Sanjay D. Gorade

Drama Others

4  

Sanjay D. Gorade

Drama Others

माझी हिरकणी

माझी हिरकणी

8 mins
336


गावाहून भावाचा फोन आला, म्हणे दिमाखी वारली. ऐकून नकळत डोळे भरून आले होते. दिमाखी आमची गाय, मामांनी आईला आंदण म्हणून दिलेल्या हरणीचं शेवटचं इत, अन आमच्या गोठ्यातील शेवटचं जनावर. कधीकाळी वडील तिचं धारोष्ण दुध काढायचे आणि सकाळी-सकळी आम्हा भावंडांना एकेक पेला भरून प्यायला द्यायचे. फेसाळलेला तो पांढर्‍याशुभ्र दुधाचा पेला हाताला सकाळच्या बोचर्‍या थंडीत मस्त गरम लागायचा. एका दमात पेलाभर दुध प्यायले की अंगात एक वेगळीच शक्ती संचारत होती. जिच्या दुधाने आईइतकेच माझ्या शरीराचे भरणपोषण केले होते. त्या दाईमाचे शेवटचे दर्शन घेण्याचेही कष्ट मी घेऊ नये हे खरेच संवेदनशील माणसाचे लक्षण आहे का ? स्वतःला प्रश्न करताच माझी मान झुकली होती. 


गावाला गेलो तेव्हा दिमाखीची आवर्जून चौकशी केली, शेताच्या कडेला हळकुंडी ओहोळाच्या बाजूला एक मोठा खड्डा खोदून त्यात तिला विधिवत पुरले होते. तिच्या समाधीचे दर्शन घेताच मनात आठवणींचा गहिवर आला होता.       


साधारण चौथीला असेल आमच्या मामांनी आम्हाला एक गाय दिली होती, त्यांनी आईला आंदण म्हणून एक गाय देण्याचं कबूल केले होते. तिच्या हायातीत तिने आंदणाची गाय आणली नव्हती. आम्ही थोडे कर्ते झालेलो पाहून मामांनी खूपच आग्रह केला, तेव्हा मी जाऊन एक गाय घेऊन आलो होतो. मामांच्या घरी त्या गाईचे काय नाव होते माहित नव्हते. आम्ही भावडांनी मात्र त्या गाईचे नाव हरणी ठेवले होते. कित्येक वर्षांचा ओस पडलेला गोठा तिच्या आगमनाने भरला होता. कळायला लागल्यापासून माझ्या पाहण्यातील हरणी आमच्या गोठ्यातले तरी पहिलेच जनावर होते. लहान बहीण सुनिता आणि मी सकाळ-संध्याकाळ तिच्यासाठी गवताचा भारा आणायचो. इतरांसारखी आमच्याकडेही गाय आहे म्हणून हौसेने शेतात जाऊन तिला चारा घेऊन यायचो आणि पाणी पाजायचो.  


ती दिसायलाही हरणासारखीच होती. तिचे शिंगे खिल्लारी होते, रंग विटकरी तांबडा होता, डोक्यावर गोल चंद्रासारखा बारीक ठिबका होता. तिचा शेपटीच्या केसांचा झुपका मस्त काळाभोर होता. तिचा रुबाब पाहून कोणत्याही शेतकर्‍याला ती आपल्या गोठ्यात असावी असे वाटले नसते तर नवलच होते. आम्हाला कौतुक असलेल्या हरणीची एक खोड मात्र खूप विचित्र होती. तिला ओहोळावर पाणी पाजायला नेले की ती हाताला हिसडा देऊन उदाळायची नाहीतर शेतात चरायला बांधलेली असताना दोर तोडून किंवा खुंटा उपटून पळायची. तिला पकडण्यासाठी मागे लागले की ; ती हाती लागता लागायची नाही. तिला आम्हाला थकविण्यात बहुतेक मौज वाटत असावी. तिचा दावे हातात घट्ट पकडून ठेवलेले असताना तिने कितीतरी वेळेस आमचा फरपटगाडा केला होता, आव्हान द्यावे तसे ती कुणाच्याही उभ्या पिकातून बेदाकारपणे तुडवत पळायची, आम्ही भावंड ती पकडताना अक्षरशः रडकुंडीला येत होतो. ज्या शेतमालकाच्या पिकाचे नुकसान झाले ; त्याचे बोलणे खात होतो. वैतागल्याभ्याणं या गाईला पुन्हा मामांच्या घरी सोडून यावे असेही वाटे.  

