मालकीण
मालकीण


तालुक्याच्या गावाला मीटिंग होती म्हणून रमा पटापट आटपत होती. तिला या गावात सरपंच होऊनही चार वर्षे झाली होती. खरंतर तिला हे पद घेतानाही मनात खूप धाकधूक होत होती. आपण पडलो बाईमाणूस. कधी घरातही आपल्याशिवाय काही अडत नाही. घरात स्वयंपाक सोडून कुठलाच कार्यक्षेत्र नव्हतं मग असं मोठं पद आपल्याला पेलवेल का परंतु शिवाजीरावांपुढे काही चाललं नाही महिला राखीव मग त्यांना स्वतःला पद मिळवण्यासाठी त्यांनी रमाला स्त्री स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले तू राजकारणात कशी योग्य, तुझ्यासारख्या महिलांमुळे देशाची प्रगती कशी होऊ शकते, अशा आणि इतर अनेक गोष्टी सांगून तिला बळेच बोहल्यावर चढवले होते.
आताशा तीही धीट झाली होती. खूप काही अस्खलितपणे नाही पण शब्दांची जुळवाजुळव करून तरी पंधरा वीस मिनिटं बोलत असे. गावात प्रथमच महिला सरपंच व्हायचा मान मिळाला. गावातील लोक शिवाजीरावांच्या समाजसेवेमुळे घरी ये-जा करत. तिला सर्वजण मालकीण तर शिवाजी रावांना मालक म्हणत. गेल्या काही वर्षांपूर्वी शिवाजी रावांनी सरपंच हे पद भूषवले होतेच. फरक एवढाच रमा सरपंच झाल्यामुळे स्त्रियांची वर्दळ वाढली. मालकीण बाईंकडे काम असले तरी निर्णय मालकच घेत. बघता बघता चार वर्षे सरली. सभा, मोठ्या ऑफिसमधल्या साहेबांच्या मीटिंग, गावासाठी विकास योजना यांची तिला चांगलीच माहिती झाली होती काही नाही तर मालकिणीकडे शेवटी का होईना सहीला कागद येई. रमा नाही म्हटलं तर कला शाखेची पदवीधर होती. तिच्यात विविध कलागुण होते. तिला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय नावडीचे. मराठी, मानसशास्त्र हे विषय आवडत. लग्न झाल्यावर जरी शिक्षण चालू नसले तरी कथा, कविता, कादंबरी वर्तमानपत्र यांचं वाचन तिने सातत्याने चालू ठेवले होते लग्नाला सहा वर्षे झाली. तिला एक मुलगा एक मुलगी होती संसाराची वेल चांगलीच बहरली होती. तिला शिक्षणाला सासरहून परवानगी होती परंतू संसारचक्रात ती व्यवस्थित अडकली होती दोन वर्षांपूर्वी सासुबाई गेल्या अन् रमावर सणवार पाहुणे-रावळे यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तिला खऱ्या अर्थाने मालकीन व्हावे लागले. शिवाजी रावांच्या घरी वाडवडिलांपासून बागायती शेतीची परंपरा . लक्ष्मी घरी नांदत होती आणि घरंदाज घराण्याच्या प्रतिष्ठेमुळे रमाला नवीन असताना दबल्या सारखे होई पण पुन्हा ती या सर्व वातावरणात रूळली. एक दीड गुंठय़ाच्या वाड्याची व्यवस्था तिच्या एकटीच्याने होत नसे म्हणूनच तिने हाताशी सखूला घेतलं होतं सखू म्हणजे तिची सावली जणू . घरातल्या हर एक कामात ती मदत करे बरीच कामे ती स्वतःहून पुढाकाराने करी. वाड्याच्या स्वच्छतेपासून ते सणाच्या स्वयंपाकात सर्व तीच करे . रमाताई सरपंच झाल्यापासून त्यांच्या मनाची चाललेली होरपळ तिच्या लक्षात येत होती. रमाबाईंना कोणताही निर्णय घ्यायची मुभा नाही, सारे निर्णय मालकांचेच रमा मालकीन होती म्हणून थोड्या फार अधिकारांची तिला अपेक्षा होती. 