Sanjay Pande

Drama Romance Others

4.1  

Sanjay Pande

Drama Romance Others

लॉक ओपन

लॉक ओपन

6 mins
351


सुहास आज ऑफिसमधून फार थकून घरी आला होता. घरात पाऊल टाकताना त्याने ठरवून टाकले की आज रेवतीच्या हातचा मस्त गरमागरम चहा घ्यायचा. परंतु, दरवाजात असतानाच मागील दोन महिन्यापासून आपली आणि रेवतीची काय धुसफूस सुरू आहे हे त्याला आठवले आणि त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले. रेवती आणि सुहास हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर. दोन वर्षापूर्वीच त्यांचे थाटामाटात लग्न झाले होते. सुहास आणि रेवती दोघेही एकाच मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होते. रेवती एक आकर्षक चुणचुणीत लोभस व आजच्या भाषेत सांगायचे तर स्लिम फिट या शब्दात बसणारी. ती जेव्हा हसे तेव्हा तिच्या गालावर पडणारी खळी पाहून समोरचा माणूस तिच्या प्रेमात पडला नाही तरच नवल. तिच्या वाणीतील गोडवा ऐकून ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जात असे. अगदी प्रथमदर्शनी प्रेम बसावे असेच तिचे व्यक्तिमत्व होते.


सुहास आणि रेवती एकाच कंपनीत असल्याने त्यांची भेट वारंवार होत असे. एकदा दोघांनाही एकाच प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सुहासने रेवतीला प्रथम जेव्हा पाहिले तेव्हाच तिच्या प्रेमात पडला होता. परंतु, जास्त संबंध न आल्याने तो याबाबत काहीही बोलू शकला नव्हता. सुहासही रेवतीच्या तुलनेत कुठेही कमी नव्हता. चांगला सहा फुटी, गोरा पान भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा पण तितकाच दिसायला गोंडस... कोणाही मुलीने त्याला एकदा बघितले तर परत पलटून दुसऱ्यांदा बघणारच असे त्याचे व्यक्तिमत्व. कॉलेजमध्ये असताना तर त्याचे मित्र कित्येकदा ही मुलगी परत सुहासला मागे वळून बघणार अशी शर्यत लावून हमखास जिंकत असत. संबंध आल्यापासून रेवतीलाही सुहास कुठेतरी आवडू लागला होता. पाच-सहा महिने प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर त्यांचा आपसातील भिडस्तपणा निघून गेला होता. सोबत जेवण करणे, चहा पिणे, गप्पा मारणे, पार्टी करणे या सर्व घडामोडीमुळे सुहास आणि रेवती हे दोघेही अजून जवळ आले होते.


सुहासच्या मागे त्याच्या घरचे आई-वडील विवाह करण्यासाठी म्हणत होते पुष्कळ मुलींची ठिकाणे त्याला आली होती. काहीतरी कारण सांगून सुहास टाळत होता. परंतु, आता जास्त दिवस काढणे शक्य नाही हे पाहून सुहासने एक दिवस निश्चय करून रेवतीला लग्नाबाबत विचारले. रेवतीच्याही मनात कधीपासून सुहास बसला होता. त्याचे जादुई डोळे, बोलण्यातील लकब व राग न येणे हे रेवतीला फार आवडत होते. सुहास, रेवतीला काय आवडते, काय नाही याची जातीने चौकशी करीत असे. सुहाससोबत आपण सुखी राहू, समाधानी राहू, असा तिला पक्का विश्वास होता आणि सुहासने स्वतःहून प्रपोज केल्याने तिनेही अत्यानंदाने होकार दिला. दोघांच्याही घरच्या लोकांच्या संमतीने सुहास व रेवतीचा धुमधडाक्यात विवाह संपन्न झाला.


विवाहानंतर पहिले एक वर्ष कसे गेले हे दोघांनाही समजले नाही. हसणे खिदळणे, पार्ट्या करणे, पिकनिकला जाणे, हॉटेलिंग करणे यात मनसोक्त रममाण झाले होते. परंतु, एक वर्षानंतर सुखी संसाराला कुणाची नजर लागली आणि या दोघांच्या वैवाहिक संबंधात तेढ निर्माण झाली. वास्तविक दोघांचीही कंपनी एकच होती. दोघेही सोबत जाणे-येणे करीत असत. काही दिवसानंतर दोघांचीही वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये नेमणूक झाली. दोघांचेही कामाचे तास वेगवेगळे झाले. सुहास रात्री आठ वाजता, नऊ वाजता घरी येत असे, रेवतीला येण्यासाठी अकरा अकरा-बारा बारा वाजत. दोघांचाही एकमेकांचा सहवास अत्यंत कमी होत गेला. शनिवार-रविवारीही कधी कधी रेवतीला तर कधी कधी सुहासला काम असायचे. त्यामुळे दोघांची भेट दुर्मिळ होत गेली आणि छोट्या छोट्या कारणावरून खटके उडायला लागले.


