Kalpita Pawaskar

Drama Horror Thriller

4.6  

Kalpita Pawaskar

Drama Horror Thriller

माकडीण

माकडीण

14 mins
760


ती एक सुंदर शांत सकाळ होती. राजेश लवकर आंघोळ करून ऑफिसला जायची तयारी करत होता. शर्टाची कॉलर नीट करून ओल्या केसातून हात फिरवत त्याने आरशात स्वतःला पाहिलं. स्वतःच्या रुबाबदार, तडफदार व्यक्तिमत्वाकडे बघून त्याला स्वतःचाच फार अभिमान वाटला. आपल्याला हवं ते हव्या त्या किमतीला मिळवणं हि राजेशची फार जुनी सवय होती. शाळेतल्या कंपासपेटीपासून ते आत्ताच्या त्याच्या नोकरीतल्या बढती पर्यंत सगळ्याच गोष्टी त्याच्या मनासारख्याच झाल्या होत्या. किंबहुना त्याने त्या तशा करवून घेतल्या होत्या. अर्थात त्यात काही गैर आहे असं म्हणता येणार नाही. कारण महत्वाकांक्षी असणं हा काही गुन्हा नाही. राजेश पहिल्यापासूनच खूप महत्वाकांक्षी होता. त्याच्या वयाची इतर मुलं खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानायची, आनंदून जायची, आणि त्यातच रमायची. पण राजेशच समाधान मात्र त्या एका पायरीपुर्ता मर्यादित नव्हतं. त्याला एकदा का एक गोष्ट मिळाली कि तो लगेच पुढची गोष्ट मिळवण्याच्या मागे लागायचा. ज्याची इच्छा झाली ते मिळवणं एवढंच त्याला माहित होत. 

त्याने आरशात स्वतःकडे अभिमानाने पाहिलं आणि तो बॅग घ्यायला टेबलापाशी गेला. बॅगेतल सगळं सामान नीट आपल्याला हवं तसं आहे का ते त्याने पाहिलं. त्याची खात्री झाल्यावर त्याने नेहमी प्रमाणे पाकीट आणि रुमाल मागायला मृदुलाला हाक मारली. 

मृदुला अत्यंत सुंदर, मादक, आणि लाघवी स्त्री होती. कोणत्याही पुरुषाला स्त्री मध्ये जे काही हवं असत ते सार होतं तिच्यात. मृदुला आणि राजेश ची भेट कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे च्या दिवशी झाली. तसं राजेश ने तिला पहिल्या दिवशीच पाहिलं होतं. आणि तेव्हाच त्याने तिला मिळवायचा निश्चय केला. तिच्या मैत्रिणींशी ओळख काढ, त्यांना मदत कर, त्याच्या भवती आपलं नाव कस चर्चेत राहील ह्याची काळजी राजेश ने पुरेपूर घेतली होती. तिच्या मैत्रिणींकडून स्पोर्ट्स डे च्या दिवशी नेमबाजी चा सामना बघायला राजेश ने तिला तयार केलं होत. नेमबाजीत तो उत्कृष्ट होताच. आपल्या गुणांचा फायदा कसा आणि कोणत्यावेळी करून घ्यायचा याची कला राजेश ला चांगलीच अवगत होती. मृदुला ने राजेश ला तीर मारताना पाहिलं आणि राजेश चा मृदुलावरचा नेम अगदी अचूक लागला. मृदुला च्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि तिने त्याच्याशी ओळख करून घेतली. पुढे ती ओळख वाढत गेली आणि मृदुला राजेश च्या प्रेमात पडली. किंबहुना राजेशनेच तसं अगदी अचूक घडवून आणलं होत. मृदुला बड्या घरची मुलगी होती. तीच राहणीमान आपल्याला परवडण्यासारख नाही म्हणून राजेश च्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण राजेश ला मृदुला त्याच्या आयुष्यात हवी होती. आणि मनासारखं घडवून न आणेल तो राजेश कसला.. त्याने हट्टाने मृदुलाशी लग्न केलं आणि इथे पुण्यात तो सेटल झाला. भाड्याचं घर, स्वतःचा फ्लट, आणि आत्ता स्वतःच्या मालकीचा बंगला अशी त्याची प्रगती झाली होती. मृदुला ला तो काहीही कमी पडू देत नव्हता. तिचे कॉस्मेटिक, कपडे, पार्लर, पार्ट्या या सगळ्यासाठी तो तिला आर्थिक आणि मानसिक मोकळीक देत असे.

मृदुला त्याचं पाकीट आणि रुमाल घेऊन आली. त्याने ते बॅगेत ठेवलं इतक्यात मृदुलाने त्याला लाडिक आलिंगन दिलं आणि त्याच्या मानेला आपल्या ओठांचा स्पर्श केला. राजेश हसला आणि तिला म्हणाला, ‘बोला राणी सरकार.. कशासाठी हवेत पैसे..??’. त्यावर ती हसून म्हणाली, ‘संधाकाळी पार्लर मध्ये जायचंय.’ राजेश आश्चर्याने म्हणाला, ‘अग, चार दिवसांपूर्वीच तर जाऊन आलीस ना..?’. त्यावर लाडिक पणे मृदुला म्हणाली, ‘हो. पण उद्या पार्टी आहे. आणि हे माझ्या अंगावरचे केस बघितलेस किती वाढलेत..? हल्ली या केसांची ग्रोथ खूपच वाढलीये बाई.’ यावर राजेश हसून म्हणाला, ‘ वाढलेत तर वाढू देत की, मी तुला काही बोलणार नाही.’ यावर मृदुला थोडीशी खोटी रुसून म्हणाली, ‘बरोबर आहे रे.. आत्ता माझी पार्टी आहे म्हणून माझ्यावर विनोद करतोयस. पण हेच जर तुझ्या बॉस च्या पार्टीत जायचं असत तर नेलं असतस का मला अस..? म्हणे मी काही बोलणार नाही.. अरे तू काय तुझ्या आधी लोकच बोलले असते. ह्या राजेश ची बायको माकडीण आहे... माकडीण..’ यावर राजेश खूप हसला आणि त्याने तिला पाकिटातून पैसे काढून दिले. आणि तो ऑफिसला जायला निघाला.


५ जुलै २०००

   संध्याकाळचे ६ वाजले होते. मृदुला घरीच वाफ घेत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. मृदुलाने कामवालीला दर उघडायला सांगितलं. कामवालीने जस दार उघडलं तसा राजेश धावतच आत आला. कोणाला काहीच कळत नव्हतं. राजेश तिला ‘ पटकन तयार हो, मी फ्रेश होऊन आलोच’ म्हणाला आणि आपल्या रूम मध्ये निघून गेला. मृदुलाने सगळ सामान आवरलं आणि टॉवेल ने पाणी टिपत ती तिच्या रूम मध्ये आली. राजेश फ्रेश होऊन नुकताच बाहेर आला होता. मृदुला ला पाहून तो म्हणाला, ‘ अजून तयार नाही झालीस..? अग पटकन आवर आपल्याला माझ्या बॉस च्या घरी पार्टीला जायचंय.’ त्यावर मृदुलाने हि अचानक कसली पार्टी असा स्वाभाविक प्रश्न विचारला. त्यावर राजेश ने आपल्या कंपनीला एक मोठं काम मिळाल्याची बातमी मृदुलाला सांगितली. मृदुलाला आनंद झाला. पण ती थोडी विचारात पडली. आणि पटकन राजेश ला म्हणाली, ‘ ऐक ना.. मला पटकन पैसे दे मी आलेच जाऊन..’ त्यावर राजेशला हि आत्ता कुठे निघाली असा स्वाभाविक प्रश्न पडला. त्यावर मृदुला थोडी संकोचून म्हणाली, ‘ अरे.. मनिषाकडे जाऊन आले. एव्हाना सगळी पार्लर बंद झाली असतील ना.. तिची आणि माझी आत्ता चांगली मैत्री झालीये. ती मला घरीच पटकन करून देईल सगळं.’ ‘ अग पण आत्ता काय करायचय ??’ अस म्हटल्यावर मृदुलाने त्याला आपल्या हातापायावरचे केस दाखवले. ‘ इतक्या लवकर केस कसे वाढले..? काही दिवसांपूर्वीच करून आलीस ना वॅक्स..?’ राजेश गोंधळाला. त्यावर मृदुला म्हणाली, ‘ अरे कळत नाहीये मलाच काय होतंय ते. तुला म्हंटल ना मी मागे की हल्ली केसांची ग्रोथ खूप वाढली आहे.’ त्यावर राजेश तिला म्हणाला की, ‘ ठीके आत्ता जाऊन ये.. पण या पुढे जरा काळजी घेत जा.. हे अस सगळ ऐनवेळी नको.’ एवढ बोलून त्याने तिला पैसे दिले आणि ती निघून गेली.

७ जुलै २००० 

राजेश आज कामावर गेला नव्हता. मृदुलाची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती जरा उशिराच उठली. राजेशला घरी बघून ती आश्चर्यचकित झाली. त्यावर राजेशने तिला आज त्याचे खूप महत्वाचे पाहुणे घरी येणार असल्याचे सांगितलं. पण हे ऐकून सुद्धा मृदुलाचा चेहेरा काही फारसा आनंदी दिसत नव्हता. कसलीतरी मोठी चिंता तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती. राजेशने त्याबाबत विचारताच ती संकोचून गेली आणि तिने अंगावरचे कपडे थोडे बाजूला काढून राजेशला आपले हात आणि पाय दाखवले. तिच्या हातापायावरचे केस खूपच वाढले होते. एका पुरुषाच्या शरीरावर मृदुला चा चेहेरा बसवल्या प्रमाणे तिचे अवयव पुरुषी झाले होते. हे पाहून राजेशला आच्छर्य वाटले. त्याने मृदुलाला विचारले, ‘ अग दोन दिवसांपूर्वीच पार्लर ला जाऊन वॅक्स करून आली होतीसना..? मग इतक्यात कस काय झालं हे...?? तुला किती वेळा सांगितलंय नीट टापटीप राहत जा. आपल्याकडे आत्ता मोठमोठ्या लोकांची उठबस असणार आहे.’ हे ऐकून मृदुलाला एकदम रडूच कोसळल. ‘ आत्ता रडत बसू नका. त्या केसांचं काय ते बघा. आणि पुढच्या वेळी मला अशी लाज येऊ देऊ नका म्हणजे मिळवली. मी जातो पाहुण्यांना घेऊन बाहेर हॉटेलात. त्यांना हे अस ध्यान दाखवण्यापेक्षा आपणच आपली लाज राखलेली बरी. ’ एवढ बोलून राजेश रागारागातच तयार होऊन निघून गेला. जाताना तो मृदुलाशी एकही शब्द बोलला नाही. मृदुला नंतर संपूर्ण वेळ आपल्या खोलीतच रडत राहिली. तीच रडणं काही केल्या थांबत नव्हत. ती काहीही खातपीत नव्हती. शेवटी न राहवून तिची सगळ्यात जुनी आणि विश्वासू मोलकरीण उषा तिच्याजवळ आली. मृदुला रडून थकलेल्या डोळ्यांनी बेडवर बसली होती. एका शून्य नजरेने ती खिडकीतून बाहेर दूरवर पसरलेल्या जंगलाकडे बघत होती. उषा तिच्याजवळ आली. ‘ताई, अग अस काय करते. काहीतरी खाऊन घे. बघ बाय ऐक माझं.. असा जेवणावर राग काढू नये ग..’ उषाच्या बोलण्याचा मृदुलावर काहीही परिणाम होत नव्हता. इतक्यात राजेश घरी आला. त्याने मृदुला कडे बघितलं. आपल्या रागाव्ण्याच्या तिच्यावर खूपच परिणाम झाला आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होत. उषाने राजेश कडे बघितलं. त्याने हळूच तिला मृदुलासाठी जेवणाचं ताट भरून आणायला सांगितलं आणि तो मृदुला जवळ गेला. मृदुलाच अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हत. तो तिच्या जवळ जाऊन बसला. त्याने तिचा हात हातात घेतला तसं तिला भान आल.त्याने तिची माफी मागितली. ‘ मृदुला, आय नो मी खूप चुकीचा वागलो तुझ्याशी.. एवढ भडकायला नको होतं मी. पण तुझ्याकडून अशा अव्यवस्थित पणाची अपेक्षा नव्हती ग.. तूच बघ न जरा.. लग्नाआधी किती छान राहायचीस तू. आणि आत्ता हा असा हलगर्जीपणा बघितल्यावर भडकणार नाही का मी..?’ यावर मृदुलाने त्याच्याकडे बघितलं. इतकावेळ थांबवून ठेवलेलं सगळं एकदम दाटून आलं आणि ती म्हणाली, ‘ तुला काय वाटत ? मला आवडत हे असं राहायला? मी हे सगळं मुद्दाम केलं.? मला मज्जा वाटत होती का तुला असा त्रास देताना..?’ मृदुलाने प्रश्नाचा भाडीमार सुरु केला. राजेश सगळ्या प्रश्नाची नकारार्थी मान डोलावून उत्तरे देत होता. शेवटी मृदुलाच म्हणाली, ‘ राजेश अरे विचार कर ना.. मी हे मुद्दाम करेन का..?? मला खरच कळत नाहीये हे अस का होतंय. माझा मलाच खूप त्रास होतोय रे..आणि त्यात तू मला अस बोलल्यावर रडू नाही येणार का मला...??’ राजेश ने मृदुला कडे एक नजर बघितलं. जणू त्या एका नजरेत त्याला मृदुलाच्या सगळ्या वेदना कळल्या होत्या. त्याने तिचा हात घट्ट पकडला, ‘ तू नको काळजी करूस.. आत्ता मी आहे ना तुझ्यासोबत.. आपण मोठमोठे डॉक्टर करू, ते सांगतील ते उपाय करू.. पण पुन्हा मी तुला असं रडू नाही देणार..’ हे ऐकून मृदुला ने राजेश ला मिठी मारली. आत्ता जणू तिच्या मनातली सगळी वादळ शमली होती.