'ओ रमाताई' या हाकेसरशी विचार चक्रातून बाहेर आली. सखू आणि त्या दोघीही गाडीत बसल्या तालुक्याच्या गावाला मीटिंग असली की मालक असले तरी सखूही सोबत राहात असे. मीटिंग नंतरही पंचायत समिती व इतर ठिकाणची कामे होऊन मालक येईपर्यंत या दोघी विठुरायाचे, गजानन महाराजांचे, चंद्रभागेचे दर्शन घेऊन येत. मीटिंगला जायचे म्हणजे लक्षात घ्यावयाच्या सर्व बाबी रामाला समजल्या पाहिजे; पण सही महत्त्वाची बाकी निर्णय मालकांचा. घरात रामू अन् सासरे मुलांना बघायला असतच. सखू रामू अन् दोन मुली असा संसार सुरळीत चालला होता . सखूची एक मुलगी नेहमी मालकांच्या मुलींबरोबर खेळायला म्हणून येत असे. शिवाजीरावांनी गाडीचा हॉर्न वाजवला त्यासरशी रमा, सखू दोघेही गाडीतून उतरल्या. दोन तीन तासात मीटिंग देवदर्शन आणि इतर कामे उरकून पुन्हा सर्वजन परत निघाले. रमा अन् मालक पुढे तर सखू मागच्या सीटवर. रमा अन् शिवाजीरावांचा जोडा लक्ष्मी-नारायणासारखा वाटे. रमाच्या देखणेपणावर सासरचे सर्वजण खुश होते. ती तितकीच हुशारही होती. परंतु तिच्या हुशारीमुळे जास्त काही फरक त्यांच्या कुणात पडणार नव्हता. तिच्या सासूबाईंना तिचे संस्कार, वागणं खूप आवडे. तिघी बहिणींमध्ये रमा मधली. स्वभावाने शांत. समाधानी वृत्तीमुळेच ती संसारात समाधानी होती. माहेरी भाऊ नसला तरी तिघी बहिणींचा आई वडिलांनी मुले समजून वाढवले होते. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा या संकल्पनेपेक्षा मुलगी दोन्ही कुळांचा उद्धार करून ज्ञानाच्या प्रकाशाने घर उजळते यावर त्यांचा विश्वास होता. माहेरी सर्व व्यवस्थित होते. थोरली बहीण मुंबईला होती. तर धाकटी बहिण डॉक्टर झाली होती. ती तिच्या डॉक्टर नवऱ्याबरोबर परदेशी स्थिरावली होती. रमाचाच आधार सासरी अन् माहेरीही वाटे. आपल्या आई बाबांच शेवटी कसं होणार म्हणून तिला काळजी वाटे. रमाच्या सासरी जाऊन चार दिवसही रहाणे म्हणजे तिच्या आई बाबांना नको वाटे. सासरच्या जबाबदाऱ्या असताना अधूनमधून माहेरी जाणे तिला अवघड जात होते. अवघ्या चाळीस किलोमीटरवर असणाऱ्या माहेरी, वर्षा सहा महिन्यांनी जायला वेळ मिळे. तरीही वरचेवर त्यांना काय हवं काय नको याची ती चौकशी कोणाकडून का होईना करत असे. शिवजीरावांसारखेच सासरच्या कुणालाच या गोष्टीचा त्रास वाटत नव्हता.
