लिफ्ट: भयकथा
लिफ्ट: भयकथा
रात्रीचा दीड वाजून गेला होता. नव्या बिल्डींगमध्ये पार्टीहून यायला शरदला उशीर झाला होता. सकाळी त्याने निघताना आधी वॉचमेनला विचारून घेतले होते की
“भाऊ या सोसायटीचे गेट रात्री उघडाल न? झोपी तर जाणार नाहीत न?” तेव्हा त्या वॉचमेनने आधी आपण चुकीचे ऐकले का म्हणून परत एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारले.
“काय म्हणालात तुम्ही साहेब? रात्री?”
“हो रात्रीच, असता न इथे तुम्ही? मला यायला उशीर होईल आज रात्री म्हणून म्हटलं”
“रात्री किती वाजता परत येणार आहात साहेब?” त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जे उत्सुक होते जाणून घेण्यासाठी शरद केव्हा परत येणार? कदाचित त्याला रात्री गेट उघडण्यासाठी प्रसाद वगेरे द्यावा लागत असावा?
“रात्री येईन मी बारा-एक वाजता! उघडशील न?” त्याने त्याच्या हातात शंभरची नोट दिली. शंभरची नोट हातात देऊन शरद तिथून पटकन निघून जात होता.
“साहेब, हवे तर लवकर यायचा प्रयत्न करा...रात्रीचा उशीर करू नका... कारण रात्री इथे”
“अरे तुला अजून पाहिजे का पैसे? “ त्यावर वाचमन ने नकार दिला… कदाचित त्याला काहीतरी स्पष्ट करून सांगायचं होत. पण दोघानाही घाई दिसत होती. शरद बाहेर आला अन् बाहेर येऊन त्याने रिक्षा पकडली. अन् रिक्षा पकडून निघून गेला. त्याच्या हे लक्षात नाही आले की त्या वॉचमनची ड्युटी संपली होती. त्याने आपले कपडे घालत स्वगत पूर्ण केले.
“कारण रात्री इथे वॉचमन नसतो... तर...” अन् तो निघून गेला पण जाण्यापूर्वी त्याने आपला इमान राखला शंभर रुपयासाठी त्याने सोसायटीचे गेट उघडे ठेवले...
“गेट उघडे ठेवले तरी कोणी येणार नाही इथे...आणि आला तरी...” त्या वॉचमनने त्या वीस मजली इमारतीकडे खालून वर पर्यंत पाहिले. शरदने इथे राहण्यासाठी फक्त एक फ्लेट रेंट वर घेतला होता. त्याने थेट आल्यावर काहीही विचारपूस न करता राहण्यासाठी समान शिफ्ट केले होते. त्याला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट होती. ती म्हणजे इथली शांतता. खालच्या पार्किंग मध्ये त्याला एक गोष्ट आवडली नव्हती ती म्हणजे धूळ खात पडलेल्या गाड्या त्यांच्यावर प्रत्येकीच्या काचेवर धुळीचा अक्षरश: थर साचला होता.
धुळीच्या थरावर लहान मुलांच्या रेगोट्या तरी दिसाव्या पण त्या सुद्धा नव्हत्या. लहान मुले सुद्धा खेळायला बाहेर पडत नसायची का इथे? पण शरदसाठी हि शांती स्वर्गासारखी वाटत होती. आपली पार्टी उरकून शरद मद्यपान करून रिक्षाने सोसायटीच्या आवारात आला होता. मद्यपानाची नशा त्याच्या जबड्याचे वजन वाढवून त्याला बोलायला मुभा देत नव्हती... रिक्षावाल्याने देखील थोडी टाकलेली होती.
“साहेब आली सोसायटी तुमची...” त्याने सोसायटीकडे न पाहताच शरदला सांगितले.
“हा? आली..आली ...हो.. किती रूपे?” शरद ने पाकीट काढून शंभरची नोट त्याच्या हातात ठेवली.
“अरे सुट्टे नई साहेब”
“ठेव...अप.. तुझ्याकडेच” एक ढेकर देत शरद म्हणाला. नोट डोक्याला लावून त्या रिक्षावाल्याने आपली रिक्षाची किक ओढायला सुरुवात केली. शरद थेट फाटकापाशी आला. गारव्याने त्याला लघुशंका जोरात लागली.
“ए वॉचमन...!” शरदला वॉचमन दिसत नव्हता... पण त्याने हाक मारून गेट वाजवून वाजवून पाहिले पण फाटक उघडले हे बघताच त्याचा आवाज खाली आला. शरदने खाली कोणी आहे का पाहिलं आणि फाटकाच्या बाजूलाच भिंतीच्या आडोशाला जागा धरली अन तिथेच तो हलका झाला... रिक्षा वाला किक ओढून अखेरीस रिक्षा चालू झाली हे पाहून जरा धीरावला अन सहज त्याने एक नजर सोसायटीवर टाकली...तर त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले... त्या सोसायटीच्या खालच्या वर्हांड्यातून पिवळी धमक खांबाची लाईट... पूर्ण सोसायटीच्या भिंतीवर पडली तर त्या बिल्डींगच्या प्रत्येक घराच्या गेलरी मध्ये हरेक कुटुंब येऊन अगदी सावधान अवस्थे मध्ये उभे होते. अन त्या लोकांची थंडगार नजर त्या रिक्षावाल्यावर पडली त्यांची चामडी पांढरी राखाडलेली होती... अन् डोळे वटारलेले होते.
“ये बाबो ये ...” रिक्षा वाल्याने मागून शरदला ओरडायच सोडून तिथून रिक्षा पळवून नेला... दूर जाई पर्यंत त्या रिक्षा वाल्या माणसावर त्या सोसायटीच्या लोकांची थंडगार नजर ठेपली होती. खाडकन त्यांच्या माना आत मध्ये येणाऱ्या शरदकडे वळल्या. अन प्रत्येक जण दात विचकून हसू लागला.
शरद लिफ्टपाशी आला अन त्याने लिफ्टचे आपल्या फ्लोरचे बटन दाबले. १०वा मजला
टिंग आवाज येत लिफ्ट सुरु झाली त्या सोबतच एक ओप्रा संगीत सुरु झाले. ते ऐकताच शरदच्या काळजात धडकीच भरली. त्या गाण्याला एव्हिल सॉंग असेही म्हणतात त्याने ऐकले होते.
“हॉहॉ..हॉ ह हॉहॉ बाय दि विंडो थ्रू दि विंडो”
“अरे हे...बंद कर रे.. काय फालतू गिरी लावली” शरदने जवळ जवळ चेहऱ्यावरचा घाम पुसला. लिफ्ट पाचव्या मजल्यावर आली अन अचानक थांबली.
“टिंग”
“अये पाचवर का थांबली हि?” अन त्या पाचव्या मजल्याचा दरवाजा उघडला दरवाजा उघडताच शरदला समोर एक रिकामा कोरिडोर दिसला... त्याने त्या रिकाम्या कोरिडोरकडे लिफ्ट मधून डोकावून पाहिले... एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे तर उजवी कडे त्याला कोरीडोर च्या शेवटी भिंतीच्या आडबाजुहून एक मुलगा फक्त मान काढून डोकावून पाहताना दिसला.
तो शरदला पाहून हसला...
“हिहि..” त्याचा चेहरा अगदी तसाच प्रेतासारखा पांढरा पडलेला शरद जवळ जवळ दचकून मागे आला अन त्याने लिफ्टचे बटन दाबले... लिफ्टच्या समोरच एक दरवाजा होता तो दरवाजा लिफ्ट बंद होताना खाडकन उघडला... अन आत मधून एक विचित्र माणूस धावत लिफ्टच्या दिशेने येऊ लागला... त्याचे कपडे मळके, केस विखुरलेले कधी अंघोळ पण केली होती का त्याने? पण त्याला असा धावत आलेला बघून शरद आता घाबरला...
“हेल्प... हेल्प... हेय्ल्प” तो ओरडला पण शरद त्या लिफ्टच्या मागच्या कोपऱ्यात अगदी कोळी चिकटतात तसा चिकटला होता. त्या माणसाने लिफ्ट रोखून धरली होती अन तो आत येण्याचा प्रयत्न करत होताच कि मागून त्याचा पाय कोणीतरी धरून ओढला
शरदने तेव्हा तो हात पाहिला
“वरती जाऊ नको ... जाऊ नको वरती! जाय नको...” त्या शेवटच्या नको चा आवाज अतिशय दूरवर जात जात नाहीसा झाला.