१० जुलै २००० 

रात्रीचे ८ वाजले होते. राजेश आणि मृदुला नुकतेच थकून घरी आले होते. रमा ने त्यांना पाणी दिलं आणि ती जेवण गरम करायला निघून गेली. मृदुला डोक्याला हात लाऊन बसली होती. राजेश तिच्या शेजारी जाऊन बसला आणि तिची समजूत काढू लागला, ‘ मृदू.. अशी उदास नको होऊस.. आपलं ठरलंय ना नाही रडायचं...’ मृदुला ने राजेश कडे पाहिलं. तिच्या डोळ्यात सत्य परिस्थीची जाणीव स्पष्ट दिसत होती. राजेश तरीही तिची समजूत काढू पाहत होता. ‘ अग एका डॉक्टरने उपाय नाही म्हंटल म्हणून काय झालं.. आपण दुसऱ्या डॉक्टर कडे जाऊ...होईल सगळ व्यवस्थित..’ हे ऐकून मृदुलाने राजेश चा हात पकडला . ‘नक्की होईल ना सगळं व्यवस्थित..??’ राजेशने तिला धीर दिला आणि तिला जेवायला घेऊन गेला.

१५ जुलै २००० 

मृदुलाने अंगभर कपडे घातले होते. तिच्या शरीरावरचे केस आत्ता प्रमाणाबाहेर वाढले होते. डोळ्याखालची चिंतेची वर्तुळ स्पष्ट दिसत होती. जणू आत्ता तिच्या अंगातली सगळी ताकद संपली होती. निरस चेहेऱ्याने खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या दाट जंगलाकडे ती पाहत होती. जंगल आज जरा जास्तच दाट दिसत होत. त्यात पावसाचे दिवस.. त्यामुळे वातावरणात उदासीनता जास्तच जाणवत होती. मृदुलाच्या डोळ्यात आत्ता कसलीच आशा दिसत नव्हती. आशा दिसणार तरी कशी..? कारण गेल्या ८ दिवसात ती ज्या ज्या डॉक्टरांना भेटली त्या प्रत्येकाने तिच्या पदरात नकारच टाकला होता. ती सामान्य विचारांची चारचौघींसारखी बाई असती तर कदाचित ह्या प्रकारचा तिला फारसा फरक पडला नसता. पण मृदुला तशी नव्हती. तिला टापटीप राहायला, सुंदर दिसायला खूप आवडायचं. जगात सगळ्यात जास्त काळजी ती स्वतःची घ्यायची. रोज आरश्यासमोर आपण कालपेक्षा जास्त सुंदर कसे दिसू; याचाच विचार ती करायची. पण आत्ताशा साध आरसा असलेल्या खोलीत जायची पण तिची हिंमत होत नव्हती. स्वतःच्या खोलीतले सगळे आरसे तिने बाहेर काढले होते. जे काढता आले नाहीत त्यांची तोंडं दुसऱ्या दिशेने वळवली होती. गेल्या दोन दिवसापासून ती अशीच निपचित, उघड्या खिडकीतून दाट जंगलाकडे निरस डोळ्यांनी पाहत पडून होती. 

   उषा ज्यूस चा ग्लास घेऊन खोलीत आली. मृदुलाला तीच अस्तित्व जाणवलं सुद्धा नाही. मृदुलाला हाक मारायची उषाला जरा भीतीच वाटली. तिने खोलीतच असलेल्या राजेशकडे पाहिलं. तो मृदुलाच्या प्रोब्लेमवर इंटरनेटवर काही सोल्युशन मिळतंय का ते पाहत होता. उषा त्याच्या टेबलापाशी गेली तिने ज्यूस चा ग्लास त्याच्या टेबलावर ठेवला. तसं राजेशच लक्ष तिच्याकडे गेलं. तिने इशाऱ्यानेच ते ज्यूस मृदुलाला द्यायला सांगितलं आणि ती निघून गेली.

   राजेशने एकदा मृदुलाकडे पाहिलं. त्याला तिची अवस्था कळत होती. पण कदाचित पहिल्यांदाच त्याला परिस्थिती स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेण जमत नव्हत. मृदुलाकडे बघून तर त्याची अस्वस्थता अजूनच वाढली. घडणारा प्रकार काय आहे.. त्याचं नेमकं कारण काय आहे.. काहीच कळत नव्हत. डॉक्टर ब्युटीशीअन सगळ्यांचे सल्ले घेऊन झाले होते. पण उत्तर मात्र कोणाकडेच नव्हत. कोणताच मार्ग दिसत नव्हता पण परिस्थिती सांभाळण गरजेचं होतं. 