घरात स्वच्छता नाही, भाजी आणली नाही, चहा कोणी करायचा, येताना ब्रेड-पाव आणले नाही, अशा क्षुल्लक कारणावरून भांड्याला भांडे लागू लागले. दोघांनीही पुष्कळ सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीना काही कारणामुळे वाद होऊ लागले. त्याचा परिणाम दोघांच्याही कार्यालयीन कामावरही होऊ लागला. एक दिवस तर हद्द झाली. रेवती रात्री दहा वाजता थकून भागून कार्यालयातून घरी आली. बघते तर काय, सुहास मस्त टेबलवर पाय पसरून बसला होता. रेवतीची हे बघून तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने म्हटले, 'सुहास, तू मला फोन केला, जोरात भूक लागली म्हणून आणि तू इथे नुसता बसून आहेस. काही भाजी बीजी चिरुन ठेवायची...' असे म्हणून रागात ती फ्रेश व्हायला गेली. सुहासचे डोके फार दुखत होते अगदी त्याला अस्वस्थ होत होते. इतक्यात रेवती फ्रेश होऊन आली आणि म्हणाली, 'अरे सुहास किती तू निर्लज्ज आहेस. मला वाटले उठला असशील भाजी करण्यासाठी...'


सुहास म्हणाला, 'रेवती काय लावले हे? माझे डोके दुखण्यामुळे डोके फुटायची वेळ आली आहे. कसं करतोय माझं मला माहीत. पोटात भुकेने कावळे ओरडून ओरडून झोपले आहेत. तू थोडी लवकर येऊन स्वयंपाक करू शकली असतीस...'


आता रेवती चिडली, ती म्हणाली, 'सुहास बरे झाले आपण एकाच कंपनीत काम करतो. माझा प्रोजेक्ट किती अवघड आहे तुला माहिती आहे, तुझ्यासारखे नाही मी थातूरमातूर काम करत...'


सुहास लगेच म्हणाला, 'म्हणजे तुझे म्हणणे असे आहे की मी काम बरोबर करत नाही? रेवती, हे अति होतंय...'


रेवती म्हणाली, 'मग तू घरी आलास तर स्वयंपाक का नाही करून ठेवला...'


सुहास म्हणाला, 'मग आता तुला काय म्हणायचे आहे...'


रेवती म्हणाली, 'सुहास काही नाही, मी स्वयंपाक करणार नाही...'


सुहास म्हणाला, 'रेवती, तुला तर स्वयंपाक करावाच लागेल...'


ती म्हणाली, 'तू थकून येतोस तसेच मी पण येते. सुहास तू येतानाच हॉटेलमधून का डब्बा नाही आणलास?'


सुहास रागात म्हणाला, 'कंटाळलो मी ते हॉटेलमधील खाऊ खाऊ, एखाद दिवशी घरचे खाऊ घालशील का रेवती?'


पण, 'आता मी स्वयंपाक करणार नाही, आता सहनशक्तीच्या पलीकडे गेले,' असे रेवती म्हणाली.


सुहास म्हणाला, 'ठीक आहे रेवती, आपण मागील एक वर्षापासून पाहतोय आपली भांडणे होत आहेत. रविवारी आपण वकिलाकडे जाऊन सोक्षमोक्ष लावू...' रेवतीही रागात म्हणाली.


'हो हो मला पण फार कंटाळा आलाय तुझ्या अशा वागण्याचा. आपण जाऊन लवकर काडीमोड घेतलेला बरा...' असे म्हणून दोघेही उपाशीच झोपी गेले. नंतर दोन-तीन दिवस दोघेही एकमेकाला ब्र शब्दही बोलले नाही. रविवारी वकिलाकडे जाण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. परंतुं रविवारी अचानक लॉकडाऊन झाले आणि त्यांची वकिलाकडील अपॉइंटमेंट स्थगित झाली. नंतर पूर्ण देशातच लॉकडाऊन लागले. ऑफिसलाही जाण्यास मज्जाव होता. वर्क फ्रॉम होम दोघांचेही सुरू झाले. दुसरे दिवशी सकाळी उठल्यानंतर सुहास चहा करायला गेला. जाताना तिला विचारले, 'रेवती तू चहा घेणार आहेस का?'


तिनेही तुसडेपणाने, हो असे उत्तर दिले. सुहास मस्त दोन कप चहा बिस्किटासह घेऊन आला. तिने चहाचा कप आणि बिस्किट घेतले. दोघांच्याही हातात पेपर होते. चहाचा घोट घेत घेत पेपर वाचत होते. परंतु, आपसात दोघेही बोलले नाही. चहा घेऊन रेवतीने सुहासला विचारले, 'मी नाश्त्याला उपमा करत आहे तू खाणार आहेस का?'


सुहासने रेवतीकडे न पाहता, 'हो' म्हटलं. रेवती किचनमध्ये उपमा करण्यासाठी गेली. सुहासही तिच्या मागे मागे गेला आणि तिला कांदे कापून दिले. रेवतीने मस्त गरमागरम उपमा तयार केला. तोपर्यंत सुहासही फ्रेश होऊन आला. रेवतीने दोन प्लेटमध्ये उपमा आणला. सुहासने पटकन उठून लिंबू कापले आणि दोन्ही प्लेटमध्ये लिंबू पिळले. दोघांनीही न बोलताच नाश्ता केला. असे आठ दिवस न बोलताच दोघांनी काढले. हळू हळू दोघांचाही सहवास वाढू लागला. दोघेही एकमेकांना घरकामात मदत करू लागले. झाडूपोछाचे काम सुहास करू लागला व इतर कामे रेवती करत असे.


एक दिवस तिने विचारले, 'सुहास आज भेंडीची भाजी आहे, चालेल?'


खरेतर सुहासला भेंडीची भाजी आवडत नव्हती. परंतु, तो काही बोलला नाही. रेवती सुहासला म्हणाली, 'अरे तुला तर भेंडीची भाजी आवडत नाही ना? थांब आलूची करते...'


सुहास तिचा हात पकडून म्हणाला, 'रेवती, तुला आवडत नाही ना आलूची भाजी, ऍसिडिटी होईल तुला, थांब तू, मी बघतो फ्रीजमध्ये कोणती भाजी आहे...' आणि सुहासने फ्रीजमधून सिमला मिरचीची भाजी काढली आणि म्हणाला, 'रेवती, आज तू राहू दे, मी झक्कास सिमला मिरचीची भाजी करतो...'


रेवतीने पोळ्या करेपर्यंत सुहासने सिमला मिरचीची भाजी केली. दोघांनीही मागील बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा सोबत जेवण केले. इतक्यात सुहासच्या बॉसचा फोन आला व प्रोजेक्टचे काम न केल्यामुळे सुहासवर रागावला. सुहासला ते काम जमत नव्हते. परंतु, रेवतीने यापूर्वी या प्रोजेक्टमध्ये काम केलेले असल्याने तिने दोन तासातच सुहासचे काम करून देऊन सुहासला मदत केली. सुहासने लगेच बॉसला झालेले काम पाठविले. बॉसने खुश होऊन सुहासची तारीफ केली. सुहास रेवतीला म्हणाला, 'रेवती, आज तू मला फार मोठ्या संकटातून वाचवले. नाहीतर आज माझी खैर नव्हती...'


रेवती म्हणाली, 'सुहास, मला येत होते, आधी काम केलेले असल्यामुळे म्हणून मी थोडीफार मदत केली, असे आपले यापूर्वी कधी बोलणेच होत नव्हते. तुझी अडचण काय माझी अडचण काय काहीच आपले संवाद नव्हते...'


सुहास म्हणाला, 'होय रेवती, अगदी खरे आहे. आपण इतके कामात गुंतलो होतो. एकाच घरात असूनही आपली भेटही बरोबर होत नव्हती. या लाॅकडाऊनमध्ये कळाले तू फार चांगली आहेस, आय लव्ह यू रेवती...'


रेवतीही सुहासचा हात हातात घेऊन लगेच म्हणाली, 'बरोबर आहे सुहास, आपण एकमेकाला समजून घेतच नव्हतो. आता या लॉकडाऊनमध्ये किती आपण एकमेकाला मदत केली, किती समजून घेतले. खरेच तुझा स्वभाव फार चांगला आहे, सुहास तू मला फार आवडतो...' असे म्हणत दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी वकीलाचा फोन आला.


सुहासने फोनचा माइक ऑन केला. वकीलाने विचारले, 'सुहास रेवती, उद्यापासून कोर्ट सुरू होणार आहे. तुम्ही दोघेही आज ऑफिसमध्ये या भेटायला, दोघांच्याही काही फॉर्मवर सह्या घ्यायच्या आहेत. उद्याच आपण घटस्फोटाची केस कोर्टात दाखल करू आणि आठ दिवसात मी तुम्हाला घटस्फोट मिळवून देतो...' 


सुहास आणि रेवती दोघांनीही एकाच वेळी वकीलाला उत्तर दिले, 'वकील साहेब, आता याची आवश्यकता नाही. लॉकडाऊनमध्ये आमच्या पती-पत्नीच्या संबंधाला लागलेले लॉक ओपन झाले आहे आणि आमचा क़्वारंटाईनचा कालावधी संपला असून स्नेहमय सहजीवनाला परत सुरुवात झाली आहे...' असे म्हणून सुहासने फोन बंद केला.


Rate this content
Log in

More marathi story from Sanjay Pande

Similar marathi story from Drama