Sangamsingh Shivaji Kadam

Fantasy Others

3  

Sangamsingh Shivaji Kadam

Fantasy Others

बॅरिस्टर

बॅरिस्टर

6 mins
292


     हाताच्या दोन बोटांच्या मधून पचाकदिशी तोंडातील तंबाखूची गढूळ पिचकारी मारून, थोडासा भीतीने कावराबावरा होऊनच सर्जेराव आटपाडी पोलीस स्टेशनात घुसला. पायांत पन्हे तुटलेली चामड्याची काळी चप्पल, गुडघ्यापर्यंत लोंबणारे मळकट धोतर, तेवढीच मळकट असलेली बंडी आणि त्या बंडीपेक्षाही मळकट होता तो पोटावर असेलेला बंडीचाच खिसा! पान, कात, तंबाखु, चुना अशा त्याच्या निरनिराळ्या सवयींमुळे बंडीचा तो खिसा जरा जास्त वापरात आला असावा कदाचित. शिवाय काखेत वायरची पिशवी आणि डोक्याला तांबड्या फडक्याचे मुंडासे कसेतरीच गुंडाळलेल्या अवस्थेत, पायातील चप्पलांचा खड्क खड्क आवाज करत तो स्टेशनाच्या दगडी पायऱ्या चढून व्हरांड्यातून परत खड्क खड्क आवाज करत आत सरळ घुसला आणि थेट देशमुख फौजदाराच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिला.

     "खम्प्लेट नोंदवायची हाय खम्प्लेट आपल्याला." तोंडात असलेल्या तंबाखूसकट तो बोलला. देशमुख फौजदार त्याच्या कामांत व्यस्त होता. त्यामुळे काही क्षण तो काहीच बोलला नाही. खाली मान घालून तो आपली कामे करत होता. सर्जेरावही काही क्षण तसाच तोंडात तंबाखू पकडून काखेतील पिशवीसहित त्यांच्यासमोर उभा होता. काही कागदांवर सह्या करून देशमुख फौजदाराने आपल्या समोरची फाईल बंद करून दिली आणि वरती पाहून सर्जेरावाकडे पाहत विचारले, "हं काय म्हणाला?"

     "खम्प्लेट नोंदवायची हाय."

     "ठीकाय." असे म्हणून त्यांने साळुंखे हवालदाराला हाक मारली, "साळुंखे, ह्याची काय तक्रार आहे ती मिटव जरा."

     "ये, यि हिकडं." साळुंखे हवालदार हातानेच त्याच्या टेबलाकडे येण्याचा इशारा करत म्हणाला.

     सर्जेराव पुन्हा चप्पलांचा आवाज करत साळुंखेच्या टेबलाजवळ आला. साळुंखे हवालदाराने पुन्हा हातानेच इशारा करत त्याला समोरील खुर्चीत बसण्यास सांगितले. काखेतील वायरची पिशवी हातात घेऊन सर्जेराव खुर्चीत बसला. हवालदाराने शेजारील कम्प्लेंट रजिस्टर उघडले आणि टेबलावर पडलेली पेन्सिल घेऊन तो म्हणाला, "हं... कसली कम्प्लेंट हाय?"

     "बॅरिस्टर हरवलाय माझा."

     "ठीकाय, नाव काय?"

     "बॅरिस्टर."

     "च्यायला, तुझं बी नाव बॅरिस्टर?"

     "नाय, माझं नाव बॅरिस्टर नाय."

     "मग काय हाय?"

     "सर्जेराव."

     "मग बॅरिस्टर कुणाचं नाव हाय?"

     "आवं हरवलेल्याचंच नाव हाय बॅरिस्टर."

     "हं, बॅरिस्टर हरवलाय. मग सर्जेराव कुठं हरवलाय?"

     "आवं हवालदार साहेब, सर्जेराव कुठं हरवला नाय. मीच सर्जेराव हाय अन माझा बॅरिस्टर हरवलाय, बॅरिस्टर." सर्जेराव अजून एखादं वाक्य पुढे बोलला असता तर तोंडातील तंबाखूच्या थुंकीने साळुंखे हवालदाराचा अक्खा टेबल रंगून गेला असता.