   राजेश उठला. त्याने ज्युसचा ग्लास हातात घेतला आणि तो हलक्या पावलांनी मृदुलाच्या शेजारी जाऊन बसला. पण मृदुलाला त्याच भानच नव्हतं. ती निरस डोळ्यांनी खिडकीतून बाहेर बघत होती. राजेशने तिचा हात हातात घेतला. त्याचा स्पर्श झाल्यावर मृदुलाने नजर त्याच्याकडे वळवली. तिच्या डोळ्यातले प्रश्न आणि तिची हतबलता बघून राजेशला अजूनच हरल्यासारखं वाटू लागलं. त्याने तिला मिठी मारली. पण ती मात्र मिठीतही निश्चलचं होती. हे बघून राजेशचा धीर अजूनच खचला. त्याने तिला भानावर आणण्यासाठी जोरात हलवलं. ‘मृदुला.. बोल काहीतरी... अशी शांत नको राहूस.. बघ माझ्याकडे... होईल सगळं ठीक..’ तो जमेल त्या पद्धतीने तिला बोलत करण्याचा प्रयत्न करत होता पण मृदुलावर त्याचा परिणामच होत नव्हता. ‘माझे सगळे प्रयत्न आत्ता संपलेत.. आत्ता तू म्हणशील ते करण्या पलीकडे माझ्या हातात काहीच नाही..’ मृदुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून राजेश थक्कच झाला. त्याने तिच्याकडे पाहिलं पण ती त्याच्याशी बोलतच नव्हती. राजेशने मृदुलाला पुन्हा जोरदार झटका दिला तशी ती थोडी भानावर आली. राजेश ने तिला तिच्या बोलण्याबद्दल विचारलं आणि खिडकीतून सतत बाहेर काय बघत असतेस अस विचारल्यावर मृदुलाच्या निरस डोळ्यात भीती दाटू लागली. ‘मला माझीच भीती वाटतेय राजेश..’ मृदुला बोलत होती, ‘मला सतत असं वाटतय की मी या खिडकीतून बाहेर उडी मारावी.. मी ओढली जातेय बाहेर.’ हे ऐकून राजेशने तिचा चेहेरा आपल्या हातात घेतला आणि तिला म्हणाला, ‘ असे भलते सलते विचार नाही करायचे. मी आहे ना..’

२० जुलै २००० 

राजेश च घर तसं रिकामच होत. रमा स्वयंपाकघरात काम करत होती आणि उषा वरच्या खोलीत मृदुला जवळ होती. राजेश दिवाणखान्यात घरच्या टेलीफोनवर त्याच्या अमेरिकेतल्या सायकोलोजीस्ट मित्राशी बोलत होता. गेल्या काही दिवसात अजून काही तज्ञांचे सल्ले घेऊन झाले होते पण परिस्थिती मात्र जैसे थे.. मृदुला तर आत्ता बोलेनाशीच झाली होती. शरीराचे सोपस्कार म्हणून दोन घास खाल्ले तर खाल्ले नाहीतर नाहीच. बाकी तिच्या असण्याला अर्थ असा काही उरला नव्हता. दिवस रात्र बेडवर पडून खिडकीतून बाहेर बघत असायची ती. राजेश चे प्रयत्न मात्र सुरु होते. ‘ क्या से क्या’ झालेल्या बायकोची काळजी तर होतीच, पण त्याहीपेक्षा जास्त स्वतःच हरणं त्याला सलत होतं. त्याने मित्राला फोन लावला आणि इथली सगळी परिस्थिती अगदी नीट समजावली. त्यावर मित्र म्हणाला, ‘ हे बघ राजेश, मेडिकल सायन्स आत्ता पुढे गेलंय. यावर काहीतरी उपाय नक्कीच असेल. माझे इथले काही डॉक्टर मित्र आहेत त्यांच्याशी मी वहिनींची केस डिस्कस करतो आणि तुला कळवतो. पण तोपर्यंत तुला खूप महत्वाचं काम करावं लागेल. हे बघ, कोणतही औषध मानवी शरीरावर तेव्हाच काम करू शकत जेव्हा त्या माणसाची बर होण्याची इच्छा असेल. या सगळ्या प्रकारामुळे वाहिनी खूप खाचल्यात. त्यांना तुला सावरायला हव. तू म्हणालास तसं त्यांना सुंदर दिसायला खूप आवडतं, मग तू त्यांना ही जाणीव करून दे कि ह्याही अवस्थेत त्या तुला सुंदर दिसतायत. तुझं प्रेम अजूनही कमी झालेलं नाहीये. मला माहितीये हे खूप कठीण आहे. पण तू नक्कीच करू शकशील.’ एवढं बोलून त्याने फोन ठेवला. राजेशच्या नजरेत कदाचित हा शेवटचा मार्ग होता. त्याने विचार केला आणि मनात काहीतरी ठरवून तो स्वतःच्या खोलीकडे जाऊ लागला....


