STORYMIRROR

Pallavi Kulkarni Sukalikar

Inspirational

1.0  

Pallavi Kulkarni Sukalikar

Inspirational

आपुलाची वाद आपणासी

आपुलाची वाद आपणासी

2 mins
48.3K


"हाय! कसा आहेस?"

"हाय! मी मस्त, तू?"

"मी पण मजेत. बऱ्याच दिवसांनी चक्कर मारली इकडे? आज मुक्काम आहे की नेहमीप्रमाणे उडती भेट?"

"आहे थोडा वेळ. काय करणार, वेळच मिळत नाही हल्ली. मलाही इथे राहण्याची इच्छा होते गं! इथल्या शांत वातावरणात रममाण होण्यासारखं सुख नाही. ही जागा घाई, गडबड, गर्दी, व्याप ह्या सगळ्यापासून मुक्त आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वीकएंड आणि वीकडेच्या चक्रात आयुष्य फिरतंय, बाकी काही खास होत नाही बघ. वीकेंड आला की मुठीत पकडलेल्या वाळूप्रमाणे निसटून जातो आणि वीकडेझ सरता सरत नाहीत."

“खरंय, हे रहाटगाडगंच आहे जणू! त्यालाच तर आयुष्य म्हणतात. ते चुकलंय का कोणाला? मी त्याबद्दल विचारात नाहीच्चे."

“मग? हे बघ, नोकरी करतोस की व्यापार? लग्न झालं का, झालं असेल तर गोडबातमी कधी, असे बोअर प्रश्न विचारू नको प्लीझ. तुला तर माहितेय की असंच चाकोरीबद्ध आयुष्य वाट्याला आलंय माझ्या. पण तुझ्याशी त्याबद्दल चर्चा करायची मुळीच इच्छा नाही”

“नाही रे, असं काही मी विचारणार नाही. मला सांग, तुझी कला काय म्हणतेय? सध्या कोणतं नवीन चित्र काढत आहेस? कित्येक दिवसात तुझी चित्रं पाहिली नाहीत. तुला माहितेय ना, की तुझ्या बोटांमध्ये जादू आहे? जेव्हा तू अलगद पेन्सिल कॅनवासवर फिरवतोस तेव्हा, चित्र आपोआपच आकार घेतं. जेव्हा तू रंगांचा ब्रश हातात घेऊन मायेने चित्रात रंग भरतोस, तेव्हा चित्र जिवंत होऊन संवाद साधण्यासाठी व्याकुळ होऊ पाहतं."

“…..”

“तुझ्या शांत असण्यात उत्तर मिळालं मला. अरे का करतो आहेस ही सगळी धावपळ? सुख असं त्याच्या मागे धावून मिळत नसतं राजा! स्वतःसाठी काही क्षण वेळ काढ. चित्र, गाणी, भटकणे ह्यापैकी काहीही कर. तुझे छंद आहेत ते! तुझं मन प्रसन्न राहील. मग वीकडेझ आनंदी असतील आणि वीकएंडला तू आनंदाची उधळण करशील. मनाच्या फार अपेक्षा नसतात रे आपल्याकडून! पण त्या पूर्ण नाही झाल्या तर सगळंच निरर्थक वाटू लागतं. मनाला वेळ दे, त्याला लगाम घालू नको, एकदातरी मुक्त बागडू दे त्याला! तुझे संस्कार आणि हेतू शुद्ध आहेतच. पण ह्याचा अर्थ असा नाही की तू कंटाळवाणं आयुष्य जगावं. जीवन ही देवाने दिलेली बहुमूल्य देणगी आहे. प्रत्येक क्षणाचं सोनं कर. चिडचिड झाली तर तिला फाट्यावर मार आणि पुढे जा! मग बघ जीवनाचं सध्याचं रूप पालटून बहार येईल.”

“खरंय तुझं. मी नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीन. तुझ्याशी बोलुन हलकं हलकं वाटत आहे. पण तुला माझ्याबद्दल एवढं सगळं कसं माहित?”

“मलाच माहित असणार ना वेडू, असं म्हणून ती प्रसन्न हसली.”

आणि तो मस्त शीळ घालत आरशासमोरून हटला!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational