माय व्हॅलेंटाईन
माय व्हॅलेंटाईन
दुर्गाला नेहमीचीच गर्दी असते म्हणून मी कायम हर्षला बसतो. आजही हर्षला बसलो होतो. एकटाच. ह्या दारूने ‘बसणे’ हा शब्द इतका बाटवून ठेवला आहे की जिथे जिथे मग बसण्याची गोष्ट येते तिथे तिथे लोकांचे दारूवरून गैरसमज हे होतातच!
आता बसणे या शब्दाची काही मक्तेदारी वगैरे दारूने घेतली आहे अशातला भाग मला तरी तूर्तास वाटत नाही. जेवायला बसणे, गाडीवर बसणे, घोड्यावर बसणे अशा नानाविध गोष्टींचा बसण्याशी संबंध येतोच की नाही? मग अजून खाजगीत घुसायचं म्हटलं तर माणूस सांडासला देखील बसतोच की हो! पण गंमत बघा जेवढा संडासने हा बसने शब्द मैलावला नाही तेवढा त्या दारूने-
वाचणारे काहीजण मनात दुर्गा वाईन्स आणि हर्ष बियर बार असंच काहीसं चित्र रंगवत असतील; पण त्यात अजून रंग भरायच्या आधीच मी सांगतो की हर्षला कॉफी प्यायला बसलोय मी. हे काही कोथरूडकरांना सांगण्याची आवश्यकता नाही आणि पुणेकरांनादेखील नाही, हेही मी गृहीत धरतो.
खरंतर हल्ली एकट्याने असं कॉफी पित वेळ काढणं मलाही नकोसं झालं आहे. आता ना कॉलेजचं फ्रेंड सर्कल होतं ना.. ना ऑफिसचं. बरोबरचे सगळे साले, कुणाला ना कुणाला साले बनवून आता लाले खेळवत बसले होते. मीच बसलो होतो त्या घट्ट कोल्ड कॉफीत स्ट्रॉ टाकून फुरके ओढीत आणि आजूबाजूची हिरवळ न्याहाळीत.
नेहमी डोळ्यांना सुखावह वाटणारी ती हिरवळ व्हॅलेंटाईन वीकमध्ये तर अजूनच जास्त तीव्रतेने नजरेस पडते. मी तर म्हणेल की माझ्यासारख्या सिंगल माणसाच्या नजरेस ती अशी काही पडते की डोळेच शेवटी शेवटी नको म्हणतात; पण त्या हिरवळीमुळे मिळणारा गारवा काही आपल्या नशिबी नाही.
तरीही हातातील ग्लासमधून कॉफी ओढताना मी जमेल तितकं नेत्रसुख घेतच होतो. आता मला काही गर्लफ्रेंड नाही अशातला भाग नाही काही. म्हणजे नाहीच अजून; पण होईल असं वाटतंय. आज रोज डे आहे ना. हे काय खिशातच घेऊन बसलोय हे लालभडक गुलाब, तिची वाट पाहत.
आज भेटते म्हणालेली ती. कॉफीला. चार वाजता; पण आता वाजतायत पाच आणि तिचा काहीच पत्ता नाही अजून. ना फोन ना मेसेज. मी करावा का? नको. ते खूप उतावीळपणाचं वाटेल.
मग करायचं काय आता? हिरवळच सारखी का पाहायची? इतक्यावेळ पाहण्याने आता आपल्यालाच कसेसे वाटतंय. भुकेल्यागत. पण.. पण माझ्या मनात काही वाईट नाहीये बरं. पण, काही अंतरावर बसलेल्या त्या दोन मुली मला असं काही पाहतायत की मला वाटतंय की त्यांच्याच मनात काहीतरी आहे.
हल्ली माझी नजर वाईट झालीय का? इतकं आपण मुलींना पाहतो? खरंच आपल्याकडे स्त्रीप्रेमाचा एवढा दुष्काळ आहे की कुणीही आपली नजर पाहून आपल्याला हवस के पुजारी म्हणेल? नसेल कदाचित. नाहीतर त्या दिवशी नवीन ऑफिसातली ती एचआर म्हणाली नसती की माझे डोळे खूप बोलके आहेत म्हणून!
मघाशी इथे आलेल्या त्या मुलीचे देखील डोळे किती बोलके वाटलेले मला. असेच त्या एचआरला माझे वाटले असतील, नाही? हर्षच्या त्या लोखंडी पायऱ्या उतरताना आपली आणि तिची नजरानजर झालेली तेव्हा मला हृदयात आत खोलवर काहीतरी जाणवलेलं; पण काही क्षणासाठीच. अगदी काही क्षणासाठीच! तसेही आपण तर आपल्यावालीची वाट पाहत होतो.