भाऊबंदकीतील एका जणाच्या पिकाचे असेच नुकसान करताच खूप मोठा कज्जा झाला होता. त्याचा राग मनात धरून मी हरणीला सुताच्या जाड कासर्‍याने खुंट्याला पक्के बांधले होते व मनगटागत जाड वेताच्या काठीने मारमार मारले होते. सुटणे अशक्य आहे पाहून अखेर तिने पुढच्या पायाच्या दोन्ही खुरा जुळवत शरण आल्यागत खाली बसून घेतले. माझ्या अंगात वेताळाचा संचार झाला होता. बेफाम झाल्याने माझ्या असुरी मार सहन न झाल्याने तिला अक्षरशः तव आली असावी. तिने हात जोडल्यागत पुढच्या पायांच्या खुरा जोडलेल्या पाहून मनात धुमसत असलेल्या रागाचा पारा क्षणात शून्यावर आला होता. अनावर झालेला संताप हातातली काठी अंघोळीच्या दगडावर आपटून मोडत मी शांत केला होता. मी घरात निघून गेलो तरी ती धास्तावल्यागत उघड्या दरवाजाकडे कितीतरी वेळ पाहत होती.  


हरणीला माझी एवढी दहशत वाटू लागली होती की, मी दिसलो तरी ती खुंट्यावर ताडकन उठून उभी राहत असे, मी तिला खायला चारा घेऊन आलो तरी ती मागे सरकत असे, मी गेल्यावर मग ती चारा खात असे, एखाद्या वेळेस पाणी पाजायला म्हणून घेऊन गेलेल्या बहिणीच्या हातातून ती चुकून उधळलीच तर मी नुसता ‘हरणी’ असा आवाज देताच ती जाग्यावर थांबायची ; इतका तिने माझा धसका घेतला होता. तिला माझ्याबद्दल जेवढी भीती होती, तेवढा मीच चारापाणी खायला देईल हा विश्वासही होता. तिला दिवसातून दोन वेळेस पाणी पाजणे, चरण्यासाठी नदीला नेऊन बांधणे, रात्रीला चारावैरण करणे हे कामं कंटाळा न करता मी करत होतो. मी दुरून तिच्याकडे येताना दिसलो तरी ती हंबरत असे. जणू काही मी तिच्या चारापाण्याला उशीर केला असा काहीसा तिच्या हंबरण्यातील तक्रारीचा सूर असे. 


आमच्या घरी येऊन वर्ष दीडवर्ष झाले असेल-नसेल तिने एका छानशा पाडसाला जन्म दिला होता, गुबगुबीत मऊ बाळसेदार वासराच्या आगमनाने घरात सर्वांना खूप आनंद झाला होता. प्रथमच घरच्या गाईचे दुध आम्हाला खायला प्यायला मिळू लागले होते. त्याआधी आमच्या चहातही दुध नसत. ती वासरासोबत पूर्ण कुटुंबालाही पुरेल एवढे दुध सकाळ-संध्याकाळ देत होती, हरणीने घर दुघदुभते केल्याने जणू घरात गोकुळच अवतरले होते. हरणी आली तेव्हा आमच्याकडे गोठाही धड नव्हता. आता ती वर्षाला एक इत देत गोठा भरत होती. पहिला गोऱ्हा साडेतीन चार वर्षाचा होताच आम्हाला शेतकामाला घरच्या गाईचा बैल मिळाला होता. त्याचे नाव आम्ही हौशा ठेवले होते, नांगरणे वखरणे शिकवायला अधिक त्रास न दिलेला हौशा इमानदारीने शेताच्या औतफाट्याला उभा राहिलेला पाहून त्याच्या जोडीला सिन्नरच्या बैलबाजारातून अजून एक बैल विकत आणला, त्याचे नाव कौशा ठेवले होते, हौशा-कौशा बैलजोडीच्या जीवावर कधी नव्हे शेतात हिरव सोनं चमकू लागले होते. आधी आम्ही शेत बटाईने दुसर्‍या शेतकर्‍याला कसायला देत होतो. इतकी जमीन असूनही वर्षाकाठी धान्याच्या एकदोन पोत्यांची उसणवारी करावी लागत होती. मोठा भाऊ विजय, मी आणि सुनिता आम्ही भावडं वडिलांच्या मागे लागून एक साल घरीच शेती केली. त्या वर्षी मळणी यंत्राला द्यावयाच्या धान्यासगट बारा पोते धान्य झाले होते. वर्षभर घरासाठी लागणार्‍या धान्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न मिटला होता. एकाकी हरणीच्या कृपेने घराला बरकत आली होती. 


