माझी सेवापूर्ती...
माझी सेवापूर्ती...
आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्वागत आणि आभार.
एक घरचे कुटुंब आणि दुसरे येथील कुटुंब.
आजचा हा कार्यक्रम पाहून माझं मन गहिवरून आले.
आणि उद्यापासून मी सेवेतून निवृत्त होत आहे याची मला जाणीव झाली. उद्यापासून मी जरी या सेवेतून निवृत्त होत असलो तरी परवापासून एका नवीन सेवेत रुजू होणार आहे.
ती सेवा म्हणजे हाऊस हसबंड...
काल मी तिला म्हणालो...
आता माझी रिटायरमेंट उद्यावर आली,
तू त्यासाठी काय काय तयारी केली.
त्यावर ती मला म्हणाली...
माझ्याही रिटायरमेंटची व्यवस्था झालीय,
बदली कामगार अगोदरच बघून ठेवलीय.
माझ्या मनाने तर धसकाच घेतला,
हिला पेंशन अन तिला पगार द्यायचा कुठला.
वरुन म्हणते सुनबाई आणू घरात,
अन जावई उभा करू दारात.
ग्रॅज्युइटी च्या पैशाने लगीन लावू,
पी एफ च्या पैशात फ्लॅटच घेऊ.
मी म्हणालो...
आयुष्यभराची कमाई अशीच वाटून टाकणार!
अन म्हातारपणी काय भीक मागत फिरणार?
असो...
हा एक विनोदाचा भाग झाला.
माझ्या जीवनावरती ज्यांचा प्रभाव आहे अशा काही व्यक्तींविषयी मी आपणास सांगणार आहे.
ज्यांच्यामुळे आज मी या जगामध्ये आहे त्या व्यक्ती आई शांताबाई आणि वडील शिवराम.
माझा लहानपणीचा मित्र शरद जगदाळे ज्याच्याबरोबर १ ली ते १० वी पर्यंत स्पर्धा करुन अभ्यास केला आणि मी हुशार झालो.
( कोणी म्हणो अथवा ना म्हणो मी तरी मला हुशार म्हणून घेतो.)
माझे उच्च शिक्षण हे पार पाडणारे माझे वडील बंधू सुंदरदास.
त्यानंतर मला नोकरी नसतानाही जिने माझ्याशी विवाह करून माझ्याबरोबर आज तागायत कोणत्याही प्रकारची तक्रार न करता खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढणारी माझी धर्मपत्नी म्हणजेच सुनिता.
नंतर नोकरीत दाखल करून घेण्यासाठी ज्यांनी माझी मुलाखत घेतली आणि माझी निवड केली ते सुधाकरजी प्रभू.
मी प्रथम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे काम चालू केले त्या मुख्याध्यापिका कै. शर्वरी लोकापुरे मॅडम
आज सुपरवायझर या पोस्ट वरती मी काम करत आहे ते ज्यांच्यामुळे शक्य झाले त्या श्रद्धा येरोळकर मॅडम
आणि आज मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून नोकरीतून निवृत्त होत आहे त्या मुख्याध्यापिका सौ. सुलभा देशमुख मॅडम.
माझी दोन्ही मुले सुआकांत आणि सलोनी. माझे खूप काही मित्र आणि मैत्रिणी, नातेवाईक...
म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या जीवनावरती जन्मापासून आजपर्यंत ज्यांचं सहकार्य लाभलं ज्यांच्यामुळे मी घडलो त्या व्यक्ती म्हणजेच एस या इंग्रजी आद्याक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या आहेत.
जीवनाच्या शेवटपर्यंत अशाच एस व्यक्तींचे आणि इतर सर्वांचेच सहकार्य, आशीर्वाद लाभावेत हीच अपेक्षा.
म्हणूनच अशा या माझ्या जीवनात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आलेल्या सर्व व्यक्तींना माझा मानाचा मुजरा.
चला शाळेविषयी बोलायचे झाले तर शाळेने शिक्षक वर्गाला
प्रोत्साहित करण्यासाठी अथवा पुढील पिढीला माहिती होण्यासाठी
शाळेला लाभलेले मुख्याध्यापक यांच्या नावाचा फलक लावण्यात यावा अन्यथा पुढील पिढीला त्याचे शोधकार्य करावे लागेल.
1 मे २०२५ ला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला तसा शाळेनेही करायला हरकत नाही.
मुख्याध्यापकांबरोबरच आदर्श शिक्षकांनाही बोलावण्यास काही हरकत नाही.
( मला बोलवा असं मी म्हणत नाही गैरसमज नसावा.)
शिक्षकांबद्दल बोलायचे तर
शिक्षकांनी अगोदर आव्हान स्वीकारले पाहिजे आणि नंतर त्यावर पर्याय शोधावेत.
पाण्यात पडल्याशिवाय पोहायला कसे काय येईल.
एकदा पाण्यात पडले की आपोआप हातपाय हलवायला सुरुवात होते.
आपण दुसऱ्यांना कधीच कमी लेखू नये आणि स्वतःलाही.
नेहमी म्हणत रहावे की
"हम भी किसी से कम नहीं "।
प्रायमरी विभागातील सर्व शिक्षक मला नेहमी म्हणतात की सर्वांचे लक्ष फक्त आपल्याकडेच का असते.
मी त्यांना सांगतो की आपण चुकतो म्हणून सर्वांचे लक्ष आपल्याकडे असते, आणि चुकतो कोण तर जो करतो तोच चुकतो.
न करणाऱ्यांचा चुकण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यांच्याकडे कोणी पहात नाही. म्हणजेच आपण काम करतो म्हणून सर्वांचे आपल्याकडे लक्ष असते.
असो...
माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांना मी कधी चुकून किंवा अनावधानाने बोललो असेल ओरडलो असेल तर क्षमा असावी.
आणि आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. 🙏
जाता जाता मी एवढेच म्हणेन
उद्यापासून असेल देहाने
जरी मी घरी,
मनाने मात्र शाळेतच तरी.
अर्ध आयुष्य शिकण्यात गेलं,
अर्ध आयुष्य शिकवण्यात गेलं.
उरलं सुरलं आठवणीत जाईल,
आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने सुखी राहील. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो.
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय विश्वकर्मा