     "मग ही आधीच नाय का बोलायचं? उगाच शेंबडात माशी गुंडाळल्यागत लांबड लावल्याय." हवालदार जरा चिडूनच बोलला. सर्जेराव काहीच बोलला नाही. तो मान खाली घालून तसाच बसून डाव्या हाताने उजव्या काखेतील केसांमधीलघाम पुसत राहिला.

     "वय काय?"

     "पंचेचाळीस." भरलेल्या तोंडाने तो कसाबसा बोलला.

     "आधी ती तोंडात काय हाय ते थुकून दी बर."

     हवालदार असे म्हणताच सर्जेरावने इकडे तिकडे पाहिले आणि तोंडातील सगळा मुद्देमाल गटकन गिळून टाकला.

     "पंचेचाळीस हाय वय."

     "बॅरिस्टरचं?"

    "बॅरिस्टरचं नाय वं, माझं."

    "तू काय हिवतडवरनं आलायस का?"

    "नाय कौठुळीस्न आलुया."

    "मग बॅरिस्टरचं वय सांग की."

    "त्येचं आसल की सात एक वर्ष."

    हवालदाराने जरा तिरकसपणानेच त्याच्याकडे पाहिले आणि पुढचा प्रश्न केला, "कधीपासून बेपत्ता हाय?"

    "कालपासून. म्हंजी तसं काल रातच्यानं."

    "त्येचा काय फुटु बिटू हाय का तुझ्याकडं."

    "तसलं काय बी नाय. अन बॅरिस्टरचा फुटु काढायचा कधी परसंगच आला न्हाय."

    "बरं कायतर जन्मखूण, वर्णन, कायतर सांग."

    "वर्णन म्हंजी, बगा आता त्येला दोन डोळं, दोन पाय..."

    "आरं माकडीच्या, दोन डोळं, दोन पाय, दोन हात सगळ्यालाच असत्याती." सर्जेरावचं बोलणं मध्येच काटत हवालदार चिडूनच म्हणाला.

    "तेच तर, त्येला हात न्हाईतं, पख हायतं पख त्येला, अन त्याची चोच तर अशी बाकदार हाय म्हणता काय सांगू तुम्हाला."

हवालदार आता लिहायचं थांबवून त्याच्याकडे पाहू लागला.

    "तुझा बॅरिस्टर नक्की माणूस तर हाय का?"

    "न्हाय वो हवालदारसाहेब माझा बॅरिस्टर माणूस न्हाय, माझा कोंबडा हाय त्यो."

    एवढ्यावेळ आपण एका कोंबडा हरवल्याची तक्रार लिहून घेत होतो, याचा हवालदाराला खूप राग आला. सर्जेरावने आपला कोंबडा केल्याचे त्याला वाटले आणि म्हणूनच चिडून तो म्हणाला, "आरं, तू काय बाजीराव हायस का?"

    "बाजीराव न्हाय वं साहेब, सर्जेराव हाय मी. मगाच सांगितलं की वो तुमाला."

    "उठ. उठ आधी. उठ हितनं." हवालदार चिडून म्हणाला.

    "आवं साहेब तक्रार तर लिहून घ्या." खुर्चीतून उठत तो म्हणाला.

    त्याच्या दंडाला धरत हवालदाराने त्याला बाहेर काढले आणि हिसक्याने ढकलत तो सर्जेरावला म्हणाला, "कोंबड्या-कुत्र्यांच्या तक्रारी घिऊन तुझा बाप तरी आला असता का पुलिस स्टेशनात? निघ हितनं."

    बिचारा सर्जेराव एक नाय दोन नाय, काखेत वायरची पिशवी कोंबून पोलीस स्टेशनच्या बाहेर पडला. बॅरिस्टर हरवल्याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. काल रात्री जेव्हा खुराड्यात कोंबड्या कोंडताना त्याच्या बायकोला बॅरिस्टर परत आला नसल्याचे समजले तेव्हापासून ते दोघे उदास झाले होते, रात्रीचं जेवणही त्यानं केलं नव्हतं आणि सकाळी पोटाला काहीच न खाता त्यानं पोलीस स्टेशन गाठलं होतं. स्वतःला मुल नव्हतं म्हणून त्याने आणि त्याच्या बायकोने बॅरिस्टरवर अगदी मुलाप्रमाणे जीव लावला होता.

    डोक्यावर डौलदार लाल तुरा, थोडेसे लालसर डोळे, बाकदार अशी पिवळसर चोच, गळ्याभोवती लोंबणारं लाल शिरगुळ, तांबड्या-पिवळ्या पिसांनी सजलेली झुबकेदार गर्दन, काहीशा तशाच व करड्या पिसांनी नटलेले त्याचे पंख यामुळे त्याचे रूप अजून खुलून दिसत होते. मागे वक्राकार अशी जमिनीला टेकू पाहणारी काळी, लांब पिसे जणू त्याचा रुबाबच वाढवत होती. अंगावर काळा कोट चढवून कोर्टात जाणाऱ्या एखाद्या वकिलाप्रमाणे तो वाटत होता. कदाचित म्हणूनच सर्जेरावने त्याचं नाव बॅरिस्टर ठेवलं असावं! चालताना छमछम आवाज करणारी दोन्ही पायांतील पितळेची घुंगरं जणू काही त्याची आभूषणेच होती! असा हा बॅरिस्टर, उकिरड्यात शेणाच्या डगरीवर असा ऐटीत उभा राहून जी जोराची बाग द्यायचा, तशा आजूबाजूच्या कोंबड्या तुरुतुरु धावत त्याच्याभोवती गोळा व्हायच्या आणि सारा नजारा जणू गवळणींत श्रीकृष्ण उभा असल्यागत भासायचा.

    पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सर्जेरावने डोक्याचे मुंडासे काढून हातात घेतले व कसलातरी विचार करत तो तिथेच उभा राहिला आणि घाईनेच पुन्हा माघारी वळला. भराभरा चालत जाऊन तो साळुंखे हवालदाराच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिला.

    "बरं मग ती कोंबड्या-कुत्र्यांचं पुलिस स्टेशन कुठं हाय? न्हाय मंजी बॅ..रि..स्ट..र....." असे म्हणून तो हवालदाराकडे पाहत उभा राहिला.

    संध्याकाळी सर्जेरावची बायको काटे पाहुण्याच्या घरी आली होती. तेव्हा गावात फक्त पोस्ट ऑफिसात आणि काटे पाहुण्याच्यातच टेलिफोन होता. दर आठवड्याला सर्जेरावचा मेहुणा     आपल्या बहिणीला न चुकता मुंबईवरून फोन करायचा.

    "कशी हाय तायडे?" पलीकडून सर्जेरावचा मेहुणा बोलला.

    "इस्वरा, सगळं बरं हाय न्हवं? आज हालू बिलू कायच म्हणाला न्हाय."

    "मी बरा हाय बघ तायडे. तू कशी हाय सांग." पलीकडून त्याने असे विचारताच सर्जेरावच्या बायकोचा बांधच फुटला. ती हमसून हमसून रडू लागली.

    "काय झालं तायडे? दाजी परत दारू ढोसायला लागलं का?"

    "नाय रं बाबा." रडता रडता ती म्हणाली.

    "मग काय झालं?"

    "आपला बॅरिस्टर."

    "कधी मेला?"

    त्याने असे विचारताच ती अजून जोरात रडू लागली तसा काटे पाहुण्याचा छोटा विजू धावतच तिथे आला आणि चौकटीत उभा राहून कावराबावरा होऊन तिच्याकडे पाहू लागला.

    " मेला न्हाय रं बाबा."

    "मग?"

    "कालपास्नं गायब झालाय. कुठं सापडंना झालाय."

    "आधी तू रडायचं थांबव बर तायडे. अन बॅरिस्टर कुठं जाणार न्हाय. आसल तिथंच कुठंतर."

    "ह्येनी बी कचेरीत जाऊन आलं; पण काय झालं न्हाय. माणूस आटपाडीस्न जाऊन आलाय तसा गप्प हाय. जेवला बी न्हाय रातच्यानं."

    "काय न्हाय तायडे लै तरास नगस करून घिव. आधी दाजींना जीऊ घाल."