हरणी, हौशा, कौशा आणि लहानी वासरी दिमाखीचे चारापाणी करण्याचे काम माझ्याकडे होते, जणू तसा अलिखित नियमच होता, मी शाळेत गेलेलो असेल तरी माझ्या नावाने चारही जनावरे खुंट्याला तसेच बांधलेली असत. मला सकाळची सात ते बारा शाळा असायची. शाळेतून घरी येईपर्यंत मला साडेबारा व्हायचे. शाळेतून घरी आलो की मग मी त्यांना चारापाणी करत असे. वडील किंवा मोठा भाऊ सकाळच्या प्रहरात हौशा आणि कौशाकडून शेतातले काम करून घेत खुशाल खुंट्याला बांधून ठेवत असत. माझ्याशिवाय दुसरे कोणी चारापाणी करणार नाही याची खात्री बहुदा त्या मुक्या जनावरांनाही खात्री असावी. ते माझ्या वाटेलाच नजर लावून उभे असत. मी दुरून येताना दिसलो की, जोरजोरात हंबरत. हरणी तर जोपर्यंत चारापाणी देत नाही ; तोपर्यंत हंबरून हंबरून भंडावून सोडत असे. जनावरांचे उपाशी हंबरणे कानांना कधीकधी इतके असाह्य होई की ; पहिले त्यांना चारापाणी करून मग मी जेवत असे.   


दिवाळीच्या आगेमागे जनावरांना गायरानात चरायला घेऊन जावे लागत असे. आमचे गायरान घरापासून साडेचार किलोमीटर अंतरावर तौल्याचा डोंगरात होते, सिन्नर आणि बारागाव पिंपरीच्या अगदी मधोमध. बारा वाजता शाळा सुटली की, धावपळ करत घरी यायचे, घाईघाईत जेवण करायचे, पुस्तक, काठी आणि पोतं उचलायचे, जनावरे सोडायची व तौल्याच्या डोंगराकडे निघायचे. डोंगरात पोहोचेपर्यंत दीड वाजलेला असायचा. भुकेलेली जनावरं तडातडा पाय उचलत डोंगर गाठत असत. अर्ध्या दिवसाचा उपवास घडलेली जनावरं डोंगरात पोहोचल्यावर निमुटपणे चरत असत. त्यांना दुसर्‍यांच्या जनावरांप्रमाणे वळण्याचीही गरज पडत नसत. कमी वेळात पोटातील भूक शांत करण्याचे त्यांना पडलेले असे. 


तरी मी इतरांपेक्षा एक दीड तास उशिराने घराकडे निघत असे. आपण उशिरा जनावारांना चरायला घेऊन आलो आहे तर आपल्याला घराकडे उशिरानेच निघावे लागेल ही समज त्या नासमज वयातही मला होती. अंधार थोडासा गडद होऊ लागला की, जनावरेही स्वतःहून घराकडे निघत असत. मी उशिराने जाऊ म्हटले तरी जनावरे चारा खायचे सोडून घरी जायचा रस्त्याने पाहत राही. मग त्यावेळी गुरांचे पोट भरले समजून घरी जायला निघत असे.

एरवी गुरे चरत असताना बाकीचे संवगडी पत्ते खेळत, विटी-दांडू खेळत, दुपारी उन्हात नदीत पोहत ; मी मात्र शाळेच्या वाचनालयातून आणलेली पुस्तक वाचत असे. डोंगरच्या माळरानात मऊ लुसलुशीत गवतावर पोतं अंथरून कथा-कांदबरीचे पुस्तकं वाचण्यात मला एक वेगळाच आनंद मिळत असे. पुस्तक नसेल त्यावेळेस मात्र मीही त्या संवगड्यात सामील होई.    


एक दिवस मी साने गुरुजींचे ‘शामची आई’ पुस्तक वाचत होतो. भित्र्या शामच्या गमतीजमती वाचण्यात कधी नव्हे इतका मी गढून गेलो होतो. सभोवताली काळोख दाटला तरी मला कळले नव्हते. सांयकाळचे साडेसहा सात वाजले होते, मला पुस्तकातील अक्षरं दिसायला त्रास होत होता तरी मी डोळे बारीक करून पुस्तक वाचत होतो. रोज रात्रीची शामच्या गोष्ट वाचत नसून अंथरुणावर पडून वडिलांच्या गोष्ट ऐकतो आहे इतका मी स्वतःला विसरून वाचत होतो. पुस्तक वाचण्यात इतका मग्न असतानाही मला एका गोष्टीची जाणीव झाली होती. चारही जनावरे माझ्या अवतीभवती ओवा दीडओव्याच्या अंतराने उभी आहेत, मी झोपलेल्या स्थितीत डोक्याच्या दिशेने ते मारक्या नजरेने पाहत आहे, अन नाकाने फुरफुरत पुढच्या उजव्या पायाच्या खुराने जमीन उकरत आहे, चाल केली तर शिंगावर उचलून टाकण्याचाच त्यांचा तो आक्रमक पावित्रा होता. संकटाची चाहूल लागताच मी ताडकन उठून बसलो, समोर सांबराच्या आडोशाला एक लांडगं दबा धरून बसले होते. ते पाचपैकी कोणातरी हल्ला करण्याच्या तयारीत होते. 

कंबराएवढे उंचीचे व काळसर करड्या रंगाचे कुत्र्यासारखे दिसणारे ते लांडगे पाहून माझी तर चड्डीच ओली होण्याची वेळ आली होती. माझ्या हातात नावाला काठी होती, लांडग्याच्या नुसत्या दर्शनाने माझ्या पूर्ण शरीराला कंप सुटला होता, मनात रामाचा जोरजोरात जप चालू होता. मी हळूच कौशाच्या आश्रयाने उठून उभा राहिलो. लांडग्याच्या हालचालींकडे धडधडत्या काळजाने डोळे फाडून पाहू लागलो.  


माझ्यासह पाचही जणांचा मोर्चा हरणीने सांभाळला होता. तिचा आवेश तर खूप भयंकर होता. लांडग्याला ती एक पाऊलही पुढे टाकू देत नव्हती. त्याने थोडी जरी हालचाल केली तरी हिच्या अंगात दुर्गा संचारत होती. पहिलवानाने मांडी ठोकावी तशी ती पायांच्या खुरांनी जमीन उकरीत होती. लांडग्याने चालच करावी ; ती त्याला चारी मुंड्या चीतच करणार होती. शिंगाने ती त्याच्या पोटातील कोथळा बाहेर काढणार होती. आमच्या चौघांच्या जीविताची हमी घ्यावी तशी ती छातीचा कोट करून उभी राहिली होती. मागून हौशा आणि कौशाही तिचा विश्वास द्विगुणीत करत फुरफुरत होते. 


अखेर लांडग्यानेच माघार घेत विचार बदलला, डोंगराच्या लवणातून साबराच्या आडोशाने लपत-लपत ते हिंस्त्र श्वापद पराभूत झाल्यागत निघून गेले. लांडगे दिसेनासे होताच आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. हरणीच्या हिंमतीचे मला कौतुक वाटले होते. लहानी वासरी दिमाखीला व मला हौशा आणि कौशाच्या मधे घालत तिने मृत्यूचे आलेले संकट मोठ्या धीराने परतवून लावले होते. तिच्या त्या जिगरबाज साहसाचे माझ्याप्रमाणे हौशा आणि कौशालाही नवल वाटले असावे. 


काळ आला होता पण वेळ आली नव्हती, मी चारी जनावरांना घेऊन लगोलग घराकडे निघालो होतो. रोजचाच टाईम होता, तरी घराकडे निघायला उशीर झाला आहे असे मला वाटत होते. जनावरे नेहमीपेक्षा पाय उचलून चालत होती तरी मी विनाकरण त्यांना हाकलत होतो. लांडगे निघून गेले होते तरी त्याची भीती मनात कायम होती. लांडग्याची शिकार मी होतो की दिमाखी होती ते कळले नव्हते. मात्र रक्षक बनून तिन्ही जनावरांनी आमच्या दोघांचेही संरक्षण केले होते.


मृत्यूच्या झालेल्या दर्शनाने मी किती वेळा हरणीच्या पाया पडलो असेल देवच जाणे, मात्र मुक्या जनावरांना जेवढे जीव लावू ; तेवढे तेही आपल्याला माया लावतात. आपण विसरलो तरी ते ओळख विसरत नाही. मी शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेलो असताना जेव्हा कधी गावाला जाई ; तेव्हा ती माझ्याकडे कान टवकारून पाही व हंबरत खुंट्याभोवती गोल गोल गरके मारत असे. खूप दिवसांनी लेक घरी आल्यावर आईला जसा आनंद होतो तसा आनंद तिच्या चेहर्‍यावर मला दिसत असे. मीही शेतात नाहीतर वैरणीच्या वळईवर जाऊन तिच्यासाठी चारा घेऊन येत असे. हरणी माझ्यासाठी नक्कीच हिरकणीसमान होती. तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचला होता. एवढं जीवावर उदार फक्त एक आईच होऊ शकते. 


दिमाखी आणि मी आम्ही दोघेही हरणीच्यावर दुधावर लहानाचे मोठे झालो होतो. दिमाखी एक अर्थाने माझी लहान बहीणच होती. तिनेही मायप्रमाणे आमच्या कुटुंबासाठी आयुष्य वेचले होते. तिच्या जन्मापासूनचा अंतापर्यंतचा सगळा पट समाधीवर नतमस्तक होताना माझ्या नजरेसमोरून तरळून गेला होता. हरणी आमच्या गोठ्यातील पहिली तर दिमाखी शेवटची जनावर ठरली होती. अशी मुकी व निःष्पाप माया यानंतर कधी मिळेल ? मनाने नकार देताच आपण अनमोल असे काहीतरी गमावले आहे याची जाणीव झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama