डॅा. सु. दि. बगाडे

Comedy

4.0  

डॅा. सु. दि. बगाडे

Comedy

मी चोर पकडतो त्याची गोष्ट

मी चोर पकडतो त्याची गोष्ट

4 mins
229


    पाकिट मारणे, खिसा कापणे किंवा किरकोळ चोरी होण , ही प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा तरी घडणारी गोष्ट आहे. वस्तू कितीही किरकोळ असली तरी चोरी झाली की, आपण बेचैन होतो, चोराला लाखोली वाहतो. वस्तू हरविली तर हळहळ वाटते पण ती थोडीफार! पण चोरीचं शल्य खूप काळ मनात राहत. चोरी झाल्यावर पोलिस तक्रार करून फारसा उपयोग होत नाही व मुद्देमाल कधीही सापडत नाही, चोर सापडण तर अशक्यच्या जवळचच असत. चोर समोर दिसला तरी तो शिताफीने पळून जातो किंवा दांडगा असला तर हाताशी पण लागत नाही. चौसष्ठ कलांपैकी एक कला चौर्यकर्म आहे. भुरटे चोर तर हातकी सफाई चांगलीच दाखवतात. हाॅस्टेलवर रहाणाऱ्यांना तर याचा नेहमी अनुभव येत असतो. साबण, पेस्ट सारख्या किरकोळ गोष्टीपासून ते घड्याळ, पैसे , कपडे व इतर मौल्यवान गोष्टी चोरीला जाणे व तो चोर न सापडणे हे तर नेहमीच झाल होत. आमच बीजेच हाॅस्टेल पण याला अपवाद नव्हत.चोर सापडत नव्हता. कदाचित एकच चोर नसावा, वेगवेगळे असावेत. सतत होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांनी आम्ही हाॅस्टेलवासी वैतागलो होतो. 


    त्या दिवशी हाॅस्टेल डे साजरा झाला होता. धमाल व मजा करून सर्वजण झोपी गेले होते. मी त्यावेळी ए ब्लॅाकवर रहात होतो. माझे पार्टनर टकले व शेंडे होते. दोघेही आपआपल्या गावी गेले होते. मी खोलीत एकटाच होतो. त्यावेळी मी पाप्याच पितर अस म्हणता येईल इतका तब्येतीने किरकोळ होतो. वजन अवघे ४५ किलो. सांगण्याच कारण माझी शारिरीक क्षमता किती होती, याचा अंदाज येण्यासाठी. मध्यरात्रीचे वेळी दारावर थाप आली, मी गाढ झोपेतून उठून दारं उघडल. माझा रूम पार्टनर टकलेचा मित्र दारात उभा होता . मी त्याला ओळखत होतो . तो नेहमी येत असे. दार उघडून त्याला आत घेतला व मी झोपी गेलो. माझी झोप तशी सावध असायची. खुडबुडीने मला जाग आली. मी उठून टेबल लॅम्प लावला. एक हात गजराच्या घड्याळावर मला दिसत होता. मला वाटल टकलेच्या मित्राला किती वाजले आहेत? हे पहायच असेल. मी आता जागा झालो होतो. ‘ काय हवय ? किती वाजलेत ते बघायचंय का?’ अस म्हणत मी कुशीवरून वळलो. वेगळा चेहरा दिसल्याने मी आता खाडकन जागा झालो. मी ताड्कन उठून बसलो व म्हणालो, ‘ कोण आपण? चोर दिसताय वाटत? ‘ मी पटकन काॅटवरून खाली उतरलो. ‘ अरे चोराऽ चोरी करायला आलास काय? मुकाटयाने इथ बस!’ मी जोरात चोरावर ओरडलो.


चोर संमोहन केल्यासारखा काॅटवर बसला. आमचा गेस्ट म्हणजे टकलेचा मित्र आवाजाने उठून बसला होता. रात्री याच्यासाठी दार उघडल्यावर ते मी बंद केल नव्हत , तर आमचा गेस्ट सुद्धा दार न लावता झोपी गेला होता. मला कसलच भान नव्हत. मी पटकन खोलीच्या बाहेर पळालो. बाहेरून कडी लावली व ‘चोर चोर ‘ अशी जोरात बोंब ठोकत बाजूच्या काही खोल्यांवर थाप मारली. बरेच जण बाहेर आले व विचारू लागले की, कुठ आहे चोर?मी कडी उघडत चोराकडे बोट दाखवले. त्याला मारत मारत बाहेर काढला. एव्हाना आमचा गेस्ट पण टकटकीत जागा झाला होता. त्याने पण हात धुवून घेतला. अख्खा मजला जागा झाला होता व त्या चोराला लाथा बुक्क्यांनी बदडण चालल होत. ‘ बगाडेऽ अरेऽ हाण की, त्याला! ‘ मी आजपर्यंत आयुष्यात कोणालाही मारल नव्हत. लहानपणीसुद्धा धाकट्या भावाकडूनपण मार खात असे. धाडस करून मी एक फटका मारला, तर माझ्याच हाताला झिणझिण्या आल्या. आतापर्यंत सगळा ब्लाॅक जागा झाला होता. प्रत्येकजण हात धुवून घेत होता.


तितक्यात बाहेरगावी गेलेला माझा पार्टनर टकले आला. त्याला हकिकत कळली. बॅग तशीच बाजूला ठेऊन त्यानेही चोराची धुलाई सुरू केली. चोराकडे काही मुद्देमाल सापडला होता. आमच्या हाॅस्टेलवरची ही त्याची पहिलीच चोरी होती.पण इथ येण्यापूर्वी आमच्या जवळ असणाऱ्या संत ज्ञानेश्र्वर हाॅस्टेलमधे त्याने हात साफ केला होता. चोराच तोंड सुजल होत, काळनिळ झाल होत. कोणाला तरी दया आली. चला, त्याला ससूनमधे घेऊन जाऊ व मलमपट्टी करू. काहीजण त्याला घेऊन गेले, अर्थात बडवत , बडवतच! नंतर मी ऐकल की, वाटेत संत ज्ञानेश्र्वर मधील मुल , त्यांना बातमी कळल्याने ,त्याचा समाचार घ्यायला आली होती. त्यांनी कसा समाचार घेतला?हे वेगळ सांगायला नको. ससूनमधे मलमपट्टी करून औषधोपचार करून त्याला सोडून दिल. सी.एम.ओ. आमचा व तिथले पोलिसही आमचे. Alleged history of fall म्हणजे पडला असे पेशंटने सांगितले. किस्सा मग संपतोच.


इकडे मग मी चोर कसा पकडला? याची चर्चा. मी चोराला, ‘आपण चोर आहात वाटत, इथ बसा,’ अस म्हणालो व चोर खरच बसला हे ऐकून सगळे इतके हसत होते की, बस्स! तशात आमच्या गेस्टलापण मी आत न कळत कोंडल होत. चोराने त्याला काही केल नाही हे नशीबच. मी मात्र त्याला सारख साॅरी म्हणत होतो. मलाही आता आश्चर्य वाटत होत की, चोर बस म्हणाल्यावर बसला कसा? माझ्या अंगात जोर नव्हता तरी केवळ चतुराईच्या जोरावर चोर पकडला गेला होता. काहीजण म्हणत होते की, ही घटना हाॅस्टेल डे अगोदर झाली असती तर त्या दिवशी बगाडेचा सत्कार केला असता. हे ऐकल्यावर माझ्या काटकुळ्या दंडावर बेडकी फुगल्यासारख वाटल! त्यानंतर मात्र बरेच महिने आमच्या हाॅस्टेलवर चोरी झाली नाही.


Rate this content
Log in

More marathi story from डॅा. सु. दि. बगाडे

Similar marathi story from Comedy