शरदची पूर्णपणे उतरली होती. त्याचे हात पाय आता थरथर कापत होते... जसा जसा तो वरती जात होता तसे तसे लिफ्टचे तापमान वाढत होते. आत मध्ये अतिशय गरम भासत होते... असे जसे कि आग लागली आहे कुठेतरी... अन लिफ्ट जेव्हा आठव्या फ्लोरवरती आली तेव्हा
“टिंग” आवाज आला शरद लिफ्टचा दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागला... आता काय असेल? काय पाहायला मिळेल? तो मोठमोठे श्वास घेत धडधडत्या काळजाला पकडून आवंढा गिळत वाट पाहू लागला...
तो माणूस म्हणाला होता.. वरती जाऊ नको ... वरती जाऊ नको.... अन अचानक दरवाजा उघडला.... दरवाजा उघडताच क्षणी लिफ्टच्या समोरचा कोरिडोर लालभडक अग्नीतांडवाचा रंगमंच झाला होता...इकडून तिकडून कोकलत किंचाळत ओरडत धावणारे अंगावर पेट घेतलेले लोक त्याला दिसून आले...
“वाचवा! वाचवा!” कोणी जाऊन थेट खिडक्यामधून उड्या मारू लागले तर कोणी जमिनीवर गडबडा लोळू लागले... अन पुढच्याच क्षणी शरदला त्याच्या समोरचा आणखी एक फ्लेटचा दरवाजा उघडताना दिसला... जो दरवाजा उघडताच आत मधून आगीचा भडका उडाला.... अन त्या भडक्या सोबतच एक पेट घेतलेली बाई अन तिच्या मागे आणखी काही माणसे धावत धावत लिफ्टच्या दिशेने येऊ लागली.. डोळे वटारून पाहणारा शरद घाबरला त्याची भीतीने गाळण उडाली....पाय हात लटलट कापू लागले असले भयान दृश्य पाहून त्याला आता पटकन मरण यावे अशीच इच्छा निर्माण झाली. अन पुढच्याच क्षणी ती लिफ्ट त्या पेट घेतलेल्या माणसांनी भरली अन त्या माणसाच्या मागे त्याला दिसून आला एक लालभडक चेहरा....डोक्यावर शिंग असलेला चेहरा... त्याने शरदकडे पाहून फक्त दात विचकले...अन तो नाहीसा झाला...त्याचा घोगरा आवाज आणि वेदनेने किंचाळत्या लोकांनी शरदला चारी बाजूनी घेरले होते अन बघता बघता शरदच्या अंगाने देखील पेट घ्यायला सुरुवात केली....
“नाही .... ए नाही... नाही... नाय...” शरद तोंडावर दोन हात ठेवत किंचाळत होता...
“याचे हात पकडा रे! पाय पण धरा... हा इंजेक्शन शिवाय ऐकणार नाही... हा धरा!” शरदने डोळ्यावर चे हात काढले समोर पांढरे कपडे अन कोट घातलेले लोक होते....ती खोली शुभ्र पांढरी होती अन तिला एकच दरवाजा अन शरदने स्वतःला तेव्हा एका पांढर्या पलंगावर पाहिले. त्याला आपल्या दंडावर काहीतरी टोचल्याची जाणीव झाली... अन पुढच्याच क्षणी तो डोळे उघडे ठेऊन धडकन बेडवर पडला काही लोकांनी त्याचे हात पाय धरून त्याला सरळ झोपवले...
“काय रे कोण आहे हा?” एका वार्ड बॉयने दुसऱ्याला विचारले....
“अरे तुला नाही का माहिती? अरे हा त्या सोसायटी मध्ये राहायला गेला होता म्हणे...ती नाही का सोसायटी शहराच्या शेवटी आहे ती... अरे ती नाही का...बिल्डींग ला आग लागली होती अन एका रात्रीच पन्नास साठ लोक मेले तीच ती”
“अबाबा? अरे ती तर म्हणतात कि झपाटलेली आहे..”
“हा तिथेच हा सापडला सोसायटीच्या वॉचमेनने सकाळी फोन केला गेली दोन महिने असाच आहे हा... वेड लागलय याला...आयला याला अस वाटत कि याच्या अंगालाच आग लागलीय कि काय.... चल जाऊ झोपला बघ तो...”
म्हणत ते तिथून बाहेर पडले अन त्यांनी मागे शरदच्या खोलीचे दार लावून घेतले...

