ममतेचे बरसणे
ममतेचे बरसणे
लहानपणी आई आणि पाऊस
सारखे माझ्यावर बरसायचे
आई अभ्यास करताना
पाऊस शाळेत जाताना
अन दोघेही मैदानावर खेळताना
बरसून झाल्यावर मात्र मला
दोघांमध्ये नेहमी एक साम्य दिसे
आई अश्रूंनी भिजवायची
पाऊस उन्हाने सुखवायचा
दोघे ही वात्सल्य उबेने पान्हायचे
आता मात्र दोघे सोबत असून
नसल्यासारखे वागतात
आईने कोपरा धरला आहे
पावसाने दडी मारली आहे
ममतेचं आटलं ते बरसणं
काळाप्रमाणे ते ही बदललेले असावे
असे मला सतत वाटायचे
पण आई आईच होती
पाऊस पाऊस होता
मीच मात्र मी राहिलो नव्हतो