"जाणीव...."
"जाणीव...."
अचानक दारावर कुणीतरी ठोठवलं, मला दचकून जाग आली. अर्धवट झोपेत घड्याळ्यात पाहिलं, मध्यरात्रीची वेळ होती ती. मी जरा घाबरलेच, तेवढ्यात परत कुणीतरी दार वाजवल, मी तडक उठले आणि अंधारात हळूहळू पाउलं टाकत हॉल मधे आले, सगळीकडे काळोख होता आणि नीरव शांतता. मी हॉलचा लाइट लावला आणि दारवार असलेल्या आयहोल कड़े माझी नजर गेली, ह्या क्षणी त्या आयहोलची खरी गरज मला समजली. पावलांचा आवाज न करता आयहोल मधून बाहेर पाहिलं आणि मी थबकली! बाहेर माझी आजी उभी दिसली... मी ताबडतोब दार उघडलं तेच तीची गोरीपान कांती, पांढरे शुभ्र केस, मोठ्या कपाळावर लावलेली अंडाकृती काथ्या रंगाची टिकली, सरळ धारदार नाक, चेहऱ्यावर स्मित हास्य, लाल काठांची पिवळी साडी, हातात दोन सोन्याच्या बांगड्या, तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं आणि एक प्रसन्न सुगंध दरवळत होता तेव्हा... तिला पाहून घळा घळा अश्रुधारा सुरु झाल्यात आणि मी तिच्याशी काही बोलणार तेवढ्यात ती बोलु लागली, "अग दार उघडायला किती वेळ लावलास, हे घे!" म्हणत माझ्या हातात तिने एक पांढरी शुभ्र चौकोनी जवळ पास 200 पानांची वही दिली, ती वही इतर वह्यांसारखी मुळीच नव्हती काहीतरी वेळग होतं त्या वहीत हे जाणवत होतं. मला काही बोलायचा अवकाश न देताच ती पुढे बोलू लगली... "ही वही खास तुझ्या करता आणली आहे, माझ्या कडून तुझ्यासाठी ही भेट! रोज रात्री झोपायच्या आधी ही वही उघडायची आणि लाल रंगाच्या पेनाने तुला उद्याचा दिवस कसा हवाय ते लिहून काढायचे. पण अट अशी की दिवस कसा हवा ते फक्त एका ओळीतच लिहायचे आणि कुणी वाचणार नाही अश्या ठिकाणी ही वही ठेवायची. विसरु नकोस एकदा लिहायला सुरुवात केली की रोज लिहावच लागेल, रोज सकाळी उठून आधीच्या दिवसाचं पान फाडून वाहत्या पाण्यात सोडायचं आणि मागे न बघता घरी परतायचं! मी जाते आता, सुखी समाधानी राहा!" अस म्हणत ती चक्क निघूनही गेली... मी ह्या प्रकारातून बाहेर येते न येते तेवढ्यात जाणीव झाली की.... की आजीला जाऊन आज तब्बल एक महिना झालाय! ही इथे आली मला दिसली माझ्याशी बोलली माझ्या हातात चक्क वही दिली! मी किती तरी वेळ स्तब्ध होती डोळ्यातून अश्रू वाहत होते. आजी एक मीठी मारायची होतीग तुला परत तुझ्या पोटावरुन हात फिरवायचा होता... खुप खुप रडले मी, ती आता परत कधीच दिसणार नाही ही जाणीव खुप खुप दुखावणारी होती...
पण स्वतःला सावरत मी ती वही उघडली, त्या वहीच्या प्रत्येक पानावर पान नंबर टाकलेला होता. कुतूहलाने मी शेवटचं पानं पाहीलं त्यावरचा आकडा "365" असा होता...! दुसऱ्या दिवशी माझा एक महत्वाचा interview होता लगेच लाल पेन हातात घेतला आणि लिहले देवा मला interview मध्ये यशदे...! आजी तुला माझी किती काळजी आहे गं आणि परत डोळ्यात पाणी आले, हा interview म्हणजे माझ्या करता बाकी सगळ्या गोष्टीं पेक्षा मोठा होता.
दुसऱ्या दिवशी उत्साहाने उठून मी interview ला गेले. Interview यशस्वी झाला. माझा आनंद गगनात मावेनासा होता. माझ्या हाती जादूची वही लागली होती! देवाचे आणि आजीचे कोटी कोटी धन्यवाद मानून मी पुढे रोज रात्री वही लिहीत गेली आणि तस तसं रोज घडतही गेलं. आधल्या दिवशीचे पान फाडायचे आणि नदीत सोडायचे हा नियम पण चुकू दिला नाही...
एक दिवस, एका छोट्या कारणा मुळे सुजय म्हणजे माझा नवरा आणि मी आमच्यात खूप मोठं भांडण झालं मी खुप वैतागली होती... रागा रागात वहीत लिहलं देवा मला जगायचा कंटाळा आलाय मला उद्याचा दिवस नाही बघायचा! असे लिहून मी वही बंद करून डोळ्यात अश्रू घेऊन झोपी गेले...! झोप येतंच नव्हती आणि अचानक जाणीव झाली की मी वहीत काय लिहिलंय आता तेच होणार उद्या मी जिवंत नसणार, ती जाणीव होताच काळीज पिळून निघालं पोटात गोळा उठला माझ्या मागे माझ्या लोकांना किती अतोनात दुःख होईल आणि माझ्या आयुष्यात मला करायच्या असणाऱ्या किरीतरी गोष्टी राहून गेल्या... आईनी प्रेमाने दिलेली साडी नाही नेसली, सुजयवर माझं किती प्रेम आहे हे त्याला सांगायचे राहून गेले, आई बाबांचे त्यांनी मला दिलेल्या अगणित सुखां करता धन्यवाद मानायचे राहून गेले, जे लोक माझ्या मुळे दुखावले होते त्यांची माफी मागायची राहून गेली! माझ्या जवळच्या, प्रेमाच्या लोकांना भेटायचे राहून गेले... उद्या हे सगळं जगायला आपण नसणार ही जाणीवच खुप भयावह होती! हजारो गोष्टींनी डोकं भणभणू लागलं.
"प्रीतीsss, आगं प्रीती ऊठ! आज काय झालय तुला.... आग 8 वाजलेत, माझा डबा, मला उशीर होतोय ऑफिसला जायला...! मी ताडकन उठुन बसले! मला कळेचना काय होतंय... धावत जाऊन आधी वहीचा शोध घेतला, सुजयला समजेचना मी अशी का वागतेय... ती वही कुठेच नव्हती! ते सगळं काहीच झाल नव्हतं...! ते सगळं स्वप्न होतं! मी दोन मिनिटं केस मागे सरकवत स्तब्ध उभी होती... आणि भानावर येताच सुजयला मीठी मारून ढसा ढसा रडत होती... तो पण घाबरला, त्याला कळेचना मी असं का वागतेय... त्यानी मला शांत केलं पाणी दिलं, काय झालं विचारताच मला पडलेलं स्वप्न मी त्याला सांगितलं... त्याच्या डोळ्यांच्या कडा पण पाणावलेल्या होत्या, त्याला पण जाणीव झाली की आपण जे आयुष्य जगतोय ते किती चुकीचं आहे! मिळालेला क्षण किती अनमोल असतो, आत्ताचा हा क्षण जगायचा! पुढच्याची काळजी नाही आणि गेलेल्या दिवसाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं... एका स्वप्ना मुळे आमचा आयुष्य कडे बाघायचा आणि जगायचा दृष्टिकोन इतका बदलून जाईल असं "स्वप्नात" सुद्धा वाटलं नव्हतं. आजी तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तू नसतांनाही तुला माझी काळजी आहे! हे सगळं बोलत असतांना त्याचा फोन वाजला फोन ऑफिस मधून होता. 11.00 वाजले होते वेळ कसा गेला आम्हाला समजलाच नाही... त्याने फोन वर लगेच सांगीतले आज येणार नाही! मग काय तर कामाच्या समुद्रात नखशिखान्त बुडालेल्या सुजयने ऑफिसला 6 महिन्यात न घेता येणारी सुट्टी घेतली आणि आजीने दिलेल्या शिकवणी नुसार खुप दिवसांपासून मनात असलेल्या सगळ्या गोष्टी बोलूनटाकल्या, ज्या लोकांचे मन माझ्या मुळे दुखावले होते त्यांची मी माफी मागीतली, ज्या लोकांनां भेटावेसे वाटत होते त्यांना भेटलो. ही जाणिवेची संधी सगळ्यांच्याच आयुष्यात यावी अशी ईश्वर चरणी मागणी केली. आणि हे सगळं केल्यावर एकदम हलकं झाल्या सारखं वाटलं अगदी पंख फुटावे आणि अलगद आकाशात उडावे असं...!