जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने
जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने
मातृदिन, पितृदिन, मैत्रीदिन, गुलाबदिन, जलदिन, पेयदिन असे कितीतरी दिन कोणाच्या सुपीक डोक्यातून येतात काही कल्पना नाही. रोज कोणता ना कोणता दिन असतो. आज काय म्हणे जागतिक अन्नदिन. काही का असेना या वेगवेगळ्या दिनाच्या निमित्ताने लोक लिहतात चर्चा करतात हे काही कमी नाही. आज नेहमीप्रमाणे मोबाईल मधील मेसेज पहात होतो. एका मेसेजने माझे लक्ष वेधून घेतले. जागतिक अन्न दिनाच्या शुभेच्छा असा तो मेसेज होता. मला आश्चर्य वाटले. म्हटले चला लिहायला आणखी एक आगळा वेगळा विषय मिळाला.
आज जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने आपला जो पोशिंदा समजला जातो त्या शेतकरी वर्गाला खर तर शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्याच्या प्रति ऋण व्यक्त केले पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन प्रमुख मूलभुत गरजा आहेत. त्यातील अन्न ही गरज केवळ शेतकरी वर्ग उन्हापावसाचा विचार न करता शेतात राबत असल्याने पूर्ण होऊ शकते. विचार करा शेतकऱ्याने शेतात न राबण्याचा निर्णय घेतला तर आपली काय अवस्था होईल? यामुळे बळीराजाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. त्याच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. शेतकरी आहे म्हणून आपण पोटभर जेवू जेवतो.
जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने आपण काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. समाजात आज विषमतेची दरी पहावयास मिळते. एक वर्ग खाऊन पिऊन सुखवस्तू जीवन जगत आहे. दुसरा वर्ग अन्न मिळत नाही मानून कुपोषित रहात आहे. रोटी या चित्रपटात देखील जीवन जगण्यासाठी अन्नाची चोरी करतानाचे दृश्य दाखवले गेले आहे. शालेय पोषण आहार योजनेत गोरगरीब कुटुंबातील मुले थाळी भरुन भात व त्यावर भाजी आमटी घेऊन झाडाखाली बसून खातानाचे दृश्य पाहिले की मनात कालवाकालव होते. गरिबी हा शाप वाटायला लागतो.
मंगल कार्यालयाच्या ठिकाणी जी दोन दृश्ये आपणास पहावयास मिळतात ती आजच्या जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने विचारात घेण्यासारखी आहेत.पहिले दृष्य मंगल कार्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांचे. आपणास हवे तेवढे खाध्यपदार्थ न घेता ताटात भरमसाठ घेऊन ते टाकून देणारे महाभाग दिसून येतात. खाऊन माजावे पण टाकून माजू नये हा संस्कार त्यांच्या वर झालाय की नाही याची शंका येते. कितीतरी अन्न अशा कार्यक्रमातून वाया जाते. देणारी व्यक्ती महागड्या दराने भोजनाची व्यवस्था करते पण त्याचा आस्वाद घेणाऱ्याला त्याची कोणतीच फिकीर नसते. घरात अन्न वाया न घालवणाऱ्या महिला देखील निम्मे पदार्थ ताटात टाकून उठतात हे आश्चर्य नाही का?
मी एका कार्यक्रमासाठी पुण्यात गेलो होतो तेथे ताट स्वच्छ केल्याशिवाय भोजनकक्षाच्या बाहेर कोणालाही जाऊ दिले जात न्हवते. हात जोडून ताटातील सर्व पदार्थ संपवण्याची विनंती केली जात होती. मला ते दृष्य खूप आवडले. आपणास हवे तेवढे घेतले म्हणून बिघडते कोठे? पण हा विचार करायला आपल्याकडे वेळ कुठे आहे?
दुसरे दृश्य मंगल कार्यालयाबाहेरचे. दहा बारा मुले बायका वाया गेलेले अन्न बाहेर कधी येते याच्या प्रतीक्षेत. जेवण जास्त झाले म्हणून ज्यांनी अन्न टाकले त्याच अन्नावर उपजीविका करणारा हा एक वर्ग. त्यांच्याकडे पाहिल्यावर अन्नाचे मोल किती आहे याची कल्पना येते. आजच्या या जागतिक अन्न दिनी आपण यातून काही बोध घेणार की नाही? आणखी एक सकस अन्न खाण्याचे सोडून आपण फास्टफूड कडे आकर्षित होत चाललो आहोत. पूर्वी घराघरात नाष्टा हा प्रकारचं न्हवता. लोक सकाळी भाकरी कालवण खाऊन घराच्या बाहेर पडत होते. पहाटे उठण्याची सवय होती. चहा घेण्याच्या वेळेला जेवण तयार असायचे. आज साऱ्या गोष्टीचा कंटाळा आलेली पिढी. नाष्टा जेवण याच्या पार्सलवर उपजीविका करणारी शहरातील कुटुंबे कसले सकस खाणार? चहा बिस्कीट, नाष्टा ही मुळात आपली भारतीयांची पद्धतच नाही. शेतकरी कुटुंबात नाष्टा हा प्रकार अपवादानेच असतो. माझा एक शेतकरी मित्र सकाळी कॉलेजला येताना जेवण करून आलेला असायचा.
कालानुरूप त्यात बदल होणारच. ते स्वीकारले पाहिजेत. हे जरी खरे असले तरी चांगल्या गोष्टी परत आत्मसात करायला काय हरकत आहे.
सर्वांनी सकस अन्न खाल्ले पाहिजे. शरीर व मन सुदृढ ठेवले पाहिजे. अन्न वाया घालवता कामा नये. आपल्या प्रमाणे दुसऱ्याच्या पोटाचा देखील विचार करावा. भुकेल्याला अन्न व तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे यासारखा दुसरा दानधर्म नाही. पूर्वी कोणीही घरी आला तरी जेवल्याशिवाय जात नसे. आज शहरात आपण कोणाच्या घरी गेलो तर जेवणार का? असा औपचारिक प्रश्न विचारला जातो. अन्न दानाचे महत्व जाणून घेणे ही काळाची गरज आहे.