माझी अंतरिक्ष यात्रा - सन २०५०
माझी अंतरिक्ष यात्रा - सन २०५०
एक विशिष्ट नादाने गुंजणाऱ्या,धीरगंभीर अशा अंतरिक्षात मी येऊन पोहचले होते. चहूबाजूंनी वेढलेल्या अंधारात दूर लखलखणारे ग्रह तारे कोहिनूर हिऱ्याप्रमाणे भासत होते. डोळ्यांना दिपवून टाकणारे त्यांचे दैदिप्यमान रूप शब्दात सांगणे कठीण! त्या तेजोमय वलयात मी न्हाऊन निघत होते........वगैरे मी मुळीच म्हणणार नाही! अंतरिक्ष फार सुंदर होतं, मान्य आहे. पण त्या सुंदरतेचे वर्णन करून कितीवेळ लोणचं घालत बसणार?!! खरंतर मला स्वतःच्या जीवाची पडली होती. पृथ्वी तर माझ्या अवस्थेकडे बघून हसत असावी असं वाटत होतं. हा एकच ग्रह माझ्या अगदी जवळ होता आणि मी बघू शकत होते.
एव्हाना बरेच धूमकेतू मला ओव्हरटेक करून पुढे गेले होते आणि कदाचित मागे वळून सांगत होते, घाबरू नकोस गं, ये अंतरिक्ष अपनाइच है !
पृथ्वीवरून मंगळावर जाण्याऱ्या मंगल कन्या एक्सप्रेस रॉकेट मध्ये आम्ही बसलो तो क्षण आठवतो, तेव्हा कल्पनाही नव्हती कि अंतरिक्षात पोहचून अचानक हा रॉकेट अपघात घडेल आणि आम्ही एकमेकांपासून कित्येक मैल दूर फेकलो जाऊ.
आता माझ्याकडे एकच पर्याय होता, दुसरे रॉकेट दिसेपर्यंत, आहे त्याच अवस्थेत वाट बघणे. काही अंतरावर तरंगत्या वेटिंग रूम्स दिसत तर होत्या पण बंद अवस्थेत. माणसाचा मागमूसही नव्हता. कसा असेल ! परग्रहवासीयांकडून अचानक झालेल्या हल्ल्याला महिना पण उलटला नव्हता. त्यामुळे सगळीकडे टाळेबंदी! तरी नशिबाने आम्हाला आमच्या मंगळावर जायला पृथ्वीवासियांनी सोय करून दिली.
मला सारखे वाटत होते कि माझ्या जीवाला धोका आहे. परग्रहवासी जर नजर ठेवत असतील आणि त्यांना जराही संशय आला असेल तर काही क्षणात माझ्या शरीराचे अति सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होऊन ते या अफाट गगन मंडळाची सैर करू लागतील.
कभी भी कुछ भी हो सकता है या अवस्थेत मी होते. हा माझा पहिलाच अंतरिक्षाचा अनुभव होता. या आधी फक्त पुस्तकात वाचले आणि बघितले होते. (कारण एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाणे हे सध्या तरी मंगळावरच्या गरीब माणसाला परवडण्यासारखे नाहीये ना !).
मनाला सारखी एक भीती होती कि चुकून जर खाली गुरुत्वाकर्षण आले तर कसली जोरात आदळेन मी !! आधीच या धूमकेतूंपासून स्वतःला बचावताना मला नाकी नऊ येत होते.
दुरून काहीतरी चमकताना दिसले कि मला आशा वाटायची बहुधा हे रॉकेट असेल पण उनाडक्या करत धावत येणारा धूमकेतू मला वाकुल्या दाखवत सुईईई ..... करत जायचा. सुरुवातीला आकाशात तरंगताना वाटणारी मजासुद्धा आता सजा होत चालली होती. कित्येक वेळापासून अंतरिक्षात तरंगणाऱ्या ढुंगणाला आता बसायचे होते. पोटात तर भुकेचा धुमाकूळ चालला होता. मंगल कन्या एक्सप्रेस मध्ये बसताना आईने माझ्या स्पेस सूटच्या साईड पॉकेट मध्ये ठेवलेले खारे शेंगदाणे मला आठवले. मी खिशात हात घातला आणि ......... अरे व्वा ! शेंगदाणे आहेत कि !!!!!!! आई चे मनोमन आभार मानून मी शेंगदाण्याचे पाकीट उघडले खरे, पण त्यातल्या पहिल्या शेंगदाण्याने माझ्या आनंदावर घडाघडा पाणी फेरले.