    "दाजीला आमंत्रण हाय रातच्याला जेवायचं. ह्यांच्या दोस्ताचा, त्या पाटलाचा पोरगा उद्या मम्बयला येणार हाय. तवा चार दिसापूर्वी पाटील आलता सांगाया, वड्यात कारंजाखाली कोंबडा कापणाराय म्हणून."

    "बगा न्हायतर पाटलानं पळवला असायचा बॅरिस्टरला."

    "पाटलाला काय कोंबड्यांची कमी हाय वी अन पाटलाला बॅरिस्टर काय माहिती न्हाय वी? बरं पाटलाच्या पोरासोबत तुला धपाटी, कापण्या करून दिव का?"

    "तायडे कापन्या नकू, धपाटी दी पाठवून आणि काळजी घी. ठिव का मग फोन?"

    तो असं म्हणताच ती पुन्हा रडू लागली तसा चौकटीतूनच विजूने भुवया बारीक केल्या.

    "इस्वरा. माझा बॅरिस्टर."

    "तायडे बघ रडू नकू तू. सापडंल बॅरिस्टर. मी ठिवतू फोन. पूस बर तू डोळं."

    "पोटचा गोळा नसला तरी पोटच्या गोळ्याप्रमाणं वाढवलाय म्या त्येला."

    "तू आधी डोळं पूस तायडे."

    तिने पदराने डोळे पुसले आणि नाकातील पाणी जोरात वर ओढले.

    "हं, ही बग पुसलं."

    "अगं तायडे, पुसल्यालं दिसत नसतं गं फोनात."

    इच्छा नसताना सर्जेराव रात्री ओढ्यातील कारंजाखाली पंक्तीत जेवायला गेला; पण जेवणाच्या त्या पंक्तीत जेवायला बसूनही तो वेगळा वाटला. मनात बॅरिस्टरचाच विचार करून त्याने एकेक घास नजर भुईकडे ठेवून खाल्ला. ना कुणाशी धड बोलला ना धड गप्पागोष्टी केल्या.

    रात्री अंगणात बाजावर पडून तो नुसता कूस बदलत राहिला. सतत बॅरिस्टर त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता. त्याचा तुरा वाऱ्यावर डोलताना दिसत होता, कधी तो घुंगरे वाजवत ऐटीत चालताना दिसायचा तर कधी मान ताणून जोराची बाग देताना दिसायचा. शेवटी पहाटे सर्जेरावचा डोळा लागला.

    दिवस चांगला कासराभर उंच आला होता. आज सर्जेरावला जागं करायला बॅरिस्टरची बाग नव्हती. बायकोने त्याच्या तोंडावरचे पांघरून ओढले, तसा तो दचकूनच जागा झाला. उठून त्याने बाजेखालच्या तांब्यातील पाण्याने चूळ भरली आणि हातावर तंबाखू घेऊन, डबीतून चुना काढून त्याने हाताने चांगला चोळून विडा मळला आणि तीन बोटांत पकडून, तोंड वर करून तो जिभेच्या सहाय्याने तोंडात ठेवून दिला. चरवीने टमरेलात पाणी ओतून ते हातात पकडून तो ओढ्याकडे गेला. ओढ्यातील करंजाच्या झाडापासून तो पुढे जाऊन चिल्लारीच्या झुडपात आडोशाला बसला.

    कानी माश्यांच्या घोंगावण्याचा आवाज येत होता. मधूनच चिमण्या किलबिल करीत होत्या. दुरून कुठूनतरी टिटवी टिवटिव करीत होती. अचानकच कुठूनतरी सरडा सरपटत जात होता आणि दचकून सर्जेराव त्या होणाऱ्या आवाजाच्या दिशेने पाहत होता. डावीकडे नजर जाताच त्याला तिथे एका कोंबड्याची पिसे उलगडल्याचे दिसले; पण ओढ्यात कुणी ना कुणी सतत कोंबडा म्हणा कोंबडी म्हणा, उलगडतच असे. त्यात नवल काय ते, असे समजून त्याने नजर दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला तशी त्या पिसांत पितळेची घुंगरे सकाळच्या उन्हाने चमकलीच!

    बॅरिस्टर आता कधीच परत येणार नव्हता. बसल्या बसल्याच सर्जेराव हुंदाडे देऊ लागला, उलट्या काढू लागला


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy