प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Inspirational

3  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Inspirational

कृतिशील व्यक्तीमत्व डी.आर.डेरे

कृतिशील व्यक्तीमत्व डी.आर.डेरे

3 mins
450


   एक उतुंग अन कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. डी. आर.डेरे गुरुजी यांच्या कर्तुत्वाची चुणूक मी श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा येथे रुजू होताच अनुभवास आली.कालांतराने त्यांच्यातील अनेकविध कार्यकर्तुत्वाचे पैलू उलगडत गेले. ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील श्री डी.आर.डेरे गुरुजी यांचा जन्म स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर म्हणजे १५ ऑगस्ट १९६२ ला पिंपळखुटा या संतभूमीत झाला.पदवी व पदव्युत्तर परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर श्री संत शंकर बाबा यांच्या आज्ञेने *श्री ज्ञानेश्वर रामकृष्णजी डेरे* हे श्रीसंत शंकर महाराज विद्यामंदिर पिंपळखुटा येथे गुरुजी म्हणून रुजू झाले.

     विशेष म्हणजे श्री.डेरे सर यांच्या पुढाकाराने तसेच सर्व भक्तांचे प्रयत्न आणि परमहंस श्रीसंत शंकर बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने सन १९८९ ला पिंपळखुटा या लहानशा गावात *श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर* या नावाने शाळा सुरू करण्यात आली.सर्वप्रथम ८ वा वर्ग सुरू करून,त्याच नेतृत्व आदरणीय श्री डी.आर.डेरे गुरुजी यांच्या कडे सोपविण्यात आले होते.शाळेचे पहिले मुख्याध्यापक,शिक्षक,लिपिक, आणि चपराशी अशा चतुरस्त्र भूमिकेत त्यांनी शैक्षणिक कार्य सुरू केले.त्यावेळी ८ व्या वर्गात केवळ १४ विध्यार्थी प्रवेशित होते.आज त्यांनी लावलेल्या या लहानशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे.सध्या स्थितीत या शाळेत जवळपास ६५० ते ७०० विध्यार्थी शिक्षण घेत आहे.याचे श्रेय श्री डेरे गुरुजी यांना जाते.

  कालांतराने श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट पिंपळखुटा च्या माध्यमातून श्री संत शंकर महाराज एम.सी.व्ही.सी.तसेच कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालय आणि श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास त्याचा सिहाचा वाटा कुणीच नाकारणार नाही.गावातील तसेच परिसरातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये अशी त्यांची कायम भूमिका राहिली व आहे.विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देत असताना ज्ञानदानाबरोबरच वास्तववादी विद्यार्थी घडविण्याकडे त्यांचा अधिक कल होता.आजचा विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे म्हणून एक सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून जडणघडण करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. जात,धर्म,पंथ,आणि वर्ण असा भेद न करता विद्यार्थ्यांतील गुणवत्ता हेरून त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देणे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देण्याचा डेरे सरांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाला सामोरे जाण्याची जिद्द निर्माण करण्याचे कौशल्य सरांच्या अंगी होते. विद्यार्थ्यांत नकारात्मकतेचा लवलेशही असणार नाही आणि सकारात्मक दृष्टिकोन अधिकाधिक कसा पेरता येईल यासाठी सरांची धडपड राहिली आहे.त्या अनुषंगाने जे जे करता येईल ते ते सर्व प्रयत्न/उपाय त्यांनी अवलंबलेत.नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेत.विद्यार्थी/कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष देऊन त्यांचा सन्मान करणे ही योजना त्यांचीच देणगी आहे.चांगल्या अक्षराचे वळण हेही डेरे सरांची देणगी असल्याचे विद्यार्थी अभिमानाने आवर्जून सांगतात. अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाने सरांची कारकीर्द गाजली आहे.

   शासकीय नियमानुसार सर ऑगस्ट २०२० ला सेवानिवृत्त झाले आहे.मात्र त्याची कारकीर्द सर्वांसाठी अविस्मरणीय अशीच राहिली आहे.

   सर्व विद्यार्थ्यांत लोकप्रियतेसोबतच सर्वांचे आवडते आणि लाडके असलेल्या सराचा स्वभाव शांत,मितभाषी,निटनिटकेपणा, वक्तशीरपणा, काटकसर,कार्यतत्पर,कोणतेही काम आनंदाने आणि पूर्ण क्षमतेने करून खऱ्या अर्थाने ते सर्वांचे प्रेरणास्रोत ठरले आहे.विशेष म्हणजे कठोर शिस्त प्रिय राहिले तरी ते सर्वांचेच आवडते राहिले आणि राहणार सुद्धा!!!!.

    शालेय अध्यापन कार्याबरोबरच परीक्षा विभाग,केंद्रसंचालक ,म्हणून त्यांनी लिलया आव्हान पेलले.पर्यावरण प्रेमी असलेल्या डेरे सर यांनी स्वतः झाडे लावून, नित्यक्रमाने रोज ते विध्यार्थ्यांना रोपटे देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करीत असे.शाळेतील अन्य बाबतीतही त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केलेले आहे.

  शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यात्म त्याच्या आवडीचे क्षेत्र. धामणगाव रेल्वे येथील वास्तव्यास गेले असता तेथील विद्युत कॉलनीत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील लोकांना एकत्रित करून *श्री संत गजानन महाराज* मूर्ती प्रतिस्थापना आणि मंदिराची उभारणी करण्यास पुढाकार घेतला अन आगळेवेगळ्या वातावरणाची निर्मिती केली.पूर्वी सुनसान असलेल्या त्या कॉलनीत आता दर गुरूवारला सर्व मंडळी एकत्रित येऊन महाप्रसाद सहभोजन करतात.आता तेथे भक्तिमय वातावरण झाले आहे. यासाठी तेथील नागरिक श्री डेरे गुरुजी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात.इतकेच नव्हे तर त्यांना भजन कीर्तनाची आवड आहे.आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी इतर सहकारी मंडळीना सोबत घेऊन *भजन मंडळ* स्थापन केले.भजनाच्या माध्यमातून सर घरा-घरात पोहचले आहे.त्यातही त्यांनी भजन हे सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच असावे असा त्यांनी नियम घालून दिला आहे.विशेष म्हणजे ज्या गावात भजन असेल त्या गावात भजनी मंडळी ही स्वमालकीच्या चारचाकी गाडीबरोबरच पेट्रोल खर्चाची जबाबदारी सुद्धा स्वतःच गुरुजी उचलतात हे विशेष!!

  अशा प्रामाणिक,परखड, जिज्ञासू निस्वार्थी,निगर्वी,कर्तव्यतत्पर श्री डेरे गुरुजी यांचा १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस.त्यांची ही दैदिप्यमान वाटचाल निरामय स्वास्थासह सुखी समृद्ध,ऐश्वर्य संपन्न होवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच या वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक कोटी कोटी हार्दिक सदिच्छा!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational