फसवणूक
फसवणूक
रोहनला कालपासून प्रदीपचा फोन येऊ लागला. प्रदीप काहीतरी घटना घडल्यामुळे अस्वस्थ झाला होता हे त्याच्या आवाजावरून लक्षात येत होते. एरवी प्रदीपचा फोन झाला की, रोहनला खूप आनंद होत असे. कारण फोनवर दिलखुलास बोलणारा प्रदीप, बराचवेळ बोलत असे. तो हसला म्हणजे जणू हवेत एक वेगळाच उत्साह संचारत असे. त्याचं दिसणं एखाद्या दाक्षिणात्य नटाप्रमाणे होतं. रहाण्यात, चालण्यात, बोलण्यात एक शाही अदब होती. कोणतीही व्यक्ती त्याच्याशी बोलताना मोकळेपणाने बोले. तो प्रत्येकाला हवाहवासा वाटे. याच गोष्टीचं राजकारण त्याला त्याच्या व्यापारात होत होते. तो एका बड्या सोनाराच्या दुकानात कामाला होता. तो नुसता कामाला होता असे नाही तर तो मालकाचा उजवा हात होता. मोठ्या पार्ट्यांना भेटणे, मोठमोठ्या वाटाघाटी करण्यात तो अग्रेसर होता. धंद्यातील ब-याच खाचाखोचा त्याला माहित झाल्या होत्या. म्हणूनच मालक त्याला प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेत. प्रदीप असला म्हणजे मालक त्याच्या विश्वासावर दुकान सोडून परगावी व्यापारानिमित्त जात असे. प्रदीपने मालकाचा विश्वास संपादन केला होता. त्याने मालकाच्या दुकानातील एकंदरीत सगळ्याच परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास केला होता. त्याला मालक ब-यापैकी पगार देत. तरीही सध्याच्या महागाईच्या काळात वाढत्या जबाबदा-या पहाता त्याला स्वत:चा उद्योग सुरू करावा असे वाटू लागले. घरामध्ये दोन लहान भाऊ, एक लहान बहिण होती. लहान भावांचा शिक्षणाचा खर्च आणि बहिणीच्या लग्नाचा खर्च. घरात वयस्कर आई वडील. ब-याच विचाराअंती भांडवलाची जमवाजमव करून त्याने शुभ मुहूर्तावर सोन्याचे दुकान टाकले. मालकाला थोडावेळ वाईट वाटले. परंतू आपल्या हाताखाली शिकून सराईत होवून प्रदीपने स्वत:चे दुकान टाकले याचा अभिमान वाटत होता. उद्घाटन प्रसंगी मालक आपल्या कुटूंबासमवेत आवर्जून उपस्थित होते. बघता बघता प्रदीपच्या दुकानाचा चांगलाच जम बसला. मशीनमेड आणि हातानेही तयार केलेले दागिने तो विकत असे. गरजू लोकांसाठी म्हणून त्याने सोनेतारण योजनाही सुरू केली होती.
एके दिवशी प्रदीपच्या वर्गात शिकणारी लीना बाटलीवाला तिच्या नव-याला घेवून दुकानात आली. तिला आलेलं पाहून त्याला आकाश ठेंगण वाटू लागलं. कॉलेज जमान्यात ती त्याची धडकन होती. तिला पाहिल्याशिवाय त्याला करमत नसे. तिचे सौंदर्य, हुशारी यावर तो फिदा होता. पण तशी कबुली द्यायची असं ठरवे ठरवे पर्यंत तर कॉलेज मधील जीवन संपलेही. शेवटी लीनाचे सूरज बाटलीवाला यांच्याशी लग्न झाले. सूरजचाही मोठा व्यवसाय होता. घरात लक्ष्मी पाणी भरत असे. एकंदरीत लीना संसारात सुखी होती. पण म्हणतात ना प्रत्येकाची एक वेळ असते. त्याप्रमाणे सूरजला धंद्यात घाटा झाला. यामुळे धंद्यावर आपोआप परिणाम झाला. यातून बाहेर पडण्यासाठी लीना मदत करू लागली. त्यांना आता दुस-या धंद्यात गुंतवणूक करायची होती. यासाठी लागणा-या भांडवलासाठी लीनाचे दागिने प्रदीपच्या दुकानात गहाण ठेवायचे, अशी आयडीया लीनाच्या डोक्यात आली होती. तसं सूरज अडचणीत आहेत असं सांगितल्यावर प्रदीपने मदतीचा हात पुढे केला होता. पण तिने तो नाकारला होता. आता मात्र लीनाच्या अडचणीत प्रदीप कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत तर करणारच. दागिने गहाण ठेवून पैसे घ्यायचे, ही कल्पना सूरजला पटली. प्रदीपला मात्र योग्य वाटत नव्हते, पण मदतीसाठी हा मार्ग लीनाला योग्य वाटतो ना मग ठीक नव्हे उत्तम. त्याने तिचे दागिने घेतले अन् त्याच्या बदल्यात तिने मागेल तेवढे पैसे द्यायचे ठरवले. तिने आठ लाख रूपये मागितले. मनातल्या मनात तो विचार करू लागला. 'एवढी रक्कम देणं योग्य होईल का?' पण मैत्रिणीपुढं व्यवहार बाजूला ठेवला. नाहीतरी काही न घेताही तो मदत करणारच होता. दागिन्यांची किंमत सहा लाखाच्या आसपास असेल. पण आपण तिच्या उपयोगी पडू, यातच त्याने धन्यता मानली. लीना अन् सूरजने मोठ्या कंपनीत पैसा गुंतवला होता. त्यांना ब-यापैकी फायदा होणार होता. लीना आता अधूनमधून प्रदीपकडे फेरफटका मारत असे.
एके दिवशी प्रदीपच्या शेजारच्या शांती ज्वेलर्समधून एक स्त्री दागिने गहाण ठेवून पैसे उचलणार होती. पद्धतीप्रमाणे दागिने तपासल्यावर त्यातील काही दागिने खोटे निघाले. ते सोन्याचं पाणी दिलेले होते. माझ्या सासरच्या लोकांनी घातले. मला तरी काय माहित अशी बतावणी त्या स्त्रीने केली. खरतरं ती स्त्री शांती ज्वेलर्स च्या दुकानात कामाला असणा-या मुलाची बायको होती. खरतर दागिन्याची तपासणी करायचे काम तोच मुलगा करत असे. पण आज योगायोगाने मालकांनी स्वत: तपासले. मग काय, मागच्या अनेक गि-हाईकांचे दागिने तरी याने व्यवस्थित तपासले, की याची काही मिली भगतगिरी होती आणि बरोबर हेच मालकाच्या लक्षात आले. शेवटी व्यापारी दृष्टिकोणातून ते दागिने तपासलेच जाणार होते पण नोकराकरवी हे काम झाले असते तर मालक फसला असता. समज देवून त्याला कामावरून काढून टाकले. पोलिसात तक्रार मात्र दिली नाही. पण हा हा म्हणता म्हणता ही बातमी सराफ कट्ट्याच्या कानाकोप-यात पोहोचली. प्रदीपलाही हा अनुभव नवाच होता. परंतू विश्वासातल्या जवळच्या माणसाने असे करणे चुकीचे होते. या गोष्टीमुळे सराफकट्ट्याच्या सर्वच सराफांनी दागिने तपासून घेतले, तसं काही दागिने प्रदीपनेही तपासले. बघता बघता दोन- तीन वर्ष गेली. या कालावधीत प्रदीपचे राणीशी लग्न झाले. राजा- राणी संसारात चांगलेच रमले होते. प्रदीपला राणी आल्यापासून घरीच क
ाय पण दुकानातही मदत होत होती. राणीने बघता बघता दुकानातील प्रत्येक गोष्ट समजून घेतली. प्रदीपला परगावी व्यापारानिमित्त जाण्यास वेळ मिळू लागला. एके दिवशी व्यापाराच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या वाटाघाटीसाठी तो मुंबईला गेला होता. लीना व तिचा नवरा सोनं सोडवून घेण्यासाठी आले होते. लीनाचा आपल्या घराविषयी घरोबा माहितच होता. पण तरीही तिने नव-याला फोन करून दागिने देत असल्याचं सांगितलं. रीतसर सर्व बाबी झाल्या. लीनाने दागिने घेताना तपासून देण्याची मागणी केली. दागिने ठेवून घेताना मात्र प्रदीपने दागिने तपासले नव्हते. राणीला त्यात काही विशेष वाटले नाही, म्हणूनच दागिने तपासले. दागिने तपासायला सांगितलेला नोकर मालकिणी कडे आश्चर्याने पाहू लागला. राणीने त्याला पटकन आवर बाकीची गि-हाईक खोळंबलय असं तिने सांगितले. पण त्याला स्थिर पाहून ती अवाक् झाली. जणू तो बर्फच झाला होता. त्याने राणीला दागिने खोटे असल्याचं सांगितलं. राणीच्या डोळ्यापुढे दिवसा तारे चमकल्याचा भास झाला. आपल्याला उंच ठिकाणाहून कोणीतरी दरीत ढकलतंय असा भास झाला. ही गोष्ट प्रदीपला सांगावी की नको अशी तिची द्विधा मनस्थिती झाली. परगावी आहेत, त्यांना हा धक्का सहन होईल का? ते मुंबईला महत्त्वाच्या कामानिमित्त परगावी गेले, त्यांना हा आघात कसा सहन होईल. या सगळ्या विचारात असतानाच लीनाने तिला हाक मारली,' "'वहिनी, अहो द्या ना दागिने. मला कार्यक्रमाला जायची घाई नसती ना तर निवांत थांबले असते.' राणीला तिला काय बोलावे ते सुचेना. गोड बोलून पाठीत खंजीर खुपसण्याची कला तिला छान अवगत होती. तसंतर लग्न झाल्यापासून लीनाला पाहिलं की, तिचं डोकं सटकत असे. पण काय करायचं? नव-याची मैत्रीण म्हणजे वेगळाच रूबाब होता.
लीनाला दागिने आताच हवे म्हणत तिने तगादा लावला. उचललेली सर्व रक्कम त्यांनी राणीच्या पुढ्यात ठेवली. राणीला कोणीतरी शांत पाण्यात एकदम दगड टाकावा तसं वाटलं. हो नाही करत तिने दागिने समोर ठेवले. लीनाने लाडिक स्वरात दागिने तपासून देण्याची मागणी केली होती. अन् जवळ जवळ ती जोरात किंचाळली. मी ठेवलेले ते हे दागिने नव्हेत. राणीला तिने विचारणा केली. मी खरे दागिने ठेवले होते, खोटे नाही. खरंतर तिच्यापुढे दागिन्यांची तपासणी न होताच तिने हे दागिने खोटे आहेत हे कसे ओळखले. राणीचा संशय बळावला, पण ती काही बोलू शकली नाही. तिच्या डोक्यात विचारांच काहूर माजलं. डोक्यात असंख्य मुंग्या येवू लागल्या. शेवटी तिने लीनाकडे दोन दिवसांची मुदत मागितली. प्रदीपही तोपर्यंत गावावरून येणार होता. परंतू लीनाने आता जमदग्नीचा अवतार धारण केला होता. आपण आता पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत असे सांगितलं. क्षणात नात्यांचा खेळ तिने मोडला. विश्वासाने न तपासता घेतलेले दागिने परत देताना मात्र तपासल्याशिवाय घेणार नसल्याचे सांगितले. ती आपल्या निश्चयावर ठाम होती. तक्रार नोंदविल्यामुळे पोलीस आणि बघ्यांची गर्दी वाढली. जो तो प्रदीपने असं करायला नको होतं असंच बोलत होता. कारण दिसणारी परिस्थिती लीनाच्या बाजूने होती. एकतर सुंदर व्यक्तिमत्व, अनेक ठिकाणच्या मोठ्या ओळखी आणि लाघवी बोलणं. खोटे दागिने आपल्याला परत देवून या सोनाराने आपली फसवणूक केली, या सर्व परिस्थितिचे तिने तांडव मांडले होते. तिचा अवतार पाहून जो तो तिला सहानुभूती देत होता. राणीने नाविलाजाने प्रदीपला सारी परिस्थिति सांगितली. प्रदीपच्या पायाखालची जमीन सरकली. खरंतर लीना म्हणजे त्याचं मनात लपून राहिलेलं अधूरं प्रेम. पण तिने असा दगा फटका केला, तो स्तब्ध झाला त्याला सर्व घटना स्पष्ट डोळ्यासमोर येवू लागल्या. दुकानाच्या उद्घाटनादिवशी पुढंपुढं मिरवणारी आपल्या दुकानासाठी आवर्जून भेटवस्तू देणारी, नेहमी जवळीक साधणारी लीना त्याला फसवून गेली. खरंतर शांती ज्वेलर्स मधल्या घटनेनंतर त्याने शहाणं व्हायला हवं होतं. पण बाकी सर्वांचे दागिने तपासले तरी लीनाचे मात्र दागिने त्याने तपासले नव्हते. त्याला स्वत:च्या वागण्याचा मनस्वी राग येत होता. आपल्या हातून असं घडण्याचं कारण आपलं मन अजूनही कुठेतरी लीनाविषयी भावूक होतं. तो कसाबसा दुस-यादिवशी गावी परतला. त्याला राणीने सर्व हकीकत सांगितली. तक्रार केल्यामुळे त्याला सर्व दागिन्यांची रक्कम किंवा दागिने द्यावे अशी पोलिसांनी ऑर्डर काढली होती. राणीला तर पोलिसांनी चौकीत नेले होते परंतू राणीच्या भावाने तिला जामीन देवून आणले होते. प्रदीपने आपली चूक राणीला सांगितली. राणीने सर्व परिस्थिति पाहून कपाळावर हात मारून घेतला. स्त्रिया आपल्या दिसण्या, वागण्या, रहाण्याची भूरळ पाडून समोरच्याला मोहजाळात फसवून कशी फसवणूक करतात ते सांगितलं. कोणताच पुरावा प्रदीपच्या बाजूने नसल्यामुळे त्याला नुकसान भरपाई देण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रदीपला जबरदस्त अनुभव मिळाला होता. फसवणूक करून घेण्यास तो स्वत: ही तितकाच जबाबदार होता. राणीने घेतलेली रक्कम वजा जाता बरीच रक्कम द्यावी लागणार होती. प्रदीपचा मित्र रोहन वकील होता. त्याच्याकडून काही मदत होते का हे पाहून त्याला भेटून त्याची वेळ घेतली. रोहननेही या गुंत्यातून प्रदीपला बाहेर काढायचे ठरवले. आणि संपूर्ण केसचा अभ्यास करण्यास सुरवात केली. खरं प्रेम हे कधीही फसवणूक करत नाही. उलट त्याग, शांतपणा, समाधान, प्रियकराच्या सुखात आपलं सुख मानणं ह्यालाचं तर प्रेम म्हणतात. पण प्रेमाचं बाजारीकरण करून स्वार्थ साधणे कितपत योग्य याचा रोहन विचार करू लागला.