माकड
माकड


छे छे! तरी माकडांना कळतं हो. माणूस शेवटी कोण? माकडच. विशिष्ट प्रकारचा. जो इकडून तिकडं उड्या मारत असतो. त्याचं कामच आहे उड्या मारणे. पण शेपूट नाही म्हंटल्यावर माणूस व माकड शेम टू शेम कसं म्हणायचं.
अशीच तीन माकडं आमच्या गच्चीवर चढली होती. गच्चीवर पापड वाळायला घातले होते. मी गडबड केली व माकडांना हाकलून लावण्यासाठी जिना चढत वर गेलो. अलगदपणे दरवाजा उघडला. पाहतो तर काय? पापडांचा सत्यानाश, वाटोळं अन सुपडा साप एकदाचा. आईने मला सांगितलं होतं की नीट लक्ष दे, मी गिरणीला जाऊन येते. त्या टीव्हीच्या नादात मी विसरलो असेन. नाही नाही मीच आळशी बनलोय. तरी आमचा बंटी दादा पण घरीच आहे. चला त्याच्यावर ढकलून देऊ व मोकळे होऊ. तेवढ्याच आईच्या शिव्या खायला नाही लागणार.
"हुप्प.. हुप्प..." नारळाच्या झाडावर चढून एक माकड आवाज करीत होता. इतर दोन माकड टेरिसवरच होते. एका माकडाने फडक्यात पापड भरून घेतला होता. झोळी घेऊन तो फरार होऊ लागला. झाडावरील माकड जणू तिसऱ्या माकडाला खुणावत होता. "बघ... तो सारे पापड घेवून चाललाय.. बघ "
इतक्यात माझे कान एका विशिष्ट आवाजाकडे एकवटले गेले. आमच्या घरापासून काही अंतरावरच शाळा आहे. माईकवर कोणी मुलगी भाषण करीत होती. अरे देवा! आज २ ऑक्टोम्बर ना! म्हणूनच म्हटलं, आज बापूची कशी आठवण आली. आणि काय ते तीन माकडे असा शब्द ही कानी पडला.
"एक... दोन... आणि हा.. तीन " झाली हि गांधीजींची तीन माकडं. मी समोरील माकडांकडे पाहून म्हणू लागलो. पण गांधीजींची माकडे या मर्कटांसारखी लुटारू नव्हती. तसेच त्या दुसऱ्या माकडासारखे चोर नव्हते. आली ही म्हणे गांधीजींची तीन माकडे. ही तर बिनअकली बंदर आहेत, मूर्ख कुटचे. मी जरा जास्तच बोलत होतो. कारण त्यांनी माझ्या घरचे पापड चोरले होते. मी माझ्या बचावासाठी उपाययोजना करीत होतो. कोणीतरी बेल मारला. मी पटकन खालती गेलो. पिग्मीवाला पिंटूदादा होता. नंतर परत घाईघाईतच वर आलो.
पाहतो तर काय... "बाप रे!" सगळे पापड आधीसारखे होते. एकदम व्यवस्थित. तिथे ना माकड होते ना इतर कोणी. मी स्वप्न तरी पाहत नव्हतो ना? असं कस होऊ शकतं पण? जस्ट आताच यार तीन माकडे होती इथे. मी सहजच थोडा पुढे गेलो. एका दूरवरच्या वडाच्या झाडावर तीन माकडे बसली होती. एकदम शांत, निवांत. जणू तिघे हि मित्र असावेत. त्यांनाही माझ्यासारखा बापूंचा स्मरण झाला असावा. फक्त इथे नो वाईट... नो वाईट... नो वाईट... असं त्यांनी ठरवलं असावं. शेवटी प्राणीच ते. त्यांना काय कळायचं यातलं. पण काही वेळापूर्वी नको ते म्हणणाऱ्या मला त्यांचा आता का एवढा पुळका यावा? आम्ही हो ऑफकोर्स माणसे आहोत. पण खरी माणसे कोण? मी ठरवलं होतं की सारं आरोप बंटी दादावर ढकलून मोकळं व्हायचं. म्हणजे खोटं बोलायचं. मी याच विचारांत गुंग झालो होतो. एक मंजुळ अशी हवा माझ्याशी बोलत होती. सांगत होती की, तू माणूस आहेस, उड्या मारणार इकडून तिकडे. आणि समोरील तीन माकडं आहेत, ते सुद्धा उड्या मारणारे! आणि मी याच विचारांत हसू लागलो... जोरजोराने!