मुक्ती
मुक्ती


'बाबा, आपला पोपट राघू बघा ना कसा पिंजऱ्यात फडफड करतोय बाहेर निघण्यासाठी, आपण त्याला बाहेर मोकळे सोडायचे का?' विनित आपल्या बाबास काकुळतीला येऊन म्हणाला. विनित चे वडील प्रकाश हे एकूण जाम भडकले व म्हणाले.
'विनित हे काय नवीनच खूळ? तुला माहिती आहे ना की मला या पोपटाची इतकी सवय झाली आहे की एका क्षणासाठी ही मी यास दूर करू शकत नाही. किती मुश्किलीने मी आणलाय हा पोपट? आणि याला शिकवण्यासाठी पण मी भरपूर मेहनत घेतलीय.' पुढे काही बोलणार तेवढ्यात विनित बोलता झाला
'पण बाबा, किती दिवस आपण असा या पोपटास डांबून ठेवणार?'
विनित ने शाळेत नुकतीच कविता वाचली होती व स्वातंत्र किती अनमोल आहे हे त्यात सांगितले होते.माणसाप्रमाणेच प्राणी, पक्षी यांना ही स्वातंत्र आवडते असे त्या कवितेत रेखाटलेले होते व तेव्हापासून त्याच्या मनात पोपट मुक्त करण्याचा विचार घोळत होता. विनित च्या प्रश्नावर प्रकाश म्हणाले,
'विनित, काय कमी आहे आपल्याकडे? किती आपण लाड करतो आपल्या लाडक्या राघूचे. त्याला रोज खाण्यासाठी विविध फळे आणतो, त्याच्या स्वच्छतेची काळजी घेतो इतकेच काय प्रत्येक महिन्यात पशू वैद्यकीय चिकित्सकास दाखवून त्याची प्रकृती तपासतो. जंगलात काय असते? तेथे तर खायची पण मारामारी असते. आपण जर याला घरी आणला नसता तर आतापर्यंत याला कोण्या प्राण्याने मारून खाल्ला पण असता. इथे तो जिवंत तर आहे.' प्रकाश विनित ला समजावण्याच्या सुरात म्हणाला.
'बाबा, फक्त चांगले खायला-प्यायला भेटणे म्हणजे जीवन नसते. मुक्त संचार ,विहार ही आवश्यक असतो. इंग्रजांच्या काळात आपल्याला खायला प्यायला भेटत तर होतेच ना. तरीही लाखो लोकांनी स्वातंत्र्यासाठी उठाव केला तो केवळ गुलामगिरीतून मुक्त होणासाठीच ना बाबा' प्रकाश ला आपल्या मुलाचा सडेतोड युक्तिवाद आवडला व विनित चे त्यांना कौतुक ही वाटले. पण आवडत्या राघू ला मुक्त करण्याची प्रकाश ची अजिबात इच्छा नव्हती. सुमन हा बाप लेकाचा संवाद सकाळचा चहा बनवत बनवत ऐकत होती. तिने चहा व बिस्कीट आणत म्हटले
'बस करा आता तुमची चर्चा आणि गरमागरम चहा घ्या 'असे म्हणत तिने दोघांना ही चहाचा कप दिला व बिस्कीट चहात बुडवत म्हणाली
' प्रकाश,मी काय म्हणते,इतका विनित म्हणत आहे तर सोडून द्या न आपल्या राघू ला मोकळे ' प्रकाश चहाचा घोट पित म्हणाले
'आता हा विषय येथेच बंद, मी कोण्या ही परीस्थीतीत राघूला मोकळे सोडणार नाही. त्याच्या सुरक्षित तेची मला काळजी आहे ' असे म्हणत कार्यालयात नौकरीवर जाण्यासाठी तयारीला लागले.विनित ला हिरमुसलेले पाहून सुमन म्हणाली ' बेटा, तू ही तयारी कर शाळेत जायची ' असे म्हणून ती स्वैपाकघरात जाऊन पुढील तयारीला लागली. यानंतर बरेच दिवस गेले.प्रकाश चे राघू ची काळजी घेणे चालूच होते.एक दिवस प्रकाश कार्यालयात थोडा जास्त वेळ काम असल्याने थांबले होते. सर्वजण निघून गेले होते.अचानक बाहेर काही वाद झाल्याने शहरात कर्फ्यू जाहीर झाल्याने प्रकाश ला कार्यालयातच थांबावे लागले.कमीतकमी मेस व कँटीन चा कर्मचारी वर्ग असल्याने प्रकाश ला हायसे वाटले. बाहेर निघण्याची अजिबात संधी नव्हती.पोलिसांना 'दिसताच गोळी मारा'असे आदेश होते.प्रकाश ला वाटले एखाद दिवसात सारे शांत होईल म्हणून तो ही बिनधास्त होता. आता कार्यालयात तोच प्रमुख असल्याने त्याला विचारून नास्ता व जेवणाचे मेन्यू बनविण्यात येऊ लागले.दोन तीन दिवस प्रकाश ला चांगले चांगले आयते खायला मिळत असल्याने मस्त वाटले.फोन वर त्याचे सुमन व विनित शी बोलणे होत होते व त्यांना ही तो ' येथे मस्त खाण्याची सोय आहे, मी मजेत आहे असे सांगत असे'. पाच दिवस झाले तरी कर्फ्यू उठण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते.आता मात्र प्रकाश कंटाळला होता.रोज रोज गोड धोड व चमचमीत खायला असून ही त्याला अन्न गोड लागत नव्हते.या कैदेतून कधी बाहेर निघतो असे प्रकाश ला झाले होते त्याने सुमन ला फोन केला ' सुमन,मी जाम कंटाळलो आहे कसे ही करून मला आता इथून बाहेर काढ, मला मुक्त व्हायचे आहे.' पण सुमन जवळ ही काही पर्याय नव्हता.अखेर आठ दिवसानंतर कर्फ्यू उठविण्यात आला व प्रकाश घरी आला व आल्याबरोबर त्यांने पहिले काम केले की आपल्या लाडक्या राघू पोपटास सोडून देऊन मुक्त केले .राघू ही पिंजऱ्यातून बाहेर निघताच थोडा चाचपडला पण लगेच आनंदी होत उंच आकाशात मुक्त पणे भरारी घेत उडाला. प्रकाश म्हणाला ' जा राघू जा, तू तुझा मुक्त होऊन जग, मी तुला इतके दिवस पिंजऱ्यात ठेवून तुझ्यावर अन्यायच केलाय त्याबद्दल माफ कर.पण मागील आठ दिवस मी पिंजऱ्यात बंद असल्यासारखा कार्यालयात होतो व तेथून मुक्त होण्यासाठी तडफडत होतो. चांगले जेवायला असून ही जेवण जात नव्हते. तेव्हा मला स्वातंत्र्याचे महत्व कळले व आपण राघू वर किती अन्याय करतोय याची जाणीव झाली ' विनित आपल्या बाबांचे हे म्हणणे ऐकून आनंदी होऊन बाबाना गच्च मिठी मारली व आनंद व्यक्त केला. ' विनित,तू बरोबर म्हणत होतास पण मी राघू च्या प्रेमात आंधळा झालो होतो. आता मला धडा मिळाला आहे. यापुढे मीच काय ईतर कोणालाही असे पक्षी, प्राणी पाळू देणार नाही 'असे म्हणत सुमनला मस्त चहा करण्यास सांगून फ्रेश होण्यासाठी गेले.
पक्षी, प्राणी जरी असले तरी त्यांना ही मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे व त्यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवणे हे अन्यायकारक आहे हेच याप्रसंगी सांगावेसे वाटते.