Dilip Bhide

Drama Action

4.0  

Dilip Bhide

Drama Action

ह्याला जीवन ऐसे नाव भाग ६

ह्याला जीवन ऐसे नाव भाग ६

5 mins
190


एक दिवस मॅडमनी पंडितला विचारलं की इतक्या वेगवेगळ्या विषयांबद्दल तुला इतकी बरीच माहिती कशी काय आहे ? तेंव्हा पंडित ने सांगितलं होतं की त्याला वाचनाची खूप आवड होती त्यामुळे बरीच माहिती त्याच्याजवळ गोळा झाली आहे.

आणि पूजा आणि मंत्र ? ते केंव्हा शिकला ? त्याच्यासाठी तर बरीच वर्ष खर्ची घालावी लागतात. पण एवढी वर्ष घालवून सुद्धा तू म्हणतोस की तू पौरोहित्य करणार नाहीस म्हणून, हे कसं काय ? मॅडमचा दुसरा प्रश्न.

मग पंडितनी त्याची नोकरी वगैरे वगळून बाकी नर्मदा परिक्रमांची कथा सांगितली. एक दिवस त्यांनी विचारलं की

“पंडित तू लग्न का नाही केलंस ? कोणी मुली सुचवल्या नाहीत का ?”

“बऱ्याच मित्रांनी आणि त्यांच्या बायकांनी प्रयत्न केलेत पण नाही जमलं. बहुधा माझ्या लग्नाचा योग नसावा. मग मी ही सोडून दिलं. एकटा जीव सदाशिव. छान चाललं आहे की.” तो विषय मग तिथेच थांबला.

एक दिवस रात्री मॅडम ला भयंकर स्वप्न पडलं आणि त्या दचकून जाग्या झाल्या. मॅडमची बोबडी वळली होती दरदरून घाम सुटला होता. घशाला कोरड पडली होती. जीभ टाळूला चिकटली होती. गुदमरल्यासारखं होत होतं. तोंडातून शब्द फुटत नव्हता. पाण्याची बाटली शेजारच्या टेबलावर होती. ती घेण्यासाठी हात लांब केला तर धक्का लागून बाटली खाली पडली. बाटली घरंगळत बहुधा पलंगा खाली गेली असावी कारण डोळे ताणून सुद्धा दिसत नव्हती. बेडस्वीच दाबून दिवा लावण्याचा प्रयत्न केला पण दिवे गेले होते. मॅडम ने इलेक्ट्रिसिटी बोर्डाला मनातल्या मनात लाखोली वाहिली. पंडित ला बोलावण्यासाठी कॉल बेल लावली होती त्याचा पण उपयोग नव्हता. पायाला गुढ्ग्या पासून प्लास्टर होतं त्यामुळे पाय वाकत नव्हता. तश्याच अवस्थेत मॅडम कशाबशा खाली उतरल्या, आणि जमिनीवर बसल्या. बसल्यावर लक्षात आलं की त्या पाण्यात बसल्या आहेत. बाटलीतल पाणी सांडलं होतं. तशातच थोडी शोधाशोध केल्यावर बाटली सापडली. त्यांनी आधाशासारखी बाटली तोंडाला लावली. बाटलीत जेमतेम दोन चमचे पाणी होतं. तहान तर नाही भागली पण कोरड शमली. उठणं शक्यच नव्हतं मग तशाच बसून राहिल्या. केंव्हा जमिनीवरच आडव्या झाल्या ते त्यांना पण कळलं नाही.

सकाळी पंडित त्यांच्या खोलीत चहा घेऊन गेला तेंव्हा मॅडम जमिनीवर झोपल्या होत्या. पंडितला वाटलं की त्या पलंगावरून पडल्या आणि बेशुद्ध झाल्या आहे. त्यानी जोरजोरयात हाका मारल्या आणि चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला. मॅडम जाग्या झाल्या. आणि उठून बसल्या. चेहऱ्यावर अत्यंत त्रासिक भाव होते. एक क्षणही न घालवता त्यांनी पंडित वर आग ओकायला सुरवात केली. पंडित चुपचाप काही न बोलता उभा होता. पांच मिनिटानंतर त्यांचा राग शांत झाला. मग म्हणाल्या की “नुसता शुंभा सारखा, बघत काय उभा राहिलास, मला उठायला मदत कर, मला पलंगावर बसायचय.”

नंतर पंडित ने त्यांना चहा बिस्किटे दिली. चहा प्यायल्यावर मॅडम नेहमीच्या मूड मध्ये आल्या.

“काय झालं मॅडम खाली कशा पडल्या ?” पंडितने विचारलं.

मग मॅडम नी सगळी कथा सांगितली. आणि म्हणाल्या की

“पंडित तू आत्ताच शेजारच्या खोलीत शिफ्ट हो. काल रात्री इथे असतास तर आवाज ऐकून तू आला असतास. आणि पुढचं रामायण टळलं असतं.” 

“पण मॅडम माझ्यासारख्या नोकर माणसाने घरात राहणं म्हणजे लोकांना बोलायला संधि देण्या सारखं होईल.” – पंडितने आपली शंका बोलून दाखवली.

“तुझ्या अंगाला भोकं पडतील ?” मॅडमनी विचारलं.

“नाही.” – पंडितनी काही न समजून उत्तर दिलं.

“मग माझं मी बघून घेईन. तू चिंता करू नकोस. आणि पंडित, एक तरी असा प्रसंग सांग की, जेंव्हा मी तुला नोकरा सारखं वागवलं आहे ?” – मॅडम

“नाही मॅडम,” पंडित म्हणाला. “तो तुमचा मोठेपणा आहे. पण लोकांच्या दृष्टीने हे विचित्र आहे.”

“माझी सोय बघायला लोक येणार आहेत ? नाही ना, मग मी सांगते तस कर. शेजारच्या रूम मध्ये शिफ्ट हो. त्या रूम मध्ये सगळी सोय आहे. तुला काहीच त्रास होणार नाही.” – मॅडमनी निर्णय दिला.

“ठीक आहे मॅडम.” पंडितने नाईलाजाने मान तुकावली.

सव्वा महिना झाला आता चार दिवसांनी प्लास्टर निघायचं होतं. त्या दिवशी रात्री बेडपॅन ची गरज लागली. रात्रीचे अकरा वाजले होते आणि बाई तर निघून गेली होती. आता काय करायचं ? मॅडम आणि पंडित दोघेही संकटात सापडले. थोडा वेळ तसाच गेला. पण आता मॅडम ना असह्य व्हायला लागलं होतं. शेवटी पंडितला त्यांच्या कडे बघणं कठीण झालं. तो म्हणाला

“मॅडम प्राप्त परिस्थितीतून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग मला सुचतो आहे. तुम्ही संकोच बाजूला ठेवा. मी बेडपॅन देतो. मी कोणाला काही सांगाण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही पण सांगू नका आणि विसरून जा.”

मॅडमचा चेहरा शरमेने काळवंडून गेला. पण दूसरा उपाय त्यांना पण सुचत नव्हता शेवटी त्यांनी नाईलाजाने मान डोलावली.

दुसऱ्या दिवशी पंडित चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेला तेंव्हा मॅडम म्हणाल्या की

“पंडित मला खूप लाज वाटते आहे. काल तुला माझी नको ती सेवा करावी लागली. काय करू मी ? सॉरी.”

“मॅडम प्रसंग सगळ्यांवरच कधी ना कधी येत असतात. त्यांची वाच्यता न करणेच श्रेयस्कर. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ.” पंडितने त्यांना आश्वस्त केलं. 

महिना भरानंतर मॅडमनी पुन्हा बँकेत जायला सुरवात केली. मॅडम ड्राइव करणं शक्यच नव्हतं. त्यांनी मैत्रिणीला, विशाखाला फोन केला की कोणी रिक्शा वाला आहे का जो ने आण करेल. ती चौकशी करते अस म्हणाली. पण मग म्हणाली की “पंडितलाच विचार, त्यानीच तुला दवाखान्यात नेलं होतं त्या दिवशी.” मॅडम ला पण आठवलं, त्यांनी पंडितला विचारलं आणि पंडित हो म्हणाला. आता पंडितची धावपळ सुरू झाली. सकाळी लवकर उठून आंघोळ आटपून स्वयंपाक करायचा ,डबा भरायचा आणि मॅडमला बँकेत सोडून यायचं. संध्याकाळी पुन्हा घ्यायला जायचं. आल्यावर चहा नाश्ता मग रात्रीच्या जेवणाची तयारी सगळं आटपायला रात्रीचे अकरा वाजायचे. दिवस भराभर जात होते. विचार करायला फुरसत नव्हती. एक दिवस बँकेतून येतांना मॅडम जरा वैतागलेल्या दिसल्या. नेहमीची प्रसन्न मुद्रा नव्हती.

घरी आल्यावर त्याने चहा देता देता विचारलं. “काय झालं मॅडम चेहरा जरा उतरलेला दिसतोय ? काही प्रॉब्लेम आहे का ?”

“या मेडीक्लेम चा काही तरी घोळ झालेला दिसतोय. काय करावं समजत नाहीये. मी हे पहिल्यांदाच करते आहे, म्हणून गोंधळ उडाला आहे.” मॅडमनी सांगितलं.

“काय झालं काय पण ?” – पंडित.

मग मॅडमनी काय झालंय ते सांगितलं आणि म्हंटलं “म्हणून क्लेम मिळत नाहीये. पण तू का विचारतो आहेस ? तुला काही कळतंय का त्याच्यातलं ?”

पंडित नी काही न बोलता त्यांच्या ऑफिस मध्ये फोन लावला. पंडितचा फोन आला म्हंटल्यांवर सर्वांनाच बोलायचं होतं. अर्धा तास सगळ्यांचं समाधान करण्यात गेल्यावर मग पंडितनी मॅडम चा प्रॉब्लेम सांगितला आणि क्लेम सेट्टल करता येतो का ते पहायला सांगितलं. पंडित जवळ जवळ तासभर अस्खलित इंग्रजी मध्ये अधिकारवाणीने बोलत होता आणि मॅडम त्यांच्याकडे चकित नजरेने पहात होत्या.

(क्रमश:)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama