किंकाळी – द्विशतशब्द भयकथा
किंकाळी – द्विशतशब्द भयकथा


त्या दिवशी अंधारून आले होते.भर दुपार असुनही काळोख दाटला होता. वारा सुटला होता. खिडक्यांची तावदान एकमेकांवर आपटून आवाज होत होता. भरीस भर म्हणून झाडांच्या पानांची सळसळ चालूच होती!!
मीना घराच्या आतल्या खोलीत एकटीच पुस्तक वाचनात मग्न होती. वाचन सुरु झाले की तिला कशाचेही भान राहत नसे. अचानक तिने पाहिले की समोरच्या भिंतीजवळ एक अभद्र आकार वळवळ करत होता. त्याचा रंग कसलातरी विचित्र, गडद तपकिरी प्रकारात होता. काहीतरी किळसवाणं होतं ते!! हे नक्केच सामान्य नव्हतं.वेगळं होतं! त्या आकाराला काळ्या रंगाच्या मिशांसारखं काहीतरी होतं. वेगाने वळवळणारा तो आकार आता भिंतीवर चढला होता. भिंतीवर आणि जमिनीवर लीलया फिरत होतं ते विचित्र रूप!! त्याची हालचाल पाहणं मीनासाठी भयप्रद होतं. ती जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात सरकून बसली. जोपर्यंत तो आकार जवळ येत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत ही भावना तिच्या मनात होती. पण पुढे हीच परिस्थिती कायम राहणार नव्हती. नशिबाच्या मनात काहीतरी वेगळं होतं.
अत्यंत घाबरलेल्या मीनाला स्वतःच्या श्वासांचा आवाजही धडकी भरवत होता. सर्वांग आक्रसून बसली होती ती त्या कोपऱ्यात!! पुस्तक केव्हाच बाजूला कुठेतरी पडलं होतं. थोड्या वेळाने घडू नये ते घडायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता तो आकार वेगात मीनाच्या जवळ येऊ लागला. घाबरून कानावर हात ठेवत तिने जोरदार किंकाळी फोडली!!!!
मीनाचा आवाज ऐकून ‘तो ‘आत आला. त्याच्या हातात आयुध दिसलं आणि रक्षणकर्ता भासला ‘तो’ मीनाला!!
त्यांना आयुधांचा वार केला आणि ते जे काही अमंगल होतं त्यातून सुटका झाल्याचं समाधान मीनाच्या चेहऱ्यावर झळकलं!!
‘तो’ बाहेर आल्यावर इतरांकडे पाहत म्हणाला,”आपली मीनाताई झुरळाला घाबरून ओरडली. दिला एक झाडूचा फटका ठेवून!! खिडक्या लावायला पाहिजेत,पाऊस पडेल आता “.