मातीच घर
मातीच घर
"खूप वर्ष झाली मी रमलो नाही" धावू काकाच्या घरातल्या पडवीत त्याने हे वाक्य लिहून ठेवलेलं. आमच्या घरापासून बागेत जाण्याचा रस्ताा धावू काकाच्या घरा शेजारूनच जातो. त्यामुळे वाटेत थांबून मी तिथे थोडावेळ बसायचो. अगदी मस्त निसर्ग रम्य घराभोवतीच वातावरण होत. त्यामुळे 'कधी कंटाळा आला तर ह्या घरातल्या माणसांना बाहेर जाण्याची कुठे गरज पडत नसेल फक्त दार उघडलं की निसर्गाची ती थंड हवा,पाखरांचा कलकलाट यानेच मन प्रसन्न होत असेल'. गावात सगळ्यांची घर चिर्यांची होती मग हेच घर अस मातीच का? हा प्रश्न मला सारखा पडायचा. पण, हा प्रश्न विचारल्यावर कोणी योग्य अस उत्तर द्यायचंच नाही. एक सांगायचं त्यांची भांडण असतील, एक म्हणायचं त्यांना बांधायचं नसेल. अशी खुप सारी उत्तर यायची पण मला नेमकं उत्तर भेटल नव्हत. आता तेच उत्तर मी धावू काका भेटल्यावर त्याला विचारणार होतो. गावातल्या प्रत्येक अडचणीला तेव्हा ह्या घरातला मुख्य माणूस ठाम उभा राहून मदतीला धावायचा. गाव वाडी आणि त्यातली माणस आपली आहेत, "गरीब श्रीमंत अस कोणीच नसत शेवटी फक्त माणुसकी उपयोगी येते. अशी विचार धरणी धरणारा माणूस", आणि तेच वळण स्वतःच्या मुलांना देखील लावणारा म्हणजेच धावू काकाचे वडील त्यांचेे सर्व गुण त्यांच्या मुलांनमध्ये देखील होते. आणि त्यांच्या सारखाच हुबेहूब त्यांचा मोठा मुलगा म्हणजे धनावंत आणि आमचा "धावू काका".
व्यायाम वेगळा कधी ह्याला करायलाच लागायचा नाही. सकाळी पाच ला उठून दुपारी बारा पर्यंत मेहनतीची काम केली, की व्यायाम खूप झाला अस काकाच म्हणणं असायचं. कोणाला अडचणीत बघायला ह्या माणसाला अजिबात आवडायचं नाही. एक दिवस धावू काकाला विचारलं तुला जर तुझं स्वतःच नाव ठेवायचं झालं तर तू काय ठेवलं असतस तर तो पटकन म्हणाला मी माझं नाव सम्राट ठेवलं असत. 'अशोक सम्राट' ह्या राजाची प्रत्येक गोष्ट धावू काका ला आवडत होती. म्हणून कदाचित त्या राजाला जणू आपल्या रूपात बघत असावा. शौर्य आणि देशभक्ती ह्या सर्व गोष्टींमध्ये हा माणूस जास्त रुची बाळगायचा तसाच निसर्ग प्रेमी सुद्धा होता. ह्या काकाने घराभोवती हिरवळ अशी ताजी ठेवलेली की तिला तो विविध रूपाने नटवीत असायचा. घराच्या समोरच त्याने लावलेल्या जास्वंदीला हत्तीचं कोरीव रूप दिलेलं. घराच्या आडोशाला असलेल्या गुळगुळीत दगडाला त्याने कोरून त्यात त्याच्या बाबांचा चेहरा बनवलेला.
त्याचे बाबा भेटले की नेहमी म्हणायचे 'जर तुला कोणी पाठिंबा देणारा असेल तर यशाचा दरवाजा खूप जवळ असतो'. इतकी सकारात्मक भावना ठेवणारी माणस आपल्या जवळ असली की आपण पण सकारात्मक विचार करायला सुरुवात करतो. म्हणून मला काहीस यांच्या घराबद्दल इतकी आपुलकी होती. कधी कधी वाटत सगळंच जग अश्या रीतीने विचार करायला लागल तर नकारात्मक विचार जन्मालाच आले नसते. पण खंत हीच होती की जिथे गॅस ऐवजी चुल पेटत होती. चुलीवर तांदळाची भाकरी आणि सोबत झुणका असायचा. थंड फ्रिज ऐवजी तिथे 'मठातल पाणी' आणि पक्षी सुद्धा भुकेलेले असतात त्यांच्या साठी अंगणासमोर चिऊ खाऊ ठेवलेला असायचा. जिथे झोपण्यासाठी फॅन नाही पण नैसर्गिक हवा थंड लागायची. तिथे लाईट ऐवजी कंदील आणि सान्यात बत्ती लावलेली असायची. अश्या घरात आता कोणीच राहत नव्हतं. धावू काका सुद्धा त्याच्या कामाला जाऊ लागायचा. खरतर चार भाऊ आणि घर लहान व मातीच यांमुळे धावू काका सोडून बाकीचे तिघे बाहेर गावी राहायचे कधीतरी सुट्टीत गावी येऊन घरी राहायचे. "जुन्या आठवणीनं सोबत रमायचे,आणि खुप मज्जा करून पुन्हा त्यांच्या वाटेला जायचे".
मी विचार करत तुळशी जवळ बसलो इतक्यात घरातून काहीतरी भांड पडण्याचा आवाज आला. मी हाक मारली तर धावू काका ने हाक दिली. आणि धावू काका नुकताच दोन दिवसापूर्वी आला अस तो म्हणाला. तो येऊन माझ्या सोबत बसला आणि मी त्याच्या सोबत खुप गप्पा मारल्या. धावू काका मला सांग तुझं ह्या घराशी एवढं घट्ट नात आहे, पण फक्त तुझंच का आहे बाकीच्यांच का नाही? आणि तुम्ही हे घर इतकी वर्ष एकत्र असून नवीन का नाही बांधलंत..! त्यावर तो हसत म्हणाला, हे मला विचारणारा तू पाहिला आहेस. "खर सांगायचं झालं तर प्रत्येक वाटेत मिळणारा माणूस मला एकच म्हणतो घर नवीन का नाही बांधत बघवत नाही आता त्याच्याकडे पण मी हसतो आणि पुढे जातो". घरातले माझे सक्के भाऊ सुद्धा मला कधी कधी म्हणतात की दादा आपण घर नवीन बांधुया का म्हणून, पण मी हसलो की ते समजून जातात माझ उत्तर आणि नंतर माझं उत्तर अपेक्षित न धरता विषय थांबवतात. आज इतकी वर्ष झाली सगळे प्रगतीच्या दिशेने वळले, जस जग बदलत तस वेळेनुसार आपण बदलायला हवं हे अगदी खर आहे.
पण बदल आपल्यात घडवुन यायला हवे अस मला वाटत. ना की कोणत्या वस्तू मध्ये बदल घडायला हवे. वस्तू सुद्धा एका वेळेनंतर बिघडते, आपण तिची योग्य काळजी घेतली आणि तिला बिघडूच दिल नाही तर ती वस्तू सुद्धा आपल्यावर प्रेम करायला सुरुवात करते. खर सांगू तुला ह्या वास्तू मध्ये माझं मन रमलय. हे घर माझ्या आजोबांनी बांधलंय ह्या घरामध्ये माझ्या बाबांचं बालपण गेलंय. आमची बालपण गेली. कधी खूप थकून कंटाळून गेलो ना की अंगणाच्या समोर येऊन एकटा बसून असतो. मग मला खुप काही दिसत की आई आतून येऊन माझ्या मागे धावत पूर्ण अंगणभर धावत मला भरवतेय, बाबा शेतातुन काम करून आले की ह्या समोरच्या बाकावर बसायचे एक तांब्या पाणी प्यायले की मी जाऊन त्यांच्या खांद्यावर खेळायचो. माझे लहान भाऊ ह्याच अंगणात खुप खेळायचे. त्यांचे भातुकलीचे खेळ अगदी रंगून जायचे. आज खुप वर्ष आई बाबांना जाऊन झाली. पण मी हे मानतच नाही की माझी आपुलकीची माणस मला सोडून गेलीत, 'ती आहेत माझ्यासोबत', त्यांच्या आठवणी आहेत. त्यांनी केलेल्या प्रत्येक कष्टाचं सबुत हे घर आहे.
माझे बाबा समाजसुधारक होते त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचा पाहुणचार ह्या घरात आहे. पावला पावलावर आपुलकी आमच्या घरात नांदत असते. माझी आईने राब राब राबून ह्या घराच्या मातीला थापलय. तिच्या हातातील जादु ने ह्या घराला अजून खंबीर करून ठेवलंय. दारासमोरची तुळस कधीच सुकली नाही कारण ती माझ्या आईने लावलीय. त्या वनस्पतीला ही माहितेय की मला लावणारी ही स्त्री निर्मळ मनाची होती. काही गोष्टी आहेत घरच्या बाबतीत ज्या मला कोणी म्हटलं तर आवडत नाही, कारण माझं अस जुन घर मी ठेवलंय माझ्याकडे पैसा असून मी हे का अस ठेवलंय हे कोणीच विचारत नाही. पण तू ते पाडून नवीन बांध अस सगळेच सांगतात. आणि तू एकटा आहेस जो आपुलकी दाखवतोस म्हणून मला तुझ्याशी हे बोलावस वाटलं. आणि मनही हलकं झालं. खुप जण पैश्याने श्रीमंत होतात पण मनाने श्रीमंत व्हायला विसरतात. गावात खूप मोठ घर बांधतात पण त्या घरात राहायला त्यांच्याकडे वेळच नाहीय. गावात आमच मोठ घर आहे अस रुबाबात सांगतात पण त्या घरात साधे चार दिवस पण राहत नाही.
गाव माणस शेतीवाडी आता सगळ जुनाट झालाय, पण कधीकाळी ह्याच वातावरणात आपण सुद्धा राहून गेलोय हे विसरून जातात. एकदा बाहेर गावी नोकरी लागली कि मागे काय होतंय ह्याची जरा सुद्धा जाणीव नसते ह्यांना, कारण त्यांच राहिनिमान बाहेर चांगल असत. तुला सांगू ह्या घरातल्या आठवणी मला जगायला प्रेरणा देतात. आणि इथल्या मातीत माझी नाती आहेत याची जाणीव करून देतात. माझ वस्तूत जस मन रमत तसच माझ मन ह्या वस्तूत रमलय. आणि तेव्हापासून मला धावू काकाचा खूप अभिमान वाटू लागला. इतका वेगळा आणि सकारात्मक विचार करणारा माणूस आपल्या सोबत राहतो. अशी वेगळीच अभिमानास्पद गोष्ट अजून काय असू शकते. आपल्याला आजूबाजूला खूप प्रकारची लोक असतात. पण आपण कोणाला निवडायचय आणि त्यांच्याकडून काय शिकायचय हे सगळ आपल्यावर अवलंबून असत.