आता रस्त्यावर वाहनांची वर्दळ काहीशी वाढलेली जाणवतेय मला आणि जाणवतोय वेळ, हळू हळू निघून चाललेला. हिरवळ बिरवळ बाजूला सारून मी मात्र मग वाहनांची ये जा पाहत राहिलो. निळाशार कधीकधी काळपट धूर सोडणाऱ्या त्या गाड्या मला सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा काही कमी वाटल्या नाहीत. दोन्हींची इंजिने उघडून पाहिली की हाती सारा काळा चिकट स्राव लागेल. भयानक वाटतं मला हे सारं.
त्यातल्या त्यात त्या पीएमट्या, हिरव्या-निळ्या. मला तर त्या कायम हिरव्या पानाला पोखरणाऱ्या आळ्याच भासल्यात. धावतानाही त्या, त्या आळ्यासारख्या वाकड्या तिकड्याच धावणार. हे सारं पाहताना मी काही नोंदी ठेवल्या मनात. जसे की, मागील एका मिनिटात दोन पीएमट्या, दोनशे दोन दुचाक्या आणि एकशे सहा चारचाक्या माझ्या डोळ्यांसामोरून निघून गेल्या. मी पादचारी मोजले नाहीत.
दोनशे दोन दुचक्यांपैकी स्कूट्या बीट्या पकडून एकशे वीस का काहीतरी हिरोच्या होत्या बाकी मोजण्यात अडचण आली; पण चारचाकींत मात्र हुंदई आणि मारुतीच्याच गाड्या जास्त होत्या. टाटाच्या पण होत्या. मग मी विचार करू लागलो. साधारणपणे २०१५ साली इथे बसलो असता आपल्याला एका मिनिटात खच्चून सव्वाशेक दुचाक्या आणि..फारतर साठेक चारचाक्या दिसल्या होत्या. तेव्हाही हिरो, मारुतीच. आणि आता-
केवढी ही वाढ, केवढी भयानकता, केवढी धावपळ, केवढा एकटेपणा. जगाच्या विचाराने मी काहीसा शून्यात हरवलो. एक मोठा श्वास घेऊन काहीसा सावरलो. हॉलीवूडच्या चित्रपटांत जग वाचवणारे नट असतात तसाच म्हणा हवं तर. पटकन खिशातून मोबाइल बाहेर काढला. व्हॉटस अॅप उघडलं. तिचा कसलाच मेसेज नव्हता. मग मी मोबाइल परत खिशात घातला आणि आजूबाजूला पाहू लागलो.
हर्षच्या त्या खुज्या फायकसच्या झुडुपाआड ती.. मघाची मुलगी बसली होती. एकटीच. हातात एक कुस्करलेलं गुलाब घेऊन. मी आता बाजूचा सारा गोंगाट विसरून तिलाच पाहत होतो. मघाच्या तिच्या त्या डोळ्यांत आता अश्रु होते. ती रडत नव्हती; पण दु:खी होती. का कुणास ठाऊक, ती दु:खी मुलगी मला छान नाही वाटली. मग मी विचार केला, ती रडत असती तर किती छान भासली असती.?
एव्हाना माझ्या हातातील कोल्ड कॉफीचा ग्लास रिकामा झाला होता आणि त्यावर माशा घोंगावू पाहत होत्या. त्यातल्या काही नर होत्या आणि काही माद्या. कॉफीच्या गोडीला आकर्षित झालेल्या आणि काही एकमेकांना. या पृथ्वीतलावर हे नर मादीचं आकर्षण कायमच अबाधित राहणार.
सहा वाजले होते. तिचा अजूनदेखील पत्ता नव्हता. मी हातातील ग्लास ठेवण्यासाठी जागचा उठलो. नजर त्या मुलीवर गेली. आता तिने कुस्करलेल्या गुलाबाची मूठ सावकाश उघडली आणि ते गुलाब बिचारं तिच्या पायांत पडलं. मला वाईट वाटलं. त्या गुलाबाला देखील वाटलं असावं. म्हणालं असेल, जर कुस्करून टाकणंच नशिबी होतं तर देवा उमलवायचंच कशाला मला? त्याचं माहीत नाही; पण मी मात्र तसं म्हणालो.
मी वाकून तिच्या पायांतलं ते गुलाब उचललं आणि जाऊन ग्लास ठेवला.
“एक्सक्यूज मी, हॅलो?” मागून एक गोड आवाज कानी पडला. मला माहीत होतं तीच असणार म्हणून मी काही पलटलो नाही. उलट काउंटरवर अजून दोन कोल्ड कॉफीचे पैसे देऊन तेथील पोराच्या कानात ‘मी इशारा करेल तेव्हा’ असे म्हणत मग मागे वळलो.
“एक्सक्यूज मी, तुलाच बोलतेय मी.” ती म्हणाली.
“एक्सक्यूज यू फॉर व्हॉट?” मी म्हणालो.
“ते गुलाबाचं फूल माझं आहे.”
“तू ते कुस्करून खाली टाकलं तेव्हा तुझा आणि त्याचा संबंध
संपला. आता हे माझं आहे.”
“संबंध संपला सांगायचा तुझा काय संबंध?”
“संबंध आहे ना.” मी स्टूल ओढून तिच्या पुढ्यात बसलो. अशा अनोळखी मुलीसोबत असं बसणं योग्य होतं का? तितक्यात तिथे मी जीची वाट पाहत होतो तीच आली तर? पण मी असले सगळे विचार फाट्यावर मारले आणि बोललो, “तू मला ओळखतेस.”
“मी तर पहिल्यांदा पाहतेय तुला.” ती कपाळावर आट्या पाडीत म्हणाली.
“नाही, आपली मघाशी नजरानजर झालेली की. तीच माझी ओळख.”
“नुसत्या नजरानजरेने काही ओळख होते?” असे विचारत तिने माझ्या नजरेस नजर मिळवली. मी तर आधीच तिला माझ्या नजरेत कैद केलेलं आणि आता तिने मला.
“एका फॉरेन रिसर्चनुसार पाच सेकंदाच्या आय कॉन्टॅक्ट मध्ये साधारणपणे एक टेराबाइट डाटाची देवाणघेवाण होते.”
“नाईस फ्लर्टींग.” ती बोलली. ती नॉर्मल होताना दिसते असं पाहून मी मग काउंटरकडे हात करीत इशारा केला. त्याने दोन ग्लास कोल्ड कॉफी बनवली. मी मग उठून ती घेऊन आलो. तिने संकोचल्यागत एक ग्लास घेतला.
मी पाहिलं, ग्लास उचलातच ती काहीशी भावनिक झाली. खाली मान घालून ती पुन्हा रडत असावी बहुतेक. मला थोडं टेंशन आलं. कारण आजूबाजूचे पाहणारे काहीच्या काही अर्थ लावत असतील असं मला वाटलं.
तिने तिचा मोबाइल काढला पर्समधून आणि एक मेसेज उघडून मला दाखवला.
मी येऊ शकणार नाही.
आज रोज डे आहे.
पूजाने मला भेटायला बोलावलं आहे.
SORRY!!
आपण नंतर भेटू.
असा एकंदरीत तो मेसेज होता. कुण्या संदीपणे पाठवला होता. मला देखील पोरींची कधीकधी कमाल वाटते. त्यांना जो भाव देतोय त्यांना या भाव बनवतात आणि जो भाव नाही देत त्यांच्यासाठी मग या अश्रु गाळीत बसतात.
तिने आपल्या मोबाईलमधले मेसेज मला दाखवलेलं मला काही पटलं नाही. अगदीच पटलं नाही अशातला भाग नव्हता; पण पटलं नाही एवढंच. चार घटकेपूर्वी ओळख झालेल्या माणसाला कोण असं दाखवतं का? मग तिला का बरं दाखवू वाटलं असावं? माझे डोळे बोलके आहेत म्हणून कदाचित? पण मग ते तर माझी एचआर पण म्हणाली होती. तशी माझी एचआर देखील छानच होती दिसायला. बस्स छान होती एवढंच.
तिने मग माझ्या हातातून आपला मोबाइल घेतला आणि कुणालातरी कॉल लावला. ‘अगं आरू, तो आलाच नाही बघ आज.. नाही ना.. कॉल कसला साधा मेसेज केलाय त्याने.. किती मीन असतात ना गं मुलं.. जाऊ दे.. माझंच नशीब.’ असं काहीबाई बोलून फोन ठेवून दिला आणि ओंजळीत तोंड घेऊन, मांडीवर डोके टेकवून ती हमसू लागली.
मला काय करावं काहीच सुचेना. मी मग विचारलं, “आर यू ऑलराईट?” ती मात्र तशीच. तोंड घालून. मी परत म्हणालो, “एव्रिथिंग विल बी ऑलराईट.” ती पुन्हा तशीच. मी मग म्हणालो, “ऑल ईज वेल.” आताही ती तशीच. मी आता विचारात पडलो. अशी बसल्या बसल्या कुणी आत्महत्या करू शकतं का? पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीवरून तिनं आत्महत्या करावी हे मला काही पटलं नाही.
आणि तसंही ही पोरगी काही असे करेल असं मलाही वाटत नव्हतं. एवढ्या सुंदर डोळ्याच्या मुलीने असलं काही करूच नये. कुठल्याच मुलीने करू नये. मी तर म्हणेल की एखाद्याने आत्महत्या करायची झाली तर मात्र हिच्या डोळ्यांत करावी. एक प्रचंड खोल, बोलका आणि तितकाच लोभस आहे हा डोह. जणू की करणाऱ्याला परत परत आत्महत्या करावी असे वाटणारे आहेत हिचे डोळे.
ती आता उठली. ग्लास माझ्या हातात दिला. पर्समधून टिशू पेपर काढून नाक-डोळे पुसले. नाकाचा लाल शेंडा माझं लक्ष वेधून घेत होता. मला त्याला स्पर्श करायची इच्छा झाली. मी म्हटलं तिला विचारावं का; पण नाकाला स्पर्श करू हे कसं विचारायचं?
“पीएमट्या पाहून तुला काय वाटतं?” खूप वेळची त्या रस्त्याकडे पाहत असणाऱ्या तिने मला विचारलं. माझ्या मनात मघाच्या आळ्या आल्या; पण मी तिला असं कसं सांगू? मी म्हणालो, “प्रेमिका वाटतात मला.” ती म्हणाली, “कशा?”
आता मी हे काही ठरवून म्हणालो नव्हतो. पण म्हणालो तर होतो. हिला काहीतरी सांगावं म्हणूण मग मी बोलू लागलो, “रोज शेकडो प्रवासी घेऊन जातात या. पण सगळेच काही रोजचे नसतात. पण जे काही एक-दोन रोजचे प्रवाशी असतात त्यांना त्या कधीच धोका देत नाहीत. अगदी वेळेवर स्टॉपला येतात.” कदाचित मी जिची वाट पाहत होतो ती अजूनदेखील आली नसल्यामुळे असेल मी असं बोलून गेलो होतो.
मग ती बोलू लागली. मला तर या आळ्या वाटतात आळ्या. रंग पाहिलेस यांचे. पाने कुरतडणाऱ्या असतात ना हिरव्या आळ्या तशाच वाटतात मला या. तिच्या अशा बोलण्याने मी मात्र माझे डोळे बटाट्यागत करत तिला पाहत होतो. असं कुणी कुणाच्या मनातलं जाणतं का? मी विचार करू लागलो.
“या मेट्रोच्या ब्रिजकडे पाहून तुला काय वाटतं?” तिने मला परत विचारलं. मी म्हणालो, “खूपच उंच आहेत असं वाटतं.” ती म्हणाली, “नाही.” मी म्हणालो, “मग?” मग ती म्हणाली, “मला माहीत नाही. मी असंच विचारलेलं.”
माझा मेसेज वाजला. मी मोबाइल पाहिला. तिचा मेसेज होता. अवनीचा. लिहिलं होतं-
सॉरी, आज नाही भेटता येत.
माझे काही प्लॅन्स आहेत. नंतर भेटूया.
शेवटी एक स्माइली पाठवली होती. ती पाहून मी उदास झालो. मला डोळ्यांत पाणी दाटल्यासारखं जाणवलं. सात वाजत आले होते. मी चार वाजल्यापासून बसून होतो. दोनवेळा कॉफी घेऊन झालेली. एक अनोळखी मुलगी भेटलेली...
“काय झालं?” तिने विचारलं. मी मग तो मेसेज तिला दाखवला. मला वाटलं मांडीत डोके घालून काही क्षण राहावं का? नको. ते योग्य दिसणार नाही.
आमच्यात काही काळासाठी शांतता होती. गाड्यांचा आवाज, लोकांचा गोंगाट, पों पों, पी पी, टी टी सगळे आवाज. मग मीच खिशातलं ते गुलाब सावकाश बाहेर काढलं. त्याच्याकडे पाहिलं. वाटलं कुस्करून टाकावं. टाकणारही होतो. तितक्यात तिच्या हातांनी अडवलं. तिने ते माझ्या हातातून घेतलं. तीही त्याला पाहत राहिली. मला वाटलं कुस्करण्याचा अनुभव तिला जास्त. तीच कुस्करेल; पण ती एकटक त्याच्याकडे पाहत राहिली.
मी जाण्यासाठी उठलो. तिला म्हणालो देखील. ती म्हणाली, “तू जा.” मग मी लोखंडी पायऱ्या चढून वरती आलो. किती सैरभर वाहने जात होती. पाहणाऱ्यालाही सैरभर करीत होती. मी परत फिरलो. खाली आलो. ती तशीच बसलेली. मी मग तिच्या पुढ्यात बसलो.
मी तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिनेही माझ्या डोळ्यांत पाहिलं. पहिल्या नजरानजरेत जी भावना उमटली तीच आता देखील उमटली.
तिने हाताने इशारा करत दोन कॉफीची ऑर्डर दिली आणि गुलाबाचं फूल माझ्या समोर धरून मला म्हणाली, “विल यू बी माय व्हॅलेंटाईन?”