तिला मघाशी झालेल्या मिटिंगची आठवण झाली. मीटिंगला जाण्यापूर्वीच मिटींगमध्ये तू काही बोलू नकोस म्हणून शिवाजीरावांनी सांगितले होते. यावर रमा नाराज झाली होती. मिटींगमध्ये बऱ्याच महिला सरपंच बोलतात; पण आपल्यालाच मुभा नाही. रमाला आपणही आपला एखादा विचार मांडावा असे वाटे. कारण पन्नास टक्के आरक्षणामुळे राजकारणात बऱ्याच स्त्रिया दिसू लागल्या होत्या. पन्नास टक्के स्त्रिया जरी बोलत नसल्या तरी आपली मतं मांडीत. बाकी नुसत्या सहीच्या मालकिणी. मागे एकदा मिटिंगला बोलावण्यात आले. परंतू घरात शिवाजीराव नव्हते. काही कामानिमीत्त ते मुंबईला गेले होते. घरामधल्या दोन्ही गाड्या जागेवर नव्हत्या. गावातली वाहनेही भाड्यासाठी बाहेरगावी गेलेली. तिने गावात सांगितले असते तर कुणीही एक वाहन उपलब्ध करून दिले असते. परंतु दुसऱ्यांना त्रास द्यायला तिला आवडत नसे. कुणाच्या गाडीवर ती केव्हाच बसली नव्हती. ते तिच्या तत्वात बसत नव्हतेच. गावामध्ये वातावरण बरोबर नाही, नको त्या विषयांची चर्चा या सर्वांचा तिला चांगलाच अभ्यास होता. आपण बसनेच तालुक्याच्या गावाला जायचे, हे ठरवून तिने सखूला बरोबर घेतले. बस वेळेवर येईना. आपण या सुरळीत बससेवेची मागणी आजच्या मिटिंगमध्ये करायची असे तिने ठरविले. उशिरा का होईना बस मिळाली. मिटींगच्या आधीच दोन तास निघाल्यामुळे मिटिंग सापडली. मागे एकदा नुकतेच सरपंच होऊन चार-पाच महिने झाले होते. अन् शिवाजीराव नसताना ती तिच्या चुलत दीरांच्या गाडीवर बसून गेली. गावात थोड्या दिवसात चर्चेला उत आला. गावावरून आल्यावर शिवाजीरावांना कळले. त्यांनी रमाला बजावून सांगितले, "आपण खेडेगावात रहातो, अमेरिकेत नाही. जमत नसेल तर जायचंच नाही मिटिंगला." सर्व प्रकरण तिला डोक्याला तापदायक ठरले. तेव्हापासून शिवाजीराव किंवा सखू यांना बरोबर घेतल्यावरच ती परगावी मिटिंगला जाई. नाही म्हटलं तरी खेडेगावात थोडी लोकसंख्या, लोकवस्ती कमी, त्यामुळे कोण कुठं, कशासाठी कोणाबरोबर जातं याची बातमी पारावर बसून बरेचजण घेत असतात. खेडेगावातील लोक शिकली तरी त्यांच्या विचारात प्रगल्भता नव्हती. अजूनही खेडेगावात स्त्रियांना पाहिजे तशी मोकळीक मिळत नाही. त्या स्वत: निर्णय घेऊ शकतात; पण तशी परवानगी त्यांना नाही. रमा मात्र सर्व रूढी, परंपरा, अंधश्रध्दा यावर मात करणार होती. आपल्या मुलाला मुक्त आकाश मिळणारच; पण आपल्या मुलीलाही खूप शिकवणार होती.
आजच्या मिटिंगमध्ये बऱ्याचजणांना आजकाल होऊ लागलेल्या त्रासाची चर्चा झाली होती. रमालाही हे पटत नव्हते, माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर होत नव्हता. कुणीही उठसूठ माहिती मागत होता. दररोजच्या कामात या एका कामाची भर पडे. काही वेळेस या अधिकाराचा योग्य प्रकारे योग्य माहितीसाठी वापर होत असला तरी बऱ्याचवेळा विरोधी गटातील लोकांकडून एखाद्या ' क्ष' व्यक्तिला तयार करून त्याच्याकरवी माहिती मागवली जात होती. माहिती देण्याविषयी कोणाची ना नसे; परंतु अशा एक ना दोन. वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या पध्दतीची, प्रकारांची माहिती मागणाऱ्या चार-पाच व्यक्ती असत. त्यांना माहिती पुरवण्यासाठी ती गोळा करण्यातच बराच वेळ जाई. गेल्या महिन्यात विरोधी गटाने शिवाजीरावांना असाच वैताग दिला होता. हाच मुद्दा त्यांनी मिटिंगमध्ये रमा करवी मांडला; पण त्यात अधिकाऱ्यांनी उलट त्यांनाच सांगितले, कारण रस्त्यावरचा भिकारीदेखील तुम्हाला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवू शकतो आणि तुम्हाला ती पुरवावीच लागते. या सर्व चर्चेवरून विरोधी गट आपल्या कामात नेहमीच लुडबूड करणार याच विषयावर रमाबरोबर चर्चा करत होते. चर्चा करताना ते बरेच त्वेषात होते. रस्त्याने अंधारही दाटला होता. त्यातून रस्ता बरोबर नव्हता. शिवाजीरावांच्या गाडीचा वेग बराच होता. सखू तर सीटचा आधार घेऊन जाम बसण्याचा प्रयत्न करत होती. बघता बघता अचानक मोठ्या दगडावरून गाडी उडून रस्त्याच्या कडेच्या खड्डयात घसरली. रमा, सखूला थोडे खरचटले; पण गाडी शिवाजीरावांच्या बाजूने रस्त्याच्या खाली गेल्याने त्यांचे पाय गाडीखाली अडकले. जवळच असणाऱ्या वस्तीवरच्या लोकांनी आवाजामुळे, लाईटच्या प्रकाशामुळे घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना मदत करून दवाखान्यात वेळेवर पोहोचवले. परंतू शिवाजीरावांचे पाय अधू झाले. मदत मिळाली; पण पुढील सारं पाहून रमाच्या अंगावर काटे उभे राहिले. तिला आपणच अधू झालो आहोत असे वाटू लागले.
शिवाजीराव मनाने खचले, आपण अधू झालो. ते नशिबावर नाराज झाले; परंतु दैवनिर्णयापुढे कुणाचेच काही चालत नाही. मग तो राव असो की रंक. हळू-हळू त्यांना व्हीलचेअरची सवय झाली. वाड्यात ते फिरत; पण वाड्याबाहेर ते जास्त नव्हे क्वचितच बाहेर पडत. लवकरच त्यांना जयपूर फूट बसविण्याचा निर्णय घेतला. या सर्व गोंधळात रमाला आता स्वत:चा सारा कारभार पाहण्याची वेळ आली. स्वत:चे निर्णय ती स्वत: घेऊ लागली. गावात सभा घेणे. नवीन योजना जाहीर करणे, अंमलबजावणी करणे, बघता बघता तिने स्वत: बरोबर गावाचाही कायापालट केला. कोणत्याही योजनेतून हातचं राखून काम करण्याची. काहीतरी आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ठेवायची हा तिचा स्वभावच नव्हता. शिवाजीरावांना हे पटत नसलं तरी दुसऱ्याचा पैसा पचनी पडत नसतो. कलियुगात इथल्या इथे परतफेड करावी लागते, याची जाणीव तिने करून दिल्यावर झालेल्या घटनेचा विचार करून ते शांत राहू लागले. त्याचं आता काही चालणारही नव्हतंच.
रमाच्या कामामुळे ती थोड्याच दिवसात लोकप्रिय झाली. वाड्यावरची वर्दळ वाढली. मालकिणबाईंचा बराच वेळ लोकांसाठी खर्ची पडू लागला. गावातल्या बायकांना विविध योजनांमुळे लाभ मिळू लागला. रमाला आता सारे व्यवहार कळू लागले. बऱ्याच गोष्टी ती नव्याने शिकली. शिवाजीरावांना हे सर्व प्रथम अवघड वाटत होते; पण हे सर्व योग्यच आहे हे हळू-हळू पटू लागले. रमाला तिच्या कार्यामुळे गावात लोकप्रियता मिळालीच, तिला 'आदर्श सरपंच' पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमासाठी सासरच्या सर्वांबरोबरच माहेरच्या सर्वांना आमंत्रण दिले. रमाच्या आई-वडीलांना खूप आनंद झाला. आपल्या लेकीच्या यशामुळे तिने आकाशाला गवसणी घातली, हे जाणवलं. त्यांनी तिला काही भेट देऊ केल्यावर यापुढं तुम्ही माझ्याबरोबर रहायचं हे मान्य केल्याशिवाय मी तुमची कोणतीच भेट स्विकारणार नाही, हे तिने जाहीर केलं. शेवटी मुलीपुढे आई-वडिल हतबल झाले. मुंबईहून बहीण, भावोजी आले होते. त्यांनाही खूप आनंद झाला. सासरेही प्रभावित झाले होते. घरात, वाड्यातच नव्हे तर गावात गावजेवण देऊन आनंदोत्सव झाला. पुढेही याच सरपंचांना संधी देण्याविषयी एकमत झाले. तिच्या निर्णयक्षमतेमुळे तिच्याच काय पण गावाच्या, गावातल्या स्त्रियांच्या जीवनात प्रगतीची पहाट झाली. मालकीण खऱ्या अर्थाने मालकीण झाली.