केविलवाणे घर
केविलवाणे घर
स्टेजवरील कलाकार आपल्या प्राजक्ती स्वराने वातावरणाला सुगंधित करून मनाला तृप्तीचे घोट पाजत होता. स्वर्गीय अनुभूती देत होता. कर्णमधुर असे त्याचे गीत ऐकत आप्तांशी चाललेली चर्चा अधिकच लयबद्ध होत होती. सुख स्वप्नांच्या मागे धावताना स्वतःलाच स्वतःशी भेटायला वेळ नसलेले सारे असेच एका आप्तांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या निमित्ताने एकत्र आलेले..उत्सव मूर्ती व उत्सव मूर्तीचे अगदी जवळचे नातेवाईक सोडल्यास इतर जण गप्पा मारण्यात दंग होते. रोहित मात्र जरा अलिप्त वाटत होता सगळ्यांच्यात......तारुण्याच्या उंबरठ्यावरील विशी पंचविशीच्या अवखळ वयात पन्नाशीचा पोक्तपणा घेऊन अगदी गंभीर स्वमग्न होऊन बसला होता.. उत्सव मूर्तीचा म्हणजे पूजाचा सख्खा भाऊ पण असाच तुटकपणे परक्यासारखं बसला होता. रामरावांना हे जरा खटकले.
रामराव, रोहितच्या वडिलांचे दूरचे स्नेही. रोहित लहान असताना कायम त्यांच्या घरी रामरावांचे येणे-जाणे चाले. नंतर मात्र नोकरीत मिळालेली बढती, नंतर झालेली बदली, यामुळे मात्र गेली कित्येक वर्ष भेटगाठ नव्हती. मात्र आजच्या या सोहळ्यासाठी असलेल्या खास निमंत्रणामुळे ते आले होते. रोहितच्या जवळ जाऊन ते बसले तेव्हा रोहितने त्यांच्याकडे पाहिलेदेखील नाही. रामरावांनी मग स्वतःहून संवाद साधला. पण त्याच्या डोळ्यात ओळखीचे कोणतेही भाव दिसले नाही. तेव्हा रामरावांनी गत आठवणींना उजाळा देत स्वतःची ओळख करून दिली. हास्याची एक मंद औपचारिक रेषा रोहितच्या चेहऱ्यावर उमटली मात्र हवा तसा प्रतिसाद त्याने दिला नाही. रामरावांशी तुटकपणे बोलून तो कोण्या मित्राशी फोनवर बोलण्यात गुंग झाला. नंतर थोड्यावेळाने उठून बाहेर गाडीवर बसून कोठेतरी चालला गेला. हे पाहून रामरावांना आश्चर्य वाटले. नंतर संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत रोहित त्यांना दिसला नाही आणि त्यांच्या घरच्या मंडळींना ही त्याची आठवण वा उणीव भासली नसल्याचे रामरावांना जाणवले..
दुसऱ्या दिवशी रामरावांना नोकरीच्या गावी वापस जावयाचे असल्याने ते प्रकाशरावांना म्हणजे त्यांचे परममित्र व रोहितचे वडील यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. प्रकाशरावांनी या सात-आठ वर्षात बरीच प्रगती केल्याचे त्यांना जाणवले. त्यांचा प्रशस्त बंगला बघून रामराव मनोमन सुखावले. प्रकाशराव यांनीही त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले. खरं म्हणजे कालच साखरपुडा झालेला असल्याने प्रकाशरावांच्या घरी पाहुण्यांची वर्दळ असेल तेव्हा आपण जाऊन त्यांना त्रास देणे योग्य होणार नाही, पण परत भेट होणे या योगाच्या गोष्टी त्यामुळे आपण फक्त उभ्या उभ्या बोलून निघू म्हणून ते जरा अवघडलेपणानेच त्यांच्याकडे आले. पण त्यांच्या घरात असलेली शांतता पाहून त्यांना आश्चर्य वाटले..बहुदा सर्व नातेवाईक आपापल्या घरी गेले असावेत असा तर्क त्यांनी काढला.
प्रकाशरावांबरोबर मग त्यांची पूर्वीसारखीच गप्पांची मैफल जमली.पूजा तिच्या खोलीमध्ये टीव्ही बघत होती तर रोहित बहुदा त्याच्या खोलीत असावा. थोड्या वेळाने रोहित बाहेरून आत आला. रामरावकडे न बघता तो त्याच्या खोलीत गेला, पुन्हा कपडे बदलून काहीही न बोलता बाहेर निघून गेला. रामरावांना आश्चर्यच वाटले ते प्रकाशरावना म्हणाले देखील, "का रे प्रकाश? हा रोहित किती बदललाय दहा वर्षात? लहान असताना मी तुमच्याकडे आलो की किती आनंद व्हायचा त्याला..! किती गप्पा मारायचा माझ्याशी ..! मग आपण क्रिकेट खेळायचो. आज या रोहितकडे बघून वाटते, तो दुसराच कोणीतरी होता."
प्रकाशराव हसत म्हणाले,"अरे आता मोठा झालाय तो ! मुलं मोठी झाली की त्यांच्याच भाव विश्वात रमतात नाही का?"
रामरावांनीही मग तो विषय न वाढवता म्हटले ,"बाकी काही म्हण प्रकाश, घर मात्र मस्त बांधलंस तू. एकदम प्रशस्त !!"
हे ऐकताच प्रकाशराव मनोमन सुखावले. त्यांनी म्हटले, "हो, पूर्ण प्लॅन करूनच बांधले मी ते. प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या,त्यात स्वतंत्र टीव्ही,बेड,बाथरूम, कपाट, टेबल......म्हणजे एकदा खोलीत गेले की बाहेर यायचे कामच नाही.."
रामराव उत्सुकतेने आपले बोलणे ऐकत आहे हे पाहून अजून उत्साहात प्रकाश राव म्हणाले, "किती दिवस मागासल्या विचारांनी राहायचे आपण ? थोडे आधुनिक झाले पाहिजे ना,हे बघ मित्रा.. मुले आता मोठी झाली आहेत, त्यांचे विचार,त्यांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र झाली आहेत. त्यांनाही थोडी स्वातंत्रता, प्रायव्हसी हवी की नको ?आपल्या वेळेस आपल्या वडिलांची घरं लहान, कायम सगळ्यांचे तोंडावर तोंड त्यातून निर्माण होणारे वाद, वडिलांचा धाक,विचार स्वातंत्र्यावर येणारी गदा या सर्व गोष्टींमुळे बिघडणारी मानसिकता या गोष्टींचा अनुभव गाठीशी असल्याने आणि सुदैवाने आर्थिक स्थिती चांगली असल्याने मी सर्व प्लॅनिंग करून घर बांधले आहे... कसं...आपण जे भोगलं ते मुलांनी भोगायला नको." तोच प्रकाश रावांच्या बायकोने,सुनयना वहिनींनी डिशमध्ये नाष्टा आणून रामरावांना दिला. मी जरा बाहेर जाऊन येते बीसीचे सामान आणायचे आहे असे प्रकाशरावांना सांगून त्या बाहेर चालल्या गेल्या.
मोठ्या विस्मयाने रामराव त्याच्या मित्राच्या घरातील बदललेलं वातावरण पाहात असताना प्रकाशराव पुन्हा म्हणाले,"तर मी काय म्हणत होतो ? प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य जपता यावं म्हणून मी प्रत्येकासाठी स्वतंत्र खोल्या बांधल्या.मुलांना धाक नावाचा प्रकार मी ठेवला नाही.प्रत्येकाला शेवटी मनाचा धाक असतोच नाही का ?" असं म्हणून ते जोरात हसायला लागले.
ते ऐकून पूजा, त्यांची लाडकी लेक खोलीमधून मोबाईलवर बोलतच बाहेर येऊन म्हणाली,"पप्पा... प्लीज.. जरा हळू आवाज ठेवा.मैत्रिणींशी बोलतेये मी.डिस्टर्ब नका करू." आणि डायनिंग टेबलवर ठेवलेले जेवणाचे पदार्थ एका ताटात वाढून घेत पुन्हा तिच्या खोलीत निघून गेली.
प्रकाशराव कौतुकाने म्हणाले,"बघितले.... यासाठी स्वातंत्र्य दिले. तुला सांगतो, गेल्या कित्येक दिवसांपासून आमच्यात वादच नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात आपापल्या खोलीत. प्रत्येकाकडे घराची स्वतंत्र चावी. कसं आहे, कधी ऑफिसची पार्टी असेल तर मला यायला उशीर होतो... मुलांच्या पार्टी असतील तर त्यांना यायला उशीर होतो. मग उगाच अडकाआडकी फोनाफोनी आणि भांडण...... नकोच !! त्यापेक्षा प्रत्येकाकडे किल्ली देऊन ठेवली म्हणजे ते त्यांचे येतील. आपल्याला टेन्शन नाही. तुला सांगतो, कोण्या नातेवाईकांकडे काही कार्यक्रम असला तरी मुले येत नाहीत. मी पण आग्रह करत नाही.आम्ही दोघेच हजेरी लावतो.परवाची गंमत सांगतो, हिच्या भावाचा मुलगा आमच्याकडे आला होता. रोहित व पूजाने त्याला ओळखलेच नाही.....परत आवाज न होऊ देता तोंडावर हात ठेवून प्रकाशराव हसले... आणखी एक गमतीचा किस्सा... एकदा पूजाची मैत्रिण आमच्याकडे आली, हिला वाटले पूजा कॉलेजमध्ये गेलेली आहे त्यामुळे तिने तिला पूजा कॉलेजला गेली असे सांगितले. तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली ,"काकू घरीच आहे ती, आता पंधरा मिनिटांपूर्वी फोन करून मला बोलावले आहे तिने... आम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे." परत तेच हास्य आपल्या ओठांवर आणत प्रकाशराव म्हणाले,"पाहिलेस..... म्हणजे घरात असूनही माहिती नव्हते हिला की, पूजा तिच्या खोलीत आहे की नाही?, तिच्या मैत्रिणीने सांगितले ते. पूजाचं लग्न ठरलं हे रोहितला साखरपुड्याच्या दोन दिवस आधी कळलं... आता बोल?? अर्थात तिचेही लव मॅरेज आहे.तिने आम्हाला त्या मुलाविषयी सांगितल्यावर जुजबी चौकशी करून आम्ही लग्न ठरवून टाकले.कसे आहे त्यांना आयुष्य काढायचं आहे एकमेकांबरोबर... त्यामुळे त्यांच्या पसंतीच्या मुलाबरोबरच काढलेले बरे नाही का?रो हितलाही मी म्हटले आह, 'बाबा रे!! तुला कोणती मुलगी आवडली असेल तर सांग... लावून देऊ लग्न आम्ही.. परत आपल्यावर ठपका नको."
कुटुंबातील व्यक्तींच्या नात्याची सुटत चाललेलीे वीण.. नात्यातील कोरडेपणा... हरवत चाललेल्या प्रेमाचा ओलावा... आपलेपणा... स्वैराचाराकडे झुकणारे स्वातंत्र्य...या सर्व गोष्टींना कौतुकाच्या वेष्टनात लपेटून, आपल्या मनाला गोंजारत असलेले प्रकाशराव रामरावांना आज खूपच खुजे वाटले..... छोट्या घरातही मोठ्या मनाने वावरणारी माणस... धाकाच्या सुईत शिस्तीचा प्रेमाचा दोरा ओऊन नात्याला गुंतवून ठेवणारी घरातील वडीलधारी माणसे....! संवादातून फुलणारे प्रेम...घरातील सदस्यांच्या हसण्या बोलण्यातून निवळणारे राग रुसवे....यातून वाढत जाणारा जिव्हाळा....आपल्या स्वानुभवाने आपल्या मुलांना त्यांच्या यशस्वी जीवनाच्या वाटेवर नेणारी घरातील जेष्ठ व्यक्ती...त्या सर्वांच्या प्रेमळ आधाराने आयुष्यातील येणाऱ्या संकटातही प्रबळ राहणारी आपली मानसिक स्थिती... आणि संकटांशी दोन हात करण्याचे धैर्य..! या सर्व गोष्टींची हवीहवीशी वाटणारी श्रीमंती, तिचे मोल.....!
आधुनिकीकरणाच्या, स्वातंत्र्याच्या त्यांच्या डोळ्यावर आलेल्या पडद्यामुळे या गोष्टी त्यांच्या नजरेआड झाल्या होत्या. हा पडदा जेव्हा गळून पडेल तेव्हा फार उशीर झालेला असेल. आणि सध्या तरी तो पडदा गळून पडणे अवघडच हे जाणवल्याने रामराव प्रकाश राव यांचा निरोप घेऊन निघाले. आत्म्यातून खुरटत जाणारं प्रकाश रावांचं ते घर त्यांना फार केविलवाणे भासले....!
