लग्न म्हणजे
लग्न म्हणजे
लग्न म्हणजे "शादी का लड्डू, जो खाये ओ पछताये, और जो ना खाये ओ भी पछताये।" असे म्हटले जाते.
पण मी मात्र यांपैकी नाही. लग्न म्हणजे काय तर दोन घराण्याची जवळीक निर्माण होणे. दोन मनांचे मिलन होणे. एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, आकर्षण, जिव्हाळा यासारखी नाती निर्माण होणे.
लग्नाला किती वर्षे पूर्ण झाली हे महत्त्वाचे नसून आजपर्यंत कधीही लग्न केल्याचा पश्चात्ताप करायची वेळ माझ्यावर आली नाही हे महत्त्वाचे आहे. उलट लग्न करून मी सुखीच आहे. याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त पत्नीलाच जाते. कारण तीने माझ्यावर विश्वास ठेवून, जन्मदात्यांना सोडून ती माझ्या घरी आली. कधीही कोणत्याच प्रकारची तक्रार न करता असेल तशा परिस्थितीत राहून मला सहकार्य केले. ती स्वतः कमावती नसली तरी गॄहिणी म्हणून तीने तीचे संसाराच्या रंगभूमीवरील पात्र उत्तम रितीने सांभाळले आहे.
पत्नी म्हणजे पतीची अर्धांगिनी असते. सुख दुःखात दोघेही नेहमी एकमेकांच्या सोबत असतात. तशीच ती माझ्या जीवनात माझी सावली बनून नेहमीच माझ्या सोबत राहिली आहे. म्हणतात ना उजेड नाहीसा झाला की स्वतःची सावलीही साथ सोडून जाते. पण तीने मला अंधारातही साथ दिली.
पत्नी ही घरची लक्ष्मी असते, आणि मी देखील तीला घरातील लक्ष्मीचा दर्जा दिला आहे.
अशा या माझ्या पत्नीला म्हणजेच लक्ष्मीला शतशः प्रणाम.
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तीची साथ मिळावी आणि यासाठी तीला दीर्घायुष्य लाभावे हीच आजच्या या शुभदिनी ईश्वरचरणी प्रार्थना.
आपलाच सुखी पती...