यांना वेळच वेळ म्हणूनच त्या लिखाण करू शकल्या. पण या महान व्यक्तींना कुठे माहित आहे, त्यांच्या घरची परिस्थिती ? किंवा 'आवड असेल तर सवड मिळतेच' हा मंत्र लेखिकेने स्वीकारला असेल ,याची पुसटशीदेखील कल्पना त्यांना नसेल.
'कौतुक' पूर्वग्रहदूषित किंवा स्वार्थी नसावे. कौतुक करणाऱ्यांनी भरभरून कौतुक करावे,अगदी शत्रूचे सुद्धा----- काम केल्याशिवाय चुका होत नाहीत, यश-अपयश येत नाही आणि माणसाची प्रगती देखील होत नाही. एखादा माणूस प्रयत्न करत आपली ध्येयपूर्ती करत असेल ,तर खरचं भरभरून कौतुक करा ,त्याला प्रोत्साहन द्या. तुमच्या कौतुकामुळे त्यांना नवी उमेद मिळणार आहे किंवा त्यांची प्रगती होणार आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी वाढणार आहे. तुमच्या कौतुकामुळे तो अधिक जबाबदारीने वागणार आहे.
'कौतुक', 'प्रशंसा' दुसरे तिसरे काही नसून एक "सकारात्मक दृष्टिकोन' आहे. तुम्ही योग्यप्रकारे कौतुक कराल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला आनंदित पहाल. अशी मला खात्री आहे.
शेवटी मी एवढंच म्हणेन ----'
कौतुक करताना नको कंजुषपणा
भरभरून, नि: स्वार्थी करावे
कौतुकाचा करूनी परीसस्पर्श
आयुष्यच बदलून टाकावे