१९ जुलै १९९० 

राजेश साठी आज खूप आनंदाचा दिवस होता. शाळेतल्या नेमबाजी स्पर्धेत तो पहिला आला होता. सगळे मित्र त्याचं टाळ्या वाजवून कौतुक करत होते. पण राजेशला आनंद वेगळ्याच गोष्टीचा होता. काही महिन्यांपूर्वी राजेश आणि त्याच्या मित्रांमध्ये नेमबाजी ची स्पर्धा लागली होती. त्यावेळी राजेशचा नेम चांगला नव्हता. त्याने जिंकायचा खूप प्रयत्न केला पण तो हरला म्हणून ह्याच मित्रांनी त्याची खूप खिल्ली उडवली होती. त्यानंतर राजेशने नेमबाजीचा ध्यासच घेतला. कारण हरण राजेशला मान्यच नव्हत. तो दिवस रात्र नेम लावायचा सराव करू लागला. जणू त्याला कोणी झपाटलं होत. तहान भूक आराम सगळं विसरून तो सराव करू लागला. आणि त्याचा परिणाम म्हणून आज तो नेमबाजी स्पर्धेत पहिला आला होता. सगळ्या मित्रांनी घरच्यांनी शिक्षकांनी त्याच्या या यशाचं कौतुक केलं. पण एवढ्यावर समाधान मानेल तो राजेश कसला.. त्याला ह्याहीपेक्षा जास्त तरबेज व्हायचं होत. 


२० जुलै १९९० 

नेमबाजीत अजून तरबेज व्हायचं राजेशने मनावर तर घेतलं होतं पण आत्ता प्रश्न हा होता की हा सराव तो करणार कशावर होता? याचाच विचार करत राजेश घराजवळच्या वनराईत बसला होता. त्याला काहीच सुचत नव्हत कारण झाडावरची पानं फुलं, भिंती, दगड या सगळ्यावर नेम लावण्यात तो आत्ता माहीर झाला होता. पण त्याला आत्ता पुढची पातळी गाठायची होती. नेमकं काय कराव त्याला कळत नव्हतं. इतक्यात त्याचं लक्ष झाड्यांच्या फांद्यांवरून इकडे तिकडे झपझप उद्या मारणाऱ्या माकडांच्या जोडीकडे गेलं. डोळ्याची पापणी लवायच्या आत ते ह्या फांदीवरून त्या फांदीवर जात होते. राजेशला त्याचा पुढचा टप्पा सापडला. त्याने सरावाला सुरुवात केली.

   सकाळची संध्याकाळ झाली. राजेशचा सराव सुरूच होता. आत्ता जणू तो त्या माकडांना स्वस्थ बसूच देत नव्हता. सतत उद्या मारून मारून माकडीण थकली होती. माकड आणि माकडीण चित्कारत होते. पण राजेश काहीच समजण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त त्याचं धेय्य दिसत होत. त्याचं दगड मारण सुरूच होतं. माकडांना काय कराव ते कळत नव्हतं. तेव्हा त्यातल्या माकडाने राजेशला हुलकावणी देत दुसऱ्या फांदीवर उडी मारली. राजेशला ते रुचलं नाही. त्याने त्या माकडावर दगडांचा भडीमार सुरु केला. ते माकड प्रत्येक दगड चुकवत शिताफीने उद्या मारत होतं. राजेश आत्ता इरेलाच पेटला होता. त्याचा राग आत्ता अनावर होत होता. इतक्यात त्याचं लक्ष सगळ्यापासून दूर फांदीवर नुकत्याच विसावलेल्या माकडीणीकडे गेलं. त्याने माकडाला हूल दिली आणि त्याला काही कळायच्या आत एक मोठ्ठासा दगड जोराने माकडीणीच्या दिशेने भिरकावला. माकडीण पाठमोरी असल्यामुळे तिचं लक्ष नव्हत. माकडाने काही करायच्या आत तो दगड वेगाने माकडीणीच्या डोक्याला जाऊन लागला. माकडीण खाली पडली तसा राजेश घाबरला. काय कराव त्याला काही कळत नव्हतं. ते माकड पण खाली आलं. आणि राजेश कडे बघून जोरजोरात आवाज करू लागलं. राजेश आत्ता पुरता घाबरला होता. त्याने जवळच असलेला एक मोठा दगड उचलला आणि सगळे त्राण एकवटून त्या माकडाच्या दिशेने फेकला. ते बघून माकडाने जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढला पण जखमेमुळे माकडीण तिथून पळू शकली नाही. तो दगड नेमका जाऊन माकडीणीवर पडला. आणि सगळीकडे रक्ताचे थारोळे उडले. राजेश बिथरला आणि त्याने मागे वळूनही न बघता सरळ घराच्या दिशेने पळ काढला.

२० जुलै २००० 

राजेश आपल्या खोलीत आला. मृदुला तशीच बेडवर पडून होती. त्याने उशाला खाली जायचा इशारा केला. उषा खाली निघून गेली. तो मृदुलाच्या शेजारी जाऊन बसला. त्याने तिच्या अंगावरच पांघरूण बाजूला केलं. तिच्या केसाळ चेहेऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. मृदुलाने त्याच्याकडे बघितलं. तिला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसत होत. त्याने तिच्या शरीरावरची सगळी आवरणं हळूहळू मोकळी केली. आणि तो तिच्या पांघरुणात शिरला. तो सर्वार्थाने तिला ती सुंदर असल्याची जाणीव करून देत होता. ती मात्र तशीच भावना शून्य होती. त्याने प्रयत्न सोडले नाहीत.

   या गोष्टीला जवळ जवळ अर्धा तास उलटून गेला. मृदुला काहीच प्रतिसाद देत नव्हती. राजेश थांबला. त्याने तिला मिठीत घेतलं आणि तो विचार करू लागला. थोड्यावेळाने त्याला कसलातरी आवाज आला. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला काहीच दिसलं नाही. पुन्हा आवाज आला. राजेशच्या लक्षात आलं कि मृदुलाला काहीतरी होतंय. त्याने तिला बसवलं. ती श्वास लागल्यासारखं करत होती. विव्हळत होती. तिला काय होतंय काहीच कळत नव्हतं. राजेश उठला आणि बाजूला ठेवलेल्या भांड्यातून ग्लासात पाणी आणायला गेला. मृदुलाकडे त्याची पाठ होती. पण तिला धीर देण्यासाठी तो तिच्याशी बोलत होता. ‘ मृदुला.. थांब.. काहीही होणार नाहीये.. मी पाणी आणतो. ते पी.. तुला बर वाटेल..’ एवढ बोलून राजेश मागे वळला आणि त्याच्या हातातून ग्लासच खाली निसटला. कारण बेडवर मृदुला नव्हतीच. त्याने खोलीत सगळीकडे शोधलं पण त्याला ती कुठेच दिसली नाही. तो घाबरला. त्याला पुन्हा तो मगाससारखाच आवाज आला. आत्ता मात्र तो आवाज खिडकीबाहेरून येत होता. त्याने खिडकीच्या दिशेने पाहिलं. त्याला समोरच्या फांदीवर एक माकड बसलेलं दिसलं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने अजून पुढे जाऊन पाहिलं आणि तो हबकलाच. कारण त्या माकडाशेजारी मृदुला बसलेली त्याला दिसली. ती आत्ता माणसात राहिली नव्हती. अंगावरच्या केसांनी तीच रूप पूर्णपणे झाकून टाकलं होतं. ती आत्ता खरोखरचीच माकडीण झाली होती. तिच्या शेजारचं माकड राजेशकडे बघून हसतंय अस वाटत होत. आणि राजेश ठरवूनही काही करू शकत नव्हता.


Rate this content
Log in

More marathi story from Kalpita Pawaskar

Similar marathi story from Drama