आषाढस्य प्रथम दिवसे
आषाढस्य प्रथम दिवसे


आज आषाढाचा पहिला दिवस, पण उन्हामुळे अंगाची काहिली होत होती. पाउसही पडत नव्हता. बिचारी प्रिया आज अगदी उदास होती. तिच्या आणि चंदनच्या लग्नाला जेमतेम वर्षं झालं होतं. पण तिचा चंदू तिच्यापासून गेले महिनाभर दूर होता. आयटीवाला नवरा पकडण्याचे हे दुष्परिणाम. त्यापेक्षा एखादा डॉक्टर बघितला असता, तर तो असा मुंबई सोडून कंपनीच्या कामासाठी म्हणून हैदराबादेत गेला नसता आणि प्रियावर असं विरहिणीचं आयुष्य कंठायची वेळ आली नसती. तशी तीसुद्धा आयटीवालीच. पण तिच्या कंपनीची हैदराबादेत शाखा नव्हती. आठवड्याभरासाठी म्हणून तिथे गेलेला चंदू चांगला महिनाभर अडकला होता. त्यात प्रोजेक्टमध्ये एवढी आग लागलेली की बिचाऱ्याला शनिवार, रविवारसुद्धा सुट्टी मिळत नव्हती.
आयटीमध्ये असूनही प्रिया अतिशय रसिक तरुणी. तिला वाचनाची भरपूर आवड. मराठीतील तमाम प्रेम व शृंगारिक साहित्याचा तिने फडशा पडला होता. अगदी कालिदासापासून ते फडके, काकोडकर यांच्याबरोबरच अगदी ह्ल्लीह्ल्लीचे प्रेमकथा लेखक ती कोळून प्यायली होती.
चंदन तिला पाहायला आला होता, तेव्हा त्याला वाचनाची फारशी आवड नाही हे कळलं, तेव्हा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. पण तिला पाहताक्षणीच तिच्यासाठी पागल झालेल्या चंदूने तिला वाचनाची सवय लावून घेईन, असं आश्वासन दिलं, तेव्हा कुठे प्रियाचा होकार त्याच्या पदरात पडला होता. आयटीच्या व्यग्र कामातून यथाशक्ती वेळ काढत चंदूने ते आश्वासन जमेल तितकं निभावलं होतं.
“चंदू, बघ ना कसे दिवस आलेत आपल्यावर,” फोनवर दु:खी सुस्कारा सोडत प्रिया म्हणाली
“हो ना प्रिये, मधु तिथे अन चंद्र इथे.”
“चंदू तू कधी परतणार मुंबईला?”
“माहित नाही प्रिये.आज शनिवारीसुद्धा मी कामावर चाललोय.”
“आणि इथे तुझ्या विरहात मी सुकून चाललेय.”
“माझा नाईलाजै प्रिये. ही दुनिया जालीमै. क्लायंट निष्ठुरै नि मी अगतिकै.”
“काय हे रुक्ष जीवन..” प्रिया हताश होऊन म्हणाली.
“पण प्रिये, तुझ्या एक लक्षात आलं का?”
“काय?”
“आपलं आयुष्यसुद्धा तुझ्या आवडत्या कवी कालिदासाच्या साहित्यासारखं चाललंय,” चंदूने प्रियाचा आवडता विषय काढून तिचा मूड सुधारायचा प्रयत्न केला.
“ते कसं?”
“आठव मेघदूत. त्यातले ते विरहात बुडालेले यक्ष आणि यक्षिणी. आपली अवस्था तरी काय वेगळी आहे?”
“अरे हो. खरंच की. मला हे लक्षातच आलं नाही. पण हे साम्य इथेच संपतं.”
“मुळीच नाही. तिथे यक्ष मेघामार्फत आपल्या प्रियेला निरोप पाठवतो आणि आपल्या बाबतीत..”
“आपल्या बाबतीत कुठला मेघदूत?”
“अरे तुझ्या अजून लक्षात नाही आलं? मला सांग, मेघदूत म्हणजे काय? क्लाउड मेसेंजर. बरोबर? मी तुला इमेल पाठवतो, फेसबुकवर स्टेट्स अपडेट करतो ते सारं तुझ्यापर्यंत कसं पोहोचतं? इंटरनेटच्या क्लाउड टेक्नोलॉजीच्या मदतीनेच ना? म्हणजे इथेपण क्लाउड म्हणजे मेघच काम करतो न दूताचं.”
“अरे देवा.”
आपला भीषण टेक्निकल जोक ऐकून पलीकडे प्रियाने कपाळावर हात मारला हे चंदूच्या लक्षात आलं.
“ते सगळं सोड. तू परत कधी येणार ते मला सांग,”प्रियाने मुद्द्याला हात घातला.
“काश मुझे पता होता,”चंदूने राष्ट्रभाषेचा सहारा घेतला,”अरे हो, माझी आता मिटिंग आहे. आपण दोन तासांनंतर बोलू.” चंदूने घाईघाईत फोन ठेवला.
प्रिया पुन्हा आपल्या दु:खात बुडून गेली. तिने एक प्रेमकादंबरी उघडली आणि ती वाचनात रमून गेली.
दोनेक तासांनी फोन वाजला.
“प्रिये.”
“बोल चंदू. तुझ्याच फोनसाठी आतुरले होते रे. तू येना रे पटकन निघून. मला नाही सोसवत हा विरह आता.”
“मनापासून बोलावते आहेस?”
“हे असं रे का बोलतोस?”
“अगं ते संत रुकरुक खान कुठल्यातरी चित्रपटात बोलून गेलेत ना - अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है”
“हो रे बाबा. अगदी तसंच तू इथे यावंस असं मला वाटतं.”
“अस्सं?”
प्रिया काही उत्तर देणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
तिने दरवाजा उघडला तर दारात चंदू उभा.
प्रियाने आश्चर्याने डोळे विस्फारले आणि पुढच्याच क्षणी ती चंदूच्या मिठीत होती.
“अरे पण तू तर हैद्राबाद ऑफिसला...”
“अगं प्रोजेक्ट संपला कालच. पण म्हटलं थोडी गंमत करू एका यक्षिणीची. म्हणून तुला पूर्वकल्पना न देता सरळ विमानाने निघून आलो मुंबईला.”
“दुष्ट कुठले.”
“बरं मग आता पुढे काय प्लान?” प्रियाने मिठीतून दूर होत विचारलं.
“पुढचं पुढे पाहू. आधी एवढ्या दिवसांचा उपवास मोडणार. कालिदास झिंदाबाद. फडके, काकोडकर झिंदाबाद.”
पुढे काय होणार हे जाणवून प्रियाचे डोळे विस्फारले. ती पळ काढणार तोवर चंदूने तिला दोन्ही हातांवर आडवी उचलून घेत म्हटलं,”नाहीतरी आईबाबांना नात/नातवाचं तोंड बघायची घाई झालीय. तेव्हा आता लगेचच संपन्न करू या प्रयोग ‘कुमारसंभवम.”
आषाढाच्या पहिल्या दिवशी पावसाला सुरुवात झाली. बाहेरही आणि आतही.