तो पहिला शेंगदाणा मी तोंडात टाकणार इतक्यात हातातून सटकला आणि गेला. या नंतर जे झाले त्यात मी नशिबाला दोष देण्यात अर्थ नाही कारण तो निव्वळ माझाच मूर्खपणा होता . त्या एका शेंगदाण्याला पकडण्याच्या नादात चुकून पॅकेटच हातातून सुटले!!
"हे बघ, जे झालं ते actuallyबरं झालं! कारण your मूर्खपणा deserves this" असं म्हणून खरंतर मला कपाळाला हात मारायचा होता पण त्या अवजड स्पेस सुटात मला माझे कपाळच सापडेना. मी डोळ्यातले अश्रू आणि मनातला राग आवरून मुकाट्याने दूर जाणाऱ्या त्या शेंगदाण्यांकडे बघत बसले. पृथ्वीवरच्या जुन्या बॉलीवूड चित्रपटातल्या हिरोईन सारखे स्लो मोशन मध्ये धावत होते ते.
रेस्क्यू टीम मदतीला येईल असा विचार करणं बिनडोकपणाचं लक्षण होतं. कारण ढोरोना -५० व्हायरसच्या हाहात्कार मधेही आम्हाला आमच्या ग्रहावर जाण्याची सोय पृथ्वीवाल्यांनी करून दिली हिच खूप मोठी गोष्ट होती. मी आता मनाची तयारी केली होती कि आपल्याला कल्पना चावला सारखे अंतरिक्षात विलीन व्हावे लागणार आहे. फरक एवढाच होता कि ती एका काळातली महान वैज्ञानिक होती आणि मी आजच्या काळातली शेंगदाण्याचे पाकिटही सांभाळू न शकणारी नग!
खरंतर पुढल्या दोन -तीन दिवसातच माझा वाढदिवस होता. पण मला त्याचे कधीच वावगे वाटले नाही. कारण आमच्या मंगळावरचा वाढदिवस म्हणजे घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या कपाळावरच्या जाळ्या आणि बजेटची पुण्यतिथी! आमच्या बाबांना तर कोणाचा वाढदिवस येतोय असं म्हंटलं कि अजीर्णच सुरू होते. साहजिकच आहे, आमच्या इथे पृथ्वीसारखा ३६५ दिवसांनी वाढदिवस नाही येत. फक्त ८८ दिवस !!! आमचं वर्षच ८८ दिवसाचे असल्याने वाढदिवस कसे पटपट येतात! आणि मग बाबांचा पगार घरचा उंबरठा ओलांडण्याच्या अगोदर गुडूप होऊन जातो. अर्थात ही स्थिती आमच्या सारख्या मध्यमवर्गीय मंगळवासीयांची. अंतरिक्षात राहून, उनाडक्या करणाऱ्या धूमकेतूंचे मुजरे झेलत, वाढदिवस साजरा (?!) करणारी मी कदाचित पहिलीच व्यक्ती असेन.
आता मला दुरून एक प्रकाशाचा झोत हळूहळू जवळ येताना दिसत होता. पुन्हा धूमकेतूच असेल असं मला वाटलं म्हणून मी दुर्लक्ष केले. पण हे काय आहे ?!!!!
अरेच्चा! हे तर सॅटेलाईट आहे ! ते वेगाने जवळ येत होते.
मला एक भन्नाट कल्पना सुचली. मी जर या सॅटेलाईट च्या पुढे जाऊन थांबले तर त्या सेन्सर ने सॅटेलाईट थांबण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पृथ्वीवर बसलेल्या ऑपरेटर्सना कळेल कि मी इथे फसले आहे. पण जर ते नाही थांबले तर ..........! तर रस्त्यावरचा ट्रक जसा सहज शेण तुडवून पुढे जातो तसाच प्रकार पहिल्यांदा अवकाशाचा इतिहासात घडेल. शेण अर्थात मीच! पण प्रयत्न करून बघायला हरकत नव्हती. समजा यशस्वी नाहीच झाला तर माझ्या आयुष्यातील हा शेवटचा बिनडोकपणा असेल! व्वा ! कल्पनेनेच हसू आले.
मी हात -पाय झाडत झाडत शक्य तितक्या लवकर सॅटेलाईट च्या समोर आले. अजून साधारण ५० मीटर च्या अंतरावर होता तो. मी हात जोडले आणि डोळे अगदी गच्च मिटून घेतले.
एक.. दोन ... तीन.... चार .... पाच .... सहा... सात .... आठ.... नऊ..... दहा....
अजून नाही आले ?! अच्छा परत मोजू असे म्हणत मी पुन्हा १ ते १० चा प्रवास केला. अजून नाही आले !?
मी हळूच घाबरत घाबरत डोळे उघडले.
अरे !!!!!!! सॅटेलाईट कुठे गेला ??! समोर दिसेनाच!
मी मागे वळून पाहिले. सॅटेलाईट मला ढीगभर शुभेच्छा आणि ठेंगा देऊन निघून गेला होता. तो लांब असल्याने माझा अंदाज चुकला होता आणि मी चुकून त्याच्या रस्त्याच्या काही फूट बाजूला उभी राहिले होते. त्यामुळे मी डोळे गच्च मिटून शंभू सारखी उभी असताना तो माझ्या बाजूने अगदी सहज आल्यासारखा निघून गेला होता. काही हरकत नाही, ह्युमन एरर. तसंही अंदाज आणि नेम यांच्याशी माझं जन्मापासूनच वाकडं होतं. आता २३ तासाने सॅटेलाईट महाशय पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून येतील तेव्हा पुन्हा बघू काही जमतंय का!
या २३ तासात मी छान खयाली पुलाव बनवायला सुरुवात केली होती कि माझ्यावर प्रेरित होऊन हॉलिवूड "A lost girl in space" म्हणून मूवी बनवत आहे. बॉलिवूड ने पण जमेल तितक्या विकसित बुद्धीचा वापर करून मूवी बनवली आहे (अर्थात, एक काल्पनिक प्रेमकथा आणि प्रसंगाशी काहीही संदर्भ नसलेली २-३ गाणी टाकायला ते बिलकुल विसरले नाहीत.) मॉलिवूड (मंगळावरची फिल्म इंडस्ट्री ) नवीनच असल्याने अजून १९ च्या दशकातल्या हॉलिवूड- बॉलिवूड मुव्हीज चे रिमेक करण्यात दंग आहे. त्यामुळे अजून काही वर्ष तरी त्यांना फुरसत नाहीये.
मी अर्धमेल्या स्थितीत वेळ काढत होते. समोरून पुन्हा प्रकाशाचा झोत दिसू लागला. अरेच्चा ! २३ तास इतक्या लवकर संपले !!!???
मी आता लगबग न करता शांतपणे एक डोळा बंद करून नेम धरला आणि बरोब्बर सॅटेलाईट च्या रस्त्याच्या मधोमध उभी राहिले. डोळे अगदी गच्च मिटले आणि अंक मोजायला सुरुवात. तीव्र प्रकाश हळूहळू जवळ येत असल्याची जाणीव होऊ लागली. एक प्रचंड लाल -भडक प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला आणि मला जाणवले कि आता आपली शेणासारखीच गत होणार आहे. मी त्यानंतर बहुधा बेशुद्ध पडले असावे कारण दुसऱ्या क्षणी मी डोळे उघडले तेव्हा एका उबदार रॉकेट मध्ये होते. आजूबाजूला काही अनोळखी व्यक्ती मला न्याहाळत होते आणि एक बिचारे डॉक्टर, जे मला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असावेत.
मी सावरून बसले.
"तू मुर्खासारखी डोळे मिटून सॅटेलाईट रस्त्याच्या मधोमध का उभी होतीस ?" - एक अपमानयुक्त प्रश्न
"जाऊ दे, मी नंतर सविस्तर सांगते. आधी मला खायला द्या"
रॉकेटने मंगळाकडे झेप घेतली होती आणि मी पृथ्वीवरून आणलेला गरमागरम वडा-पाव खात सुटकेचा निःश्वास घेत होते.
अखेर रेस्क्यू टीम ने या "lost girl in space" ला तिच्या ग्रहावर पोहचवले होते
