करायला गेलो एक..
करायला गेलो एक..
कोडिंग संपवून मी डोकं वर केलं. कम्प्युटरच्या उजव्या बाजूने समोरच्या क्युबिकलमध्ये पाहिलं. रश्मी अजुनही कामात गुंग होती. मी रश्मीचं रूप न्याहाळण्यात दंग झालो. अचानक रश्मीने वर पाहिलं. हे इतकं अचानक घडलं की मला नजर दुसरीकडे वळवायची संधीच मिळाली नाही. मी तिच्याकडे पाहतोय हे तिच्या लक्षात आलं, पण तिला त्यात काही विचित्र वाटलं नसावं किंवा खुपच कामाच्या नादात असल्याने तिला त्यात काही वेगळं जाणवलं नसावं. ती माझ्याकडे पाहुन हसली आणि पुन्हा खाली मान घालून आपल्या कामात गढून गेली. केवळ दोन सेकंदांचा खेळ, पण त्या वेळात माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. अजुनही छाती धडधडत होती. स्ट्रेस मँनेजमेंट सेमिनार्समध्ये सांगतात तसा दोन तीनदा दीर्घ श्वास घेउन सोडला, तेव्हा कुठे छातीतली धडधड थांबली.
पण मी मनाशी म्हटलं, “छ्या! यात काही अर्थ नाही. किती दिवस असं चोरुन पहायचं. आज काही होवो, आपण आपलं मन आज रश्मीपुढे उघडं करायचंच. मग याचा परिणाम काय वाटेल तो होवो.”
शुक्रवार होता म्हणुन मनातल्या मनात संतोषी मातेला नमस्कार केला आणि जागेवरुन उठलो. रश्मीच्या बाजुला जाउन उभा राहिलो. पण बराच वेळ झाला तरी तिचं माझ्याकडे काही लक्ष गेलं नाही. तिच्या हातात आमच्या ॲप्लिकेशनच्या सोर्स कोडचा प्रिंट आउट होता. तो वाचण्यात ती पूर्ण गढून गेली होती.
“बाई गं, ॲप्लिकेशनचा सोर्स कोड एवढ्या मनापासून वाचतेस. थोडा वेळ माझ्या हृद्याचा सोर्स कोड वाचुन पहा. आयुष्याचं सोनं होईल तुझ्या.”मी मनाशी म्हटलं.
हे माझं नेहमीचं आहे. नाटकात म्हटली तर टाळ्या पडतील, अशी चमकदार आणि असामान्य वाक्यं मला कायम सुचतात. पण रश्मी समोर आली की माझ्या मेंदुचा प्रोसेसर हॅन्ग होतो आणि तोंडातुन फक्त फिकी आणि अतिसामान्य वाक्यं बाहेर पडतात.
“पण आज असं होणार नाही.” मी स्वतःला बजावलं. रश्मी अजुनही सोर्स कोडमध्येच गुंग होती.
“हाय गर्लफ्रेंड, काय चाललंय?” मी टाळयांचं वाकय फक्त रश्मीलाच ऎकू जाइल अशा आवाजात फेकलं.
रश्मीने वर पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर लटक्या रागाचे भाव होते.
“रवी, तुला किती वेळा सांगितलं, मला गर्लफ्रेंड म्हणत जाऊ नकोस.”
“अरे त्यात चुक काय आहे? तु गर्ल आहेस आणि माझी फ्रेंड सुद्धा आहेस. मग तुला गर्लफ्रेंड म्हटलं तर चुकलं कुठे?” मी निरागसपणे विचारलं.
“हे लॉजिक लावायचं झालं तर आपल्या प्रोजेक्टमधले सगळे मित्र तुझे बॉयफ्रेन्ड्स व्हायला हवेत.” रश्मीने बिनतोड युक्तिवाद केला.
मी ओशाळा हसलो.
“बरं ते जाऊ दे. माझं एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे.”मी विषयाला बगल दयायचा प्रयत्न केला.
“रवी, आज मी खुप बिझी आहे. प्लीज, आपण नंतर बोलुया.”
“पण रश्मी...”
“प्लीऽऽऽऽऽज. प्लीऽऽऽऽऽज माय डिअर.” रश्मीने ओठांचा लाडिक चंबू करत विनवणी केली.
रश्मी मला चक्क ‘डिअर’ म्हणाली. माझा कानांवर विश्वास बसेना. मी तरंगतच माझ्या क्युबिकलकडे परतलो.
आज काम झालं नाही तरी सोमवारी रश्मीला पुन्हा गाठायचं आणि आपल्या प्रेमाचा उच्चार तिच्यासमोर करायचाच, असं मी ठरवलं.
कंप्युटरच्या स्क्रीनकडे पाहताना गेल्या काही महिन्यांचा प्रवास माझ्या डोळयांसमोरुन सरकू लागला. सहा महिन्यांपुर्वी रश्मी कंपनीत जॉइन झाली ती नेमकी माझ्या प्रोजेक्टमध्ये. प्रोजेक्टमध्ये मी जुना टीम मेंबर म्हणुन रश्मीला प्रोजेक्टची के.टी.(माहिती) द्यायचं काम मॅनेजरने माझ्यावर सोपवलं.
के.टी.च्या निमित्ताने रश्मी दिवसातला बराच वेळ माझ्याबरोबर राहू लागली आणि अचानक कंपनीमध्ये माझा भाव वधारला. पुर्वी मी समोरुन आलो,हसलो तरी लोकांची नजर माझ्यातुन आरपार जायची. मी अदृश्य आहे की काय, अशी शंका बर्याचदा मला येत असे. पण रश्मीच्या आगमनानंतर लोकांना मी अचानक “दिसू” लागलो. येताजाता ते माझी आणि सहज केल्यासारखी म्हणुन रश्मीची चौकशी करू लागले. आठवड्भरात मला कंपनीतल्याचाळिसेक लोकांच्या फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट्स आल्या. लोकांच्या वागण्यात झालेला हा बदल पाहून माझी मात्र झोप उडाली. कारण रश्मीची चौकशी करणार्यांमध्ये कंपनीमधली काही प्रभावी व्यक्तिमत्वंसुद्धा होती. त्यांची रश्मीशी ओळख होऊ देणं अतिशय धोकादायक होतं. कारण त्यांची रश्मीशी ओळख झाली असती तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली मी पुरता झाकोळुन गेलो असतो आणि माझा पत्ता कायमचा कट झाला असता.
शेवटी बराच विचार केल्यावर मला एक मार्ग सुचला. रश्मीचा आधीपासुनच एक बॉयफ्रेंड आहे, अशी अफवा मी कंपनीत पसरवली. या अफवेने आपलं काम अगदी चोख बजावलं. मला ओळख दाखवणार्यांचा ओघ पुन्हा ओसरला. लोकांच्या नजरेतुन मी पुन्हा अदृश्य झालो आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. रश्मी माझ्यासोबत असताना मला भेटायला येणार्या लोकांचा ओघ अचानक का ओसरला, अचानक माझ्या लोकप्रियतेत का घट झाली, याचं कोडं रश्मीला बापजन्मात उलगडणार नाही.
शुक्रवारी काम झालं नाही, पण सोमवारी रश्मी प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावायचा, असा मी मनाशी निर्धार केला. कामामध्ये लक्ष गुंतवायचा प्रयत्न केला. काही वेळाने तंद्री लागली. संध्याकाळ झाली. मी डोकं वर केलं. रश्मीच्या क्युबिकलकडे पाहिलं. रश्मी जागेवर नव्हती. तिची पर्ससुद्धा जागेवर नव्हती. ती केव्हा निघून गेली ते कामाच्या नादात मला कळलंसुद्धा नव्हतं. कॉम्प्युटर बंद करुन ऑफिसमधुन खाली आलो. ऑफिसच्या बाजुलाच टपरी आहे, तिथे गेलो. सोमवारी काय होणार, रश्मीला प्रपोज केल्यावर तिची प्रतिक्रिया काय होईल याचं प्रचंड टेंशन आलं होतं. टपरीवरच्या छोटुकडून सिगारेट घेतली. सिगारेट शिलगावली आणि झुरके घेत सोमवारचा विचार करू लागलो. रश्मीला सिगारेटचा वास आवडत नाही. मी कधी सिगारेट ओढून आलो आणि तिच्या आजूबाजूला उभा राहीलो की तिला लगेच कळतं. ती कपाळावर आठया पाडून माझ्याकडे पाहते. मग मी लगेचच तिथून काढता पाय घेतो.
रश्मीचाच विचार करत मी सिगारेट संपवली. थोटुक खाली टाकुन पायाने चिरडलं. बाईकला किक मारली आणि घराच्या दिशेने निघालो.
एखादया व्हायरसप्रमाणे रश्मीने माझ्या डोक्याचा पुरता कब्जा घेतला होता. माझं डोकं तिने पुरतं इन्फेक्ट करुन टाकलं होतं. शनिवार-रविवार मी कसे घालवले ते माझं मलाच माहित. कधी एकदा सोमवार उजाडतो, असं मला झालं होतं. रविवारची रात्र तर विचित्रच होती. मध्यरात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नात रश्मी आली होती. हैराण करणारी गोष्ट म्हणजे स्वप्नात ती चक्क भकाभका सिगारेट ओढत होती. मी तिला प्रपोज करत होतो. पण ती माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन उलट सिगारेटचा धूर माझ्या तोंडावर सोडत होती. सिगारेट पूर्ण ओढून झाल्यावर तिने थोटुक खाली टाकलं. मी खाली पाहिलं, तर खाली थोटुकाच्या जागी मी होतो आणि रश्मी पायाच्या अंगठ्याने मला चिरडत होती. मी दचकून जागा झालो. अंगाला दरदरून घाम फुटला होता. आपण बघितलं ते स्वप्न होतं, हे जाणवून हायसं वाटलं. पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. बर्याच वेळाने केव्हातरी झोप लागली.
सकाळी उठलो, पटापट तयारी केली. सोमवार म्हणून भगवान शंकराला मनापासून नमस्कार केला.”रश्मीकडून होकार येऊ दे”,म्हणून महादेवाला साकडं घातलं. ऑफिसला निघालो. ऑफिसला आलो.सर्वात आधी रश्मीच्या क्युबिकलकडे नजर टाकली. ती जागेवर नव्हती. तिची पर्ससुद्धा जागेवर दिसत नव्हती. मी मनाशी चरफडलो. कामाला लागलो. तासभर होऊन गेला, तरी रश्मी आली नाही.
मी मग निशाकडे गेलो. निशा माझ्यापासुन काही अंतरावर बसते. ती रश्मीची खास मैत्रिण. काही वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या आणि सहज चौकशी करत असल्यासारखा रश्मीचा विषय काढला.
“अरे तुला माहित नाही? ती तिच्या घरी गेलीय पुण्याला. आठवडाभर सुट्टीवर आहे. आता पुढच्या सोमवारीच येईल ती.”
“काय? आठवडाभराच्या सुट्टीवर गेलीय?” मी ऐकुन मी जागचा उडालो.
“हो. का काय झालं? तिच्याकडे काही खास काम होतं का?” तिने “खास” या शब्दावर ‘खास’ जोर देत विचारलं. तिच्या प्रश्नातला तिरकसपणा मला जाणवला.
या मुलींचा काही भरवसा नाही. रश्मीमध्ये मी जास्त इंटरेस्ट घेतोय असं तिला वाटलं, तर आपलं बिंग फुटेल, अशी मला भीती वाटली. मी रश्मीपुराण आवरतं घेतलं.
“नाही. काही खास नाही. प्रोजेक्टचंच काम होतं. पण ठिक आहे. मी मँनेज करेन” असं म्हणून मी तिथुन काढता पाय घेतला.
आता रश्मीशी बोलण्यासाठी आठवडाभर थांबायचं, या विचाराने डोक्याचं भजं झालं...करपलेलं.
कामातल्या चुकांबद्दल मँनेजरकडून त्या एका आठवड्यात मी जेवढ्या शिव्या खाल्ल्या, तेवढ्या तोपर्यंतच्या पूर्ण करियरमध्ये कधी मी खाल्ल्या नव्हत्या. आधीच रश्मीमुळे डोकं कामातून गेलं होतं. नेमकं त्या आठवड्यात कामसुद्धा मरणाचं होतं. मी कामातून कोमात जातो की काय, अशी भीतीसुद्धा मला चाटून गेली. तो आठवडा मी कसा काढला ते माझं मलाच माहित.
शेवटी एकदाचा पुढचा सोमवार उजाडला. मी ऑफिसला पोहोचलो. पुण्यावरून येणार असल्याने रश्मी ऑफिसला थोडी उशिरा पोहोचणार होती. कॉंम्प्युटर चालू करताना अचानक माझ्या सुपिक डोक्यात एक किडा वळवळला. रश्मीची आज थोडी थट्टा करावी, असं मी ठरवलं. प्रोजेक्ट मधल्या माझ्या सहकार्यांना मी विश्वासात घेतलं.
तर प्लान असा होता-
रश्मी आली की मी सहकार्यांपैकी एकाला खूण करेन. त्याबरोबर त्याने रश्मीजवळ जाऊन तिचं अभिनंदन करायचं. त्यावर ती गोंधळून विचारेल,”अभिनंदन कशाबद्दल?”
तेव्हा त्याने/तिने रश्मीला सांगायचं,”तुझं लग्न जमल्याचं कळलं, त्याबद्दल अभिनंदन.”
पहिला सहकारी परत आला की थोड्या वेळाने दुसर्याने रश्मीकडे जायचं. त्यानेसुद्धा तिचं लग्न जमल्याबद्दल अभिनंदन करायचं.
तो परत आल्यावर तिसऱ्याने जायचं. तो आल्यावर चौथ्याने. आणि मग ती या साऱ्या प्रकाराने भांबावुन गेली की मग सगळ्यांनी एकत्र तिच्याजवळ जाऊन या नाटकावर पडदा टाकायचा - असं ठरलं.
हा प्लान सार्यांना आवडला. सारे जण रश्मीची वाट पाहु लागले. थोड्या वेळाने रश्मी आली. सार्यांनी एकमेकांकडे सहेतुकपणे पाहिलं. मी निशाला खूण केली. निशा रश्मीकडे गेली. आम्ही सार्यांनी माना खाली घालुन कामात दंग असल्याचं नाटक केलं. पण सारेजण चोरट्या नजरेने रश्मीकडे पहात होते.
निशाने ठरल्याप्रमाणे रश्मीचं अभिनंदन केलं. रश्मीच्या चेहऱ्यावर गोंधळाचे भाव पसरले. सारे जण आपलं हसु आवरायचा प्रयत्न करत होते. रश्मी निशाला काही तरी समजावुन सांगत होती. थोडया वेळाने निशा परतली. ती मोठ्या कष्टाने आपलं हसू आवरत होती. जागेवर बसताना तिने मला अंगठा दाखवला. याचा अर्थ सारं ठरवल्याप्रमाणे पार पडलं होतं. मी लगेच राकेशला खूण केली. राकेश जागेवरुन उठला आणि रश्मीकडे गेला. सारेजण चोरट्या नजरेने हे नाटक पहात होते. राकेशने रश्मीचं अभिनंदन केलं. रश्मी पुन्हा गोंधळल्यासारखी दिसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहुन सारेजण खाली मान घालुन हसत होते. रश्मी राकेशला काही तरी सांगत होती. थोडया वेळाने राकेश परतला. माझ्या जवळून जाताना त्याने मला ऑल क्लिअरचा इशारा दिला.
मी चेतनला इशारा दयायचं ठरवलं. त्याला इशारा देणार एवढ्यात माझ्या पीसी वर एक चाट विंडो फ्लँश झाली. मी पाहिलं तर निशाचा मेसेज होता. तिने म्हटलं,”रवी, झाली तेवढी मजा पुरे झाली. आपण रश्मीला जाउन खरं सांगुया”
मी तिला लिहिलं,”बास्स, आणखी फकत थोडाच वेळ. आणखी दोघेच जण जायचे बाकी आहेत”
मी चेतनला जायची खूण केली. चेतन रश्मीकडे गेला. तिचं अभिनंदन केलं. आधीच्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. रश्मीचा चेहरा पुन्हा गोंधळल्यासारखा आणि काहीसा त्रासल्यासारखा दिसत होता. मी मोठ्या मुश्किलीने हसू आवरत होतो. थोड्या वेळाने चेतन परतला. त्यानेसुद्धा मला हसत ऑल क्लिअरचा इशारा दिला. मी रश्मीकडे पाहिलं. ती काहिशी त्रासल्यासारखी दिसत होती. मी नाटक थांबवायचा निर्णय घेतला आणि तिच्याकडे जाऊन या नाटकाचा खुलासा करायचं ठरवलं. मी तिच्याकडे जात असताना तिचा फोन वाजला. तिला मेसेज आला होता. ती तो मेसेज वाचू लागली. मेसेज वाचुन तिने समोर पाहिलं तर तिच्या पुढयात मी उभा होतो.
मी तिला ’हाय’ केलं. तिनेसुद्धा ‘हाय’ म्हटलं आणि लगेचच म्हणाली,
“बरं झालं तू आलास ते. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं.”
“काय बोलायचं होतं?” मी विचारलं.
“इथे नको. कँफेटेरियात जाउन बोलू या. तिथे फारसं कुणी नसेल.”
“ठिक आहे.”
आम्ही कँफेटेरियात गेलो. तो जवळजवळ रिकामाच होता.
तिथल्या दोन खुर्च्यांवर आम्ही बसलो.
“हं बोल आता. असं काय महत्वाचं बोलायचं होतं तुला?” मी विचारलं.
“रवी, काही तरी गोंधळ आहे. ”
“कसला गोंधळ?”
“मी आज ऑफिसला आल्यापासुन प्रत्येकजण माझ्याजवळ येऊन लग्न ठरल्याबद्दल माझं अभिनंदन करतोय”
हे ऎकुन माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. मी तिला या सार्याचा खुलासा करणार तेवढ्यात ती पुढे म्हणाली,
“माझं लग्न ठरलंय हे मी खरं तर अजुन कुणालाच सांगितलं नाही. मला कळत नाही या लोकांना हे कळलं तरी कुठून?”
हे वाक्य ऐकताच मी ताडकन उठलो. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. मी खात्री करुन घेण्यासाठी विचारलं,”रश्मी, तुझं लग्न खरोखर ठरलंय?”
यावर रश्मी लाजली आणि म्हणाली,”हो. पण मी हे ऑफिसमध्ये कुणालाच सांगितलं नव्हतं.”
मी स्वतःवर मोठ्या प्रयत्नाने ताबा ठेवत विचारलं,”हे सगळं कधी ठरलं?”
“मी आता सुट्टी घेऊन घरी गेले होते तेव्हा.” तिने पुन्हा लाजत सांगितलं.
एव्हाना माझं डोकं गरगरायला सुरुवात झाली होती. कुणीतरी डोक्यात घणाचे घाव घालतं आहे, असं वाटत होतं. रश्मी माझ्या हातातुन निसटली होती. ज्या वेळेस मी तिला प्रपोज करायचा विचार करत होतो, त्या काळात तिचं लग्न ठरलं होतं. मला काय करावं ते कळेना. विचारांचा ताण असह्य होऊन मी दोन्ही हातांत डोकं गच्च धरलं.
माझी ही अवस्था पाहुन रश्मी दचकली. तिने घाबरून विचारलं,”रवी, काय झालं? तुला बरं नाही वाटत? डोकं दुखतंय का?”
मी मोठ्या मुश्किलिने स्वतःला सावरलं आणि म्हटलं,”काही विशेष नाही. जरा डोकं दुखतंय. जरा खाली फार्मसीत जाऊन गोळी घेऊन येतो.”
असं म्हणुन मी उठलो आणि जायला निघालो. आता मी जास्त वेळ स्वतःला तिच्यासमोर आवरू शकलो नसतो.
“तुला नक्की जमेल ना? की मी सोबत येऊ?” तिने काळजीच्या सुरात विचारलं.
‘आता तुझी सोबत विसरायला हवी मला.’मी मनाशी म्हटलं, पण मोठ्याने तिला म्हटलं,”मी ठिक आहे. जाईन एकटा.”
आणि मागे वळुन न पाहता मी ऑफिसचे जिने उतरुन खाली आलो. माझा कंठ दाटुन आला होता. नशिबाचे फासे उलटे पडले होते. अगदी जोरजोरात बेंबीच्या देठापासून ओरडावंसं वाटत होतं. कसं तरी स्वतःला आवरलं. पावलं टपरीकडे वळली. छोटुकडून सिगारेट घेतली. सिगारेट शिलगावली आणि झुरके घेत दुःख विसरायचा प्रयत्न करू लागलो. रफीचं गाणं नकळत ओठांवर आलं,
‘हर फिक्र को धुए मे उडाता चला गया...’
अशीच दोन मिनिटे गेली असतील, तेवढ्यात मागुन आवाज आला,”अच्छा, तर ही आहे तुझी डोकेदुखीची गोळी?”
मी दचकून मागे पाहीलं. मागे रश्मी उभी होती.
“तुला माहित आहे ना सिगारेट म्हणजे स्लो पॉयझनिंग आहे ते?”
“उत्तम. तसाहीआता जगण्यात रस कुणाला उरलाय?”
रश्मी सरळ पुढे झाली. तिने माझ्या हातातली सिगारेट खेचुन घेतली आणि जमिनीवर फेकुन दिली.
मी जाम चिडलो आणि म्हटलं,
“बाई ग, तु कोण मला अडवणारी, माझ्यावर अधिकार गाजवणारी? एवढीच हौस आहे तर जाउन तुझ्या होणार्या नवऱ्यावर अधिकार गाजव.”
“तेच तर करतेय” रश्मी शांतपणे म्हणाली.
“काय बोललीस?”
“जे तू ऐकलंस तेच.”
“पण तु मघाशी म्हणालीस की तुझं लग्न ठरलंय म्हणून”
“ते खोटं होतं. मी तूला लग्न जमल्याचं खोटं सांगितलं”
“काय? पण का?”
“तु लोकांना माझ्याकडे पाठवुन माझं लग्न जमल्याबद्दल खोटं खोटंच अभिनंदन करायला लावलंस. त्याचा मी वचपा काढला.”
“तुला कसं कळलं की ते नाटक मी रचलं?”
“माझ्या एका हितचिंतकाने मला एस एम एस पाठवुन ते कळवलं. कारण तुझ्या नाटकामुळे मला होत असलेला त्रास त्या व्यक्तीला बघवला नाही.”
“हं...”
“म्हणुन मी ठरवलं तुला तुझ्याच औषधाची चव घ्यायला लावायची”
“बाई ग, त्या जालिम औषधाने माझ्या तोंडाची चवच गेली, त्याचं काय?”
यावर रश्मी गोड हसली.
मी तिला म्हटलं,“या सगळ्या प्रकारावरून मला ती प्रसिद्ध म्हण आठवली.”
“कुठली?”
“काय बरं? हं आठवलं. ते म्हणतात ना, करायला गेलो एक आणि झालं..”
माझ्या तोंडावर हात ठेवत रश्मीने वाक्य पूर्ण केलं,“..आणि झालं हवं तेच..”
======================= समाप्त =======================
रश्मी रवीच्या मनात भरलीय आणि लवकरच तो आपलं मन तिच्यासमोर उघड करणार आहे. पण तिच्या मनात काय आहे हे त्याला ठाऊक नाही. आणि म्हणतात ना प्रेमाचा मार्ग काट्या-कुट्यातून,खाच-खळग्यातून जातो. रवीच्या मार्गातही अशाच बऱ्याच अडचणी आ वासून उभ्या राहणार याचा त्याला पत्ता नाही. एक साधीशी मस्करी करायचं ठरवतो. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी वाचा.. करायला गेलो एक..